Tuesday, May 23, 2017

जून महिन्याचे राशीभविष्य आणि पावसाचे प्रमाण

जून महिना सुरु झाला की पावसाच्या आगमनाची वाट आपण पहातो. तापलेल्या भुमीवर पावसाचे आगमन होताच मातीचा गंध मनाला मोहवून टाकतो. तापलेल्या वातावरणाला अंमळ थंडावा मिळुन एक आल्हाददायक अशी हवा तयार होते. आपण नोकरदार असलो आणि तरी पावसाचे स्वरुप काय असेल हा प्रश्न शेतकरी नसलेल्यांना सुध्दा असतो. शेती पिकली तरच महागाई नियंत्रणात रहाते हे आता आपल्याला माहित झाले आहे.

कसे असेल पावसाचे प्रमाण ? 

पर्जन्य नक्षत्रांची वाहने ठरविण्याचा नियम असा आहे. ” सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्र संख्या मोजावी, त्या संख्येस नऊने भागावे. जी बाकी राहील त्यावरून वाहने जाणावी.”
१ घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा, ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस, ८ गाढव आणि शून्य बाकी राहिली तर हत्ती वाहन असते. बेडूक, म्हैस,हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल, मोर, गाढव, उंदीर वाहन असता मध्यम पाऊस पडेल,घोड़ा वाहन असता पर्वतक्षेत्रात पाऊस पडेल आणि कोल्हा, मेंढा वाहन असता पाऊस ओढ़ लावील असे सांगण्यात आले आहे. सूर्य- चंद्र नक्षत्रांवरून आणखीही काही नियम सांगण्यात आलेले आहेत.
 यावर्षीच्या पर्जन्य नक्षत्रांचा काल आणि वाहने पुढीलप्रमाणे आहेत.
१. मृग- ८ जून २०१७ ते २१ जून २०१७ , वाहन – मेंढा - कमी पाऊस
२. आर्द्रा – २१ जून  २०१७ ते ५ जुलै २०१७, वाहन – म्हैस- खुप पाऊस
३. पुनर्वसू –  ५ जुलै २०१७  ते १९ जुलै २०१७ , वाहन – कोल्हा - कमी पाऊस
४. पुष्य – १९ जुलै २०१७  ते २ ऑगस्ट २०१७, वाहन – उंदीर - मध्यम पाऊस
५. आश्लेषा – २ ऑगस्ट २०१७ ते १६ ऑगस्ट२०१७ , वाहन – घोडा - पर्वत क्षेत्रात पाऊस
६. मघा – १६ ऑगस्ट २०१७  ते २९ ऑगस्ट २०१७ , वाहन – मेंढा - कमी पाऊस
७. पूर्वा फाल्गुनी – ३० ऑगस्ट२०१७  ते १३ सप्टेंबर २०१७ , वाहन- गाढव -मध्यम पाऊस
८. उत्तरा फाल्गुनी – १३ सप्टेंबर २०१७ ते २६ सप्टेंबर २०१७ , वाहन- बेडुक -खुप पाऊस
९ हस्त – २६ सप्टेंबर २०१७  ते ९ ऑक्टोबर २०१७ , वाहन – उंदीर - मध्यम पाऊस
१०. चित्रा – १० ऑक्टोबर २०१७  ते २२ ऑक्टोबर २०१७ , वाहन – घोडा -पर्वत क्षेत्रात पाऊस
११. स्वाती – २३ ऑक्टोबर २०१७ ते ५ नोव्हेबर २०१७ , वाहन – मेंढा - कमी पाऊस

एकूण पावसाच्या मौसमाच्या अंदाजाची गोळाबेरीज केली तर पावसाच्या पाच महिन्यापैकी खुप पाऊस एक महिना, दोन महिने मध्यम पाऊस आणि दोन महिने कमी पाऊस असे योग आहेत. हवामान खाते सुध्दा ९० % पेक्षा अधीक पावसाचा अंदाज सांगते आहे. हे पहाता एकंदरीत पाऊस चांगलाच आहे असे म्हणता येईल.

