Sunday, August 12, 2018

१७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य

नमस्कार, ज्योतिषप्रेमी लोकहो. मी घेऊन आलो आहे १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य. या काळात रवि अर्थात सुर्य आपल्या स्वत:च्या म्हणजे सिंह राशीत असणार आहे. तसेच १८ ऐप्रिल २०१८ ला वक्री झालेला शनि ६ सप्टेंबर २०१८ ला मार्गी होणार आहे. त्या आधी २७ ऑगस्टला मंगळ मार्गी होऊन आजवर झालेल्या रस्त्यावरच्या अपघातांची संख्या कमी होईल.

हा महिना तसा सणांचा महिना आहे. १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत श्रावण महिन्याची सुरवात झालेली असेल. २६ सप्टेंबर २०१८ राखी पोर्णिमा, २ सप्टेंबर २०१८ ला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि महिन्याच्या शेवटी १३ सप्टेंबरला गणरायाचे आगमन असे सर्वांच्या मनाला मोहून टाकणारे सण या महिन्यात आहेत.

मी आपल्याला काही उपाय दर महिन्याला सांगत असतो तसा या ही महिन्याला एक नाही तर दोन सांगणार आहे.

डॉक्टरी तपासणीत काही दोष नाही परंतु संतती नाही अश्या जोडप्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी मंदीरातील जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी व्हावे. विशेष पुजन करुन संतती व्हावी अशी प्रार्थना करावी. याच सोबत संतान गोपाल स्त्रोत्राचे १००० पाठ किंवा संतान गोपाल मंत्राचे ४००० पठण संकल्प पुर्वक दोघांनी करावे. श्रावण महिन्यात हे पाठ सुरु करुन कृष्ण जन्माष्टमीला संपतील अशी योजना करावी.

अनेक लोक घरात वाद विवाद, क्लेश यांनी त्रासलेले असतात. १३ सप्टेंबर ला होणारे गणरायाचे आगमन वातावरण आनंदाने भरुन टाकते. या निमीत्ताने घरात १० दिवस गणपती नसला आणि दिड दिवस असला तरी १० दिवस एकमेकांना टाकून बोलायचे नाही हा नियम करा. त्याच सोबत हे कृतीमधून पण दिसू द्या. उगाच आदळ आपट ह्या सारख्या रागामुळे होणार्या कृती हे दहा दिवस टाळा. एकदा या सुंदर वातावरणाची सवय १० दिवस झाली की पहा, हे वातावरण संपुच नये असे वाटेल. मग काय हरकत आहे ?

आता १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य पाहू. हे आपल्या चंद्र राशी तसेच लग्न राशीकडुन सुध्दा वाचावे.

मेष रास : २७ ऑगस्ट पर्यत राशीचा स्वामी वक्री असल्यामुळे ४ मे पासून नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी सुरु असलेली कामाची धावपळ जरा मंदावली असली तरी २७ ऑगस्ट नंतर पुन्हा वेग येईल.  ७ नोव्हेंबर पर्यंत आता विश्रांती नाही. पुढील काही दिवसात चांगले नियोजन करुन अनेक कामे हातावेगळी करण्याची संधी चालून आलेली आहे. यात संघर्ष सुध्दा आलाच. आजवर तुमची बाजू रास्त असून संघर्ष टाळला असेल तर संघर्ष झालाच तर ही मात करण्याची संधी आहे हे जाणून संघर्ष करा.

१ सप्टेंबर नंतर शुक्र तुळ राशीत म्हणजे तुमच्या सातव्या स्थानी जातो. तुमचा स्वभाव आक्रमक असला तरी थोडेसे रोमॅंटिक व्हायला काय हरकत आहे. तरुणाईला हा काळ हातात हात घालून बागेत फ़िरण्याचा, वचने देण्याचा आणि घेण्याचा आहे. काही काळ उग्रपणा सोडून हा आनंद घ्या.

