Friday, December 22, 2017

१४ जानेवारी २०१८ रोजी ज्योतिष विशारद या ज्योतिष वर्गाची पुढील बॅच सुरु होत आहे

सज्जन प्लाझा येथील ऑफ़ीस चिंचवड गाव येथे किंवा विद्यार्थी संख्या जास्त असल्यास अजमेरा कॉलनी येथे १४ जानेवारी २०१८ रोजी ज्योतिष विशारद या ज्योतिष वर्गाची पुढील बॅच सुरु होत आहे. खालील अभ्यासक्रम शिकवला जाईल. परिक्षा होऊन आपल्याला ज्योतिष विशारद हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

अभ्यास क्रम
१. ज्योतिषाची मुलतत्वे
२. राशी ग्रह यांची नावे, आंतराष्ट्रीय चिन्हे - त्याचा उपयोग एफ़ीमेरीज पहाताना
३. क्रांतीवृत्त, सुर्यमध्य पध्द्ती, भुमध्य पध्दती,
४. लग्न समाप्ती कोष्टक दाते पंचांग, विवीध शहरांची लग्न समाप्ती - दाते पंचांग
५. कुंडली मांडणे- दोन उदाहरणे - १० कुंडली मांडणे घरचा अभ्यास
६. कुंडली मांडुन  ग्रह लिहुन पुर्ण करणे. राशी कुंडली लिहणे.
७. स्पष्ट लग्न तसेच स्पष्ट ग्रह करणे - बेरजा वजाबाक्या घरचा अभ्यास
८. पंचाग माहिती - दाते पंचांग - तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण - शांती कर्म
९. नवमांश कुंडली, भावचलीत कुंडली व महादशा अंतर्दशा काढणे
१०. कुंडलीचे पुस्तक हाताने लिहुन पुर्ण करणे
११. १२ ग्रह, १२ राशी, १२ स्थाने
१२  भावेश अभ्यास व त्यांची स्थानगत फ़ळे
१३ कुंडलीतील महत्वाचे शुभयोग, ग्रहयोग, राजयोग व पत्रिकांचा अभ्यास
१४ कुंडलीतील महत्वाचे अशुभ योग व त्यांचा अभ्यास
१५ कुंडलीचा दर्जा व भविष्य कथन
१६) विवाह गुण मेलन
१७) प्रश्न कुंडली
१८) KP पध्दती काय आहे ?
१९) मुहुर्त विचार
२०) संकटे व त्यावरील उपाय व नैमित्तीक उपासना

वर्गाचा कालावधी आठवड्याला दोन तास असे पन्नास आठवडे म्हणजे एक वर्ष असेल. अभ्यासु व्यक्तीच्या सोयीने वर्ग शनिवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळ असा असेल. हा वर्ग झाल्यावर एक छोटीशी परिक्षा होऊन आपल्याला प्रमाण पत्र मिळेल.

घरकाम करणारा महिला वर्ग किंवा नुकताच सेवानिवृत्ती घेऊन निवृत्त आयुष्याची आखणी करणारे  तसेच तरुण पुरुष महिला यांनाही या वर्गात प्रवेश आहे. या साठी किमान जुनी अकरावी एसएससी किंवा बारावी परिक्षा आपण पास असणे आवश्यक आहे. आपण या वर्गात प्रवेश घेऊन एका वर्षाने ज्योतिष सल्लागार बनु शकता किंवा या अभ्यासाने समाजाबरोबर उत्तम संवाद निर्माण करु शकता आणि आपले स्थान मिळवु शकता.

या वर्ग यशस्वी रित्या पुर्ण केल्यावर खालील सेवा आपण सहजपणे खालील सेवा उपलब्ध करुन देऊ शकाल.

१. नुकत्याच जन्मलेल्या बालकाची जन्मकुंडली संगणकाच्या सहायाने बनविणे किंवा अन्य कोणत्याही वयाच्या व्यक्तीची जन्मकुंडली बनविणे.
२. नविन जन्माला आलेल्या बालकाची रास, नक्षत्र आणि त्यानुसार नक्षत्र नावाचे अद्याक्षर सांगणे.
३. जन्माला आलेल्या बालकाला जर जननशांतीची आवश्यकता असेल तर सांगणे.
४.  विवाहाचा मुहूर्त तसेच विवीध मुहूर्त सांगणे.
५. लग्नासाठी विवाहगुण मेलन तसेच मंगळ दोष इ. पाहुन विवाह करण्याचा निर्णय देणे.
६. प्रश्न कुंडली मांडुन त्याच्या आधाराने प्रश्नाचे उत्तर देणे.
७. साडेसाती कधी असते व त्याच्या अनुषंगाने उपासना काय करावी याचे मार्गदर्शन.
८. इतर प्रश्नांची हाताळणी जसे विवाह कधी होईल, पत्रिकेत असणारे शुभयोग व त्याद्वारे उत्तम काळ मार्गदर्शन इ.
९. संपुर्ण भविष्य लिहून देणे.
१०. प्रश्नकर्त्याला उपासना सांगणे.


जे लोक पिंपरी चिंचवड शहरात किंवा पुणे येथे रहात नाहीत व ज्यांना दर आठवड्याला पिंपरी चिंचवड येथे येणे शक्य नाही अश्या लोकांसाठी दुरशिक्षण अर्थात व्हिडीओ व नोटस द्वारे अभ्यासाची योजना सुरु आहे. ज्यांना असा वर्ग हवा आहे त्यांनी ही फ़ेसबुक मेसेंजर द्वारे किंवा whatsapp  9763922176 द्वारे संपर्क करावा. हा वर्ग लवकरच सुरु होईल. याची संपुर्ण योजना तयार होत आहे.


Saturday, December 9, 2017

१६ डिसेंबर २०१७ ते १३ जानेवारी २०१८ या कालावधीचे राशीभविष्य



या कालावधीत महत्वाचे राशीबदल खालील प्रमाणे घडत आहेत.

१. या कालावधीत रवि महिनाभर धनू या मित्र राशीत वास्तव्य करुन असेल.
२. या कालावधीच्या सुरवातीला बुध वक्री होऊन वृश्चिक राशीत येईल तो २३ डिसेंबरला मार्गी होऊन ६ जानेवारीला पुन्हा धनु राशीत जाईल.
३. या कालावधीत २० डिसेंबरला शुक्र धनु राशीत येईल.

रवि, शुक्र, बुध सोडता अन्य ग्रह आहे त्या राशीत असतील. आपण चंद्र दर दोन दिवसांनी रास बदलत असल्याने त्याचा फ़ारसा विचार करणार नाही.

निसर्ग कुंडलीमधे चंद्र सोडता आपण हे ग्रहांचे वास्तव्य पाहू.





धनु राशीत मुळात प्लुटो आणि शनि आहेतच त्यात रवि व शुक्र महिनाभर वास्तव्यास आहेत व शेवटी बुध ही येत आहे.धनु राशीच्या लोकांना वेगवेगळी फ़ळे अनुभवास मिळणार आहेत.

आपण एव्हाना आपली लग्न राशी शोधली असेल. नसेल तर जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म स्थळ माहीत करुन घ्या आणि आपले राशीभविष्य जसे चंद्राकडून पहाता तसे लग्नराशीकडून देखिल वाचा.

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: आपल्या राशीचा स्वामी सातव्या स्थानी महिनाभर वास्तव्य करुन आहे. ही काही चांगली स्थिती नाही. जोडीदाराशी खटके उडत आहेत याचे अनुभव या राशीचे लोक घेत असतील याची जाणिव मेष राशीला कुठे असणार ? ते तर बोलून मोकळे होणार. मेष राशीचा पती असेल तर महिलांनी जरा पडते घेऊन घरातले वातावरण शांत राहील असे पहावे. पत्नी असेल तर काय विचारता ? परिस्थिती बदलणार नाही. या राशीच्या जोडीदाराला जमवून घ्यावे लागणार. अश्विनी नक्षत्राच्या लोकांनी आपले  कृती डिसेंबर महिना अखेरीनंतर तपासून मगच करावी.  सप्तम स्थानाचा अधिपती २० तारखे नंतर भाग्यात जात असल्याने प्रेम कमी होणार नाही.

 इतके जरी असले तरी अनेक ग्रह आपल्या भाग्य स्थानी येत असल्यामुळे आपल्याला हा महिना स्मरणात राहील मेष राशीच्या खेळाडु लोकांना हा महिना अनेक मॅचेस मधे यश मिळताना दिसेल. अनेक खेळाडुंना त्यांच्या नेत्रदिपक कामगिरीमुळे सन्मान मिळतील. या साठी आरोग्य नियंत्रणात असायला हवे. थंड हवेमुळे होणारे सर्दी/खोकला या पासून बचाव करा. अनेक कलाकारांना त्यांचे फ़ोलोअर्स/फ़ॅन्स चांगल्या कमेंट्स देतील.

वृषभ रास : आपल्या राशीचा स्वामी शुक्र अष्टमस्थानी जात आहे. तुमच्या अष्टमात रवि, राजयोगकारक शनि, ६ जानेवारीला जाणारा बुध , आधीच तिथे असलेला प्लुटो असे पाच ग्रह असल्यामुळे आरोग्य संभाळावे हा पहिला सल्ला. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ नयेत हा दुसरा सल्ला तर लहान मुलांचे आरोग्य संभाळा हा तिसरा सल्ला आहे. तुमची बुध्दी काहिही झाले तरी स्थिर असते हीच काय ती जमेची बाजू आहे.

नोकरी व्यवसायातही संघर्ष झाला तरी तो तुम्हाला फ़ार त्रासदायक होईल असे नाही. रवि, बुध आणि शुक्र महिनाभरच अष्टमात असतील त्यामुळे कटकटी झाल्यात तर त्या महिनाभरापेक्षा जास्त असणार नाहीत हे लक्षात असू द्या. शनि तुम्हाला अजून दोन वर्षे बांधुन घालणार आहे. नविन काहीतरी या महिन्यात सुरु करायचा विचार असेल तर जरा तो बेत पुढे ढकला.

मिथुन रास : तुमच्या राशीचा स्वामी जास्त काळ तुमच्या सप्तमस्थानी असणार आहे. मिथुन राशीचे लोक व्यापारात फ़ारसे असत नाहीत पण मार्केटींग किंवा कन्सलटंन्सी उत्तम करतात. या महिन्यात तुम्हाला काही नविन कन्सेप्ट विकायचा असेल तर त्याचा प्लॅन बनवा. हे काम यशस्वी होईल असे ग्रहमान आहे. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना ही एक मोठीच संधी आहे.

तरुण मुलांची काळजी करणे हा तुमचा स्वभाव नाही परंतु जरा एकदा त्याचे प्लॅन्स तपासून पहा. हवतर तुमच्या जोडीदाराला सांगा.

तरुणांना काही रोमॅंटिक वातावरणात जाण्याची संधी या महिन्यात आहे. काही सिरीयस प्रपोजल्स आली तर त्याकडे तुमच्या पध्दतीने हसण्यावारी नेऊ नका. तुम्हाला ही संधी वर्षभरात एकदाच येत असते.

कर्क रास : या महिन्यात शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना काही गोष्टी भाग्यकारक घट्ना म्हणुन समोर येतील. तुमचा राजयोग कारक मंगळ या महिन्यात भाग्येशाचा बरोबर असल्यामुळे काही तरी नेत्रदिपक घडणार यावर भरवसा ठेवा. या घट्ना घडताना काही सरळ नसतील त्यामुळे भांबाऊन न जाता तुमचा पक्ष बरोबरच आहे हे लक्षात ठेऊन तुम्ही या कडे पहा. यात तुमचे  भाग्योदय घडतील अश्या घटनांचे संकेत नक्कीच आहेत. ते तपासून थोडे क्रेडीट घ्याच. कनव्हीक्शन का पैसा है बॉस असे एक मराठी सिनेदिग्दर्शक संजय जाधव म्हणतो ते लक्षात ठेवा.

आपली संतती सुध्दा असेच काही या महिन्यात करणार आहे. त्यांचे कौतूक करायला विसरू नका.

सहाव्या स्थानी ग्रहांची गर्दी म्हणजे कमविण्याच्या अनंत संधी हे सुत्र व्यावसायीक लोकांनी लक्षात ठेवा. फ़ार भावनेच्या आहारी न जाता कलाकार, अभिनेते, लेखक या व्यावसायीकांनी डोळे उघडून कोण काय म्हणत आहे या कडे पहा. संधी आहेतच त्या कॅश करा.

सिंह रास : तुमचा राशीचा अधिपती बराच काळ दशमेश शुक्राच्या युतीत असणार आहे. शुक्र रवि युती ही अनेक चांगल्या नाट्य कलाकारांना स्टेज मिळवुन देत असते. सिंह राशीवर अनेक कलाकार जन्माला येतात. नाट्य काय कुठेही घडत असते. आपण प्रत्येकच कोणत्या ना कोणत्या रोल मधे सतत असतो. लेखकाने दर वेळेला प्रत्येक रोल ला न्याय दिलेला असतोच असे नाही. या महिन्यात तो आहे हे निश्चित. आपला रोल चांगला व्हावा या साठी प्रयत्न करा. रंगभुमी कलाकार असाल तर प्रिंट मिडीया तुमची दखल घेणार आहे. आणि जीवनाच्या रंगमंचावर असाल तर तुमचा रोल स्मरणात राहील असे घडणार आहे.

तुमचे उत्पन्न तुम्ही कुठे गुंतवणार आहात यावर विचार करा. जगात वेगवेगळ्या मार्गाने फ़्रॉड करणारे आपल्याला भेटत असतात. अश्या एखाद्या मृगजळात तुम्ही गुंतत नाही ना यावर विचार करुनच मग पैसे गुंतवा.

कन्या रास : या महिन्यात योजलेली कामे ६ जानेवारी पुर्वी मार्गी लागतील असे पहा. एकदा का तुमच्या राशीचा स्वामी बुध शनिच्या तावडीत सापडला म्हणजे अनेक कामांना तो ब्रेक लावेल. तुम्हाला खात्रीने सुचणारे शब्द तुम्हाला सुचणार नाही. ही स्थिती काही पुर्ण महिनाभर असेल असे नाही पण महिन्याचा शेवटी म्हणजे ६ जानेवारी नंतर जवळ जवळ दहा दिवस असेल.

चवथा शनि तुमच्या राशीत अजून दोन वर्षे असेल. तो सुख लाभु देणार नाही असे असताना शुक्राची चतुर्थात एन्ट्री तुम्हाला सुखाची झोप देईल. कधी नव्हे ते वाहन सौख्य मिळेल. ही स्थिती अगदीच महिनाभर असेल असे नाही पण काही दिवस तरी असे ग्रहमान या महिन्यात नक्की आहे.

तुळ रास : तुमच्या राशीचे वर्णन करताना राशीभविष्यकार मा. शरद उपाध्ये झुकत माप देऊन तुमच्या समतोल व्यक्तिमत्वाचे गुणगान गातात.या महिन्यात तुम्हाला क्रोध होईल आणि हा समतोल पणा ढासळेल. हे अगदी वाईटच असते असे नाही. लोक नाहितर तुम्हाला गृहीत धरतात. कधी तरी तुमचा राग पाहू द्या ना त्यांना. हव तर अस समजा की महाभारतात भीष्मांनी श्रीकृष्णाला युध्द करायला भाग पाडले अशी स्थिती तुमच्यावर येणार आहे. काय हरकत आहे अस झाल तर ?

तुम्ही लेखक/पत्रकार असाल तर तुमच्या लेखणीने अनेकांना गारद कराल. काही वेळाच अश्या असतात की सौम्य भुमिकेला तुमचा भित्रेपणा समजला जातो. तुम्ही फ़ेसबुक किंवा व्हॉट्स अप सुध्दा आपल्या भुमीकेने अनेकांना तोंडात बोट घालायला लावाल. शेवटी रात्रंदीन आम्हा युध्दाचा प्रसंग असताना एव्हरी थिंग इज फ़ेअर ही भुमिका घ्या.

वृश्चिक रास : आपल्या संततीकडे लक्ष द्या हा सल्ला या महिन्यातला मोलाचा सल्ला. संतती जर तरुण असेल तर ती नेमकी काय कृती करणार आहे याकडे लक्ष द्या. इतका इशारा लक्षात ठेवलात तर या महिन्यात अनेक चांगल्या गोष्टी कुटुंबात घडणार आहेत. कौटुंबिक संमेलन असेल. या संमेलनात अनेक बातम्या ज्या तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या संदर्भात आहेत त्या समजतील.

जी काय गुंतवणुक करणार आहात ती तुम्ही नेहमीच लक्ष देऊन करता. या महिन्यात या बाबत चुकू नका. खास करुन जी गुंतवणुक जी फ़क्त कागदपत्रांच्या द्वारे होते. तुम्हाला नेमकी स्थिती समजत नाही अश्या गुंतवणुकी नुसते रिपोर्ट कार्ड पाहून करु नका. फ़ॅक्ट्स तपासा.

धनु रास : या महिन्यात जे तुम्ही गमावले किंवा गमावणार आहात ते सर्व परत मिळण्याच्या संधी स्वत: हुन चालत येणार आहेत. तुमचे मित्र काय म्हणत आहेत या कडे लक्ष द्या. तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावलात तर मग मात्र संधी जाऊ शकते. पक्के व्यापारी आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवतात तसा ठेवा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या.

व्यापार हा तुमचा प्रांत नाही पण संधी घेताना तुम्हाला कोणी हातोहात फ़सवणार नाही ना हे मात्र ओळखण्या इतके सुज्ञ आणि बुध्दीमान तुम्ही आहात हे विसरु नका. हे भान असले तर हा महिना तुम्हाला लक्षात राहील असे नक्कीच काही देऊन जाणार आहे.

मकर रास :  बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे हे गाणे या महिनाभर लक्षात ठेवा. अनेकदा तुमचे नुकसान होऊ शकते असे ग्रहमान आहे. साडेसातीच्या पहिल्या टप्यात नुकसान असते म्हणजे दर महिना खुप नुकसान होते असे नाही पण या महिन्यात अनेक ग्रह तुम्हाला अपयश, चिंता, पीडा देताना दिसणार आहेत. तुमची चाल धिमी असते. तुम्ही अखंड सावधान असता ही काय ती जमेची बाब आहे.

या महिन्यात समजा तुम्ही शेअर घेणार असाल आणि तो पडला किंवा प्रॉपर्टी घेतली ते भाव जरा जास्त होते असे समजले तर जे दुख: होईल असे ग्रहमान आहे. आरोग्य सुध्दा साथ देणार नाही. त्यामुळे समझो इशारे. फ़ार काही चांगले घडेल अशी अपेक्षा ठेऊच नका ते जास्त चांगले.

कुंभ रास :  माझ्या राशीभविष्याची चातकासारखी वाट पहाणारी ही माणसे. कालनिर्णय पहाणार, सर्व वर्तमान पत्रे पहाणार . राशीभविष्यात जिथे जी गोष्ट सगळ्याच ठिकाणी समान वर्तवली जाईल त्याचा पडताळा घेणार हा तुमचा स्वभाव आहे. मग तयार का ऐकायला ?

किती देशील दोन्ही हाताने असे ग्रहमान या महिन्यात आहे. पाच ग्रह जर लाभ स्थानी असतील तर काय ? तुमची झोळी भरुन जाईल असे तुमचे ग्रहमान आहे. चांगल्या बातम्या, पैसे, यश, किर्ती आणि काय काय मिळाले ते तुम्हीच मला सांगा.

अविवाहीत आणि विवाहच्छु असाल तर तो ही जमेल. संततीच्या सुवार्ता येतील. सुखाचा फ़ुलोरा घेऊन तुम्ही नाचाल असा महिना कधी तरी लाभतॊ असे ग्रहमान आहे.

मीन रास : तुमच्या संथ स्वभावाला सोडुन जरा कंबर कसुन कामाला लागा. एक तुतारी द्या मज आणुन ह्या कवीतेचे वाभाडे काढताना काही लोक तुतारी आणुन दिलीत तर मी वाजवीन नाही तर गप्प बसीन असे म्हणतात. संधीच्या एक नाही तर अनेक तुतार्या तुमच्या आजुबाजूला वाजत असताना जर संथ राहिलात तर कसे होणार ?