मेष रास : राशीचा मालक मंगळ मिथुन ह्या राशीत महिनाभर असल्यामुळे आपल्या आक्रमक स्वभावानुसार आपण कठोर शब्द बोलून लोकांना दुखावाल. यातून काहीच साध्य होत नाही यास्तव यावर नियंत्रण ठेवा. मंगळ आणि शनि अशुभ योगामुळे महिन्याच्या सुरवातीला आरोग्य संभाळा. ९ तारखेला गुरु मार्गी झाला की अनेक रेंगाळलेल्या गोष्टी मार्गी लागतील.  महिनाभर सप्तमेश शुक्र हर्षलच्या युतीत आल्याने अविवाहीतांच्या आयुष्यात काही ठळक गोष्टी घडतील.

वृषभ रास: राशीचा मालक शुक्र महिनाभर अनुकूल नाही. वृषभ राशीला राजयोग कारक शनिसुध्दा वक्री आहे. एकटा बुध अनुकूल असल्याने सर्व कामे बुध्दीचा वापर करुनच मार्गी लागतील. यशाकरता जास्त प्रयत्न महिनाभर करावे लागतील.  ९ तारखेला गुरु मार्गी झाल्यावर पैशाचे प्रश्न असतील तर  मार्गी लागलेले दिसतील. महिनाभर तुमच्या व्यक्तिमत्वात बदल झाल्याचे लक्षात येईल.

मिथुन रास : राशीचा मालक बुध १४ तारखेनंतर अनुकूल होऊन उर्वरित महिनाभर यश देताना दिसेल. ९ तारखेला गुरु मार्गी झाल्यानंतर नोकरी व्यवसायाच्या कामात वेग येऊन अपेक्षीत गोष्टी घडुन येतील. विद्यार्थ्यांना जून केलेल्या अभ्यासाचे फ़ळ म्हणुन अपेक्षीत निकाल हातात येऊन आनंद होईल. लग्नी मंगळ महिनाभर असल्यामुळे चिडचिड होणे स्वाभावीक आहे. तुमच्या विनोद निर्माण करण्याच्या स्वभावाने तुम्हीच यावर विनोद कराल आणि चिडचिड कमी कराल.

कर्क राशी : राजयोगकारक मंगळ अनुकूल नाही. नविन शोधुन काढलेले व्यावसायीक गणिते फ़ेल होतात की काय अशी शंका मनात येईल. भाग्येश गुरु ९ जून ला अनुकूल होत आहे. व्यावसायीक असाल तर आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. विवाह इच्छुक असाल तर काही नविन ओळख या महिन्याभरात होऊन त्याचे रुपांतर नात्यात व्हावे अशी भावना महिना अखेरीस निर्माण होईल.

सिंह रास : तुमचा जन्मच मुळात अधिकार मिळवण्यासाठी झालेला आहे. या महिन्यात राशीचा मालक तुमच्या कर्मस्थानात येतो आहे. दरवर्षी तुमच्या अधिकारात वाढ करणारा महिना म्हणजे जून. अधिकार वाढीची ऑर्डर होऊन अनेक दिवस झालेले असतील तरी हा अधिकार मानून त्या प्रमाणे लोक कृती करतात याचा अनुभव या महिन्यात तुम्हाला येईल. लोक तुमच्या अधिकाराला मान देतील.

कन्या रास : शंका आली नाही असा दिवस जात नाही हा आपला स्वभाव असला तरी ह्या महिन्यात बुधाच्या शुभ भ्रमणाने आपल्या अनेक शंका दुर होतील. ज्या गोष्टींचे आपले ज्ञान अर्धवट आहे असे वाटते त्या विषयात खुप ज्ञान मिळेल. चिकीत्सा करुन अजून ज्ञान मिळवण्यास आपण तयार व्हाल. वजन वाढणे ही तुमच्या शरीराची प्रवृत्ती नाही पण काळजी घ्या.