वृषभ रास : कमी कष्टात जास्त कमाई कशी होईल असा विचार करणारी अर्थ त्रिकोणातली आपली रास आहे. या महिन्यात राशीचा स्वामी शुक्र आपल्या स्वत:च्या राशीत १ सप्टेंबरला जाणार आहे. तुळ राशीतला शुक्राचा प्रवास व्यापारी असाल तर व्यवसायाच्या अनेक संधी देणार आहे. यातून होणारी कमाई थोडी उशीरा होणार म्हणुन नाराज होऊ नका. अजून दोन महिन्यांनी हा व्यापारातून प्रत्यक्ष फ़ायदा दिसेल. पण आत्ताच त्यासाठी सुरवात करणे आवाश्यक आहे.

नोकरदारांच्या साठी सुध्दा आपले महत्व निर्माण होईल अश्या कामांच्या सुसंधी येतील. जेणे करुन तुम्हाला वरिष्ठांना तुम्ही कसे फ़ायद्याचे काम करत आहात हे पटवून देऊ शकाल. ही संधी सोडू नका हे सांगणे तुमच्या राशीला अजिबातच आवश्यक नाही.

मिथुन रास : आपल्या राशीचा स्वामी या महिन्यात २ सप्टेंबरला तिसर्या स्थानी जातोय. तिसरे स्थान लेखन आणि संवाद कौशल्यासाठी महत्वाचे असल्याने २ सप्टेंबर पासून उत्तम संवाद साधण्याच्या सुसंधी चालून येतील. आपल्या हातून लेखन घडेल. प्रकाशक असाल तर पुस्तके प्रकाशनाचे काम घडेल. तुळेतल्या शुक्राशी बुधाचा लाभ योग होत असल्याने या लेखनाला नवनिर्मीतीची झळाळी असेल. उगाच इतर कोणाच्या लेखनाचे मुल्यमापनाचे काम सोडुन आता  स्वतंत्र लेखन तुम्ही करावे असा विचार करा.

 आपल्या संततीच्या सुवार्ता येतील त्यामुळे आनंद या महिन्यात अजूनच वाढणार आहे. या सुवार्ता शैक्षणिकच असतील असे नाही तर नोकरी- व्यवसाय संदर्भातील सुध्दा असू शकतील. संतती काही कारणाने दुर रहात असेल तर या महिन्यात प्रत्यक्ष भेट घडेल.

कर्क रास : वैवाहीक जोडीदाराशी संघर्षाचे वातावरण संपले नसले तरी या महिन्याच्या उतरार्धात दोन ग्रहांच्या राशीबदलामुळे मात्र वातावरण बदलणार आहे. शुक्र चतुर्थात आल्याने घरात नविन फ़र्निचर घ्यायचे की नविन गाडी या चर्चेला सुरवात झाल्याने मागील महिन्यात थोडी कटूता आली असली तरी ती संपेल. माफ़ करणे हा तुमचा स्वभाव असल्याने जणू काही घडलेच नाही या भावनेने तुम्ही या चर्चेत भाग घेऊन आपला चॉईस सांगाल.

घरात जेष्ठ व्यक्तींचे आगमन होण्याची शक्यता असल्याने आपण त्या पाहूण्यांच्या सरबराई साठी नियोजन करावे लागेल. घरच्या जेष्ठ व्यक्तीचे सगळ्यांच्या अपेक्षेनुसार स्वागत करुन स्त्री असाल तर हवे नको ते पहाणे हे काम तुम्हाला सहज जमते. केवळ औपचारीक पणाने नव्हे तर आस्थेने तुम्ही हे कराल त्यामुळे जेष्ठांच्या कौतुकाला पात्र व्हाल.

सिंह रास : तुमच्या राशीचा मालक रवि गेले महिनाभर राशी स्वामी कर्क या राशीत आणि त्यातून बाराव्या स्थानी असल्याने अनेकदा माना पेक्षा अपमान सहन करावा लागला असेल. पण आता राशीचा मालक महिनाभर तुमच्या स्वत:च्या राशी आल्याने तुम्हाला बळ प्राप्त होईल. तुमच्या नुसत्या दर्शनाने अनेकांची घाबरगुंडी उडेल त्यामुळे तुमचे किमान दर्शन अनेकांना घडेल अशी व्यवस्था करा बाकी सर्व आपोआप घडेल.