सगळीच कामे मार्गी लागतील का तर नाही पण पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार नाही म्हणुन प्रयत्न करायचा नाही असे नाही. खर सांगु का पण तुम्ही कंबर कसा अगर नका कसू लोक तुम्हाला कामाला लावणारच आहेत. त्या पेक्षा तुम्हीच मी करतो म्हणाना ? पहा तुमच्या बद्दल असलेले मत कसे बदलते ते ?


नुकतेच प्रसिध्द झालेले माझ्या ब्लॉग वरील काही लेख पहा

१. आय व्ही एफ़ सक्सेस स्टोरी -      http://gmjyotish.blogspot.in/2017/11/ivf.html

२. अनेकदा ३६ गुण जुळूनही पती-पत्नी मधे संघर्ष किंवा प्रसंगी घटस्फ़ोट होताना दिसतात याचे कारण काय असावे ?    http://gmjyotish.blogspot.in/2017/12/blog-post.html


मी आता बराच काळ आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शनही करु शकतो. माझ्या ऑफ़ीसवर पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या लोकांसाठी पत्ता आणि फ़ोन नंबर खाली आहे तसेच. इमेल, फ़ेसबुक मेसेंजर आणि व्हाट्सअप वर सुध्दा नक्कीच संपर्क करता येईल.



Wednesday, December 6, 2017

मनातला प्रश्न १५ वा : अनेकदा ३६ गुण जुळूनही पती-पत्नी मधे संघर्ष किंवा प्रसंगी घटस्फ़ोट होताना दिसतात याचे कारण काय असावे ?

उत्तर : विवाहासाठी वधू - वरांचे गुण मिलन हा व्यावहारिक शब्द प्रयोग असला तरी खर तर नुसते गुण नाही तर कुंडली मेलन असा शब्द वापरला तर प्रथम एका शब्दामुळे होणारे गैरसमज टळतील. कारण कुंडली मेलनामध्ये, गुणमेलन हा एक निकष आहे.

कुंडली मेलनासाठी काही पुर्व गृहीतके आहेत. मुलीच्या/मुलाच्या आई वडीलांनी दिलेली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म स्थळ हे बरोबर आहे.अनेकदा लग्न जमत नाही व कुंडलीतील कुयोगाने मुलीला नाकारले जात आहे असे पाहून मुलीला/मुलाला माहित नसताना ही कुंड्ली बदलून सोयीची कुंडली देण्याचा प्रकार काही लोक समाजात करतात. प्रत्येक वेळेस मुलीची/मुलाची कुंडलीची खातरजमा करण्याची पध्दत नाही. हे सर्व करण्यासाठी वेळ ही लागतो. अनेकदा खातरजमे साठी आवश्यक माहिती पुरवली जात नाही. बायोडाटा मधे माहिती कमी असते. यामुळे कुंडलीमेलन करणारा ज्योतिषी हे गृहीत धरतो की ह्या दोन्ही कुंडल्या बरोबर आहेत.

आजही कुंडलीमेलनासाठी ज्योतिषाला फ़ी द्यावी लागते म्हणून आपण स्वत: गुणमेलन करुन थांबणारे पालक आहेत. त्याही पुढे जाऊन यापेक्षा आम्हाला जास्त पहायचे नाही असे म्हणणारे पालक आहेत. परिणामी पुढील निकष ज्याची चर्चा आपण करणार आहोत त्यावर उहापोह न होता विवाह केवळ गुणमेलनावर नक्की होतात जे बरोबर नाही.

मग गुणमेलनाबरोबर काय काय पहावे ?

१) गुणमेलनतर पहावेच ज्यात ३६ पैकी किमान १८ गुण जुळावेत व यासाठी दातेपंचांगाचाच वापर व्हावा. गुणमेलनासाठी दातेपंचांगामधे जितका अभ्यास आहे तो अन्य गुणमेलन सॉफ़्टवेअर मधे असेलच असे नाही. अनेकदा दाते पंचांग स्पष्ट विवाह करु नये असा उल्लेख करते ते अन्य सॉफ़्टवेअर मधे असेलच असे नाही.

२) मंगळ दोषाचा अभ्यास व निराकरण होत असेल तर पुढे जावे. यासाठी भावचलीत कुंडली मांडुनही अभ्यास करावा. मंगळ दोषावर कुंभ किंवा अर्क विवाहाचा, मंगळाची शांती इ. पर्याय उपलब्ध आहेत. खरच याची आवश्यकता आहे याची खातरजमा करुन नाईलाज असल्यास हे करावे. दाते पंचांगामध्ये मंगळाला प्रतिकारक कुंडली एका जोडीदाराची नसेल तर दुसर्याची असू शकते यावर ही लक्ष द्यावे.

३) सर्वात महत्वाच्या मुद्दा म्हणजे सप्तमेश व शुक्र यांच्या स्थितीचे अवलोकन. जर सप्तमेश सुयोग्य असेल तर ५०% वैवाहीक सुखाची खात्री आहे. त्यात शुक्र ही अनुकूल असेल तर अजूनही खात्री वाढते. अश्यावेळी गुण कमी असतील किंवा मंगळ दोष सुध्दा फ़ारसे प्रभाव टाकत नाहीत. थोडक्यात सप्तमेश जर सुयोग्य असेल म्हणजे लाभ स्थानी किंवा धन स्थानी असून वक्री नसेल, अशुभ ग्रहांच्या युतीत , केंद्रयोगात वा प्रतियुतीत  नसेल, अशुभ ग्रहांच्या दृष्टित नसेल तर त्याचे वैवाहीक सुख देण्याचे प्रमाण वाढते.

शुक्र स्वत: सप्तमेश असुन सुस्थितीत असेल तर अजूनही जास्त वैवाहीक सुखाची खात्री वाढते. शुक्र सप्तमेश नसताना सुध्दा स्वराशीत, उच्च राशीत असताना, स्व नवांशात/उच्च नवांशात असताना वैवाहीक सुख मिळते.

दोघांच्या पैकी किमान एकाच्या पत्रिकेत सप्तमेश आणि शुक्र दोष पुर्ण नसावेत व दुसर्या च्या पत्रिकेत सप्तम स्थानावर/ सप्तमेशावर शुभ ग्रहांची दृष्टी असल्याची खातरजमा असावी.दोघांचा शुक्र मात्र बलवान नसला तरी किमान दोषपुर्ण नसावा. इतके पाहिल्यास पतीपत्नीमधील संभाव्य विवाद लांबत नाहीत व घटस्फ़ोटाची परिस्थिती येत नाही.


४) वधू व वरांचे आयुष्य हा मुद्दा सुध्दा महत्वाचा आहे अन्यथा अनेकदा लग्नानंतर दहा वर्षे सुखाची असतात व अचानक मृत्यु ओढवला म्हणजे वरील तीनही मुद्दे अभ्यासून सुध्दा असे का घडले असा प्रश्न पडतो. वास्तविक मृत्यु वर्तवणे इतके कठीण आहे. तो खात्रीने येईलच असे कोणी सामान्य/अभ्यासू ज्योतिषी सांगू शकत नाही. या साठी हा मुद्दा स्पर्श केला जात नाही.

५) लग्नानंतर येणार्या दशा- अंतर्दशा, संतती होईल याबाबतची खात्री तसेच प्रगती होईल की नाही इतके सारे मुद्दे आवश्यक आहेत पण  ह्या मुद्यांवर अनेक पर्यायी गोष्टी आहेत. जसे प्रत्येकाला दशा-अंतर्दशा सुयोग्य येतील असे नाही पण जोडीदार चांगला असेल तर ह्या कठीण काळात निभाऊन जाण्याचे सामर्थ्य उभयतांमधे संस्काराने येते.  संतती साठी आज आय व्ही एफ़ सारखे अत्याधुनीक उपचार असताना बरेचसे प्रश्न निकाली निघतात. प्रगती होईल की नाही हा मुद्दा प्रगती म्हणजे काय ह्या गृहीतकावर आधारीत आहे. याचे उत्तर इतके स्पष्ट देता येणार नाही. मुलाच्या कुंडलित अनेक राजयोग आहेत परंतु वैवाहीक सौख्य कमी असेल अश्या मुलाला कोण पालक आपली मुलगी जाणुन बुजून देईल?

यामुळे मुद्दा नंबर ४ आणि ५ महत्वाचे असले तरी त्याला किती महत्व द्यायचे याचे भान ठेवले नाही तर या मुद्यांवरुन विवाह टाळणे हा  पर्याय ठेवला तर विवाह होणेच दुरापास्त होऊन बसेल या साठी यावर फ़ार भर दिला जात नाही परंतु जर मृत्यु आला तर मात्र ज्योतिषी बदनाम होतो हा अनेकदा अनुभव येतो.

वरील चर्चेवरुन एक निष्कर्श नक्कीच निघतो की आम्हाला अजिबात पत्रिका पहायची नाही या पेक्षा किमान पहिल्या तीन निकषांवर पत्रिका तपासल्या जाव्यात. मुद्दा नंबर ४ व ५ पालकांच्या इच्छेने पहावे पण ज्योतिषाने तपासताना तारतम्य वापरावे.

Wednesday, November 8, 2017

१६ नोव्हेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७ महिन्याचे राशीभविष्य

१६ नोव्हेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७  महिन्याचे राशीभविष्य पाहू. या आधी काही काळ या पध्दतीने रवि ज्या महिन्यात राशीबदल करतो तो डोळ्यासमोर ठेऊन भविष्य लिहीत होतो यात काही कारणाने खंड पडला होता.

मागे मी लिहले होते की दर इंग्रजी महिन्याच्या १४ ते १६ या तारखांच्या दरम्यान रवि राशी बदल असतो. हा निरयन राशी बदल म्हणुन ऒळखला जातो. कोणतातरी काळ निश्चित करुन राशीभविष्य लिहीण्याची पध्दत आहे. मी रविराशीबदलाचा काळ निवडतो. याला रविमास म्हणजे रवि महिना म्हणतात.

या महिन्यात मी येणारे सण किंवा व्रत याबाबत लिहीत असतो. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या रविमासात रवि वृश्चिक राशीत असणार आहे. या वर्षी ३० नोव्हेंबर २०१७ ला मोक्षदा एकादशी येत आहे. या एकादशीला गीताजयंती म्हणुनही ओळखले जाते. ज्यांनी फ़ारसे वाचन केले नाही ते विचारतील की गीताजयंती म्हणजे काय ? या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगीतली म्हणुन ही गीता जयंती. ज्या पार्थाला ती गीता समजली त्याचा मोक्षाला जायचा मार्ग मोकळा झाला. आपण सर्व अर्जून तर आहोत. प्रत्येकाला प्रश्न पडतोच की मी हे कर्म का करतो.  तुकाराम महाराजांनी तर " रात्रंदीन आम्हा युध्दाचा प्रसंग " असा अभंग लिहलाय.

हे जर पार्थासारख्या कृष्ण सहवासात राहिलेल्या भक्ताच्या बाबतीत होत. जगतगुरु तुकाराम महाराजांनी ही वर्णन केलय तर आपण तर अतिसामान्य आहोत. याचा अर्थ त्या साक्षात्काराला सामोरे जायचेच नाही का? एकादशी व्रत यासाठीच असतात, ज्योतिषशास्त्र दृष्ट्या रवि आणि चंद्र यांचा नवपंचम अर्थात अत्यंत शुभ असलेला ग्रहयोग दर महिन्यात दोनदा येतो.

या दिवशी मन आणि आत्मा एकरुप होण्यासाठी आवश्यक ते वातावरण पृथ्वीतलावर असते. आणि म्हणुन एकादशीला आत्मतत्वाचे चिंतन आणि मनन उपवास करुन करावे असे भागवत धर्म सांगतो. या निमीत्ताने हे आपल्या वाचनात असावे या साठी हा उल्लेख. उपवास करा किंवा जमत नसेल तर करु नका पण आत्मचिंतन या दिवशी नक्की करा.

( हे भविष्य चंद्र रास व लग्न रास दोन्ही कडुनही वाचावे )

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: दिवाळी आपणास आरोग्यदायी गेली नसेल तर महिना अखेरीस आपले आरोग्य सुधारेल. शुक्र जेव्हा आठव्या स्थानी जातो तेव्हा कष्टाशिवाय येणारी संपत्ती चालून येण्याचे योग येतात. लॉटरी असो वा लाचलुचपतीने येणारे धन असो. कुठे थांबायचे ते आपण ठरवा. २६ नोव्हेंबर नंतर असे योग जास्त संभवतात व धोका सुध्दा संभवतो. मनस्ताप ही त्या सोबत नक्कीच असतो.
सातव्या स्थानी जाणारा मंगळ काही व्यावसायीक हालचाली घडवेल. जे व्यवसाय करतात त्यांनी याची प्रचिती येईल. व्यावसायीकाने सातत्याने संधीच्या शोधात असावे. या महिन्यात तर आपणच प्रपोजल घेऊन पुढे जावे असे ग्रहमान आहे. लगेच काही घडेल असे नाही. याचा अर्थ प्रयत्न करायचा नाही असे मात्र नाही. विद्यार्थी जर परिक्षा देणार असतील तर जरा जास्तीचा अभ्यास करावा. महिलांनी अरोग्य सांभाळावे.

वृषभ रास : आपल्या राशीचा स्वामी जो तुळ राशीत आहे तो २६ नोव्हेंबरला वृश्चिक राशीत म्हणजे सातव्या स्थानी जात आहे. २६ नोव्हेंबर नंतर लंग्नासाठी इच्छुक व्यक्तींच्या समोर एखादे प्रपोजल नक्कीच असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका असे हा महिना सांगतो. खास करुन मुळव्याधीने त्रासलेल्या पेशंट नी महिनाभर दुपारी जेवणानंतर गोड ताक प्यावे. आवळा, पेरु व ताक या रोगावरचे रामबाण उपाय आहेत.

माझ्या गुरुंनी मुळव्याधीवरचा सांगीतलेला मंत्र अजुनही स्मरणात आहे. ज्यांना हा त्रास आहे मग ते कोणत्याही राशीचे असोत याचा जपा करावा. तिखट खाणे कमी करावे.

ईशं, ईशो, ईशान
कंकर को न करो लालेशाम
सात अक्षर जो पड पावे
मुळ बवासीर होय न होये

वृषभ राशीचे लोक बैलासारखे काम करतात. हे जर खुर्चीवर बसुन असेल तर मुळव्याध जडणार. म्हणुन हा प्रपंच. त्यातून जेव्हा मंगळ सहाव्या स्थानी जातो किंवा वृश्चिकेत जातो ( १७ जानेवारीला जाणार आहे ) आधीपासूनच तरुणांनी काळजी घ्यावी. वय ४० नंतर हा रोग सहसा त्रास देत नाही.

विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राजवळ बसून अवघड विषय समजून घ्यावेत. परिक्षा या महिन्यात असेल तर अभ्यास जास्त करावा. १० डिसेंबर नंतर पेपर असेल तर त्याचा खुपच जास्त अभ्यास करावा. महिलांना खास करुन हा महिना उत्तम जाईल.

मिथुन रास : कलाकार व्यक्तींना १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर ही पर्वणी आहे असे समजा. खास करुन आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना कलेपासून लाभ मिळण्याचे योग आहेत. एखादी नविन कलाकृती त्यांच्या कडून निर्माण होईल. तसेच महिनाभर  जुनी येणी वसूल व्हावीत असे योग आहेत. २४ नोव्हेंबर नंतर नविन प्लॅटफ़ॉर्म मिळेल. कलाकार विद्यार्थी परिक्षा देत असतील तर यश नक्कीच आहे. महिलांना मनाप्रमाणे घडेल असे योग २६ नोव्हेंबर पर्यंत नक्कीच आहेत.

सरकारी नोकरी ज्यांना मिळावी असे वाटते त्यांनी ह्या महिन्यात असलेली लेखी परिक्षा किंवा मुलाखत चुकवू नका.

कर्क रास : सध्या घरात चांगले वातावरण २९ नोव्हेंबर नंतर घराचे चित्र पालटेल. महिनाभर किंचीत विवाद व्हावेत असे ग्रहमान आहे. गुरु महाराज चतुर्थात बसले आहेत. फ़ार काही बिघडवू देणार नाहीत. पण कर्क राशीच्या महिला मात्र जरा काही झाले की डोळ्यात गंगा- जमुना असतात. म्हणुन काही बिघडु द्यायचे नाही असा संकल्प केलात तर हा घरातला मनस्ताप टळेल.

पुष्य नक्षत्राला त्रास आहे पण ज्याला त्रासातही सुख म्हणावे लागेल असे काहीसे ग्रहमान आहे. गुरुची दृष्टी आपल्या कर्मस्थानी आहे त्यामुळे नोकरी व्यवसायाला गती असणार आहे. काही त्रास तिथली घडी जर बसली नसेल तर असू शकतात.

आश्लेषा नक्षत्राला हाच काय पुढील काही महिने धनलाभाचे आहेत. एकंदरीत मिश्र अश्या स्वरुपाचे ग्रहमान कर्क राशीला आहे. महिलांना भुरळ पडावी असे काहीसे ग्रहमान आहे. सोनेरी मृग नसतो ते संकट आहे असे ध्यानी ठेवावे. उच्च पदवी परिक्षा सोडता शाळा/ कॉलेजातील विद्यार्थ्यांना झटून अभ्यास करावा लागेल.

सिंह रास : धाड्स करायला २९ च्या मंगळाच्या राशीबदलानंतर बाहू स्फ़ुरण पावतील असे ग्रहमान आहे. मघा नक्षत्र वाल्यांनी धाडस टाळावे. मघा आणि पुर्वा नक्षत्रांच्या लोकांना काही चांगले मित्र या महिन्यात भेटतील. त्यातील काही स्त्रीया तर उच्च पदस्थ व्यक्ती असतील. आपले नोकरी व्यवसायातील अडलेले काम त्यांना अंदाज घेऊन सांगून पहा. नुकतीच ओळख झाली म्हणजे कामे होणारच नाहीत असे काही नसते.

सिंह राशीच्या सर्वच लोकांनी आपल्या मुलांकडे/त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. हा तुमचा स्वभाव नसेल तर आपल्या जोडीदाराला हे काम सांगा. शेवटी डिस्कव्हरी पाहिल्यावर कळते सिंहीणीला शिकार करणे, बालकाचे संगोपन करणे एक ना दोन अनेक कामे करावी लागतात. स्त्री असाल तर ही जबाबदारी पुढे काही दिवस आपल्याकडे असणारच आहे. सिंह पुरुष फ़क्त जेंव्हा संकट येते तेंव्हाच धावतात. 

महिला जरा शांततेने घरात राहून सुख अनुभवतील आणि विद्यार्थी  वर्ग सकाळी उठुन अभ्यासाची सवय लावाच. लक्षात छान रहाते.

कन्या रास : २४ नोव्हेंबर पर्यंत लिखाण, चिकीत्सा, टीका स्फ़ुट लेखनासाठी चांगला काळ आहे. अनेक नविन गोष्टी स्फ़ुरतील किंवा प्रसिध्द ही होतील. आजकाल डिजीटल मिडीया फ़ास्ट असल्याने मनात आले लिहले, क्लिक केले की प्रसिध्द झाले असे तंत्र आहे. चांगल्या लिखाणाला तासाभरात १०० लाईक्स मिळतात. पटत नाही तर पुण्याच्या पांडुरंग कुंभार या फ़ेसबुक लेखकाला फ़्रेंड रिक्वेस्ट टाका आणि पहा. त्यांना १०० लाइक्स मिळतात. तुम्हाला १० तर मिळतील. शेवटी व्यक्त व्हायला हवे मग ते मित्रांपाशी किंवा फ़ेसबुक मित्रांपाशी.

चवथा शनि म्हणजे छोटी पनवतीच असते. डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेवा. हा महिनाभर तर खासच आवश्यक आहे. कन्या राशीच्या लोकांना ना शारिरीक बळ ना तोंडात दम. जे काय दाखवायचे ते आपल्या कामातूनच. त्यात समय कठीण येता कोण कामास येतो? असे ग्रहमान आहे. ती एक फ़ाईट तुमच्या बुध्दीमत्तेवर  तुम्ही शत्रुला मारणार पण आत्ता नाही. जरा दमाने घ्या.

महिलांची दिवाळी संपली असेल तर जरा कामाचे पहा. विद्यार्थ्यांनो मित्र असे जोडा की जे कामाचे आहेत.

