प्रभावहीन गजकेसर योग

जातकाच्या कुंडलीत जेंव्हा गजकेसर योग असतो तेंव्हा कुंडलीला ऊर्जितावस्था येते असे माझ्या पहाण्यात आले आहे. उर्जितावस्था याचा अर्थ दिवसेंदिवस जातक प्रगती करतो. त्याची आर्थिक स्थिती सुधारत जाते. त्याला अधिकार मिळतो. जातक यशस्वी होतो असे अनेकदा पहाण्यात येते. गजकेसर हा जुना पारंपारिक योग, ज्योतिष विषयात नुकतेच अभ्यास करु लागलेल्या ज्योतिषप्रेमी अभ्यासकांसाठी पुन्हा पाहू.

गज म्हणजे हत्ती तर केसरी म्हणजे सिंह. या दोन्ही प्राण्यांची शक्ती या योगात जातकाला प्राप्त होते. चंद्र आणि गुरु यांच्या केंद्रस्थानी युतीत असता हा योग जातकाच्या पत्रिकेत होतो. ही युती अंशात्मक असावी. जर हीच युती केंद्र स्थानी कर्क राशीत आणि कर्क नवमांशात म्हणजेच पुनर्वसू नक्षत्रात झाली तर हा योग आणखी बलवान होतो. याचे कारण चंद्र कर्केत स्वराशीत, स्वनवमांशात आणि गुरु उच्च राशीत उच्च नवमांशात येतो.

केंद्रात हा योग जास्त फ़लदायी होतो तर इतरही भावात या योगाची फ़ळे मिळताना दिसतात. आपल्याला सहसा गजकेसर योग आहे पण जातकाला अन्य कोणताही अशुभ योग नसताना उर्जितावस्था आली नाही असे असे पहायला मिळत नाही.

चंद्र मनाचा कारक आहे आणि गुरु विचार शक्तिचा, विवेकाचा कारक आहे.  समोरच्या व्यावहारीक परिस्थितीचे आकलन होऊन विवेकपुर्ण निर्णय घेतल्याने जातकाला यश  मिळत जाते. गजकेसर योगात जातकाची मनाची स्थिती उत्तम रहाते आणि व्यावहारीक निर्णय बरोबर येतात त्यामुळे त्याला यश प्राप्त होत जाते. यश मिळाले की धन आणि उर्जितावस्था येते असा सर्वसाधारण अनुभव आहे.

आपल्या समोर अभ्यासासाठी अशी एक पत्रिका आहे ज्यात अंशात्मक गजकेसर योग असताना उर्जितावस्था आली नाही.

जेंव्हा मी या जातकाला भेटलो, कुंडली पाहिली,  आणि माहिती घेतली ती अशी होती. जातक ४७ वर्षांचा ( १९७० सालचा जन्म - बाकीचे विवरण मुद्दाम लिहण्याचे टाळले आहे ) याचे लग्न होऊ शकले नाही कारण याने ३५ नोकर्या बदलल्या. आजवर कुठेही सहा महिनेपेक्षा जास्त
नोकरी करु शकला नाही. याने ग्रॅज्युएशन करुन एमबीए केलेले आहे. परंतु व्यवहारात याला माणसे ओळखता येत नाही. परिस्थितीचे गांभिर्य समजत नाही म्हणून हा नोकरी टिकवु शकत नाही.

जातक सध्या धाकट्या भावाच्या पैशाने जगतो, मधेच कधीतरी नोकरीला लागतो पण ती कधी सुटेल याचा भरवसा नसतो.

या जातकाच्या पत्रिकेत दशमेश चंद्र गुरुच्या अंशात्मक युतीत विशाखा या गुरुच्याच नक्षत्रात आहे. क्षणभर गजकेसर योग जरी बाजूला ठेवला
तरी दशमेश हा षष्ठेशाच्या अंशात्मक युतीत असताना अर्थ त्रिकोणातले दोन महत्वाचे ग्रह एकमेकांच्या युतीत येतात. दशमेश चंद्र वक्री होऊ शकत नाही. सहाव्या स्थानाचा अधिपती गुरु वक्री नाही. दोघेही केंद्र स्थानी आहेत. लग्नाचे अंश ७ आहेत त्यामुळे भावचलीतात हे दोन्ही ग्रह व्यय स्थानी जात नाहीत. लाभेश सुध्दा व्ययस्थानी नाही. ही एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पत्रिकेत ग्रहस्थिती असताना जातक हमखास नोकरी व्यवसायात यशस्वी होतो. हाताखालचे लोक चांगले भेटतात. एकंदरीत फ़ार मोठी उर्जितावस्था आली नाही तरी जातक स्थिर आयुष्य जगायला हवा. या जातकाचा अर्थ त्रिकोणातला धनेश व्ययात असताना, पैसे साठवले जाणार नाही पण कमी ही पडू नयेत.