तुमच्या शत्रु स्थानी सध्या बलवान मंगळ असल्याने शत्रुच्या कारवाया जरी थंडावल्या असल्या तरी २७ तारखेनंतर पुन्हा त्याला शत्रुच्या कारवायांना तोंड फ़ुटेल. यावर कशी मात करायची याचा विचार करुन ठेवा. रवि सर्व ग्रहांचा राजा असल्याने असल्या कारवाया डाव्या हाताने थंड करण्याचे कसब तुमच्याकडे आहेच पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी निरिक्षण, परिक्षण आवश्यक आहे.

कन्या रास : कन्या राशीला हा महिना फ़ारसा चांगला नाही. राशीचा स्वामी बुध अशुभ फ़ळे निर्माण करणार्या स्थानातून आणि नक्षत्रातून जात असल्यामुळे व त्यातून तुमच्या राशीचा स्वभाव धाडसाने कृती करण्याचा नसल्यामुळे विचारपुर्वक कृती करा जेणे करुन यश मिळेल. व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवास घडतील. जास्त शारिरीक मानसीक कष्ट होतील पण अपेक्षीत काम मात्र न होण्यामुळे निराशा सतावेल यासाठी तुम्ही कोणतेही काम सुरु करण्यापुर्वी उत्तम नियोजन करा. ते नियोजन जिथे तुमच्या नियंत्रणात नाही तिथे सुध्दा यशस्वी होईल अश्या योजना करा म्हणजे त्रास कमी होईल.

व्यावसायीक स्तरावर जरी जा महिना त्रासदायक असला तरी कौटुंबिक स्तरावर मात्र हा महिना बरा असेल. घरी स्त्रीवर्ग असलेल्या पाहूण्याचे आगमन असेल. या निमीत्ताने कौटुंबिक संमेलने होऊन आनंद होईल. आवडीचे अन्नपदार्थ खाण्याचे योग या निमीत्ताने महिनाभरात अधून मधून येतील.

तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी १ सप्टेंबरला तुमच्या राशीत येणार आहे आणि लाभेश रवि महिनाभर लाभ स्थानी असणार ही परिस्थिती तुमच्या राशीला चांगली आहे. या सोबत भाग्येश बुध लाभात असल्याने हा महिना लाभदायक आहे असे वर्णन या महिन्यासाठी यथार्थ आहे. या महिन्यात अनेक कामे मार्गी लागतील. यातून चांगले लाभ होतील हे वेगळे सांगावयाची गरज नाही.
गरज आहे झालेल्या लाभाचे उत्तम नियोजन करण्याची.

व्यावसायीक स्तरावर जरी उत्तम चालले असले तरी घरात मात्र अशांतता राहील. ही परिस्थिती अजून थोडे दिवस असणार आहे. घरगुती वातावरण स्फ़ोटक न होऊ देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल तर हा महिना खुप त्रास न होता जाईल.

वृश्चिक रास : हा संपुर्ण महिना रवि तुमच्या कर्म स्थानी असणार आहे. ज्यांचे प्रमोशन होणे अपेक्षीत आहे त्यांना ते मिळेल किंवा त्या संदर्भात हालचाली होतील. ज्यांचा जन्म १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर काळातला आहे व दुपारी १२ च्या दरम्यान आहे त्यांना तर हा अनुभव येण्याची शक्यता अजून जास्त आहे. काहींना ह्या महिन्यासाठी वरिष्ठ रजेवर असल्यामुळे अधिकार प्राप्त होणे अपेक्षीत आहे.

आपल्याला काही पैसे रोकड यांचा व्यवहार करणे अपेक्षीत आहे. कुठेही रोख स्वरुपात रक्कम आजकाल फ़ारशी हाताळली जात नाही. पण गरज भासल्यास आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कौटुंबीक स्तरावर उतरार्धात आपला वैवाहीक जोडीदार आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. इतका भाग सोडला तर महिना चांगलाच जाणार आहे.