तुळ रास : २९ नोव्हेंबर पासून आपल्या राशीच्या लोकांचा पैसा एफ़ डी, सोने यात गुंतवला जावा असे योग आहेत. आपले रोकड रक्कम यात वाढ होईल. विशाखा नक्षत्र वाल्यांना हा अनुभव नक्कीच येईल. आलेले पैसे तुम्ही असेच खर्च करुन टाकणार नाही. स्वाती नक्षत्र सुध्दा याचा अनुभव घेईल. यासाठी २९ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी जास्त अनुकूल आहे.

सर्व तुळ राशीचे लोक  भेळ, पाणीपुरी अश्या चटकदार पदार्थांचा मनमुराद आनंद घ्याल. तुळ रास वाल्यांच्या घरी पाहूण्या स्त्रीया, माहेरवाशीणी यांचे आगमन होईल आणि घर भरुन जाईल. एकंदरीत महिलांनी आनंद लुटावा असा महिना आहे तर.  विद्यार्थी वर्गाने पुढचे काही महिने दररोज अभ्यास करावा. यश नक्कीच आहे.

वृश्चिक रास : गेले महिनाभर गुरु बाराव्या स्थानी त्यात रवि सुध्दा आणि शुक्र सुध्दा. खर्चाने गांजला असाल तर आता या महिन्यात खर्च आटोक्यात येतील. नोकरी निमीत्त अचानक प्रवास सुरु असेल तर तो ही थांबेल. काही योजना आखली असेल तर २९ नोव्हेंबर पर्यंत यशदायी होण्याचे योग आहेत. दरवेळेला गुप्तता राखावी असे काही नसते. काही वेळा सहज बोलून काम होते.

साडेसातीचे शेवटचे पर्व जरा अडचणीचा त्रास वाढवते असे तुमच्या बाबतीत होणार आहे. पण घाबरुन जाऊ नका. शनिदर्शन शनिवारी घ्या. वार्षीक राशीभविष्यात सांगीतलेला जप सुरु ठेवा.

महिलांनी आरोग्य संभाळा. अनुराधा नक्षत्राच्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर कालावधी उत्तम आहे. माहिती घ्या . फ़सगत होऊ नये.

धनु रास : मुळ नक्षत्रात शनि महाराजांचे आगमन आहे. ज्यांचे चरण १ आहे. मनस्ताप आहे. त्यात महिनाभर भाग्याचा स्वामी रवि बाराव्या स्थानी त्यामुळे प्रवास आहे. प्रवासात वस्तु गहाळ होणार नाहीत असे पहा. खर्च ही २६ नोव्हेंबर पासून वाढत आहे. आधीच तजवीज करा. आरोग्य संभाळा. काही नविन मित्र जोडले जाणार असे दिसते. अनेक कामे मित्रांचा सल्ला घेतल्याने मार्गी लागतील असे दिसते.

तरुणांना काही लक्षात राहतील असे प्रसंग येणार आहेत. बरेचसे मधुर, काहीसे कटु असे एकंदरीत या महिन्यात येणार्या प्रसंगांचे प्रकार आहेत. महिना फ़ार उत्तम असेल असे नाही. पण फ़ार कठीण नाही.

महिलांना महिनाभर खर्च करावा अशी इच्छा होईल. पहा अनावश्यक खर्च टाळता येतो का ? विद्यार्थी वर्ग या महिन्यात परिक्षा असतील तर चमकणार आहात. खेळाडु असाल तर एखादी स्पर्धा गाजवणार आहात.

मकर रास: नुकतीच साडेसाती सुरु झाली आहे त्याचे फ़ार परिणाम लगेच दिसत नाहीत. पण दर शनिवारी शनिदर्शन सुरु करा. महिना लाभाचा आहे. इश्नुरन्स , लॉटरी यातून या महिन्यात काही अनपेक्षीत धन अपेक्षीत आहे. नोकरी व्यवसायात महिनाभरात थोडी धावपळ वाढेल. या महिन्यात तरी फ़ार काही सनसनाटी घडावे असे योग नाहीत.

महिला वर्गाच्या अपेक्षा पुर्ण होतील. विद्यार्थी वर्गालाही जे हवे ते शैक्षणीक मिळवण्याचा हा महिना आहे. संकल्प करा यशस्वी व्हा.

कुंभ रास : तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा छोटासा अधिकार तुम्ही मागत आहात तो तुम्हाला मिळुन जाईल. याचा अर्थ प्रमोशन आहे असे नाही. काही विषीष्ठ कामासाठी तुम्हाला परवानगीची आवश्यकता लागणार नाही. तुमच्या कुंडलीला बदललेला शनि लाभदायक असेल. खडतर अश्या कामातुन थोडी उसंत मिळेल व मनाप्रमाणे लाभ ही मिळतील अशी या शनिबदलामुळे घडणार आहे त्याचे प्रत्यंतर या महिन्यातच येईल.

भाग्यस्थानी गुरु आणि बाराव्या स्थानी केतू हे वर्षभर तिर्थयात्रा यांचे योग येणार आहेत. या ही महिन्यात संधी आहेच.

महिलांचे महिनाभर घरात वर्चस्व असणार आहे. त्यामुळे कुंभेची पत्नी असणार्यांनी तर एक महिना त्यांच्या कलानेच घ्या.

विद्यार्थी वर्गाला यश मिळणार आहे. १० डिसेंबर पुर्वी महत्वाचे सबमिशन इ. शैक्षणीक कामे मार्गी लावा.

मीन रास: महिनाभर काही अप्रिय घडत असेल तर हा काळ संपत आला आहे. जोडीदाराबरोबर शाब्दीक चकमकींना तसा अर्थ नसतो. पण शब्द जपून वापरले की बरेच अनर्थ टळतात. अजुनही आरोग्याकडे लक्ष द्यावे असा महिना आहे. फ़ार काही नेत्रदिपक गोष्टी घडण्यास अजून एखादा महिना वाट पहावीच लागेल. तो पर्यंत आहे त्या पानावरुन पुढे चालू असे साधे सुधे ग्रहमान आहे.

महिलांना नवी दिशा सापडेल. विद्यार्थी वर्ग आपली फ़सगत होणार नाही यासाठी लक्षपुर्वक अभ्यास करा. या महिन्यात परिक्षा असेल तर जास्त लक्षपुर्वक गोष्टी करा. अचानक पेपर लिहला पण रोल नंबरच लिहला नाही अश्या चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या.

शुभंभवतु

Tuesday, November 7, 2017

IVF सक्सेस स्टोरी

कालचा दिवस म्हणजे ६ नोव्हेंबर २०१७ माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता. माझ्या जातकजोडप्या पैकी पुरुषाचा फ़ोन आला व त्याने त्यांना कन्या संतती झाल्याची गोड बातमी दिली.  हे जोडपे माझ्या संपर्कात मागच्या वर्षी डिसेंबर २०१६ मधे आले. संतती हा प्रश्न होता. स्त्रीच्या फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक असल्याने स्त्रीबीज गर्भाशयात येत नव्हते. यावर IVF अर्थात टेस्ट ट्युब बेबी हा प्रयोग डॉक्टरी शास्त्रानुसार सुरु होता.

IVF तसे तंत्र काही नविन नाही. १९७८ साली ह्याची सुरवात झाली. ज्या स्त्रीयांच्या फ़ेलॊपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत अश्यांना संतती देण्यासाठी हे तंत्र उत्तम आहे. या तंत्रात स्त्रीचे स्त्रीबीज जे फ़ेलॊपीन ट्युब वाटे गर्भाशयात येऊ शकत नाही ते शस्त्रक्रियेने बाहेर काढून पुरुष बीजाशी त्याचा संयोग शरीराबाहेर घडवून पुन्हा पाच सहा दिवसांनी गर्भाशयात सोडले जाते.  यामुळे मासीक पाळी बंद होण्याच्या वयात सुध्दा स्त्रीया माता होऊ शकतात.

भारतात हर्षा वर्धन रेड्डी बुरी या भारतीय पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म १६ ऑगस्ट १९८६ साली झाला. माझ्याकडे हे जोडपे आले तेव्हा या प्रयोगाला २०१६ साली ३० वर्षे पुर्ण होऊन गेलेली होती. दुदैव असे की या जोडप्याची IVF आधी पाच वेळा फ़ेल गेली होती. कारण तसेच आहे. या प्रयोगात भारतात ५५ ते ६० % वेळेला यश मिळते. याचाच अर्थ हा प्रयोग अनेक वेळा केला तरच यशस्वी होतो. इथे खरे ज्योतिषशास्त्र काम करु शकते. जेव्हा हा प्रयोग यशस्वी होण्याची ज्योतिषशास्त्राने शक्यता आहे तेव्हा हा प्रयोग केला तर कमी वेळा प्रयोग करुन अर्थात कमी खर्चात जोडपे आपल्या अपत्याला जन्म देऊ शकेल. प्रयोग अनेक वेळा फ़ेल गेला की मन उदास होणे, मुल होण्याची उमेद संपणे ही मानसीक स्थिती न येता जोडपे दोन चार प्रयत्नात आनंदी होऊ शकेल.

मी या जोडप्याच्या पत्रिका तपासून संतती सुखाच्या शक्यता पाहिल्या. मला असे लक्षात आले की नजीकच्या महादशा अंतर्दश्या तसेच गोचरीचे ग्रह ही ह्या स्त्रीला गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याच काळात जर गर्भधारणा झाली तर ही स्त्री आई होण्याची शक्यता अधीक असल्यामुळे मी त्यांना काही तारखा सजेस्ट केल्या.

१८-४-२०१७ हा दिवस माझ्यासाठी ह्या जोडप्याच्या इतकाच आनंदाचा होता कारण ह्या जोडप्याची IVF या वेळेला यशस्वी होऊन ती स्त्री गर्भवती झाली होती.

हे यश हातातून जाते आहे की काय अशी परिस्थिती एका सोनोग्राफ़ी परिक्षेनंतर आली. मला त्या स्त्रीचा फ़ोन आला की तीच्या जुळ्या मुलापैंकी एकाचे हृदयाचे ठोके बंद पडले आहेत. आता काय करायचे ? मी त्यांना गर्भ संरक्षक देवता श्रीकृष्ण आणि कुलदेवीची आराधना करायला सांगून माझ्या देवाची आराधना केली. माझे दोन चार दिवस अस्वस्थतेत गेले. मला फ़ोन करायची छाती होईना. सातव्या दिवशी माझी चुलत बहीण आली आणि तीने मला तीच्या जावेच्या तीळ्या पैकी एकाचे ठोके बंद झाल्यावर जुळे जन्माला कसे आले याची कहाणी सांगीतली. मी लगेच इंटरनेटवर पाहीले असता. http://americanpregnancy.org/multiples/vanishing-twin-syndrome/ हा कन्सेप्ट वाचनात आला. ज्यात स्पष्ट उल्लेख होता की जुळ्या मुलांच्या गर्भापैकी एकाचे ह्रुदय बंद पडले तर पहिल्या तीन महिन्यात तो गर्भ आतल्या आत जिरतो आणि दुसरे बालक सुखरुप जन्माला येते.

ह्या स्त्रीने ज्या अर्थी मला फ़ोन केला तेव्हा त्यांच्या डॉक्टर्स ना हा कन्सेप्ट माहित नव्हता ? त्यांनी ह्या स्त्रीला घाबरु नकोस तुला अजुन तीन महिने व्हायचे आहेत. पहिल्या तीन महिन्यात एक बाळाचा गर्भ जिरुन दुसरे बालक सुखरुप जन्माला येण्याची शक्यता खुपच जास्त आहे हे सांगायला नको होते ? कधी कधी मला डॉक्टर्स असे का वागतात याची कारणे समजत नाहीत.

हे ज्ञान किंवा कन्सेप्ट डॉक्टर्स नी सांगीतला असता तर ती गर्भवती तणावाखाली येऊन मला फ़ोन केला नसता. मी काय केले फ़क्त विश्वास दिला. हेच डॉक्टर्स ने करायला हवे होते.

मग ह्या जोडप्यातील पतीचा फ़ोन दोन चार दिवसापुर्वी आला. सिझेरीयन साठी योग्य दिवस कोणता असे तो विचारत होता. मी ही ह्या दिव्यातून नुकताच गेलो होतो. माझ्या मुलीने सिझेरीयनने तीच्या मुलाला नुकताच जन्म दिला. तेंव्हा आपल्या समुहावरील विजयानंद पाटील यांच्याशी मी चर्चा केली असता यात फ़ार ढवळा ढवळ न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मला ते म्हणाले की श्रीकृष्ण देवता गर्भरक्षक आहे. स्मरण करा आणि बाकी डॉक्टर्स वर सोडा. मी माझ्या स्वत: च्या बाबतीत स्वत: चे डोके चालवत नाही. नेहमी आपल्या पेक्षा अनुभवी लोकांचा सल्ला घेतो.

दोन चार दिवसामागे हाच सल्ला मी दिला. काल फ़ोन आला की या जोडप्याला कन्या रत्न झाले आहे. काल पासून मी खुष आहे. माझा ज्योतिषीय प्रयोग यशस्वी झाला. ही माझी नाही तर त्या जोडप्याची सुध्दा खात्री आहे.

आता तांत्रिक बाबी कडे जाऊ. जर स्त्रीचा पंचमेश बिघडला असेल तर वर उल्लेखली त्या प्रमाणे गर्भधारणेत अडचणी संभवतात. या IVF तंत्राने दुर होण्यासारखी परिस्थिती असेल तर ती स्त्री गर्भवती होऊ शकते. पण तांत्रीक बाजू पाहिली असता स्त्रीच्या गर्भाशयातून स्त्री बीज बाहेर काढणे, त्याचा पुरुष बीजाशी संयोग घडवणे आणि ते पुन्हा ५-६ दिवसांनी फ़लीत झाल्याची खात्री करुन गर्भाशयात सोडणे, गर्भाशयाने ते स्वीकृत करुन गर्भाची वाढ होणे यात गुरु ग्रहाचे मोठे कार्य असते. मुळ पत्रिकेत अनेक वेळा पंचमेश सुस्थितीत असूनही स्त्रीचा गुरु वक्री किंवा अशुभ स्थानी असता , त्याच्या सोबत युतीत व्ययेश असता किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी असता हे कार्य खात्रीने होत नाही.

सर्व ज्योतिषी हेच छाती ठोक पणे सांगतात की तुमच्या पत्रिकेतले शुभ ग्रह आयुष्यभर शुभ फ़ळे देत नाहीत. त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना, गोचर ग्रह अनुकूल असताना जास्त फ़लदायी होतात. तसेच अशुभ ग्रहांचे असते. जेव्हा अशुभ ग्रह त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना जास्त अशुभ फ़लदायी होतात.

मी  यात अचुक काळ शोधला ज्या काळी पंचमेशाचे अशुभत्व कमी होऊन गर्भ धारण होईल तसेच गुरु अनुकूल असल्यामुळे गर्भाची वाढही खात्रीने होईल. या पध्दतीने अनेक वेळा हा प्रयोग करायला मिळाला तर IVF चे फ़ेल्य़ुअर प्रमाण कमी होऊन जोडप्याचा खर्च वाचेल आणि धीर ही खचणार नाही. अश्या जोडप्यांनी माझ्याशी संपर्क करावा यासाठी हा लेखन प्रपंच.

Thursday, October 19, 2017

अक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य

अक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य  नक्षत्रप्रकाश ह्या आपल्या ज्योतिषविषयक  दिवाळी अंकात लिहावे असा मानस होता. पण काही कारणाने दिवाळी अंक निघु शकला नाही. आज रोजी हे वार्षीक राशीभविष्य मात्र वाचकांना देताना आनंद होत आहे. लिहून झाल्यावर किमान तीन वाचने व्हावीत हा नियम पाळायला वेळ नाही. दिवाळीतल्या पाडव्याच्या मुहूर्तावर हे राशीभविष्य लोकांना वाचायला मिळावे असा संकल्प करुन तो सिध्दीस जाताना काही तांत्रिक चुका दिसल्याच तर जरा दुर्लक्ष करा. चांगला भाग घ्या.

 जे ग्रह साधारणपणे वर्षभर एकाच राशीत असतात त्यांचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणे शक्य नाही. हे ग्रह ताकदवान आहेत. यांच्या शुभयोगात महिनाभरात बदलणारे ग्रह येतात तेव्हा प्रत्यक्ष घटना घडताना दिसतात. उदाहरणार्थ आता तुळेत गुरु आहे.. ज्याची शुभ दृष्टी मिथुन व कुंभ राशीवर असेल. ही दृष्टी विवाह इच्छुकांचे विवाह घडवून आणताना दिसेल. याचा अर्थ वर्षभर योग आहेत असे नाही. जेव्हा मिथुन /कुंभ राशीत शुक्र जाईल, मंगळ जाईल तेव्हा तो महिना या दृष्टीने अनुकूल असेल.

या दिवाळीच्या थोडेसे आधी किंवा लगेच नंतर कोणते मोठे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत ते पाहू सोबत त्याचा वर्षभर होणारा एकत्रीत परिणाम सुध्या या राशीभविष्याचा माध्यमातून जाणून घेऊ या.

७ ऐप्रील २०१७ ला हर्षलचा मीन राशीतुन मेष राशीत प्रवेश झाला आहे व वर्षभर मुक्काम मेष राशीत आहे.
८ सप्टेंबर २०१७ रोजी राहूचा सिंह राशीतुन कर्क राशीत प्रवेश झाला आहे व वर्षभर मुक्काम कर्क राशीत आहे.
८ सप्टेंबर २०१७ रोजी केतूचा कुंभ राशीतुन मकर राशीत प्रवेश झाला आह व  वर्षभर मुक्काम मकर राशीत आहे.
१२ सप्टेंबर २०१७ रोजी गुरु कन्या राशीतुन तुळा राशीत प्रवेश झाला आहे व वर्षभर मुक्काम तुळा राशीत आहे.
२६ अक्टोबर २०१७ रोजी शनि पुन्हा एकदा धनू राशीत प्रवेश होत आहे व व वर्षभर मुक्काम धनु राशीत आहे.

आता राशीवार फ़ळे पाहू -  ही फ़ळे लग्न रास माहित असेल तर तिकडुन ही पहावीत तशीच चंद्राच्या राशीकडुनही पहावीत.

मेष रास : मेष राशीला राहू चतुर्थ स्थानी येत आहे. रहात्या जागेतला बदल अपेक्षीत आहे. सातव्या स्थानी जाणारा गुरु व्यावसायीक संधीत वाढ करेल. व्यावसायीक असाल तर उत्पन्न वाढणार आहे.  शनि बदल भाग्य स्थानातून होत आहे. मेषेला हा बदल मिश्र फ़लदायी होतो. लाभेश लाभ स्थानाच्या लाभात म्हणुन अनेक लाभ तर दशमेश दहाव्या स्थानाच्या बाराव्या स्थानी आल्याने नोकरी व्यवसायाकारणाने परदेशी जाणे किंवा अपरिहार्य बदली होणे इत्यादी. ज्यांच्या मुळ पत्रिकेत धनु राशीत शनि असेल त्यांना याचा खास अनुभव येईल. दशमस्थानी केतू भ्रमण असणार त्यामुळे नोकरी-व्यवसाय काही सुखासुखी पुढे जाणार नाही. अर्थात तुम्हाला चॅलेंजेस हवीच असतात. यातून तुमचे क्रायसेस मॅनेजमेंट कौशल्य सुधारणार आहे.

१७ जानेवारी २०१८ ला मंगळ हर्षलशी प्रतियुती तर रविशी केंद्र योग करत आहे. ह्या योगात अपघाताचे भय आहे त्यामुळे आधीचे ५-६ दिवस तर नंतरही ५-६ दिवस वहाने जपून चालवा. वाहन स्पर्धा अजिबात टाळावी. तरुण मुलांच्या पालकांनी किमान या दिवसात नवशिक्या मुलांच्या हातात वहानाच्या किल्ल्या हातास लागणार नाहीत असे पहावे. असाच कुयोग १३ मे २०१८ च्या आसपास ही आहे. तसेच तो १ ऑगस्टच्या २०१८ दरम्यान ही आहे. मेषेच्या प्रौढांनी स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि पालकांनी तरुण वयाच्या मुलांवर नियंत्रण ठेवावे.

