Thursday, February 8, 2018

१२ फ़ेबृवारी २०१८ ते १४ मार्च २०१८ ह्या काळाचे राशीभविष्य तसेच महाशिवरात्रीला काय करावे याची माहिती.

आपणा सर्वांना आत्तापर्यंत मी रवि ज्या महिन्यात ज्या राशीत असतो तो महिना गृहीत धरुन राशीभविष्य प्रसिध्द करतो. या महिन्यात १२ फ़ेबृवारी २०१८ ते १४ मार्च २०१८ ह्या काळात रवि कुंभ राशीत आहे. कुंभ राशीत रविला बलहीन असतो. या काळात अनेकांना विवीध रोगांना सामोरे जावे लागते. यास्तव या महिन्यात खाणे-पिणे याचे विशेष लक्ष देऊन करणे आवश्यक ठरते. प्रत्येकाच्या पत्रिकेत असलेला रवि हा रोगप्रतिकारक शक्तीचा कारक बलहीन असल्याने हे सांगणे आवश्यक वाटते.

या महिन्यात दोन महत्वाची पर्वे येतात. १३ फ़ेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी शिवआराधन केल्याने नातेसंबंधात असलेले प्रश्न कमी होतात किंवा सुटतात. शक्य असेल तर उपवास करावा. उपवासाचा आग्रह नाही. परंतु शंकराला आधी पाणी मग थोडेसे दुध पुन्हा पाणी याचा अभिषेक करावा. घरात पिंडी असेल तर घरी करावा. मंदीरात गर्दी असल्याने हे शक्य नसेल तर घरी करावे.  हे करताना तांबे धातूचे  ताम्हण घेऊ नये. स्टीलचे चालेल किंवा चांदीचे असल्यास उत्तम. कारण तांबे आणि दुध याचा संपर्क आल्यास ते जल/दुध तिर्थ म्हणुन प्राशन केल्यास रोग उद्भवतील. यानंतर १०८ बेलाची पाने वाहून प्रत्येक पान वहाताना ओम नमशिवाय हा जप करावा. नाते संबंध सुधारावेत अशी प्रार्थना शिवाकडे करावी. त्यानंतर आरती करावी. दुधमिश्रीत पाणी तिर्थ घ्यावे. शंकराला नैवैद्य म्हणुन जे ठेवाल ते प्रसाद म्हणुन घ्यावे. महाशिवरात्रीच्या दिवशी हे संध्याकाळी प्रदोष पुजनाने शिवाअराधन करुन नातेसंबंध पुन्हा पुर्ववत होतात असा अनुभव आहे.

२६ फ़ेब्रुवारीला येणारी आमलकी एकादशीचे दिवशी आवळा वृक्षाच्या सहवासात असणे. आवळा श्री विष्णूंची पुजा करुन अर्पण करणे. प्रसाद रुपी आवळ्याचे सेवन करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आवळा ७२ रोगांवर औषध आहे. आयुष्याची वाढ करणारा आहे.

या शिवाय होळी व रंगपंचमी हे पारंपारीक सण आल्याने हा महिना आनंदाचा आहे.

हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून सुध्दा वाचा हे सांगणे आहेच शिवाय ही लिंक कॉपी पेस्ट करुन पुढे पाठवली तर मला आनंदच वाटेल.

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास : आपल्या राशीचा स्वामी मंगळ ७ मार्च पर्यंत अशुभ स्थानी असल्यामुळे आपल्या आक्रमक स्वभावाला अपेक्षीत यश नाही तुर्तास धाडस करु नका अंगाशी येईल. १४ फ़ेबृवारी ते २ मार्च पर्यंत लाभस्थानी बुध रवी आणि शुक्र असल्याने अनेक मार्गाने आपल्याला लाभ अपेक्षीत आहेत मग विनाकारण धाडस कशाला करता ?

आपले नातेसंबंध उत्तम असतील. नोकरी व्यवसायात आपल्याला रिपोर्ट करणारे रिपोर्टी आपल्याला लाभदायक गोष्टी करतील. तुमच्या वरिष्ठांची चिंता अजून सहा महिने करुच नका. आपला जोडीदारही आनंदात असेल.  आपल्या संततीलाही नेत्रदिपक यश मिळेल असा हा महिना आपल्यासाठी लाभदायक आहे.

वृषभ रास: जोवर शनि अष्टमात आहे तोवर सहजा सहजी काहीच घडणार नाही पण तुम्हाला याची चिंता असणार नाही. चिकाटी आणि साखर पेरणी हा आपला गुण जोवर आपणापाशी आहे तोवर ग्रहमान कसेही असू द्या. सहसा या महिन्यात कोणाची ऑफ़िशीयल प्रमोशन्स होत नाहीत पण आपल्याला स्पेशल अधिकार या महिन्यात मिळतील आणि ते पुढे प्रमोशनने तुमच्या पाशी कायम रहातील असे योग आहेत.

