Thursday, June 22, 2017

जुलै २०१७ चे राशीभविष्य तसेच शनि वक्रिमार्गाने वृश्चिक राशीत आला आहे त्याचे परिणाम विवीध राशींना काय परिणाम होईल याबाबत माहिती.

नमस्कार ज्योतिषप्रेमी लोकहॊ, आजकाल २० तारीख आली की ज्योतिषप्रेमी लोकांना वेध लागतात पुढील महिन्याच्या राशीभविष्याचे. मला लोक आठवण करतात आणि हे ही सुचवतात जसे एका सन्माननीय वाचकाने सुचवले की मागील महिन्यात शनि वक्री होऊन पुन्हा वृश्चिक राशीत गेला त्याचे फ़ळ विवीध राशीच्या लोकांना काय मिळेल ? अनेकदा हा प्रश्न असतोच की एखादा ग्रह वक्री होऊन राशीत जातो तेव्हा आणि मार्गी असताना राशीत जातो तेव्हा मिळणारी फ़ळे वेगळी असतात का ? याचे उत्तर हो आहे. नेमके कसे ते ज्याच्या त्याच्या पत्रिकेवरुन जास्त विस्ताराने सांगता येईल.

 आत्ता इतकेच सांगावेसे वाटते की तूळ राशीला २६ अक्टोबर २०१७ पर्यंत पुन्हा साडेसाती आहे हे लक्षात घ्यावे. मकर राशीची २६ अक्टोबर २०१७ पर्यंत तात्पुरती शनिच्या साडेसातीपासून सुटका झाली आहे. वृश्चिक राशीत ज्यांचे जन्मनक्षत्र  जेष्ठा नक्षत्र आहे त्यांना खासच परिणाम दिसेल. धनू राशीला पीडा आहे तशीच असेल.

पुढील काही महिने वृश्चिक राशीत ज्यांचे जेष्ठा नक्षत्र आहे अशा व्यक्तींनी कशाचेही क्रेडीट घ्यायला जाऊ नये. ( माझ्या मुळे हरबरा टरारुन वर .... वर्हाड निघालय लंडनला मधला प्रसिध्द डायलॉग ) ते क्रेडीट राहूदे बाजूला जास्त मानहानी पदरात पडेल. वृश्चिक राशीचे लोक आपला अनुभव कोणीही कळवणार नाही हे मला माहित आहे. वृश्चिक राशीचे लोक तर अपमान झाला हे कुणालाही सांगणार नाहीत. पण दुखावले जाल हे नक्की.

काही ज्योतिषांनी सिंह राशीला छोटी पनवती आहे असे म्हणले आहे ते बरोबर आहे पण सिंह राशीवरच्या उत्तरा नक्षत्रावर जन्मलेल्या काही लोकांना याचा थोडासा परिंणाम जाणवेल. जेष्ठा नक्षत्राच्या समोर वृषभेच्या मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीला जाणवेल तसेच कुंभेच्या पुर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या काहीच व्यक्तीना जाणवेल. थोडक्यात या काळात शनिबरोबर अंशात्मक केंद्र योग होत असलेल्या ग्रहांना ( उत्तरा नक्षत्रातला चंद्र आणि पुर्वाभाद्रपदा नक्षत्रातला चंद्र किंवा तिथे असलेले ग्रह ) व अंशात्मक युती व प्रतियुती होत असलेले चंद्र अनुक्रमे जेष्ठा नक्षत्र किंवा इतर ग्रह आणि मृग नक्षत्रातला चंद्र किंवा तिथे असलेले इतर ग्रह यांना शनि अशुभ फ़ळे देईल.

वर सांगितलेल्या नक्षत्राच्या लोकांनी जर नवग्रह पीडा हर स्तोत्रामधला शनिची पीडाहरण करणारा मंत्र म्हणला तर निश्चित पीडेची तीव्रता कमी होईल. तो मंत्र असा आहे.

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।

हा मंत्र शनि साडेसाती संपेपर्यंत तुला, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांनी जप करायचा आहे. या राशी शिवाय वर उल्लेख केलेल्या उत्तरा (सिंह राशी ) , पुर्वाभाद्रपदा ( कुंभ राशी ) आणि मृग ( वृषभ राशी ) नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना जर मानसीक पीडा किंवा त्यांच्या आईला त्रास होतो आहे असे वाटल्यास दररोज २१ वेळा करावा. त्रास वाढल्यास हा मंत्र दररोज १०८ करावा.

वरील नक्षत्रात चंद्राशिवाय दुसरेही ग्रह असतात अश्या व्यक्तींना या ग्रहांशी होणार्या शनिच्या अशुभ योगाचे परिणाम काय होतील हे ज्योतिषीच सांगु शकतील. ही शक्यता काही मोजक्या लोकांच्या कुंडलीत असेल त्यांनी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. ज्यांच्या कुंडलीत असे योग नाहीत त्यांनी नाहक भिती बाळगु नये.