खेळाडूंना/पोलीस किंवा सैन्यातल्या लोकांना एखादा सरकारी सन्मान मिळण्याचे संकेत १५ डिसेंबरपासून महिनाभरात मिळतील. नोव्हेंबर आणि मे महिन्यात कुटुंबियासमवेत वेळ देण्याचे योग आहेत.

सातव्या स्थानी येणारे गुरुचे भ्रमण आपण व्यापारी असाल तर नविन करार मदार होतील असे फ़ळ देईल. करार विचार पुर्वक करा.उत्पन्न वाढेल पण त्याच सोबत काही चिंता नाहीत ना याचा विचार करा. अश्विनी, भरणी किंवा कृतीका चे पहिले चरण हे भ्रमण फ़ारसे चांगले नाही.

शनिचे भाग्य स्थानातून भ्रमण फ़ार उत्तम आहे असे नाही पण लाभेश लाभात असताना काही उत्पन्न वाढेल असे योग आहेत. अश्विनी नक्षत्रात जन्म असलेल्या लोकांना याचा अनुभव मार्च २०१८ नंतच काही महीने येईल.

वृषभ रास : या राशीला राहू तिसरा येणार आहे. भावंडांच्या बाबतीत काही चिंता राहील. गुरु सहावा येणार आहे. हा गुरु ठोबळ मानाने आर्थिक स्थिती उत्तम करेल कारण तो अर्थ त्रिकोणात आहे.  ९ मार्च २०१८ ते १० जुलै या गुरु वक्री होण्याच्या काळात ज्यांना मुळातच डायबेटीस आहे त्यांनी काळजी घ्यावी. शनि आठवा होणार आहे जो तुम्हाला बांधून ठेवणार आहे. फ़ार प्रगतीची अपेक्षा करु नये परंतु व्यावसायीकांना नविन प्रॉडक्ट च्या कल्पना साकार होताना दिसतील. प्रॉडक्ट कन्सेप्ट डेव्हलप होतील.

 जे लोक प्रिंटींग व्यवसायात आहेत त्यांनी प्रुफ़ रिडींग बाबत सावधानी घ्या अन्यथा चा मा होऊन नुकसान होईल. कृतिका नक्षत्राच्या मंडळींनी सावधान रहा. वृषभ राशीच्या लोकांनी इमेल लिहताना सावधानता घ्या. इंटरव्ह्युला जाताना पुढील दीड वर्ष राहू काळ टाळून जा. नोव्हेंबर महिना सुख समाधानाचा तर ३ मार्च २०१८ ते २५ मार्च २०१८ हा काळ अपेक्षा पुर्तीचा अनुभवाला येईल. अनेक कामे याच काळात अपेक्षीत फ़लदायी होतील. वयाने मोठ्या अश्या व्यक्तींशी मैत्री होईल. ज्या योगे त्यांच्या अनुभवाचा फ़ायदा होताना दिसेल.

सहाव्या स्थानी येणारा गुरु अर्थ त्रिकोणातून जाताना उपत्न्न वाढवणार आहे. नोकरी व्यवसायात वाढ ही होणार आहे व पैसे संग्रह वाढणार आहे. याचा अर्थ या वर्षी आपण सोने /मुदतठेवी या माध्यमातून संपत्ती साठवण्याचे योग या वर्षी निर्माण होत आहेत. ह्याचा अनुभव खास करुन मृग नक्षत्रावर जन्म असलेल्या वृषभ राशीच्या लोकांना अक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ काळात येईल.

आठव्या स्थानी येत असलेला शनि आपल्याला पुढील अडीच वर्षे फ़ारशी प्रगती देताना दिसणार नाही. आपल्या राशीला शनि राजयोग कारक असतो जो पण पहिल्या वर्षी गुरु सहायभूत असल्यामुळे खरा त्रास पुढील फ़क्त दीड वर्षच असेल म्हणजे २०१८ दिवाळी नंतर सुरु होईल. मग आत्ता कशाला या विचाराने हे वर्ष खराब घालवायचे.

मिथुन रास : तुमच्या कुटुंबस्थानात राहूचे भ्रमण आहे.  मांसाहारी लोकांना या दिड वर्षात मांसाहाराची आठवण अनेक वेळा होईल. ज्यांचे दाताचे आरोग्य खराब आहे त्यांनी आपल्या दाताच्या आरोग्याबरोबर दुर्गंधी येऊन जवळच्या व्यक्तीला त्रास होणार नाही याबाबत जागरुक असावे. हा राहू गृहकलह निर्माण करणारा आहे. कारणे काहिही असतील. संभ्रम असो कि गैरसमज आपण जागरुक असा. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना फ़ारसा राहू बदलाचा त्रास नाही पण पुनर्वसु नक्षत्र ज्याची तीन चरणे मिथुनेत तर एक चरण कर्क राशीत आहेत त्यांना पुढील काही महिने संकटे येऊ शकतात यास्तव येणार्या संकटाचा आधीच वेध घ्या. कशावरही आधीच विचार करुन पर्याय शोधून ठेवले असले म्हणजे फ़ारसा त्रास होत नाही.

मिथुन राशीला तुळ राशीत गेलेला गुरु पाचवा आहे ज्यायोगे उत्पन्नात दिवाळीनंतर वर्षभर चांगली वाढ अपेक्षीत आहे. मृग नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना हा अनुभव अक्टोबर ते डिसेंबर २०१७ मधे येईल तर आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना हा अनुभव डिसेंवर १७ ते मार्च १८ या काळात येईल.  भाग्य वृध्दी करणारा हा योग आहे. भाग्य वृध्दी याचा अर्थ काही गोष्टी सहजासहजी प्राप्त होतील. तुमच्या भाग्यात कुंभ रास आहे. गुरु ज्ञानाचा कारक असल्याने एखाद्या विषयावर आपण संशोधन करु इच्छित असता हे ज्ञान सहज प्राप्त होईल. ज्या योगे आपले व्यक्तीमत्व ही उजळेल. आपल्या वरिष्ठांच्या मर्जीत वर्षभर रहाल.

शनि तुमच्या सप्तमस्थानी जाणार आहे. विवाहीत असाल तर जोडीदाराशी पुढील अडीच वर्षे वाद घालायचा नाही असे सुत्र लक्षात ठेवा. मृग नक्षत्रावर जन्मलेले जातक जरा हे सुत्र जास्त लक्षात ठेवा. सप्तमातला शनि सुध्दा तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी ठेऊन आहे. शनि तुमचा भाग्येश आहे त्यामुळे पुढील अडीच वर्षे हळु हळु भाग्य वृध्दी होताना दिसेल. तुमच्या व्यक्तीमत्वात जो बालीशपणा चुकून शिल्लक असेल तो हळु हळु कमी होऊन तुम्ही जास्त विचारी व परिपक्व व्हाल.

कर्क रास : तुमच्या राशीतून राहूचे भ्रमण सुरु आहे. तुमच्या मनात अनेक संभ्रम होणे अपेक्षीत आहे. विचारांची दिशा फ़ार वेगळी होणे स्वाभावीक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होत असल्याचे अनेकांना जाणवेल. तुम्ही अचानक अनप्रेडीक्टेबल होत आहात असे इतरांना जाणवेल. पुष्य नक्षत्राला अचानक संपत्ती जमा करण्याचे योग आहेत. आश्लेषा नक्षत्राला हे राहूचे भ्रमण फ़ारसे उत्तम आहे असे नाही. आश्लेषा नक्षत्राला स्वत: चे काही वैचारीक प्रश्न असतात त्यात भर पडल्याचे जाणवेल. काही नविन वैचारीक बदल होणार आहेत त्यासोबत तुम्ही काही नविन विचार आत्मसात कराल किंवा नविन विचार धारेला जन्म द्याल.

गुरु तुमच्या चतुर्थ स्थानी येणार आहे. तुमचा अधिकार वाढेल. अध्यात्मिक असाल तर उत्तम अनुभव या वर्षी तुम्हाला येतील. योग करत असाल तर पुढली पातळीवर या वर्षभरात पोहोचाल.

शनि तुमच्या सहाव्या स्थानी पुढील अडीच वर्षे भ्रमण करणार आहे. सप्तमेश आणि अष्टमेश सहाव्या स्थानी येत आहे. ज्यांचे वैवाहीक संबंध जास्त ताणलेले आहेत त्यांनी ते अजुन ताणले जाणार नाहीत यासाठी योजना करा. सर्वच नक्षत्रावर जन्मलेल्यांनी यावर खास लक्ष द्यावे. आरोग्याची पुढील अडीच वर्षे घ्यावी लागणारच आहे.

सिंह रास : सिंह राशीला राहूचे  हे बाराव्या स्थानातले भ्रमण फ़ारसे चांगले नाही.  व्यावसायीक असाल तर हा राहू  अनावश्यक अनपेक्षीत खर्च वाढवेल. फ़ार मित्र वाढवणे असा मघा नक्षत्राचा स्वभाव नाही तरी नविन मित्र आपल्याला खड्यात घालणार नाहीत ना ह्याचा विचार अवश्य करा. पुर्वा नक्षत्राच्या लोकांनी कोणाची दोस्ती करायची यावरही विचार करुन ठेवा. त्यांनाही मैत्री खातर नुकसान संभवते. " तुमच्या साठी काय पण" असा डायलॉग मारणारे जरा सावध रहा असे या निमीत्ताने सांगावेसे वाटते. उत्तरा नक्षत्राचा एक चरण सिंह राशीत तर उरलेले तीन कन्या राशीत असतात सिंह रास उत्तरा नक्षत्र यांनी अनेक कामे साध्य करताना जास्तीचा खर्च होत नाही ना याचा विचार करावा नाहीतर दर्द से दवा दुखदायक असा अनुभव यायचा.

आपल्या राशीला गुरु तिसर्या स्थानी येणार आहे त्यामुळे भाग्य वृध्दी, उत्पन्न वृध्दी, व्यापारी असाल तर व्यापार वृध्दी, विवाह इच्छुक असाल तर विवाह इतकी सगळी फ़ळे मिळणार आहेत. काय पाहिजे ते तुम्हीच ठरवा.

शनिचे भ्रमण आपल्या पंचम स्थानातुन होणार आहे. आपल्या संततीच्या अभ्यासाची चिंता लागून राहील त्या ऐवजी नियमीत आढावा घ्या हा सल्ला आहे. सातत्याने आढावा घेतला की प्रश्न सुटेल. हे काम आपल्याला जमेल की त्याच्या आईने करायचे तेव्हडे ठरवा.

कन्या रास: गेले दिड वर्षे हा राहू तुम्हाला आर्थिक संकटात टाकून बसला असेल तर आता पैशाची आवक वाढताना दिसेल. मग कुणाला ती नोकरीतल्या बदलाने असेल तर कुणाला अन्य मार्गाने. उत्तरा नक्षत्राला मित्र काही चांगले काम किंवा चांगली नोकरी मिळवुन देण्यास सहायक होताना दिसतील. हा बदल सुखावह असेल असे नाही. त्रासदायक बदल असला तरी पैसे वाढवून मिळणार आहेत. चॉईस तुम्ही करा. हस्त नक्षत्राच्या लोकांना काही गोष्टी सहज साध्य होऊन पैसे जास्त मिळतील असे ग्रहमान आहे. एकंदरीत कुणाला कष्ट/त्रास /मानहानी जास्त पण पैसे येणार तर कुणाला पैसे मिळवण्याची ट्रीक साधणार हा फ़रक असणार आहे. तुमची रास अर्थतत्वाची असल्याने आपल्याला काय पदरात पडत आहे हा तुमचा विचार असतो म्हणुन हा फ़रक सांगीतला. चित्राचे दोन चरण कन्या राशीत आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आणि त्रास  आहे असे ग्रहमान आहे.

गुरुचे भ्रमण कुटुंब स्थानी आहे. कुटुंबस्थानी जेव्हा गुरु येतो तेव्हा कुटुंबात एका सदस्याची संख्या वाढते याचा अनुभव नुकताच मी लग्न कुंडलीच्या बाजूने मी स्वत: घेतला आहे. दुसरे स्थानी असलेला गुरु सहाव्या स्थानी व दहाव्या स्थानी दृष्टी टाकतो. एकंदरीत कामही वाढणार म्हणजे उत्पन्न ही वाढणार असा अनुभव तुम्हाला येईल. उत्पन्न दोन मार्गांने वाढणार आहे. हस्त नक्षत्रावर जन्मलेल्यांना हा अनुभव नक्कीच येईल.  एकतर स्वत:चे कष्ट आणि इतरांचे कष्ट. याचा अर्थ तुमच्या हाताखालचे लोक साथ देतील आणि मेहेनत करतील पण नीट दिशा देणे तुमचे काम आजे.

शनिचे चतुर्थ स्थानचे भ्रमण मात्र आपले सुख कमी करेल. नोकरी- व्यवसायात वृध्दी होत असताना तुम्हाला किमान वर्षभर घरी सुख अनुभवायला तुम्ही कमीच असणार. काहीतरी मिळवायचे म्हणजे काहीतरी गमवावे लागणारच ना ? सर्वच नक्षत्रावरचे लोक हा अनुभव घेतील.

तूळा रास : एखादा मोठा सन्मान, किंवा अधिकाराचे पद मिळवताना नोकरीचे ठिकाण किमान टेबलाची जागा बदल घडणे करावेच लागते. पोर्ट फ़ोलीओ किंवा नोकरी/ व्यवसायात बदल असे योग आहेत. याचे चांगले परिणाम किंवा त्रासदायक परिणाम आहेतच. हे बदल अनपेक्षीत आहेत हे नक्की. ज्यांनी अजून नोकरी व्यवसायात पदार्पण केलेले नाही त्यांना अचानक नविन नोकरीच्या /व्यवसायाच्या संधी चालून येतील. " हारी बाजी को जितना मुझे आता है " असेही घडुन ज्या नोकरी/ व्यवसायाची अपेक्षा सोडली होती अश्या हुकलेल्या संधी पुन्हा चालून येतील. चित्राला हा बदल त्रासदायक आहे. स्वातीला नाही तर विशाखाला हा बदल जरा जास्तच त्रास देईल. तुमच्या साठी हा बदल म्हणजे शिक्षा म्हणुन बदली किंवा त्रास देण्यासाठी बदली असे असेल. विशाखा नक्षत्राच्या लोकांना व्यावसायीक काही संधी आल्याच तर पारखुन घ्या हे सांगणे गरजेचे आहे.

तुमच्या राशीला आलेले गुरु भ्रमण तुमचे व्यक्तीमत्वात बदल घडवेल. सडपातळ असाल तर जर जाड दिसाल. सहसा तूळ राशीची माणसे वजनदार नसतात त्यामुळे तुम्ही खुप जाड व्हाल असे मात्र घडणे लग्नी गुरु असता शक्य आहे पण हा योग वर्षभरच त्रास देईल सबब जरा गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा. या वर्षी तुम्हाला शैक्षणीक यश आहे, भाग्य वृध्दी आहे आणि विवाह इच्छुक असाल तर तो ही घडेल.

तिसर्या स्थानी येणारा शनि साडेसाती संपुर्णपणे संपवून तुम्हाला मानसीक स्वास्थ्य देईलच शिवाय लेखनाची आवड असल्यास दिर्घ लेखन हातून घडेल. भाग्यवृध्दी ही करेल कारण तुळा राशीला शनि राजयोग कारक आहे. विद्यार्थ्यांना कष्टाने पण यश नक्की मिळेल.

वृश्चिक रास : आपल्या भाग्यात राहू येत आहे. भाग्य स्थानातून राहू जात असताना तिर्थ यात्रा घडू शकतात. तिर्थ यात्रा करताना काही नियम असतात. भ्रष्टाचाराने पैसे मिळवुन लोकांना काशीला नेणारे उद्योग राजकीय नेते करतात. अश्या मंडळींनी केलेल्या तिर्थयात्रात सहभागी झाल्यावर फ़ारसे पुण्य लाभत नाही. अश्या यात्रा तुम्ही करणार का ? विचार करा. विशाखा नक्षत्राला अशी केलेली यात्रा एखादा अपघात तर घेऊन येणार आहे असे ग्रहयोग दर्शवितात. किंवा तुमच्या पित्याने घेतलेल्या निर्णयाने काही चुकीचे तर होणार नाहीना हे तपासावे लागेल. अनुराधा नक्षत्राला तुमची यात्रा कंपनी/ टुर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय लाभदायक ठरेल. जेष्ठा नक्षत्रवाले टुर अ‍ॅरेंजर्स असतील तर काही क्रियेटीव्ह टुर्स पॅकेजेस तयार करुन दाखवतील. एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांना फ़िरण्याचे योग आहेत.

तुमच्या बाराव्या स्थानी येणारा गुरु तुमचे खर्च वाढवणार आहे पण चतुर्थ स्थानावर त्याची दृष्टी असल्याने हा खर्च एकतर प्रॉपर्टी खरेदी साठी असेल किंवा ज्यामुळे आपल्याला सुख मिळेल अश्या परदेशी प्रवास किंवा तिर्थयात्रा यासाठी होऊ शकतो.

साडेसाती मधे शेवटचा टप्पा सुरु होत आहे. हा टप्पा कुटुंबस्थानातून आहे. कौटुंबिक संघर्ष किंवा वृध्दांचा वियोग अशी दुखदायक फ़ळे हा शनिच्या तिसर्या टप्यात मिळताना दिसतात. वृध्दांचा वियोग ही गोष्ट अपरिहार्य आहे पण असे दरवेळी घडेल असे नाही. अनुराधा व जेष्ठा नक्षत्रावरच्या जन्मलेल्या लोकांना कटु अनुभव जरा जास्त येतील.

धनू रास : आपल्या राशीच्या लोकांना कर्क रास अष्टमस्थानात आणि त्या राशीतून राहूचे भ्रमण काही शारिरीक पिडा घेऊन येईल. आपली साडेसाती सुरु आहेच. त्यात दीड वर्ष हा त्रास आहे. ऑपरेशन्स किंवा दिर्घकाळ आजारातून जाण्याचे योग टाळावेत यासाठी असे काही झाल्यास खालील मंत्र जप केल्यास नक्कीच ह्या त्रासापासून सुटका होईल. उत्तराषाठाचे एक चरण धनू राशीत आहे त्यांना अनुभव येऊ शकतो.
अनेक रूपवर्णेश्च शतशोऽथ सहश:।
उत्पातरूपो जगतां पीडां हरतु मे तम:।।
ज्यांना मंत्र जप शक्य नाही त्यांनी भटक्या कुत्र्याला पोळी/भाकरी खाऊ घाला तेच फ़ळ मिळे. घरी कुत्रा असेल तर त्याची व्यवस्था पहा.  मूळ व पुर्वाषाठा नक्षत्राच्या व्यक्तींना आपले काही मित्र या काळात आपल्याला शेअर्स च्या टीप्स देतील त्या दुर्लक्ष न केल्यास फ़ायदा होईल. इन्शुरन्सचे पैसे मिळण्यात अडचण असेल तर मित्रांचे सहकार्य घ्या. या दोन नक्षत्रांना मित्रांच्या सहायाने धनलाभ संभवतो.

लाभ स्थानातून गुरुचे भ्रमण आवक वाढवताना दिसेल. संततीचे योग आहेत. विवाह इच्छित असणारे विवाह बंधनात अडकतील आणि भावंडे प्रगती करतील असे वर्षभर योग आहेत.

आपल्या राशीतुन होणारे शनिभ्रमण चंद्रावरुन आहे त्यामुळे  मानसीक त्रास ही देणार आहे. मानसीक त्रासाचा हा "पीक पिरियड" आहे. मुळ नक्षत्राला या वर्षी हा त्रास जाणवणार आहे. शनिवारी शनिपुजन आणि शनि पीडाहर मंत्राचे दररोज अंघोळी नंतर पठण केल्यास ह्यातून त्रास कमी होईल.

हा घ्या तो मंत्र.

सुर्यपुत्रो दिर्घ देहो विशालाक्ष शिवप्रिया:।
मंदाचार प्रसंनात्मा पीडा हरतु मे शनि: ॥

माझे गुरुवर कायम सांगत की साडेसाती पीडा हरणासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. निलांजन समाभासं हा मंत्र शनि पुजनाचा आहे. स्तुती करण्याचा आहे. पण साडेसाती पीडा हरण किंवा शनिची पीडा अन्य कोणत्या प्रभावामुळे होत असता वरील मंत्र जपावा.