इथे गजकेसर योग प्रभावहीन झालेला दिसतो. काय कारण असावे याचा मी विचार  करत होतो. या पत्रिकेत राहू युतीत असल्याने होणारा कोणताही ग्रहण योग नाही. राहू केतुच्या एका बाजूला सर्व ग्रह असताना असलेला तथाकथीत कालसर्प योग नाही. एका ज्योतिषी महोदयांच्या  सांगण्यावरुन या जातकाची नारायण नागबली विधी करुन झाला आहे. जननशांती नाही मग काय झाले असावे ? असा विचार करत मी या जातकाशी संवाद सुरु केला. ही पत्रिका कदाचित इंटरनेट /इमेल/ व्हॅटसटसप माध्यमातुन सोडवली असती तर कदाचीत नेमके समजले नसते.

या जातकाशी बोलताना मी विचारले की शेवटची नोकरी का सोडली. तो म्हणाला, मी एका हॉस्पीटलमधे होतो. जिथे मुख्य डॉक्टर मला काही
कॅश शहरातल्या इतर डॉक्टर्स ना द्यायला सांगत असत. त्या शिवाय मी त्यांचे अनेक कॅशचे व्यवहार करत असे. पण जी कॅश मी हाताळत
असे खास करुन शहरातल्या डॉक्टर्स ना नेऊन देत असे ते काम मला चुकीचे वाटे म्हणुन मी ही ३५ वी नोकरी सोडली.

मी विचारले यात चुकीचे काय होते ? त्यावर तो जातक म्हणाला हे कट प्रॅक्टीसचे कमिशन होते. हॉस्पीटलच्या मुख्य डॉक्टरांनी ह्या कट प्रॅक्टीसमधे  मला सामिल करुन घेतले हे माझ्या बुध्दीला पटत नव्हते. यावर मी कपाळाला हात लावला. मी म्हणालो, एखादी जेन्युईन केस
शहरातल्या हॉस्पीटलला रिफ़र केली तरी काही कमीशन केस रिफ़र करणार्या डॉक्टर्स ना देण्याची प्रथा आजकाल आहे. यात तुझा काय रोल आहे ? समजा, शहरातील अनेक डॉक्टर्स अनावश्यक केसेसही या
हॉस्पीटलला रिफ़र करत असतील. पण ते रिफ़र करणारे आणि त्या पेशंटला अनावश्यक हॉस्पीटलमधे भरती करुन घेणारे डॉक्टर्स  नैतीकतेला धरुन वागत नाही असे कोणीही म्हणेल. या चेन मधे तु सामिल आहेस असे कोणीही म्हणणार नाही. खासकरुन जेंव्हा तुला नोकरी नाही अश्यावेळी मिळेल ते काम करणे हे योग्यच आहे.

मी पुढे विचारले, काय हो, आधीच्या ३४ नोकर्या सुध्दा अशाच कारणासाठी सोडल्या ? यावर त्याने ३-४ केसेस सांगीतल्या त्यातही या जातकाचा वैचारीक गोंधळ आहे हे मला समजले. वास्तवीक पैसे देणे, घेणे, योग्य माणसाला देणे इत्यादी तांत्रिक गोष्टीत या जातकाला काही अडचण नव्हती. हा जातक मानसीक रोगी नव्हता पण विचार योग नसल्याने प्रत्येक ठिकाणी त्याला खोट दिसत होती. तो वाद ही घालत नव्हता पण नोकरी या ना त्या कारणाने स्वत: सोडत होता.

काय कारण असावे ह्या वैचारीक गोंधळाचे असे मी शोधले असता मला पंचमभावारंभीचा राहू दिसला. तसेच पंचमेश शनि वक्री दिसला
ज्यामुळे हा जातक वैचारीक गोंधळाच्या सापळ्य़ात अडकला आहे असे मला वाटले. पंचम भाव माणसाला विचार देतो. पंचमेशही, सामान्यव्यावहारीक शिक्षणाचा कारक ग्रह असतो. तो स्वत: वक्री असल्याने जातकाचे व्यावहारीक निर्णय घेताना वैचारीक गोंधळ होतो.

विवाह न होण्यासाठी ग्रहस्थिती सुध्दा कारणीभुत आहे. सप्तमेश व्ययात आहे  आणि शुक्राच्या प्रतियोगात वक्री शनि आहे. पण यामुळे लग्न होणारच नाही असे नाही तर वैवाहीक सौख्याची हानी होईल असे म्हणता येईल. परंतु जातक नोकरीची अशी धरसोड करत असेल. घरचेइतर शेती-वाडी असे उत्पन्न नाही अश्यावेळी कोण याचे लग्न लावणार हा सामाजिक प्रश्न रहातोच. लग्नेश वक्री शनिच्या प्रतियोगात असताना जातकाला सर्वसामान्य यश मिळत नाही. इथे तर विचार चुकीचा करणारा जातक असताना यश कसे मिळणार ?

ह्या जातकाच्या पत्रिकेची मी केलेली ही कारण मिमांसा आहे. कुणाला अजून काही वेगळे म्हणायचे असेल तर आपले स्वागत आहे.

No comments:

Post a Comment