जेष्ठा, मृग, उत्तरा आणि पुर्वाभाद्रपदा असलेल्या लोकांनी आपले अनुभव कळवा. ब्लॉगवर लिहा किंवा इमेल करा. राशीभविष्य सर्वांनाच अनुभवाला येत नाही हे खरे आहे पण ह्या काळात मोजक्या लोकांना अनुभव येऊ शकतात.

या वरच्या माहितीवरुन आपल्या लक्षात आले असेल की आपल्याला राशीसोबत आपले जन्मनक्षत्र अर्थात आपल्या कुंडलीत चंद्र ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र माहित असावे म्हणजे राशीभविष्य आपल्याला नक्की अनुभवला येईल की नाही हे लगेचच समजेल.

मेष रास : या महिन्यात ग्रहमान अनुकूल नसल्याने प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. १६ जुलै पुर्वीच प्रॉपर्टीची कामे मार्गी लावा. या महिन्यात मानहानी सुध्दा पत्करावी लागेल. ६ जुलै ते २० जुलै हा काळ मानहानी होऊ नये म्हणुन लक्ष देण्याचा काळ आहे.   मुलांच्या प्रगतीत अडथळे जाणवतील पण घाबरुन जाण्याचा तुमचा स्वभाव नाही. आपल्या जवळच्या मित्रांशी सर्वच बाबतीत या महिन्यात चर्चा करायला विसरु नका. मित्र नक्कीच काही मार्ग सुचवतील. २० जुलैनंतर कुटुंबातल्या कोणालाही तुमच्या खास स्वभावानुसार रागाने डाफ़रु नका. घरातली माणसे सुध्दा कधीतरी राग मनात ठेवतात. पत्नी खासकरुन तुमच्या डाफ़रण्याने मनात राग धरेल. तुमची रास काही रोमॅंटीक नाही. हा रुसवा काढणे तुम्हाला सहज जमणार नाही. त्यापेक्षा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ रास : महिनाभर ग्रहमान संमिश्र असले तरी फ़ारसे प्रतिकूल नाही. उतरार्धात मुलांची प्रगती आणि जोडीदाराची मानसीकता यामुळे थोडे मन खट्टू होईल. पुर्वार्धात काही पैसे शिल्लकीत येतील त्याची गुंतवणुक करा हे तुमच्या राशीच्या मंडळींना सांगायला नकोच. २१ जुलै नंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी चालून येतील. पालकांच्या किंवा तज्ञांच्या सल्याने निर्णय घ्यावा. मृग नक्षत्रात चंद्र असेल तर आपल्याला मानसीक पीडा आहे त्यातही ज्यांचे चवथे चरण आहे त्यांना अनुभव जास्त येईल.  उपाय वर दिलेलाच आहे. मग चिंता करु नका.

मिथुन रास:  या राशीच्या  लोकांना महिन्याच्या उतरार्धात  धनलाभ होईल. महिनाभर नेहमी्पेक्षा जास्त खर्चही  असेलच पण गोळाबेरीज होऊन काही पैसे शिल्लकच राहीलेले दिसतील. तुमच्या स्वभावानुसार याला फ़ारसे तुम्ही महत्व देत नाही पण तुमचा जोडीदार याकडे तुमचे भविष्य वाचून लक्ष देईल ही अपेक्षा आहे.

कर्क रास: पुनर्वसु नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना या महिन्याचा उतरार्धात मानसीक थोडी चिंता आहे.  अशुभ मंगळाचे भ्रमण ह्या महिन्यात उतरार्धात तुमच्या राशीला आहे. चंद्र व मंगळ हा एक लक्ष्मी योग मानला गेला आहे. पैशाची आवक वाढण्याच्या दृष्टीने सर्व ग्रहमान अगदी अनुकूल आहे पण त्याच्या जोडीला तो चिंताही घेऊन येणार आहे. गंमत आहे ना पैसे नाहीत त्यांना ही चिंता आणि नाहीत त्यांनाही. यावर पर्याय एकच चिंतारहीत जगण्याचा अभ्यास करणे.

सिंह रास : कर्म स्थानी महिनाभर असलेला शुक्र तुमच्या कामासंदर्भात असलेल्या अडचणींची सोडवणूक करणार आहे. तुम्ही प्रयत्न करा नोकरी व्यवसायातले अनेक प्रश्न या महिन्यात हातावेगळे होतील. जरा महिन्याच्या सुरवातीलाच जोर लावा. पुर्वार्ध जरा या दृष्टीने जास्त अनुकूल आहे. उतरार्धात तुमच्या राशीचा स्वामी बाराव्या स्थानी गेल्याने अनुकूल रहाणार नाही. ही स्थिती महिनाभर असेल यासाठी पुर्वार्धात कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष देऊन कामे मार्गी लावा. आपले नक्षत्र उत्तरा असेल तर काय करावे हे वर दिलेले आहे.