मकर राशी : उत्तराषाठा नक्षत्राच्या तीन चरणांचा सहभाग मकर राशीत आहे आणि हे नक्षत्र असलेल्या मकर राशीच्या लोकांना स्वत: ला त्रास नाही पण आपल्या वैवाहीक जोडीदाराला आजारपण/ अपघात अश्या विपत्तीला पहिले काही महीन्यात तोंड द्यावे लागेल अशी शक्यता आहे. सप्तमातला राहू हा काही काळ अचानक आय़ुष्यात काही व्यक्ती येण्याचा काळ दर्शवितो. मग ते प्रेमप्रकरण असेल किंवा अनैतीक संबंध असतील. जे असले निर्णय घ्यायच्या वयात आहेत अश्यांना खास करुन उत्तराषाठा व्यक्तीच्या लोकांनी या प्रकरणापासून अलिप्तता बाळगावी. विवाह ठरत असल्यास चौकशी जास्त करावी. ज्यांचे विवाह ठरण्यास उशीर होत होता अश्या श्रवण नक्षत्राच्या लोकांना झट मंगनी पट ब्याह असा अनुभव येईल. धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मकर राशीत आहेत त्यांना व्यावसायीक असतील तर पार्टनरने अडचणीत आणले अश्या संकटांना सामोरे जाण्याची शक्यता दिसते. आपल्या वैवाहीक जोडीदाराच्या चारित्र्यावर उगाचच शंका मनात यावी असा काळ आहे. ही शंका घेताना मकर राशीच्या लोकांनी उगाचाच पराचा कावळा होत नाही ना ? याची काळजी घ्या.

दशमातून होणारे गुरु भ्रमण आपली नोकरीत कामाच्या कक्षा वाढवणार आहे. आपल्यावर अकस्मात जबाबदारी वाढल्याचा अनुभव येईल. याचे फ़ळ पुढील वर्षी वेतन वाढीत किंवा प्रमोशनसहीत वेतन वाढीत मिळेल म्हणुन नोकरीत/ व्यवसायात चालढकल करु नका.

साडेसातीच्या सुरवातीच्या टप्यात कष्ट पडतात, खर्च वाढतात किंवा मानसीक कष्ट ही वाढतात. परदेश भ्रमण होते. शनि धनु राशीत जाईल तेव्हा हे फ़ळ मिळणार आहे. खर्च झाला तरी तो इन्व्हेस्टमेंट कशी होईल ते पहा. मानसीक कष्ट काही शिकवून जातात याकडे लक्ष द्या. परदेशगमनाने काही लाभ निश्चित होतात. ज्ञान वाढते. सबब साडेसातीकडे फ़ार निराशाजनक पध्दतीने पाहू नका. शनि शिक्षक आहे, न्यायाधीश आहे. तो चुकांचे फ़ळ देतो. देताना जाणिवही देतो. या चुका करायच्या नाहीत हा संदेश आपण घ्यायचा असतो.

कुंभ राशी : आपल्या सहाव्या स्थानातून राहू जाताना खासच काळजी करावी असे ग्रहमान आहे. रोगाचे निदान ना होणे. झाले तरी योग्य औषध ना मिळणे. गुप्त शत्रुंच्या कारवाया असे ग्रहमान आहे. डॉक्टर/ वैद्य याच बरोबर आजार असता ज्योतिषाची मदत घेतलीत तर निदान योग्य होईल हे जरा धाडसाचे मी विधान मी करतो आहे असे नाही. पण जेव्हा सर्व प्रयत्न हरतात तेव्हा काही वेगळे मार्ग नक्कीच उपयोगी ठरावेत. शततारका नक्षत्राला हा त्रास फ़ारसा नाही पण पुर्वा भाद्रपदाचे जे तीन चरण कुंभेत आहेत अश्या व्यक्तीला हा त्रास नक्कीच संभवतो. यास्तव कोणता आजार, काय ट्रीटमेंट या कडे राहू बदलानंतर पहिले काही महिने लक्ष द्या. उगाच औषधे घेत राहू नका नाहीतर " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी " अस एक नाट्यपद जुन्या नाटकात होते तसा अनुभव यायचा.

भाग्य स्थानातून होणारे गुरुचे भ्रमण परदेश गमन, तिर्थयात्रा यासाठी अनुकूल आहे. कुंभ रास ही अध्यात्मात रममाण होणारी रास आहे असे म्हणतात यादृष्टीने विशेष गुरु कृपा मिळेल. ज्यांना गुरु मंत्र हवा आहे त्यांनी खास प्रयत्न करावेत. ज्यांना संतती हवी आहे त्यांना संतती योग आहेत. संततीची प्रगती वर्षभर होणार आहे. आपले व्यक्तीमत्व उजळून निघेल असे मान सन्मान या वर्षी प्राप्त होतील.

लाभ स्थानी येणारा शनि आपल्याला कष्टाच्या मार्गाने येणार्या धनामधे वृध्दी देताना दिसेल. काही कान पिळणारे जेष्ठ मित्र मिळतील. त्यांचा सल्ला महत्वपुर्ण असेल.


मीन रास : पाचव्या स्थानातून होणारे राहूचे भ्रमण पूर्वा भार्द्रपदा नक्षत्राच्या शेवटच्या चरणाला चांगले नाहीत. मुलांच्या कारणाने चिंता राहील. आपली संतती अडचणीत कशाने येऊ शकेल याचा शोध घ्या आणि त्यावर पर्याय शोधून ठेवा. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्राला क्रिडा प्रकार, कला, विचार प्रदर्शनातून चांगला लाभ या काळात मिळु शकेल. रेवती नक्षत्राला मात्र आपल्या विचारांनी भ्रमीत झाल्याचा भास काही काळ होईल. संतती अपेक्षा असणार्यांना या काळात नक्कीच संतती लाभ आहे. पाचवा राहू कधी काळी संतती होताना अडथळे निर्माण करतो हा अनुभव काहींना येऊ शकतो. गर्भपात ही टर्म पहिल्या तीन महिन्यात नैसर्गीक प्रक्रिया आहे हे खास करुन स्त्रीयांनी लक्षात ठेवावे. विकृत गर्भ निसर्ग ठेऊन घेत नाही. म्हणुन ही बातमी कळाल्यास तपासण्या करा. आजकाल अगदी पहिल्या महिन्यापासून सोनोग्राफ़ीत विकृती निदान होते. रेवती नक्षत्रांच्या स्त्रीयांनी गर्भ राहीला असता हे राशीभविष्य वाचून चिंता करण्या ऐवजी श्रीकृष्णाच्या आवडत्या मंत्राचा जप करावा.

अष्टमस्थानी आलेला गुरु व्यावहारीक जगात फ़ारसा शुभ नसतो. परंतु ज्यांना योगाभ्यासाची आवड आहे त्यांना खासच पर्वणी आहे. काही यौगीक प्रक्रियात प्राविण्य मिळवून अध्यात्म क्षेत्रात प्रगती कराल.

शनिचे दशमस्थानी असलेले भ्रमण तुम्हाला नोकरीच्या/ व्यवसायाच्या ठिकाणी कष्टाचे असेल. कामाचा बोजा वाढेल किंवा ज्या कामाची प्रोसेस नक्की माहित नाही अशी कामे करावी लागल्यामुळे शारिरीक  व मानसीक कष्ट वाढतील. तुमच्या क्षमता वाढणे कधीतरी आवश्यकच असते या शिवाय पुढचे प्रमोशन मिळत नाही या दृष्टीने या कडे पहा.

शुभंभवतु

Sunday, October 1, 2017

मुंबई मेरी जान

मुंबई मेरी जान नावाचा सिनेमा काही वर्षांपुर्वी येऊन गेला. मुंबईत रहाणार्यांचा जीव तिथेच अडकलेला असतो. फ़ारच थोडे लोक मुंबई सोडुन दुसरेकडे स्थाईक व्हायला इच्छुक असतात. या चकाचक आणि वेगवान दुनियेत काही जिवघेण्या भिती ही दडलेल्या असतात. मुंबईत झालेले बॉम्ब स्फ़ोट असोत की त्यानंतर झालेल्या दंगली. लोक आजही त्या भितीदायक दिवस-रात्रीच्या आठवणी जागवून असतात. बॉम्ब स्फ़ोट पुन्हा होतील का या प्रश्नाचे उत्तर दहशत वादाला किती पाळे मुळे मुंबईत पसरता येतात यावर त्याची तिव्रता अवलंबून आहे. थोडक्यात हे संकट मानव निर्मीत आहे आणि त्याचे उत्तर ही मानवाकडे आहे.

२६ जुलै २००५ आणि २९ ऑगस्ट २०१७ रोजी या शहराला पावसाने झोडपले. हा प्रश्न जरी मानवनिर्मीत असला तरी तो निसर्गाच्या वर सुध्दा अवलंबुन आहे म्हणुन मला "कोणत्या मुंबईत योगावर जोरदार पाऊस पडला आ्णि पुन्हा अशी भिती मुंबईला कधी येऊ शकेल?"  यावर अभ्यास करण्याची प्रेरणा झाली. अर्थात हा अभ्यास आहे. मुंबईचे भविष्य मी वर्तवत नाही. मेदिनीय ज्योतिष शाखेचा मी विद्यार्थी नाही त्यामुळे या लेखाचा झालाच तर उपयोग काळजी घेण्यासाठी किंवा या विषयावर विस्त्रुत अभ्यास करण्यासाठी आहे.

पाऊस पडण्यासाठी खालील गृहीतके विचारात घेतली आहे.

१. पावसाच्या सिझनमध्ये पाऊस पडतो. सध्याच्या वातावरणात जुन जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस पडतो याला सरकारी भाषेत सुध्दा मोसमी पाऊस असे संबोधले आहे. अन्य काळात जरी पाऊस झाला तरी मुंबई बुडेल असा पाऊस होणार नाही.
२. पावसाच्या नक्षत्रात म्हणजे खालील नक्षत्रात जेव्हा रवि प्रवेश करतो आणि त्याचे वहान जर बेडूक, म्हैस,हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल, मोर, गाढव, उंदीर वाहन असता मध्यम पाऊस पडेल,घोड़ा वाहन असता पर्वतक्षेत्रात पाऊस पडेल आणि कोल्हा, मेंढा वाहन असता पाऊस ओढ़ लावील असे सांगण्यात आले आहे. ही वहाने पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे किंवा नाही याबाबत अंदाज देतात.
३. जर कर्क, वृश्चिक आणि मीन या जलराशीत जास्त ग्रहांची किंवा शुक्र, चंद्रासारख्या जलग्रहांचे अधिक्य असेल तर पाऊस जास्त पडतो
४. जून महिन्यात ढ्गांचे प्रमाण विस्कळीत असते. मुसळधार पाऊस जुलै किंवा ऑगस्ट महिन्यातच पडतो आणि जून महिन्यात पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते. यामुळे पाऊस पडला तरी पाणी कमी वहाते.
५. पाऊस जास्त पडेल म्हणजे त्या ठिकाणी कमी काळात रेकॉर्ड पाऊस पडेल किंवा त्या काळात सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस पडेल.

खालील कुंडली मुंबईचे सिंह लग्न गृहीत धरुन २६ जुलै २००५ या दिवसाची तयार केली आहे. सुर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश १९/०७/२००५ ला झाला तेंव्हा वाहन बेडुक होते. एका वहाना वरुन पाऊस जास्त पडेल की कमी असे वर्तवणे बरोबर असणार नाही. कारण ही परिस्थिती १३ दिवस असते. अश्यावेळी तेरा दिवस जोरदार पाऊस पडेल का ? तर नाही. ज्या दिवशी असे वहान असून जलराशीत जलकारक किंवा अनेक ग्रहांची गर्दी असेल त्या दिवशी पाऊस पडेल.



वरील पत्रिका पाहिली असता खालील गोष्टी दिसतात.

१. मुंबईच्या पत्रिकेत अष्टमस्थानी राहू आणि चंद्र यांची युती जलराशीत झालेली आहे.
२. मुंबईच्या पत्रिकेत व्ययस्थानी रवि,शनि व बुध हे ग्रह आहेत.
३. मुंबईच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी अनेक दुर्घटना आणि एकावेळी अनेकांचे अपघाती मृत्यु घडविणारा प्लुटॊ जलराशीत आहे.

यावरुन एकूण जलराशीत १२ पैकी ६ ग्रह दिसतात. यात चंद्र एकटाच जलकारक ग्रह आहे.

आता आपण २९ ऑगस्ट २०१७ ची मुंबईची पत्रिका पाहू ज्या दिवशी पुन्हा मोठा जलप्रलय झाला. या दिवशी रवि सिंह राशीत मघा नक्षत्रात होता व त्याचे वहान मेंढा होते. याचा अर्थ भरपुर पाऊस पडेल असे वहान नसताना सुध्दा जोरदार पाऊस झाला. ही परिस्थिती अनेक ग्रह जल राशीत असताना चंद्र जलराशीत गेला असता तयार होते.



१. मुंबईच्या पत्रिकेत अष्टमस्थानी मीन या जलराशीत एकही ग्रह नाही.
२. मुंबईच्या पत्रिकेत व्ययस्थानी कर्क राशीत राहू आणि रवि हे दोन ग्रह आहेत पण युतीत नाहीत.
३. मुंबईच्या पत्रिकेत चतुर्थात वृश्चिक राशीत चंद्र आणि शनि हे दोन ग्रह आहेत,

यातला कोणता ग्रह जलराशीत असताना अशी घटना घडू शकते (पावसाचे प्रमाण वाढू शकते ? ) यावर विचार केला असता.
१. दर वर्षी जुलै महिन्याच्या १५-१६ तारखेला रवि जल राशीत जातो पण दरवेळी पाऊस वाढतोच असे नाही.
२. बुध आणि शुक्र रवि पासून लांब जात नाहीत म्हणजे एखाद्या पावसाळ्यात रवि, बुध, शुक्र आणि एखाद्या दिवशी चंद्र त्यांच्या सोबत कर्क राशीत असणे शक्य आहे. असे असूनही दर दोन चार वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक मुंबईत पाऊस पडला असेही घडत नाही.
३. या दोन्ही कुंडल्यांच्या विचार केला असता दोन्ही वेळेस शनि जल राशीत होता आणि दोन्ही वेळेस राहू जल राशीत होता.
४. या दोन्ही पत्रिकात अजून एक साम्य असे आहे की दोन्ही वेळेस गुरु कन्या राशीत होता याचा काही संबंध आहे का?
५. गुरु जल राशीत दर चार वर्षांनी जातो म्हणुन तो काही जलप्रलय करत नाही कारण गुरुचे कारकत्व वाढ करणे असले तरी नुकसान करणे असे नाही. यामुळे कन्या राशीतला गुरु स्वत: काही घडवत नसला तरी २००५ च्या जलप्रलयात त्याची दृष्टी मीन राशीतल्या ग्रहांवर असल्याने काही प्रमाणात प्रलयाला जबाबदार असावा.
६. या सर्व विवेचनावरुन असे वाटते की जलकारक ग्रहाच्या बरोबर राहू असेल तर पाऊस जोरदार पडेल.



एका जुन्या ग्रंथाचा संदर्भ घेतला तर चंद्र जेव्हा अनेक ग्रहांशी जलराशीतून योग करतो तेव्हा त्या काळात जास्त पाऊस पडतो असे अनुमान वरील हिंदी ग्रंथाच्या संदर्भातून मिळते.

यावरुन असे वाटते की पुढील वर्षी म्हणजे २०१८ मधे पावसाळ्यात राहू जलराशीतच असणार आहे. त्याचा चंद्राशी योग पावसाळ्यातल्या जुलै आणि ऑगस्ट या पावसाळ्याच्या महिन्यात होणार आहे. जर याच वेळी अनेक ग्रह जलराशीत असतील तर मोठाच पाऊस मुंबईत पडे.

सामान्य माणसाला काही भोगावे लागेल की नाही याचे उत्तर त्याच दिवशी भरती आहे किंवा रविवार सारखा सुट्टीचा दिवस नसून कामाचा दिवस असेल तर मात्र हे घडेल. आपण पाहू या संभाव्य तारखा.

१. जुन २०१८ मधे १६ व १७ ला चंद्र, शुक्र व राहू कर्क राशीत फ़क्त तीन ग्रह जलराशीत असल्याने पाऊस थोडा जास्त असेल.
२. जुलै २०१८ मधे १४ व १५ तारखेला चंद्र, बुध व राहू कर्क या जलराशीत तीन ग्रह असतील त्यामुळे पाऊस जास्त पडेल.
३. ऑगस्ट २०१८ मधे १० व ११ तारखेला चंद्र रवि बुध आणि राहू असे चार ग्रह कर्क या जलराशीत असतील इथे थोडा जास्त
   पाऊस अपेक्षीत आहे. रवि चे नक्षत्र आश्लेषा आहे व त्याचे वहान ( कोल्हा ?) असल्याने ढगांची उत्पत्ती फ़ारशी नाही.

या नंतर २८ नोव्हेंबर २०२३ ला राहू मीन या जलराशीत प्रवेश करतो त्या वर्षीच्या पावसाळ्यात इतर ग्रहांची काय परिस्थिती आहे ते पाहू.

१. जून महिन्यात फ़क्त चंद्र आणि राहू जलराशीत आहेत. असे तीन वेळा घडेल पण फ़ारसा पाऊस नसेल.
२. ७ व ८ जुलै २०२४ ला चंद्र, बुध आणि शुक्र कर्क या जल राशीत तर राहू या मीन राशीत असेल तेव्हा पाऊस जास्त पडेल.
३. १७ व १८ जुलै २०२४ ला चंद्र, बुध, शुक्र व रवि हे कर्क राशीत तर नेपच्युन व राहू मीन राशीत आहे अश्याही वेळी जास्त पाऊस पडेल.
४. २६ व २७ जुलै २०२४ ला शुक्र व रवि हे कर्क राशीत तर चंद्र व राहू व नेपच्युन मीन राशीत अशी असाधारण परिस्थिती असेल.
या दिवशी रवि पुष्य नक्षत्रात असेल. रविचा पुष्य नक्षत्रातला प्रवेश १९ जुलैला असेल व वहान बेडूक असेल. याचा अर्थ पाऊस जास्त पडेल
अशी स्थिती जुलै महिन्यात याच तारखेला असेल.

माझ्या मते जेव्हा राहू आणि चंद्र एकत्र असतात ते जास्त प्रभावी असतात. २६ जुलै २००५ ला असे ग्रहमान होते. चंद्र व प्लुटोचा केंद्रयोग २७ जुलै २०२४ ला आहे. हा एक अशुभ योग मानता येईल.

आता या तारखांना भरती आहे का हे तपासण्याची गरज आहे. नेटवर शोधले असता पुढील काही वर्षातल्या काही तारखांना  भरती असेल का ? हे शोधण्याचे टेबल काही सापडले नाही.

या शोध निबंधाचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.

१. २०१८ साली तरी किमान मुंबई जलमय होण्याचा धोका दिसत नाही.
२. हा धोका २०२४ सालच्या पावसाळ्यात होऊ शकतो.
३. २६ व २७ जुलै २०२४ हे ते संभाव्य दिवस असतील ज्या वेळी मुंबई जास्तच जलमय होऊ शकते.

घाबरुन जाण्याचे कारण नाही. मुंबईने २६ जुलै २००५ नंतर खुपच मोठा बोध घेतला आहे.  या वेळी २४ तासात ९४४ एम एम पाऊस पडला होता. या दुर्घटनेत १०९४ लोकांना प्राण गमवावे लागले होते. वीत्त हानी ही मोठी होती.

२९ ऑगस्ट २०१७ च्या घटनेत १२ तासात ४६८ एम एम पाऊस पडला जो सहसा ऑगस्ट महिन्यात इतका पडत नाही. २१ लोकांना ह्यात प्राण गमवावे लागले यात बिल्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेची जोड आहे. मुंबई या वेळेला सावध होती. अनेकांनी ऑफ़सच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अचानक येणारी संकटे कमी झाली. दुर्घटनापासून बचाव करणारी पथके रोडवर होती.