नोकरी व्यवसायाच्या पटलावर अनेक गोष्टी घडुन मनासारखे व्हावे असे योग आहेत. नातेसंबंधापैकी चिंता फ़क्त जोडीदाराच्या आरोग्याबाबत  ७ मार्च नंतर करावी लागेल. हारी हुवी बाजी को जितना मुझे आता है हे गाणे प्रत्येक वेळेला मनासारखे झाल्यावर तुम्ही मनातल्या मनात का होईना तुम्ही म्हणणार आहात.

मिथुन रास: तुमच्या राशीचा स्वामी बुध महिन्याच्या सुरवातीला भाग्य स्थानी तर नंतर २ मार्च ला कर्म स्थानी जाऊन बसणार आहे. बर भाग्यात असलेला बुध कुंभ राशीत असल्याने तुमची असली ताकद बुध्दीमता वापरुन केलेली प्रत्येक कृती तुम्हाला संधी निर्माण करुन देणार आहे पुढे यश ही देणार आहे. तुमचे व्यावसायीक अंदाज/अ‍ॅनालिसीस बरोबर येईल.

कौटुंबीक स्तरावर संतती कला क्षेत्रात नविन संधी घेताना दिसेल. भावंडे सुध्दा आपपल्या क्षेत्रात नाव कमवताना दिसतील. तुमचे रिपोर्टी काय करु शकतील याचा अंदाज तेव्हडा घ्या. वरिष्ठांची चिंता करु नका. एकंदरीत चांगले ग्रहमान या महिन्यात आहे.

कर्क रास : हा महिना काही तुमच्या साठी बनविलेला नाही अशी खुण गाठ बांधून मगच कामाला सुरवात करा. आपल्याला अपयश मिळेल का तर तसे नाही. पण मनासारखे घडावे असे ग्रहमान नाही इतकेच नमूद करायचे आहे.

कौटुंबीक स्तरावर काळजी करावी या पेक्षा त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागेल असे ग्रहमान आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जरा बरे ग्रहमान महिनाभर असेल. ३ मार्च नंतर परिस्थितीत जरा बदल घडेल हे ही नसे थोडके.

सिंह रास : तुमच्या राशीचा स्वामी पुढील महिनाभर सप्तम स्थानी असणार आहे. हे स्थान म्हणजे बाजार आहे. तुम्ही कलाकार असाल तर तुम्हाला कला पेश करायला उत्तम संधी महिनाभर असली तरी पैसा वसूल परफ़ॉर्मन्स द्यायला हवा आहे. Conviction चा पैसा आहे अस  संजय जाधव वारंवार म्हणतात याचा अनुभव तुम्हाला येईल.

कौटुंबीक स्तरावर ठिक असेल. नोकरीच्या ठिकाणी आगाऊ रिपोर्टीचे कान ओढून लंबे करण्याची वेळ आली आहे. हे करताना नियमाचा आधार घेतल्याशिवाय काही करायचे नाही असा नियम ठेवा. पुढच्या महिन्यात साहेबांच्या कानाला लागण्याची भिती वाटावी असे कान ओढा म्हणजे सगळे  व्यवस्थित होईल.

कन्या रास: या महिन्यात तुमच्या महिन्याचा स्वामी सहाव्या स्थानी २ मार्च पर्यंत असेल. आरोग्य संभाळावे लागेल पण त्याचे बरोबर झालेले नुकसान भरुन काढण्याच्या संधी सुध्दा वाट पहात आहेत. धक्का मारल्या शिवाय काहिही पदरात पडणार नाही असे एकंदरीत वातावरण महिनाभर आहे.

कौटुंबीक स्तरावर सर्व काही ठीक असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संघर्ष करावा लागेल पण २ मार्च नंतर ही स्थिती कायम रहाणार नाही असे एकंदरीत वातावरण आहे.

तूळ रास : आपल्या राशीचा स्वामी ३ मार्च पर्यंत पंचम स्थानी म्हणजे नवनिर्मीतीच्या कामात व्यस्त असणार आहे. तुमचा भाग्येश तुम्हाला या कामी मदत करणार आहे. फ़क्त डोळे मिटा अनेक नविन गोष्टी तुमच्या बंद डोळ्यांच्या समोर दिसू लागतील. जे कलाकार आहेत त्यांना नविन सुचेल. एक डायरी जवळ ठेवा. जे सुचेल ते लिहीत जा.  ज्यातून नविन कलाप्रदर्शनाची संधी पुढे चालून येईल.

कौटुंबीक स्तरावर कटकटी असणार आहेत. पण तुमच्याकडे ते बॅलन्स करायाचे कौशल्य असल्यामुळे फ़ारसे बिघडणार नाही.