कन्या रास : महिनाभर लाभ स्थानी  बुध, मंगळ आणि रवि हे ग्रह थोडे पुढे मागे प्रवेश करत आहेत. नोकरीत बढतीचे योग असल्यास सुवार्ता कानी पडेल. सरकारी नोकरांना बढतीचे कळले तरी लांब गावी बदली नाही ना ही चिंता असतेच. पण बहुतेकांना आहे त्याच ठिकाणी किंवा सोयीच्या ठिकाणी प्रमोशनवर बदली मिळावी असे ग्रह संकेत आहेत. सरकारी नोकरांनी बढतीचे संकेत येताच बदली योग्य ठिकाणी व्हावी यासाठी सेटींग करा.

तूळ रास : संघर्ष टाळावा हा तुमचा स्वभाव असला तरी या महिन्यात ११ जुलै नंतर नोकरी व्यवसायात संघर्ष अटळ आहे. या संघर्षात तुमची पत आणि प्रतिष्ठा पणाला लागेल असे ग्रहमान आहे. हाताखालच्या लोकांवर फ़ारसा विश्वास ठेऊ नये परंतु नोकरीत असाल तर वरिष्ठ मात्र तुम्हाला अडचणीत आणणार नाहीत. तुमच्या राशीचा मित्र असलेला ग्रह बुध तुम्हाला मदत करेल.  हुशारीने आपली सोडवणुक करुन घ्या.

वृश्चिक रास : हा महिना जोडीदाराबरोबर सुखसंवाद करण्याचा आहे. हा एक भाग सोडला तर राशीचा स्वामी मंगळ आपल्या नीच राशीत जात असल्याने सर्व काही मनासारखे घडेल असे नाही.  जेष्ठा नक्षत्र असलेल्यांनी खास करुन चवथे चरण असलेल्यांनी वरील शनिच्या वक्री होण्याचे परिणाम वाचा. पुर्वार्धापेक्षा महिन्याचा उतरार्ध बरा असेल. एकंदरीत ग्रहमान फ़ारसे अनुकूल नाही असे चित्र या महिन्याचे आहे.

धनू रास : कर्म स्थानी मागच्या महिन्यात मार्गस्थ झालेला तुमच्या राशीचा स्वामी गुरु तुम्हाला कर्म करत रहाण्याचा आदेश देतो आहे. सध्यातरी फ़ळाची अपेक्षा करु नका. ग्रहमान फ़ारसे अनुकूल नसले तरी या महिन्यात केलेले काम वाया मात्र जाणार नाही. आठव्या स्थानी जाणारा रवि आणि मंगळ आरोग्याबाबत काळजी घ्यायला सांगत आहेत. धनु राशीला चंद्र जेव्हा कर्केत असतो ते दिवस मनस्तापाचे असतात. या महिन्यात त्या चंद्राच्या जोडीला अशुभ मंगळ आहे. २२, २३ आणि २४ जुलै ह्या तारखांना हा अनुभव जास्त वाईट असेल. आईच्या माहेरच्यांकडुन  काही सुखद वार्ता येतील हा ह्या महिन्यातला चांगला भाग आहे.

मकर रास : तुमची साडेसाती येता येता राहीली आहे. व्यावसायीक असाल तर या महिन्यात अनेक प्रस्ताव येतील त्यावर विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या राशीला शुक्र या महिन्यात बलवान आहे. त्याचा फ़ायदा घेऊन काही नोकरी व्यवसायातले निर्णय घ्या. कलाकार असाल तर ह्या महिन्यात आपल्या हातुन एक सुंदर कलाकृती निर्माण कराल. गायक/वादक  असाल आणि संधी शोधलीत तर आपली कला अनेक काळ लोक स्मरणात ठेवतील अशी बहारदार मैफ़ील जमून येईल.   वैवाहीक जोडीदार उतरार्धात नाराज होईल तर त्यावर उपाय शोधून ठेवा.

कुंभ रास :  शनि वक्री होऊन कर्म स्थानी आल्याने नोकरी व्यवसायात जरा कष्टदायक परिस्थिती निर्माण होईल. पण शनिच्या राशीला खास करुन कुंभ राशीला बुध्दीचा वापर करुन प्रश्न सोडवण्याचे वरदान आहे हे लक्षात ठेवा. यातही शुक्राचे भ्रमण चतुर्थात असल्याने घरी आल्यावर ह्या कष्टाचे काहीच वाटणार नाही असे सुखद अनुभव महिनाभर घरी असताना येतील. २२-२३-२४ जुलैला अपघातापासुन स्वत:ला जपा.  मी रिस्क घेणार नाही येवढा मंत्र जपा. अपघाताच्या शक्यता कमी होतील

मीन रास : महिनाभर ग्रहमान संमिश्र आहे. तुमच्या विचारांना चालना मिळेल. अनेक गोष्टींवर सखोल विचार करण्यास अनेक पर्यायी विचार समोर येतील. चांगले प्लॅनिंग करण्यास अनुकूल महिना नक्कीच आहे. भावंडे खास करुन बहिणीकडुन आनंददायक बातमी या महिन्यात मिळेल. बहीणीबरोबर काही काळ आनंदात घालवाल असे योग या महिन्यात आहेत.