२०१७ ते २०२४ ह्या काळात नेमका कोणता भाग जास्त जलमय होतो ते शोधून त्या भागात  काही बचावात्मक यंत्रणा उभी करता आली तर ह्या लेखाचा उपयोग होईल. लोकशिक्षणाचा वापर करुन इशारा मिळेल तेंव्हा लोकांना रस्त्यावर येण्यापासून थांबवण्यात आले तर इतकीही मनुष्य हानी न होता ह्या संकटातून बाहेर पडता येईल असे वाटते. जपान मधे भुकंप कायमच होतात या साठी लोकशिक्षणाचा परिणामकारक उपयोग करुन दुर्घटनामधून होणारी मनुष्यहानी टाळण्याचे शिक्षण शाळेपासूनच दिले जाते. या पासून आपणही भारतात शिकायला हवे.

शुभ तेच घडावे. अशुभ मनुष्याने प्रयत्नाने टाळावे हाच ज्योतिषाचा उपयोग आहे हा विचार सांगून लेखनसीमा.

Sunday, August 27, 2017

सप्टेंबर २०१७ चे राशीभविष्य आणि नक्षत्रप्रकाशच्या दिवाळी अंकांची घोषणा.

ज्योतिषप्रेमी लोकहो, सप्टेंबर महिन्याचे राशीभविष्य आपल्याला सुपूर्त करताना मनात खुप आनंद होत आहे याचे एक कारण दरमहिना राशी भविष्य लिहीण्याचा संकल्प करुन एक वर्ष पुर्ण होत आहे. २०१६ सप्टेंबर पासून मी राशीभविष्य लिहायला सुरु केले. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१६ लगेचच प्रसिध्द केला. याला वाचकांचा खुप प्रतिसाद मिळाला.

आता नक्षत्रप्रकाशचा दिवाळी अंक ३० सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजे दसर्याच्या मुहूर्तावर फ़ेसबुकवर प्रसिध्द करण्याचा मानस आहे. त्यामुळे ज्यांनी फ़ेसबुकच्या नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर आपले सदस्यत्व नोंदवले नसेल त्यांनी त्वरेने नोंदवा कारण हा अंक इथे प्रथम प्रसिध्द होईल. अर्थात अनेक लोकांना याची लिंक पुढे पाठवायला मी प्रोत्साहन देतो त्यामुळेच वाचकांची संख्या वाढते. नेहमी प्रमाणे दिवाळी अंकातही ज्योतिष विषयक अनेक लेख असतील व वार्षिक राशीभविष्य ही असेल यामुळे अक्टोबर महिन्याचे वेगळे राशीभविष्य असणार नाही.

सप्टेंबर महिन्यात दोन महत्वाचे ग्रह राशीबदल करत आहेत. ८ सप्टेंबरला राहू व केतू राशी बदलत आहेत. याचे स्वतंत्र भविष्य मी आधीच प्रसिध्द केले आहे. http://gmjyotish.blogspot.in/2017/08/blog-post.html याच बरोबर या महिन्यात १२ तारखेला गुरु ही तूळ राशीत जात आहे. शनि पुढील महिन्यात पुन्हा धनू राशीत जात आहे. याचे एकत्रित परिणाम मी दिवाळी अंकात देईनच पण तो पर्यंत या महिन्याच्या भविष्यात काही तात्कालिक परिणाम वाचा.

राहू जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचे परीणाम अकस्मात आणि जोरदार घडतात. याची चुणूक या महिन्यात दिसेलच. पाहूया राशीवार भविष्य,

मेष रास: या महिन्यात १२ सप्टेंबरला गुरू सप्तमात येत आहे. ८ सप्टेंबरला राहू चतुर्थात येत आहे. पंचमात असलेला मंगळ खेळ खेळण्यात महिनाभर उत्साह येईल. चतुर्थातला राहू सुखस्थानी आल्याने आपल्या सुख कमी होणार आहे. घर बदलण्याचे योग येऊ शकतात. यामुळे नविन घरी जागा बदलल्यामुळे झोप न लागणे, वस्तु जागेवर न सापडणे असे घडेल त्यामुळे किंचीत अस्वास्थ्य येऊ शकते. अनेकांना काहीना काही कारणाने घर बदलावे लागेल , शहर बदलावे लागेल यामुळे रोजची घडी विस्कटली जाऊनही अस्वास्थ्य येऊ शकते. व्यावसायीक लोकांना व्यवसायस्थानी गुरु आल्याने व्यवसाय वृध्दी अनुभवायला मिळणार आहे . अगदी लगेचच नाही पण आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे. चंद्रावर गुरुची दृष्टी वर्षभर पडल्याने मेषेच्या मुलींची तर लग्ने वर्षभरात होतील. पण मुलींनी स्थळ पहायला होकार द्यायला हवा. मगच पालक हालचाल करु शकतील ना ?
वृषभ रास: या महिन्यात तुमच्या सुखाच्या स्थानी ग्रहांची गर्दी या महिन्यात आहे. रवि, मंगळ आणि बुध हे आहेतच शिवाय  १५ तारखेनंतर राशीचा स्वामी शुक्र  सुखस्थानात आल्याने  सुखात भर पडेल.शुक्र चतुर्थात असताना वाहन सुख, घरात उत्तम कौटुंबिक वातावरण असल्याने मिळणारे सुख वाढते. तुम्ही कष्ट करायला कंटाळत नाही पण या महिन्यात १५ तारखेनंतर जरा सुखाचाही अनुभव घ्या. गुरु बदलाने एखाद्या मोठ्या माणसाच्या मदतीने आपण प्रतिस्पर्ध्यावर मात करु शकाल.  नोकरी व्यवसायात जी माणसे आपल्याला त्रासदायक आहेत त्यांना परस्पर कसे दुर करायचे हे ह्या गुरुमुळे शक्य होते. वर्षभर हा योग आहे त्यामुळे प्लॅनींग करायला लागा. तिसरा राहू भावंडांची चिंता निर्माण करेल. यासाठी त्यांच्या संभाव्य समस्यांचा विचार करायला लागा.
मिथुन रास : राशीचा मालक बुध तिसर्या स्थानी आहे. तिसरे स्थान लिखाण, प्रकाशनाला अनुकूल स्थान आहे. आपला स्वभावही ज्ञान संपादन, लेखन याकडे झुकणारा असतो त्यामुळे असा संकल्प असेल तर नक्कीच अनुकूल काळ आहे.  तसेच शुक्राचे आगमनाने काही लिखाण हातून पुर्ण होईल. वर्षभर गुरु पंचम स्थानी म्हणजे शिक्षणाच्या स्थानी असेल. विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या संधीच्या शोधात असतील तर त्या दृष्टीने काही अनुकूल गोष्टी घडायला सुरवात होईल. कुटुंबात सुरु होत असलेले राहू भ्रमण काही बदल घडवून आणेल. घरगुती वाद उफ़ाळुन येणार नाहीत ना या कडे वर्षभर लक्ष द्या. जर मुळातच विसंवाद असेल तर काही मुद्यांवर आपण बोलायचे नाही असा संकल्प या महिन्यात करा. तोंडाचे/दातांचे वर्षभर आरोग्य संभाळा. यासाठी आतापासून दोन वेळा दात घासण्याचा संकल्प करा.
कर्क रास : राहू लग्न स्थानी किंवा चंद्रावरुन भ्रमण करताना स्वभावात किंवा व्यक्तिमत्वात फ़ेरबदल घडतात. या महिन्यापासून तुमच्या व्यक्तीमत्वात किंवा स्वभावात मोठे बदल घडायला सुरवात होईल. लोक तुम्हाला " तुम तो ऐसे न थे " असे म्हणुन दाद देतील क्वचीत टीका ही घडवतील. यामहिन्यात तुमच्या कुटुंब स्थानात अनेक ग्रहांचा राबता असेल. पाहूणे मंडळींच्या आगमनाने  कुटुंबात अनेक सुवार्ता येतील. शुक्राच्या आगमनाने भेळ पुरी सारखे पदार्थ उतरार्धात मनसोक्त चापाल. सुख स्थानी येणारा गुरु दशमावर द्रुष्टी टाकतो त्यामुळे नोकरी व्यवसायात वाढ होणार आहे तसेच खर्चही वाढणार आहेत. त्याचे कसे नियंत्रण कसे करायचे यावर या महिन्यापासून विचार करायला लागा.
सिंह रास : राहू बदल काही आर्थीक नुकसान करायला सुरवात करेल याबाबत वर्षभर जागरुक रहा. याची चुणूक नको असेल तरी या महिन्यात अनुभवाला आल्यास आश्चर्य वाटु देऊ नका. हा अनुभव कधीच नोकरदारांना येत नाही. आपण व्यावसायीक असाल तर जागरुक रहा आणि नुकसान टाळा. शुक्र तुम्हाला या महिन्याच्या उत्तरार्धात जास्त वेळ आरश्यासमोर उभा करेल. कधी नव्हे ते सुगंध तुम्ही खरेदी करुन वापराल. तुमच्या राशीचा स्वामी रवि १६ तारखेपर्यंत तुमच्या राशीत आहे. सोबत मंगळ ही आहे. तुमची पत/प्रतिष्ठा वाढेल असे ग्रहमान महिनाभर आहे. तिसरा गुरु आपल्या अनेक अपेक्षांची पुर्ती वर्षभर करणार आहे यावर विचार करायला लागा व कामाला लागा.
कन्या रास : महिनाभर खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. हा खर्च कसा नियंत्रणात ठेऊ असा प्रश्न तुम्हाला पडणार आहे. पण महिनाभरच हा प्रश्न असेल.  प्रवासाचे योग येणार आहेत. मानसीक दृष्टीने व्यस्तता जाणवेल.  गुरु बदलाने पुढील वर्षभरात घरात एक नविन पाहूणा किंवा मेंबर नक्कीच वाढणार आहे. उत्पन्न सुध्दा अचानक पणे वाढीचे योग या राहू बदलाने आलेले दिसती. अचानक काही नविन व्यावसायीक संधी लाभुन पुढील वर्षभर किंवा जास्त काळ आवक वाढल्याचे व्यावसायीकांना दिसेल. या नविन संधीचे स्वागत करायला या महिन्यात सज्ज रहा.
तूळ रास : आपल्या राशीसाठी नोकरी/व्यवसायातले बदलाची सुरवात ही या महिन्याची हेड लाईन आहे.  आपली नोकरी/ नोकरीचे स्थान किमान टेबल/ ऒफ़ीसचा पत्ता बदलाचे योग आहेत. अनेकांना हा बदल सुखावह वाटेल. नोकरी नसणार्यांना अचानक नोकरीच्या संधी चालून येतील. आपल्या व्यक्तीमत्वात भारदस्त बदल होण्याची सुरवात या महिन्यापासुन होत आहे. तूळ राशीचे लोक फ़ारसे जाड जूड नसतात पण या  खाल्ले ते अंगी लागायचे योग वर्षभर आहेत. व्यावसायीक नव्या व्यवसायाचा विचार सुरु करतील/प्रक्रिया सुरु होईल. आणि या वर्षभरात ते घडताना दिसेल.:
वृश्चिक रास : राशीचा स्वामी महिनाभर नोकरी/व्यवसायाच्या स्थानी आहे. तिथेच १५ सप्टेंबर पर्यंत रवी आहे. आपल्याला कामासाठी म्हणुन काही विशेष अधिकार प्राप्त होतील हे  काही काळासाठीच असतील. आपल्याला नोकरी/व्यवसायात अनेक आघाड्यावर लढावे लागेल. विजय निश्चित आहे पण लढाई शिवाय यश नाही त्यामुळे कंबर कसून तलवार उपसून तयार व्हा.  काही वेळा नुसती तलवार उपसली तरी काम भागेल. महिनाभर मोठीच पळापळ आणि धामधुम असेल.  गुरु बाराव्या स्थानी जात आहे. स्वत:चे घर व्हावे म्हणुन प्रयत्नात असाल तर त्याची सुरवात होईल. या निमीत्ताने घरासाठी खर्च करण्याचे योग वर्षभर येत आहेत. आत्ता पासून विचार करायला लागाल तर नक्कीच काही घडेल.
धनु रास: भाग्य स्थानी अनेक ग्रहांची गर्दी आहे त्यामुळे प्रवास योग आहेत. यात प्रवास नोकरी -व्यवसायाच्या निमीत्ताने असेल असे योग आहेत. काही चांगल्या घटना घडण्याची नांदी ही हे ग्रह देत आहेत. आठवा होणारा राहू मात्र वर्षभर विनाकारण चिंता तसेच पैसे ही देऊन जाणार आहे. राहू बदल होताच अशी चुणूक पहायला मिळते त्याचा अनुभव या महिन्यात घ्या. हा राहू अनपेक्षीत रित्या पैसे देण्याची प्रक्रिया सुरु होईल. उतरार्धात रवि दशमात आल्याने आपला शब्द महत्वाचा ठरेल. लाभ स्थानी येणारा गुरु वर्षभर अनेक आकांक्षाची पुर्ती करताना दिसेल. मनापासून एखादे स्वप्न पाहिले असेल तर ते वर्षभरात पुर्ण होणार आहे. त्यासाठी प्रयत्न करता काही घडणार नाही पण विचार तर करायला लागा की प्रार्थमिकता काय आहे?
मकर रास : दशमात येऊ घातलेला गुरु तुमचा कार्यभार वाढवणार आहे. वाढलेली कामे हातावेगळी करण्यासाठी वेगळी हातोटी अवलंबावी लागते. या महिन्यात वेळेचे नियोजन कसे करायचे यावर प्रशिक्षण घ्या म्हणजे वर्षभर कामाचा ताण सहन करता येईल. आठव्या स्थानी अनेक ग्रह आहेत. त्यात मंगळ आणि रवि आहे. आरोग्याच्या तक्रारी होतील पण फ़ार त्रास होऊ नये. पुढील काही महिने राहू सप्तमात असेल. मुळचा राहू या स्थानी असताना होणारे राहूचे भ्रमण भलत्याच गोष्टीत आपली गुंतवणुक होईल असे दर्शवितो. विवाहीत असाल तर जरा जास्त काळजी घ्या. सहसा मकर राशीचे लोक असल्या भलत्या मोहात पडत नाहीत पण काय सांगावे म्हणुन ही सुचना.
कुंभ रास : सहाव्या स्थानी राहू आला म्हणजे दुखणी होतात पण ती का होतात याचे कारण समजत नाही. यासाठी दुखणे आलेच तर वर्षभर डॉक्टर चांगला निवडा. वेळेवर औषधे घ्या. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे पथ्य पाळा. पथ्यकर आहार घेतला म्हणजे निम्मे रोग येतच नाहीत. योग शिकला असाल तर वर्षभर नियमीतता ठेवा किंवा अन्य व्यायाम करा. त्याचा संकल्प याच महिन्यात करा. भाग्यातला वर्षभर येऊ घातलेला गुरु आपले जीवन फ़ुलवणार आहे. तिर्थयात्रा होतील त्याचे प्लॅनिंग करायला सुरवात करा.  विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश आहे तसेच संतती व्हावी असे वाटत असता या वर्षी हा योग आहे त्यासाठी नियोजन करा.
मीन रास: पंचमात राहू आला म्हणजे विद्यार्थी वर्गाने सावध रहावे. या काळात काही घोळ होणे असे अनुभव येऊ नयेत यासाठी  विद्यार्थ्यांनी वेळेवर अभ्यास करण्याची सवय या महिन्यापासून लावून घ्या. असे केले म्हणजे अभ्यास केला ते विचारलेच नाही आणि जे वाचले नाही त्यावर नेमका पेपर पडला असे म्ह्णण्याची वेळ येणार नाही.  प्रश्नपत्रिका नीट वाचा. परिक्षा क्रमांक तपासा. पुरवण्या नीट जोडा. पेपर लिहताना ऐन वेळी विसरु नये म्हणुन काही तंत्रे असतात ती शिका म्हणजे पुढील दीड वर्षे त्रास होणार नाही. हे असे लिहणे म्हणजे पालकांच्या खास करुन विद्यार्थ्यांच्या मातृवर्गाचे सुख हरपणार आहे. पण काळजी घ्या, हा सल्ला आपण आपल्या पाल्याला द्या.  काळजी करत बसु नका. तुम्ही म्हणाल मीन राशीत काय फ़क्त विद्यार्थी वर्गच असतो का ? तुमच्या राशीचा अधिपती गुरु अशुभ म्हणजे आठव्या स्थानी जात असल्याने प्रगतीला ब्रेक लागणार आहे. या साठी विचार करुन ठेवा.

Tuesday, August 8, 2017

८ सप्टेंबर पासून होणारे राहूचे राशी परिवर्तन

राहू हा ग्रह ज्याला वस्तुमान नाही असा आहे हे ज्योतिष शिकणार्या ज्योतिषप्रेमी मंडळींना माहीत असेलच. पुर्वाचार्यांनी राहूला वस्तुमान, आकार नसताना ग्रह म्हणुन मान्यता दिली आहे कारण हा जरी काल्पनिक बिंदू असला तरी याचे फ़लज्योतिषात परिणाम दिसतात.

राहू सिंह राशीतुन कर्क राशीमधे ८ सप्टेंबरला प्रवेश करतो आहे. जेंव्हा जेंव्हा राहू असा राशीबदल करतो तेव्हा अनेक फ़ळे अचानक पणे प्रदान करतो असा अनुभव आहे. ही फ़ळे वेगाने मिळतात, अनपेक्षीत असतात. कधी कधी नुसता आभास असतो, फ़ळे मिळत नाहीत असे ही दिसते. राहूबाबत अजून माहिती माझ्या ब्लॉगवर राहू महादशा - शाप की वरदान या लेखात या लिंकवर वाचा http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html . ज्यांची राहू महादशा किंवा अंतर्दशा सुरु आहे अशांना राहू राशीबदलाची जोरदार फ़ळे मिळतील. पुढील काही महिन्यात शनि पुन्हा धनु राशीत तर गुरु तुळेत जाणार आहे. आपल्याला एकटा राहू फ़ळे देतो असे नाही.  विवीध राशीतल्या अनेक ग्रहांच्या फ़ळांचा तो एकत्रीत परिणाम असतो. याबाबत दिवाळी अंकातल्या वार्षीक राशीभविष्यात त्याबाबत विस्ताराने पाहू. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक प्रसिध्द करण्याचा मानस आहे त्याची संभाव्य तारीख लवकरच समजेल.

आता राशीवार फ़ळे पाहू - एखादा आठवडा कदाचित सर्व राशींवर राहूच्या राशीबदला बाबत लिहायला लागेल. ही फ़ळे लग्न रास माहित असेल तर तिकडुन ही पहावीत तशीच राशीकडुनही पहावीत.

मेष रास : मेष राशीला राहू चतुर्थ स्थानी येत आहे. चतुर्थ स्थान हे सुख स्थान आहे. या ठिकाणी राहू येणे फ़ारसे सुखदायक नसते. सुखाचा नाश येण्याचे योग आहेत. आपण घरात रहाता त्या संदर्भात एखादी घटना जी मनाला चुटपूट लावेल अशी घडण्याची शक्यता आहे. काही जणांना घर बदलावे लागेल.  रहाते घर जर नाईलाजास्तव बदलावे असेल तर त्या घराशी जुळवून घेताना होणारे बदल मनाला त्रास देतील.  ज्यांचे अश्विनी आणि भरणी नक्षत्र आहे त्यांना मित्रमंडळीत अचानक नविन मित्र जोडले जाण्याचा अनुभव येईल. हा जोडला गेलेला मित्र/मैत्रीण घरापर्यंत येऊ द्यायचा की नाही याचा अभ्यास करुनच त्याला घरी आणा. संततीचे काय सुरु आहे यावर दिड वर्षे लक्ष ठेवावे लागणार आहे. नोकरी व्यवसायात फ़ार काही वेगळे घडेल असे नाही. मागील पानावरुन पुढे चालू असा राहूचा प्रभाव असेल.