तुला रास : राशीचा अधिपती महिनाभर व्यापार संधी उपलब्ध करुन देणार आहे. अनेक व्यापारी प्रस्ताव किंवा करार तुमच्या समोर येतील यावर विचार पुर्वक निर्णय घ्याल. जोडी्दाराबरोबर गुज करायला ह्या महिन्यात वेळ ही आहे आणि मुड ही असणार आहे त्यामुळे सुखावणार आहात. शरीर प्रकृतीत किंचीत बिघाड व्हावे असे ग्रहमान आहे त्यामुळे महिन्याच्या पुर्वार्धात काळजी घ्या.

वृश्चिक रास : शत्रु राशीत आणि राशीपासुन आठव्या स्थानी राश्याधिपती मंगळाचा मुक्काम असल्याने फ़ारसे मनासारखे घडेल अशी अपेक्षाच ठेऊन नका. पंचमेश गुरु वर्षभर लाभस्थानी आहे. ९ जून पासुन तो मार्गी होत आहे हीच जमेची बाजू आहे. जेष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास महीना अखेरीस जास्त सुरु होऊ शकतो यास्तव शनि उपासना करा. साडेसातीचा हा थोडासा त्रास आहे जो सप्टेंबर मधे कमी होऊन जाईल.

धनु रास : राश्याधिपती गुरू ९ जूनला मार्गी होत आहे. आळस झटकून पळायला तयार व्हा. दशमात मार्गी  गुरु असला म्हणजे कार्यभार वाढतो याचे प्रत्यंतर पुढील दोन -तीन महिने राहील. सहाव्या स्थानी असलेला रवि आपली नविन कामे समोर येतील. काही कारणांनी पुर्वी आलेले प्रस्ताव आपण किंवा आपल्या समोरच्या व्यक्तींनी स्विकारले नसतील तर त्यावर पुनर्विचार या महिन्यात होईल.अविवाहीतांना आपल्या चांगल्या मित्रात किंवा मैत्रीणीत इंटरेस्ट निर्माण होईल.

मकर रास : महिनाभर शुक्र तुमच्या सुख स्थानात आहे. सतत कार्यरत असणे हा तुमचा स्वभाव बाजूला ठेऊन जरा उपलब्ध सुखाचा उपभोग घ्या. शांत पणे घरात बसून जमवलेल्या सुखसाधनांना आनंद घेता येईल असे ग्रहमान आहे. वहानातुन जरा फ़ेरफ़टका मारा आणि आपणच कमावलेल्या सुखसाधनांचे सुख काय असते ते अनुभवा. सहाव्या स्थानी असलेला मंगळ आपल्या शत्रुला नियंत्रणात आणेल. जुने दुखणे सुध्दा औषधौपचाराने नियंत्रणात आलेले दिसेल.

कुंभ रास : महिनाभर शुक्र तुमच्या तिसर्या स्थानी महिनाभर असणार आहे. तिसर्या स्थानाचा स्वामी मंगळ पाचव्या स्थानी आहे. बुध ही मिथुनेत येत आहे. तुम्हाला लिखाणाची स्फ़ुर्ती होणार आहे. प्रयत्न पुर्वक मनात येत आहे ते कागदावर उतरवा. तुमची रास बौध्दीक रास आहे त्यामुळे हा आनंद काही वेगळाच असेल.

मीन रास : सप्तमेश बुध शुक्राच्या राशीत असताना गुरुशी नवपंचम योग या महिन्याच्या सुरवातीला होत आहे. विवाह इच्छुक असाल तर या सिझनचा हा जोरदार योग आहे. ९ तारखेला गुरु मार्गी झाला म्हणजे या प्रक्रियेला वेग येणार आहे. तुमच बाशींगबळ जोरात असेल तर झट मंगनी पट शादी.  मग काय ठरवताय ?