धनू रास :  हा महिना आपल्या साठी चांगले ग्रहमान घेऊन आलाय. धार्मिक यात्रा आपल्याला या महिन्यात घडणे संभव आहे. श्रावण महिना, आपला धार्मिक स्वभाव आणि धार्मिक यात्रा हा संयोग छानच आहे. या महिन्यात आपल्या वैवाहीक जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. फ़ारसा मोठा शारिरीक त्रास होईल असे संभवत नाही पण काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.

आपण लेखक असाल आणि आजवर आपल्या लेखनाचे पैसे येणे असतील तर जरा मागणी करुन पहा. या महिन्यात हे काम होईल. आपल्याला नविन मित्र मिळतील त्यातून नविन लाभ होणे, व्यावसायीक संधी उपलब्ध होणे अपेक्षीत आहे.

मकर रास : खुप दिवस मंगळ आपल्या लग्न स्थानी आहे. गेले महिनाभर वक्री होता तो २७ ऑगस्टला मार्गी होऊन पुन्हा आपली अडलेली कामे मार्गी लावणार आहे. अर्थातच ही संधी ७ अक्टोंबर पर्यंत असल्याने जे जे आपल्याला मार्गी लावावेसे वाटत आहे त्याची योजना करा.
हे करत असताना या महिन्यात आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. यास्तव बेसावध राहू नका.

महिनाभर वैवाहीक जोडीदाराबरोबर खटके उडत असतील तर आता या महिन्याचा उतरार्धात आता ते थांबेल. या महिन्यात आपले वडील जर लांब रहात असतील तर त्यांची भेट महिन्याच्या उतरार्धात व्हावी. जर आपल्या सोबत असतील तर दिवसाचा जास्त काळ त्यांचा सोबत जाईल. त्यांचे प्रेम आणि आशिर्वाद याचा लाभ होईल. ज्यांचे वडील भेटणे शक्य नसेल त्यांना हाच अनुभव वडीलधार्या व्यक्तीकडून मिळेल.

कुंभ रास : नोकरी व्यवसायानिमीत्त प्रवास अजुनही काही दिवस घडणे शक्य आहे. अश्या प्रवासामुळे काही लाभ होणे अपेक्षीत आहे. याला जोडून एखादी धार्मिक स्थळाची यात्रा करण्याचा योग आल्यास ही एक सुसंधी मानावी लागेल. संतती संदर्भात काही चिंता निर्माण झाली असेल तर ती या महिन्यात दुर होईल.

काही लोकांना आपला जोडीदार फ़ारच रोमॅटीक होतो आहे असा महिनाभर अनुभव येईल. अशी संधी कुंभ राशीला वारंवार येत नाही त्यामुळे हा ही अनुभव घ्यायला तयार रहा.

मीन रास : आरोग्याची काळजी घ्यावी असा महिना आहे. ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे त्यांनी नियमीत पथ्य आणि औषधे याकडे दुर्लक्ष करु नका. एखादा मोठा प्रोजेक्ट हातात आहे पण थांबला आहे किंवा संथ झाला आहे असे दिसत असेल तर २७ ऑगस्ट नंतर पुन्हा त्याची प्रगती सुरु होईल. आपला नोकरी/व्यवसाय जर अडचणीत असेल तर हा महिना उलटताच त्याला दिशा सापडेल.

या महिन्यात फ़ारसे काही महत्वाचे घडेल असे नाही पण आपले प्लॅनिंग असू द्या. हा वेळ त्यासाठी द्या.

हे राशीभविष्य दर महिन्याला वाचण्यासाठी माझ्या https://www.facebook.com/gmjyotish/ या फ़ेसबुक पेज ला लाईक करा.
जर आपल्याला या शिवाय ज्योतिषशास्त्र विषयात रस असेल तर https://www.facebook.com/groups/npastrogroup/ या
ज्योतिषविषयक समुहाला जॉईन करा.