वृषभ रास : या राशीला राहू तिसरा येणार आहे. भावंडांच्या बाबतीत काही चिंता राहील. जे लोक प्रिंटींग व्यवसायात आहेत त्यांनी प्रुफ़ रिडींग बाबत सावधानी घ्या अन्यथा "ध" चा "मा" होऊन नुकसान होईल. वृषभ राशीच्या लोकांनी इमेल लिहताना सावधानता घ्या. इंटरव्ह्युला जाताना पुढील दीड वर्ष राहू काळ टाळून जा. कृतिका नक्षत्राला काहीसा त्रासदायक अनुभव ह्या किमान वर्षभरात येऊ शकतो. कृतिकेचे एक चरण मेषेतही आहे. ज्यांचे कृतिका नक्षत्र प्रथम चरण आहे त्यांची मेष रास असुनही काळ त्रासदायक आहे हे लक्षात ठेवावे. रोहीणी नक्षत्राला अनेक कामे जी आज पर्यंत साध्य झाली नाहीत ती पुढील वर्षभरात अचानक साध्य होताना दिसतील. हा अनुभव खास करून लेखन करणारे, प्रकाशक असणारे यांना येईल. मृग नक्षत्राचे दोन चरण वृषभेत तर दोन मिथुनेत आहेत. त्यांना ही राशीबदल फ़ारसा लाभदायक नाहीच उलट कटकटीचा आहे.

मिथुन रास : तुमच्या कुटुंबस्थानात राहूचे भ्रमण आहे.  मांसाहारी लोकांना या दिड वर्षात मांसाहाराची आठवण अनेक वेळा होईल. ज्यांचे दाताचे आरोग्य खराब आहे त्यांनी आपल्या दाताच्या आरोग्याबरोबर दुर्गंधी येऊन जवळच्या व्यक्तीला त्रास होणार नाही याबाबत जागरुक असावे. हा राहू गृहकलह निर्माण करणारा आहे. कारणे काहिही असतील. संभ्रम असो कि गैरसमज आपण जागरुक असा. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना फ़ारसा राहू बदलाचा त्रास नाही पण पुनर्वसु नक्षत्र ज्याची तीन चरने मिथुनेत तर एक चरण कर्क राशीत आहेत त्यांना पुढील काही महिने संकटे येऊ शकतात यास्तव येणार्या संकटाचा आधीच वेध घ्या. कशावरही आधीच विचार करुन पर्याय शोधून ठेवले असले म्हणजे फ़ारसा त्रास होत नाही.

कर्क रास : तुमच्या राशीतून राहूचे भ्रमण सुरु आहे. तुमच्या मनात अनेक संभ्रम होणे अपेक्षीत आहे. विचारांची दिशा फ़ार वेगळी होणे स्वाभावीक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होत असल्याचे अनेकांना जाणवेल. तुम्ही अचानक अनप्रेडीक्टेबल होत आहात असे इतरांना जाणवेल. पुष्य नक्षत्राला अचानक संपत्ती जमा करण्याचे योग आहेत. आश्लेषा नक्षत्राला हे राहूचे भ्रमण फ़ारसे उत्तम आहे असे नाही. आश्लेषा नक्षत्राला स्वत: चे काही वैचारीक प्रश्न असतात त्यात भर पडल्याचे जाणवेल. काही नविन वैचारीक बदल होणार आहेत त्यासोबत तुम्ही काही नविन विचार आत्मसात कराल किंवा नविन विचार धारेला जन्म द्याल.

सिंह रास : सिंह राशीला हे भ्रमण फ़ारसे चांगले नाही.  व्यावसायीक असाल तर हा राहू आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कमी करेल किंवा अनावश्यक अनपेक्षीत खर्च वाढवेल. फ़ार मित्र वाढवणे असा मघा नक्षत्राचा स्वभाव नाही तरी नविन मित्र आपल्याला खड्यात घालणार नाहीत ना ह्याचा विचार अवश्य करा. पुर्वा नक्षत्राच्या लोकांनी कोणाची दोस्ती करायची यावरही विचार करुन ठेवा. त्यांनाही मैत्री खातर नुकसान संभवते. " तुमच्या साठी काय पण" असा डायलॉग मारणारे जरा सावध रहा असे या निमीत्ताने सांगावेसे वाटते. उत्तरा नक्षत्राचा एक चरण सिंह राशीत तर उरलेले तीन कन्या राशीत असतात सिंह रास उत्तरा नक्षत्र यांनी अनेक कामे साध्य करताना जास्तीचा खर्च होत नाही ना याचा विचार करावा नाहीतर "दर्द से दवा दुखदायक" असा अनुभव यायचा.

कन्या रास: गेले दिड वर्षे हा राहू तुम्हाला आर्थिक संकटात टाकून बसला असेल तर आता पैशाची आवक वाढताना दिसेल. मग कुणाला ती नोकरीतल्या बदलाने असेल तर कुणाला अन्य मार्गाने. उत्तरा नक्षत्राला मित्र काही चांगले काम किंवा चांगली नोकरी मिळवुन देण्यास सहायक होताना दिसतील. हा बदल सुखावह असेल असे नाही. त्रासदायक बदल असला तरी पैसे वाढवून मिळणार आहेत. चॉईस तुम्ही करा. हस्त नक्षत्राच्या लोकांना काही गोष्टी सहज साध्य होऊन पैसे जास्त मिळतील असे ग्रहमान आहे. एकंदरीत कुणाला कष्ट/त्रास /मानहानी जास्त पण पैसे येणार तर कुणाला पैसे मिळवण्याची ट्रीक साधणार हा फ़रक असणार आहे. तुमची रास अर्थतत्वाची असल्याने आपल्याला काय पदरात पडत आहे हा तुमचा विचार असतो म्हणुन हा फ़रक सांगीतला. चित्राचे दोन चरण कन्या राशीत आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आणि त्रास  आहे असे ग्रहमान आहे.

तूळा रास : एखादा मोठा सन्मान, किंवा अधिकाराचे पद मिळवताना नोकरीचे ठिकाण किमान टेबलाची जागा बदल घडणे करावेच लागते. पोर्ट फ़ोलीओ किंवा नोकरी/ व्यवसायात बदल असे योग आहेत. याचे चांगले परिणाम किंवा त्रासदायक परिणाम आहेतच. हे बदल अनपेक्षीत आहेत हे नक्की. ज्यांनी अजून नोकरी व्यवसायात पदार्पण केलेले नाही त्यांना अचानक नविन नोकरीच्या /व्यवसायाच्या संधी चालून येतील. " हारी बाजी को जितना मुझे आता है " असेही घडुन ज्या नोकरी/ व्यवसायाची अपेक्षा सोडली होती अश्या हुकलेल्या संधी पुन्हा चालून येतील. चित्राला हा बदल त्रासदायक आहे. स्वातीला नाही तर विशाखाला हा बदल जरा जास्तच त्रास देईल. तुमच्या साठी हा बदल म्हणजे शिक्षा म्हणुन बदली किंवा त्रास देण्यासाठी बदली असे असेल. विशाखा नक्षत्राच्या लोकांना व्यावसायीक काही संधी आल्याच तर पारखुन घ्या हे सांगणे गरजेचे आहे.

वृश्चिक रास : आपल्या भाग्यात राहू येत आहे. भाग्य स्थानातून राहू जात असताना तिर्थ यात्रा घडू शकतात. तिर्थ यात्रा करताना काही नियम असतात. भ्रष्टाचाराने पैसे मिळवुन लोकांना काशीला नेणारे उद्योग राजकीय नेते करतात. अश्या मंडळींनी केलेल्या तिर्थयात्रात सहभागी झाल्यावर फ़ारसे पुण्य लाभत नाही. अश्या यात्रा तुम्ही करणार का ? विचार करा. विशाखा नक्षत्राला अशी केलेली यात्रा एखादा अपघात तर घेऊन येणार आहे असे ग्रहयोग दर्शवितात. किंवा तुमच्या पित्याने घेतलेल्या निर्णयाने काही चुकीचे तर होणार नाहीना हे तपासावे लागेल. अनुराधा नक्षत्राला तुमची यात्रा कंपनी/ टुर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय लाभदायक ठरेल. जेष्ठा नक्षत्रवाले टुर अ‍ॅरेंजर्स असतील तर काही क्रियेटीव्ह टुर्स पॅकेजेस तयार करुन दाखवतील. एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांना फ़िरण्याचे योग आहेत.

धनू रास : आपल्या राशीच्या लोकांना कर्क रास अष्टमस्थानात आणि त्या राशीतून राहूचे भ्रमण काही शारिरीक पिडा घेऊन येईल. आपली साडेसाती सुरु आहेच. त्यात दीड वर्ष हा त्रास आहे. ऑपरेशन्स किंवा दिर्घकाळ आजारातून जाण्याचे योग टाळावेत यासाठी असे काही झाल्यास खालील मंत्र जप केल्यास नक्कीच ह्या त्रासापासून सुटका होईल. उत्तराषाठाचे एक चरण धनू राशीत आहे त्यांना अनुभव येऊ शकतो.
अनेक रूपवर्णेश्च शतशोऽथ सहश:।
उत्पातरूपो जगतां पीडां हरतु मे तम:।।
ज्यांना मंत्र जप शक्य नाही त्यांनी भटक्या कुत्र्याला पोळी/भाकरी खाऊ घाला तेच फ़ळ मिळे. घरी कुत्रा असेल तर त्याची व्यवस्था पहा.  मूळ व पुर्वाषाठा नक्षत्राच्या व्यक्तींना आपले काही मित्र या काळात आपल्याला शेअर्स च्या टीप्स देतील त्या दुर्लक्ष न केल्यास फ़ायदा होईल. इन्शुरन्सचे पैसे मिळण्यात अडचण असेल तर मित्रांचे सहकार्य घ्या. या दोन नक्षत्रांना मित्रांच्या सहायाने धनलाभ संभवतो.

मकर राशी : उत्तराषाठा नक्षत्राच्या तीन चरणांचा सहभाग मकर राशीत आहे आणि हे नक्षत्र असलेल्या मकर राशीच्या लोकांना स्वत: ला त्रास नाही पण आपल्या वैवाहीक जोडीदाराला आजारपण/ अपघात अश्या विपत्तीला पहिले काही महीन्यात तोंड द्यावे लागेल अशी शक्यता आहे. सप्तमातला राहू हा काही काळ अचानक आय़ुष्यात काही व्यक्ती येण्याचा काळ दर्शवितो. मग ते प्रेमप्रकरण असेल किंवा अनैतीक संबंध असतील. जे असले निर्णय घ्यायच्या वयात आहेत अश्यांना खास करुन उत्तराषाठा व्यक्तीच्या लोकांनी या प्रकरणापासून अलिप्तता बाळगावी. विवाह ठरत असल्यास चौकशी जास्त करावी. ज्यांचे विवाह ठरण्यास उशीर होत होता अश्या श्रवण नक्षत्राच्या लोकांना झट मंगनी पट ब्याह असा अनुभव येईल. धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मकर राशीत आहेत त्यांना व्यावसायीक असतील तर पार्टनरने अडचणीत आणले अश्या संकटांना सामोरे जाण्याची शक्यता दिसते. आपल्या वैवाहीक जोडीदाराच्या चारित्र्यावर उगाचच शंका घेण्याचा काळ आहे. ही शंका घेताना मकर राशीच्या लोकांनी उगाचाच पराचा कावळा होत नाही ना ? याची काळजी घ्या.

कुंभ राशी : आपल्या सहाव्या स्थानातून राहू जाताना खासच काळजी करावी असे ग्रहमान आहे. रोगाचे निदान ना होणे. झाले तरी योग्य औषध ना मिळणे. गुप्त शत्रुंच्या कारवाया असे ग्रहमान आहे. डॉक्टर/ वैद्य याच बरोबर आजार असता ज्योतिषाची मदत घेतलीत तर निदान योग्य होईल हे जरा धाडसाचे मी विधान मी करतो आहे पण जेव्हा सर्व प्रयत्न हरतात तेव्हा काही वेगळे मार्ग नक्कीच उपयोगी ठरावेत. शततारका नक्षत्राला हा त्रास फ़ारसा नाही पण पुर्वा भाद्रपदाचे जे तीन चरण कुंभेत आहेत अश्या व्यक्तीला हा त्रास नक्कीच संभवतो. यास्तव कोणता आजार, काय ट्रीटमेंट या कडे राहू बदलानंतर पहिले काही महिने लक्ष द्या. उगाच औषधे घेत राहू नका नाहीतर " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी " अस एक नाट्यपद जुन्या नाटकात होते तसा अनुभव यायचा.

मीन रास : पाचव्या स्थानातून होणारे राहूचे भ्रमण पूर्वा भार्द्रपदा नक्षत्राच्या शेवटच्या चरणाला चांगले नाहीत. मुलांच्या कारणाने चिंता राहील. आपली संतती अडचणीत कशाने येऊ शकेल याचा शोध घ्या आणि त्यावर पर्याय शोधून ठेवा. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्राला क्रिडा प्रकार, कला, विचार प्रदर्शनातून चांगला लाभ या काळात मिळु शकेल. रेवती नक्षत्राला मात्र आपल्या विचारांनी भ्रमीत झाल्याचा भास काही काळ होईल. संतती अपेक्षा असणार्यांना या काळात नक्कीच संतती लाभ आहे. पाचवा राहू कधी काळी संतती होताना अडथळे निर्माण करतो हा अनुभव काहींना येऊ शकतो. गर्भपात ही टर्म पहिल्या तीन महिन्यात नैसर्गीक प्रक्रिया आहे हे खास करुन स्त्रीयांनी लक्षात ठेवावे. विकृत गर्भ निसर्ग ठेऊन घेत नाही. म्हणुन ही बातमी कळाल्यास तपासण्या करा. आजकाल अगदी पहिल्या महिन्यापासून सोनोग्राफ़ीत विकृती निदान होते. रेवती नक्षत्रांच्या स्त्रीयांनी गर्भ राहीला असता हे राशीभविष्य वाचून चिंता करण्या ऐवजी श्रीकृष्णाच्या आवडत्या मंत्राचा जप करावा.

शुभंभवतु 

Friday, July 21, 2017

ऑगस्ट २०१७ महिन्याचे राशीभविष्य सिंह राशी मधे बुध वक्री होणे का शेअर मार्केटपर परिणाम होईल का ?



राशी भविष्य लिहून ते ब्लॉगवर प्रसिध्द करायला लागल्याला वर्ष पुर्ण होत आहे. या निमीत्ताने काही नविन संकल्पाचे मनात आहे. फ़ेस बुक वर जसा नक्षत्रप्रकाश ज्योतिषविषयक नविन समूह मागील महिन्यात सुरु झाला आहे. याचे सदस्य होण्यासाठी ही लिंक घ्या https://www.facebook.com/groups/npastrogroup/  राशीभविष्य दरमहिन्याला प्रसिध्द झाले की त्याची माहिती या फ़ेसबुकच्या नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर  आपल्या मिळणारच आहे.

मागच्या महिन्यात मुंबई शेअर मार्केटने उच्चांक नोंदवला होता. करेक्षन होऊन हा निर्देशांक स्थिर ही झाला असेल. काही तात्कालीक कारणे अशी घडतील की निर्देशांक पुन्हा खाली येईल असा. शेअर बाजारात बुध वक्री झाला की निर्देशांक खाली येतो. असा अनुभव आहे त्यामुळे १३ ऑगस्ट पुर्वी आपली पोझीशन आधीच तपासुन घ्या. बुध वक्री झाल्याचे बरेच परिणाम कमोडीटी मार्केटवर सुध्दा पडतात असाही अनुभव आहे.

१५ ऑगस्टला लाल किल्यावरुन भाषण होताना प्रधानमंत्री नविन संकल्प करतील त्यामुळे राजकारणाला नविन दिशा मिळेल. मागील वर्षीच्या भाषणात पाकिस्थान मधे बलुचिस्थानच्या स्वतंत्र होण्याचा उल्लेख केला गेला आणि त्यामुळे पाकिस्थानला ते झोंबले असेल. यामुळे ह्या भाषणानंतर काश्मिरमधला पाकिस्थानी कारवायांचा वेगही वाढला आहे. यावर्षी मोदीजी अजुनही काही बोलतील. सिंह या स्वत:च्या राशीत रवि गेल्याने ही डरकाळी येणे स्वाभाविक आहे. त्याचे परिणाम जेव्हा मंगळ -हर्षलचा प्रतियोग होईल तेव्हा दिसेल. ३० नोव्हेंबर पासुन हे दिसेल.

ऑगस्ट महिन्यात २५ तारखेला गणेश चतुर्थी आहे. ही बुध्दीची देवता आहे. ज्यांना असे वाटते की जन्मत: आपल्याला बुध्दीचे वरदान नाही त्यांनी किमान दीड दिवसाचे हे व्रत करावे. गणेश पुराणात या व्रताचे वर्णन दीड दिवसाच्या व्रताचेच आहे. आता बुध्दीप्रामाण्यवादी किंवा विज्ञानवादी म्हणतील की बुध्दीची वाढ वय ८ ते १० नंतर थांबते पण बुध्दीचा वरचा स्तर ज्याला प्रज्ञा असे म्हणतात तो योगाभ्यासाने किंवा ईश्वरप्रणिधानाने जागृत होतो असे सुत्र " योगसुत्र" ह्या पतंजली महामुनींच्या ग्रंथात आहे. " विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धन, पुत्रार्थी लभते पुत्रा, मोक्षार्थी लभते गतीं " असे सुत्र सांगताना सहा महिन्याच्या उपासनेने हे सर्व मिळते संशय घेऊ नका असे स्त्रोत्र कर्ते सांगतात. माणसाला अजुन काय हवे ? श्री गणपती अथर्वशिर्ष हे तर एक उपनिषद आहे. यावर भाष्य करणे माझा अधिकार नाही. हे लिहायचा उद्देश्य इतकाच की अनुभव घेतला नसेल तर ह्या गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची घरी स्थापना करा. ज्याच्या घरी गणेश पुजा होते त्याला वर उल्लेखलेले सर्व लाभते. ही उपासना श्रध्देने करावी.

आता ऑगस्ट महिन्याचे राशीभविष्य पाहू.


मेष रास: अश्विनी नक्षत्रावर जन्म असलेल्या व्यक्तींना आई संदर्भात एखादी घटना या महिन्यात चटका लावेल. प्रकृती बिघडेल.  राशीचा मालक मंगळ नीच राशीत बसल्यामुळे नेहमी मिळणारे हुकमी यश या महिन्यात मिळणार नाही. शत्रु कुरघोडी करतील. हा महिना शत्रुचा आहे असे समजा. शत्रुला धाडसाने प्रतिकार करु नका. नोकरी व्यवसायात तुमच्या हितशत्रुच्या कारवाया सोडता, व्यवसाय वृध्दीच्या दृष्टीने महत्वाचे घडणार नाही. किंबहुना अडचणी तशाच राहतील. महिनाभर वहाने हळु चालवा. वीजेशी खेळु नका. महिलांना बहिणी माहेरवाशीणी श्रावणात भेटुन आनंद होईल.

वृषभ रास : या महिन्यात काही जास्त रक्कम हाती येईल ती व्यवस्थित गुंतवा हे सांगण्याची गरज वृषभेच्या लोकांना नसते. भावंडे या महिन्यात कशी वागु शकतात याचा नमुना पहायला मिळेल. मुलांकडे या महिन्यात जरा लक्ष देऊन त्यांचे बरोबर चालले आहे ना हे पहा.  भेळ-पुरी, वडा-पाव सारखे बेत या महिन्यात वारंवार येतील पण पावसाळी हवेत त्याचा अतिरेक होऊ देऊ नका अन्यथा अरोग्य बिघडेल. जोडीदाराच्या मानसीक स्वास्थाची या महिन्यात काळजी घ्या.

मिथुन रास: या महिन्यात महिला असाल तर जरा जास्त काळ आरश्यासमोर असाल. या निमीत्ताने पुरुषांना यावर विनोद करायचे सुचेल. लिखाण पुर्ण करायचे असल्यास १३ ऑगस्ट पर्यंत संपवा. बुध वक्री झाल्यावर सुचेलच असे नाही. कर्केचा मंगळ कुटुंबात कपात वादळे आणेल. बुध्दीमत्ता वापरुन अशी वादळे थांबवण्याचे कौशल्य तुमच्या कडे आहेच. दिर्घकाळ असलेले एखादे दुखणे महिनाभरात मोठे होणार तर नाहीना या कडे लक्ष द्या.

कर्क रास : या महिन्यात नोकरी/व्यवसायात तुम्हाला नको असलेला संघर्ष करायचे बळ येईल. यामुळे आर्थिक नुकसान होत नाही ना या कडे पहा. महिनाभर मनस्ताप आहेच पण ७ आणि ८ ऑगस्टला परमवधी आहे असे या महिन्याचे चित्र आहे. लहान भावंडे असतील तर त्यांचे या महिन्यात काहीतरी प्रश्न निर्माण होतील आणि तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.