वृश्चिक रास: तुमच्या राशीचा स्वामी या महिन्यात वृश्चिक राशीत असणार आहे. मंगळाची ही दुसरी रास आक्रमक पणे जे साध्य होत नाही ते कुटीलपणे मिळवण्यात आग्रही असते. ज्यांना याचा डंख बसतो ते दु:खी होतात. काय करणार आपले हे हत्यार आहे. आपला राशी स्वामी योध्दा आहे. सतत प्रयत्नशील असणे त्याचा स्वभाव आहे.

७ मार्च पर्यंत जरा आराम करा. आपले विचार सोडून  जाणिव करुन घ्या की गादीचा कापूस असो ही फ़ोम किती मऊ असतो. या सुखमंचकी आनंद घ्या. नंतर आपली कारवाई सुरू करा. कौटुंबिक स्तरावर हाच अनुभव तुम्हाला येणार आहे. नोकरी व्यवसायात आपली स्थिती चांगली असेल. मग कशाची चिंता आहे?

धनू रास: आपल्या राशीचा मोठा त्रासदायक काळ सुरु आहे. त्यातून मूळ नक्षत्राच्या लोकांना खासच त्रास आहे. साडेसाती अगदी त्रासदायक होण्याचा काळ म्हणतात तो हाच कारण सध्या शनि मूळ नक्षत्रात आहे. तरी सुध्दा न कंटाळता शनिवारी शनिदर्शन आणि दररोज नवग्रह पीडाहर स्त्रोत्रातला खालील मंत्र म्हणला की त्रास कमी होईल.

सुर्यपुत्रो दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय: ।
मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनि ॥

शनिला ही प्रार्थना समजते आणि शनि महाराज पीडा हरण करतात असा अनुभव आहे.  इतर राशींना जर साडेसातीचा त्रास होत असेल तरी उपाय हाच आहे.

मकर रास:  आपला राशी स्वामी खर्चाच्या, मनस्तापाच्या आणि पीडेच्या स्थानी आहे. आपले धैर्य आणि चिकाटी हे गुण शनिचे असल्यामुळे तुम्ही खचून न जाता मार्गक्रमण करता. असे असले तरी हा महिना आपल्यासाठी रोख रक्कम घेऊन येणार आहे. कुठे गुंतवू हा प्रश्न तुमच्या मनी असेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. फ़ार रिस्क घेऊ नका असा सल्ला आहे. हा निर्णय लवकरात लवकर म्हनजे २ ते ३ मार्च च्या आत घ्यावा लागणार आहे.

कौटुंबीक स्तरावर हा महिना चांगला असेल. अनेक नातेवाईकांचे घरी आगमन होईल. त्यांच्या बरोबर सहभोजन होईल. या महिन्यात काही रिपोर्टी आणि तुमचे वरिष्ठ सुध्दा घरी आल्यास आश्चर्य वाटु नये असे ग्रहमान आहे. पाहूणचार करताना काय बोलायचे याचे भान ठेवा म्हणजे हवे ते घडेलच.

कुंभ रास: महिनाभर दशमस्थानी असलेला मंगळ नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी संघर्ष/ पळापळ देणार आहे. अचानक काही घडेल त्याला तोंड द्यावे लागेल याची तयारी ठेवा. ७ मार्च नंतर ही परिस्थिती नियंत्रणात येईल.

कौटुंबीक स्तरावर ग्रहमान ठीक आहे. नोकरी व्यवसायात सर्वांचे सहकार्य मिळून वर लिहल्याप्रमाणे संघर्षात्मक परिस्थितीवर आपण यश मिळवणारच आहात. एकंदरीत असे ग्रहमान महिनाभर आहे.

मीन रास: ३ मार्च पर्यत ग्रहस्थिती तुमच्या नियंत्रणात नाही. प्रवास, आजारपण, खर्च याने नुसते वैतागुन जाल असे ग्रहमान ३ मार्च पर्यंत असणार आहे. त्यानंतर मात्र हळू हळू परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल.

कौटुंबीक स्तरावर जोडीदार आजारी पडणे किंवा सासुरवाडीच्या लोकांचे आरोग्य बिघडणे याच बरोबर घरातले नोकर किंवा तुम्ही ज्यांच्यावर नोकरी व्यवसायात अवलंबुन आहात असे लोक आजारी पडणे किंवा त्यांच्या घरचे लोक आजारी झाल्याने ते कामावर न येणे आणि वरिष्ठ मात्र कामाचा तगादा करणे या कचाट्यात तुम्ही सापडणार आहात. असे झाले तर काय करायचे याचे प्लॅनिंग  केलेले असेल तर कुठलेही संकट सहजपणे परतावता येते हा मंत्र ध्यानात ठेवावा.