सिंह रास : राशीचा मालक रवि १६  तारखेपर्यंत अनुकूल नाही. यानंतर मात्र महिनाभर तुम्हाला बळ मिळत आहे. वर्षातून एकदाच राशीचा मालक राशीत आल्याने तुम्ही सिंहगर्जना करुन सर्वांना आपले स्थान दाखवून द्याल. कर्क राशीत मंगळ ही महिनाभर तिथेच मुक्काम ठोकून आहे. त्यामुळे मनासारखे घडणार नाही. पण नाराजी व्यक्त करायला योग्य काळ १६ तारखेनंतरच आहे.   १३ तारखेपर्यंत पैशाची आवक मात्र समाधानकारक राहिल इतकाच काय तो दिलासा. २१ तारखेनंतर खर्चात वाढ होणार आहे पण सिंह राशीच्या मालकाला खर्चाची चिंता नसते.

कन्या रास: कन्या रास आधीच निर्णय घ्यायला कमकुवत असते. त्यात राशीचा स्वामी आणि कर्म स्थानाचा स्वामी सिंह राशीत असल्यावर मती कुंठीत होईल. शेअर मार्केट मधली गुंतवणुक तपासुन योग्य निर्णय घ्या. तुमचा सल्ला आजवर उत्तम समजला जायचा त्याकडे दुर्लक्ष होईल. यात तुमचा काय दोष आहे ? १३ तारखेनंतर नेमके शब्द सुचणार नाहीत असे ग्रहमान आहे. कुटुंबातल्या एखाद्या महिला व्यक्तीसंदर्भात भाग्यकारक घटना घडेल ही ह्या महिन्याची चांगली बाजु आहे.

तुळ रास : हा महिना तुम्हाला चांगलाच जाणार आहे. नोकरी /व्यवसायात जरा संघर्ष असेल पण कधी ज्याचा मागमुस नाही अश्या संधी चालून येतील. २३ ऑगस्ट नंतर त्यावर प्रत्यक्ष काम सुरु होईल. या महिन्यात तुम्हाला काही अधिकारही चालून येतील. त्याच बरोबर काही नको असलेला त्रास ही आहे. व्यावसायीकांना आवक चांगली राहील. वैवाहीक जोडीदाराचे मन कसे ओळखायचे आणि त्याची नाराजी कशी दुर करायची यावर मी काय तुम्हाला मार्गदर्शन करणार ?

वृश्चिक रास : जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गुप्त गाठी भेटी ची संधी चालून येईल आणि काही खलबते होतील. हा तुमचा स्वभाव आहे आणि अस्त्रही आहे. या महिन्यात मात्र डाव यशस्वी होणे कठीण आहे.  १६ ऑगस्टनंतर मात्र तुम्हाला अपेक्षीत घडेल. दशमात बलवान रवि आल्याने १६ ऑगस्ट नंतर महिनाभर  नोकरीत तुम्हाला काही खास अधिकार मिळतील. तुमचे वरिष्ठ ही तुम्हाला " तु सांग तसे करु " असे म्हणुन मान देतील. एखादी अनेक वर्षे न पुर्ण झालेली मागणी ह्या अधिकारात मागुन घ्या.

धनु रास : महिना जरा रोमॅन्टीकच असेल. पुरुष असाल तर हा अनुभव लक्षात राहील कारण धनु राशीची व्यक्ती काही अगदीच अरसिक नसते.  १३ तारखे पर्यंत उत्तम कार्यसिध्दीचे योग आहेत. आपले मित्र आणि शत्रु देखील मदत करतील. पुरुष असाल तर स्त्रीया आपल्या मदतीला येतील असे ग्रहमान आहे. नविन व्यावसायिक प्रस्ताव येतील.  संततीची किंचीत चिंता निर्माण होईल.

मकर रास : जोडीदाराबरोबर काही मतभेद होतील पण फ़ार काळ टिकणारे नाहीत. दिर्घ काळ प्रयत्न करुन एखादे अपेक्षीत यश या महिन्यात हातचे जाईल. आज ना उद्या तुम्ही ते परत मिळवणार हा तुमचा स्वभाव आहे पण या महिन्यात जरा निराशा येईल.  महिनाभर आरोग्याकडे लक्ष द्या. किंचीतही प्रकृतीत झालेले बदल नजरेआड न करता वैद्यकीय सल्ला घ्या. काट्याचा नायटा व्हायला नको. शैक्षणीक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीना महिना अखेरीला एखाद्या अपेक्षीत गोष्टीचे फ़ळ मिळेल.

कुंभ रास : महिना सुखाचा असल्याचा भास होईल. मागील महिन्यात जर काही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असतील तर ते सुटतील . रोजचेच प्रवास सुखदायक असतील असे या महिन्यात जाणवेल. लांबचा प्रवासही घडण्याची शक्यता आहे.  आपण काय लिहितो कशावर सही करतो या कडे दुर्लक्ष नको की  तुमच्या नको त्या ठिकाणी लिहण्याने , सही करण्याने काही आफ़त ओढवेल. या करिता कितीही इच्छा झाली तरी फ़ेसबुक व व्हॉट्स अप वर लुज कमेंट नको.

मीन रास : महिनाभर सुखशय्या मिळणार आहे. सुख स्थानी असलेला शुक्र तुम्हाला अनेक सुख या महिन्यात देणार आहे. याचा अर्थ असा की सुखाची साधने असली तरी अनेकांना सुख अनुभवायला वेळ नसतो अशांना नक्कीच उसंत आहे. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. काहींना परदेश गमनाचे योग आहेत. काही लोकांच्या बाबतीत या महिन्यात काही महत्वाचे घडणार नाही याचा अर्थ विचारच करायचा नाही असे नाही. हा काळ प्लॅनिंग साठी उपलब्ध आहे. आराखडे तयार करा.

शुभंभवतु




Thursday, June 22, 2017

जुलै २०१७ चे राशीभविष्य तसेच शनि वक्रिमार्गाने वृश्चिक राशीत आला आहे त्याचे परिणाम विवीध राशींना काय परिणाम होईल याबाबत माहिती.

नमस्कार ज्योतिषप्रेमी लोकहॊ, आजकाल २० तारीख आली की ज्योतिषप्रेमी लोकांना वेध लागतात पुढील महिन्याच्या राशीभविष्याचे. मला लोक आठवण करतात आणि हे ही सुचवतात जसे एका सन्माननीय वाचकाने सुचवले की मागील महिन्यात शनि वक्री होऊन पुन्हा वृश्चिक राशीत गेला त्याचे फ़ळ विवीध राशीच्या लोकांना काय मिळेल ? अनेकदा हा प्रश्न असतोच की एखादा ग्रह वक्री होऊन राशीत जातो तेव्हा आणि मार्गी असताना राशीत जातो तेव्हा मिळणारी फ़ळे वेगळी असतात का ? याचे उत्तर हो आहे. नेमके कसे ते ज्याच्या त्याच्या पत्रिकेवरुन जास्त विस्ताराने सांगता येईल.

 आत्ता इतकेच सांगावेसे वाटते की तूळ राशीला २६ अक्टोबर २०१७ पर्यंत पुन्हा साडेसाती आहे हे लक्षात घ्यावे. मकर राशीची २६ अक्टोबर २०१७ पर्यंत तात्पुरती शनिच्या साडेसातीपासून सुटका झाली आहे. वृश्चिक राशीत ज्यांचे जन्मनक्षत्र  जेष्ठा नक्षत्र आहे त्यांना खासच परिणाम दिसेल. धनू राशीला पीडा आहे तशीच असेल.

पुढील काही महिने वृश्चिक राशीत ज्यांचे जेष्ठा नक्षत्र आहे अशा व्यक्तींनी कशाचेही क्रेडीट घ्यायला जाऊ नये. ( माझ्या मुळे हरबरा टरारुन वर .... वर्हाड निघालय लंडनला मधला प्रसिध्द डायलॉग ) ते क्रेडीट राहूदे बाजूला जास्त मानहानी पदरात पडेल. वृश्चिक राशीचे लोक आपला अनुभव कोणीही कळवणार नाही हे मला माहित आहे. वृश्चिक राशीचे लोक तर अपमान झाला हे कुणालाही सांगणार नाहीत. पण दुखावले जाल हे नक्की.

काही ज्योतिषांनी सिंह राशीला छोटी पनवती आहे असे म्हणले आहे ते बरोबर आहे पण सिंह राशीवरच्या उत्तरा नक्षत्रावर जन्मलेल्या काही लोकांना याचा थोडासा परिंणाम जाणवेल. जेष्ठा नक्षत्राच्या समोर वृषभेच्या मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीला जाणवेल तसेच कुंभेच्या पुर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या काहीच व्यक्तीना जाणवेल. थोडक्यात या काळात शनिबरोबर अंशात्मक केंद्र योग होत असलेल्या ग्रहांना ( उत्तरा नक्षत्रातला चंद्र आणि पुर्वाभाद्रपदा नक्षत्रातला चंद्र किंवा तिथे असलेले ग्रह ) व अंशात्मक युती व प्रतियुती होत असलेले चंद्र अनुक्रमे जेष्ठा नक्षत्र किंवा इतर ग्रह आणि मृग नक्षत्रातला चंद्र किंवा तिथे असलेले इतर ग्रह यांना शनि अशुभ फ़ळे देईल.

वर सांगितलेल्या नक्षत्राच्या लोकांनी जर नवग्रह पीडा हर स्तोत्रामधला शनिची पीडाहरण करणारा मंत्र म्हणला तर निश्चित पीडेची तीव्रता कमी होईल. तो मंत्र असा आहे.

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।

हा मंत्र शनि साडेसाती संपेपर्यंत तुला, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांनी जप करायचा आहे. या राशी शिवाय वर उल्लेख केलेल्या उत्तरा (सिंह राशी ) , पुर्वाभाद्रपदा ( कुंभ राशी ) आणि मृग ( वृषभ राशी ) नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना जर मानसीक पीडा किंवा त्यांच्या आईला त्रास होतो आहे असे वाटल्यास दररोज २१ वेळा करावा. त्रास वाढल्यास हा मंत्र दररोज १०८ करावा.

वरील नक्षत्रात चंद्राशिवाय दुसरेही ग्रह असतात अश्या व्यक्तींना या ग्रहांशी होणार्या शनिच्या अशुभ योगाचे परिणाम काय होतील हे ज्योतिषीच सांगु शकतील. ही शक्यता काही मोजक्या लोकांच्या कुंडलीत असेल त्यांनी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. ज्यांच्या कुंडलीत असे योग नाहीत त्यांनी नाहक भिती बाळगु नये.

जेष्ठा, मृग, उत्तरा आणि पुर्वाभाद्रपदा असलेल्या लोकांनी आपले अनुभव कळवा. ब्लॉगवर लिहा किंवा इमेल करा. राशीभविष्य सर्वांनाच अनुभवाला येत नाही हे खरे आहे पण ह्या काळात मोजक्या लोकांना अनुभव येऊ शकतात.

या वरच्या माहितीवरुन आपल्या लक्षात आले असेल की आपल्याला राशीसोबत आपले जन्मनक्षत्र अर्थात आपल्या कुंडलीत चंद्र ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र माहित असावे म्हणजे राशीभविष्य आपल्याला नक्की अनुभवला येईल की नाही हे लगेचच समजेल.

मेष रास : या महिन्यात ग्रहमान अनुकूल नसल्याने प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. १६ जुलै पुर्वीच प्रॉपर्टीची कामे मार्गी लावा. या महिन्यात मानहानी सुध्दा पत्करावी लागेल. ६ जुलै ते २० जुलै हा काळ मानहानी होऊ नये म्हणुन लक्ष देण्याचा काळ आहे.   मुलांच्या प्रगतीत अडथळे जाणवतील पण घाबरुन जाण्याचा तुमचा स्वभाव नाही. आपल्या जवळच्या मित्रांशी सर्वच बाबतीत या महिन्यात चर्चा करायला विसरु नका. मित्र नक्कीच काही मार्ग सुचवतील. २० जुलैनंतर कुटुंबातल्या कोणालाही तुमच्या खास स्वभावानुसार रागाने डाफ़रु नका. घरातली माणसे सुध्दा कधीतरी राग मनात ठेवतात. पत्नी खासकरुन तुमच्या डाफ़रण्याने मनात राग धरेल. तुमची रास काही रोमॅंटीक नाही. हा रुसवा काढणे तुम्हाला सहज जमणार नाही. त्यापेक्षा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ रास : महिनाभर ग्रहमान संमिश्र असले तरी फ़ारसे प्रतिकूल नाही. उतरार्धात मुलांची प्रगती आणि जोडीदाराची मानसीकता यामुळे थोडे मन खट्टू होईल. पुर्वार्धात काही पैसे शिल्लकीत येतील त्याची गुंतवणुक करा हे तुमच्या राशीच्या मंडळींना सांगायला नकोच. २१ जुलै नंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी चालून येतील. पालकांच्या किंवा तज्ञांच्या सल्याने निर्णय घ्यावा. मृग नक्षत्रात चंद्र असेल तर आपल्याला मानसीक पीडा आहे त्यातही ज्यांचे चवथे चरण आहे त्यांना अनुभव जास्त येईल.  उपाय वर दिलेलाच आहे. मग चिंता करु नका.

मिथुन रास:  या राशीच्या  लोकांना महिन्याच्या उतरार्धात  धनलाभ होईल. महिनाभर नेहमी्पेक्षा जास्त खर्चही  असेलच पण गोळाबेरीज होऊन काही पैसे शिल्लकच राहीलेले दिसतील. तुमच्या स्वभावानुसार याला फ़ारसे तुम्ही महत्व देत नाही पण तुमचा जोडीदार याकडे तुमचे भविष्य वाचून लक्ष देईल ही अपेक्षा आहे.

कर्क रास: पुनर्वसु नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना या महिन्याचा उतरार्धात मानसीक थोडी चिंता आहे.  अशुभ मंगळाचे भ्रमण ह्या महिन्यात उतरार्धात तुमच्या राशीला आहे. चंद्र व मंगळ हा एक लक्ष्मी योग मानला गेला आहे. पैशाची आवक वाढण्याच्या दृष्टीने सर्व ग्रहमान अगदी अनुकूल आहे पण त्याच्या जोडीला तो चिंताही घेऊन येणार आहे. गंमत आहे ना पैसे नाहीत त्यांना ही चिंता आणि नाहीत त्यांनाही. यावर पर्याय एकच चिंतारहीत जगण्याचा अभ्यास करणे.

सिंह रास : कर्म स्थानी महिनाभर असलेला शुक्र तुमच्या कामासंदर्भात असलेल्या अडचणींची सोडवणूक करणार आहे. तुम्ही प्रयत्न करा नोकरी व्यवसायातले अनेक प्रश्न या महिन्यात हातावेगळे होतील. जरा महिन्याच्या सुरवातीलाच जोर लावा. पुर्वार्ध जरा या दृष्टीने जास्त अनुकूल आहे. उतरार्धात तुमच्या राशीचा स्वामी बाराव्या स्थानी गेल्याने अनुकूल रहाणार नाही. ही स्थिती महिनाभर असेल यासाठी पुर्वार्धात कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष देऊन कामे मार्गी लावा. आपले नक्षत्र उत्तरा असेल तर काय करावे हे वर दिलेले आहे.

कन्या रास : महिनाभर लाभ स्थानी  बुध, मंगळ आणि रवि हे ग्रह थोडे पुढे मागे प्रवेश करत आहेत. नोकरीत बढतीचे योग असल्यास सुवार्ता कानी पडेल. सरकारी नोकरांना बढतीचे कळले तरी लांब गावी बदली नाही ना ही चिंता असतेच. पण बहुतेकांना आहे त्याच ठिकाणी किंवा सोयीच्या ठिकाणी प्रमोशनवर बदली मिळावी असे ग्रह संकेत आहेत. सरकारी नोकरांनी बढतीचे संकेत येताच बदली योग्य ठिकाणी व्हावी यासाठी सेटींग करा.

तूळ रास : संघर्ष टाळावा हा तुमचा स्वभाव असला तरी या महिन्यात ११ जुलै नंतर नोकरी व्यवसायात संघर्ष अटळ आहे. या संघर्षात तुमची पत आणि प्रतिष्ठा पणाला लागेल असे ग्रहमान आहे. हाताखालच्या लोकांवर फ़ारसा विश्वास ठेऊ नये परंतु नोकरीत असाल तर वरिष्ठ मात्र तुम्हाला अडचणीत आणणार नाहीत. तुमच्या राशीचा मित्र असलेला ग्रह बुध तुम्हाला मदत करेल.  हुशारीने आपली सोडवणुक करुन घ्या.

वृश्चिक रास : हा महिना जोडीदाराबरोबर सुखसंवाद करण्याचा आहे. हा एक भाग सोडला तर राशीचा स्वामी मंगळ आपल्या नीच राशीत जात असल्याने सर्व काही मनासारखे घडेल असे नाही.  जेष्ठा नक्षत्र असलेल्यांनी खास करुन चवथे चरण असलेल्यांनी वरील शनिच्या वक्री होण्याचे परिणाम वाचा. पुर्वार्धापेक्षा महिन्याचा उतरार्ध बरा असेल. एकंदरीत ग्रहमान फ़ारसे अनुकूल नाही असे चित्र या महिन्याचे आहे.

धनू रास : कर्म स्थानी मागच्या महिन्यात मार्गस्थ झालेला तुमच्या राशीचा स्वामी गुरु तुम्हाला कर्म करत रहाण्याचा आदेश देतो आहे. सध्यातरी फ़ळाची अपेक्षा करु नका. ग्रहमान फ़ारसे अनुकूल नसले तरी या महिन्यात केलेले काम वाया मात्र जाणार नाही. आठव्या स्थानी जाणारा रवि आणि मंगळ आरोग्याबाबत काळजी घ्यायला सांगत आहेत. धनु राशीला चंद्र जेव्हा कर्केत असतो ते दिवस मनस्तापाचे असतात. या महिन्यात त्या चंद्राच्या जोडीला अशुभ मंगळ आहे. २२, २३ आणि २४ जुलै ह्या तारखांना हा अनुभव जास्त वाईट असेल. आईच्या माहेरच्यांकडुन  काही सुखद वार्ता येतील हा ह्या महिन्यातला चांगला भाग आहे.

मकर रास : तुमची साडेसाती येता येता राहीली आहे. व्यावसायीक असाल तर या महिन्यात अनेक प्रस्ताव येतील त्यावर विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या राशीला शुक्र या महिन्यात बलवान आहे. त्याचा फ़ायदा घेऊन काही नोकरी व्यवसायातले निर्णय घ्या. कलाकार असाल तर ह्या महिन्यात आपल्या हातुन एक सुंदर कलाकृती निर्माण कराल. गायक/वादक  असाल आणि संधी शोधलीत तर आपली कला अनेक काळ लोक स्मरणात ठेवतील अशी बहारदार मैफ़ील जमून येईल.   वैवाहीक जोडीदार उतरार्धात नाराज होईल तर त्यावर उपाय शोधून ठेवा.

कुंभ रास :  शनि वक्री होऊन कर्म स्थानी आल्याने नोकरी व्यवसायात जरा कष्टदायक परिस्थिती निर्माण होईल. पण शनिच्या राशीला खास करुन कुंभ राशीला बुध्दीचा वापर करुन प्रश्न सोडवण्याचे वरदान आहे हे लक्षात ठेवा. यातही शुक्राचे भ्रमण चतुर्थात असल्याने घरी आल्यावर ह्या कष्टाचे काहीच वाटणार नाही असे सुखद अनुभव महिनाभर घरी असताना येतील. २२-२३-२४ जुलैला अपघातापासुन स्वत:ला जपा.  मी रिस्क घेणार नाही येवढा मंत्र जपा. अपघाताच्या शक्यता कमी होतील

मीन रास : महिनाभर ग्रहमान संमिश्र आहे. तुमच्या विचारांना चालना मिळेल. अनेक गोष्टींवर सखोल विचार करण्यास अनेक पर्यायी विचार समोर येतील. चांगले प्लॅनिंग करण्यास अनुकूल महिना नक्कीच आहे. भावंडे खास करुन बहिणीकडुन आनंददायक बातमी या महिन्यात मिळेल. बहीणीबरोबर काही काळ आनंदात घालवाल असे योग या महिन्यात आहेत.