Friday, December 22, 2017

१४ जानेवारी २०१८ रोजी ज्योतिष विशारद या ज्योतिष वर्गाची पुढील बॅच सुरु होत आहे

सज्जन प्लाझा येथील ऑफ़ीस चिंचवड गाव येथे किंवा विद्यार्थी संख्या जास्त असल्यास अजमेरा कॉलनी येथे १४ जानेवारी २०१८ रोजी ज्योतिष विशारद या ज्योतिष वर्गाची पुढील बॅच सुरु होत आहे. खालील अभ्यासक्रम शिकवला जाईल. परिक्षा होऊन आपल्याला ज्योतिष विशारद हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

अभ्यास क्रम
१. ज्योतिषाची मुलतत्वे
२. राशी ग्रह यांची नावे, आंतराष्ट्रीय चिन्हे - त्याचा उपयोग एफ़ीमेरीज पहाताना
३. क्रांतीवृत्त, सुर्यमध्य पध्द्ती, भुमध्य पध्दती,
४. लग्न समाप्ती कोष्टक दाते पंचांग, विवीध शहरांची लग्न समाप्ती - दाते पंचांग
५. कुंडली मांडणे- दोन उदाहरणे - १० कुंडली मांडणे घरचा अभ्यास
६. कुंडली मांडुन  ग्रह लिहुन पुर्ण करणे. राशी कुंडली लिहणे.
७. स्पष्ट लग्न तसेच स्पष्ट ग्रह करणे - बेरजा वजाबाक्या घरचा अभ्यास
८. पंचाग माहिती - दाते पंचांग - तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण - शांती कर्म
९. नवमांश कुंडली, भावचलीत कुंडली व महादशा अंतर्दशा काढणे
१०. कुंडलीचे पुस्तक हाताने लिहुन पुर्ण करणे
११. १२ ग्रह, १२ राशी, १२ स्थाने
१२  भावेश अभ्यास व त्यांची स्थानगत फ़ळे
१३ कुंडलीतील महत्वाचे शुभयोग, ग्रहयोग, राजयोग व पत्रिकांचा अभ्यास
१४ कुंडलीतील महत्वाचे अशुभ योग व त्यांचा अभ्यास
१५ कुंडलीचा दर्जा व भविष्य कथन
१६) विवाह गुण मेलन
१७) प्रश्न कुंडली
१८) KP पध्दती काय आहे ?
१९) मुहुर्त विचार
२०) संकटे व त्यावरील उपाय व नैमित्तीक उपासना

वर्गाचा कालावधी आठवड्याला दोन तास असे पन्नास आठवडे म्हणजे एक वर्ष असेल. अभ्यासु व्यक्तीच्या सोयीने वर्ग शनिवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळ असा असेल. हा वर्ग झाल्यावर एक छोटीशी परिक्षा होऊन आपल्याला प्रमाण पत्र मिळेल.

घरकाम करणारा महिला वर्ग किंवा नुकताच सेवानिवृत्ती घेऊन निवृत्त आयुष्याची आखणी करणारे  तसेच तरुण पुरुष महिला यांनाही या वर्गात प्रवेश आहे. या साठी किमान जुनी अकरावी एसएससी किंवा बारावी परिक्षा आपण पास असणे आवश्यक आहे. आपण या वर्गात प्रवेश घेऊन एका वर्षाने ज्योतिष सल्लागार बनु शकता किंवा या अभ्यासाने समाजाबरोबर उत्तम संवाद निर्माण करु शकता आणि आपले स्थान मिळवु शकता.

या वर्ग यशस्वी रित्या पुर्ण केल्यावर खालील सेवा आपण सहजपणे खालील सेवा उपलब्ध करुन देऊ शकाल.

१. नुकत्याच जन्मलेल्या बालकाची जन्मकुंडली संगणकाच्या सहायाने बनविणे किंवा अन्य कोणत्याही वयाच्या व्यक्तीची जन्मकुंडली बनविणे.
२. नविन जन्माला आलेल्या बालकाची रास, नक्षत्र आणि त्यानुसार नक्षत्र नावाचे अद्याक्षर सांगणे.
३. जन्माला आलेल्या बालकाला जर जननशांतीची आवश्यकता असेल तर सांगणे.
४.  विवाहाचा मुहूर्त तसेच विवीध मुहूर्त सांगणे.
५. लग्नासाठी विवाहगुण मेलन तसेच मंगळ दोष इ. पाहुन विवाह करण्याचा निर्णय देणे.
६. प्रश्न कुंडली मांडुन त्याच्या आधाराने प्रश्नाचे उत्तर देणे.
७. साडेसाती कधी असते व त्याच्या अनुषंगाने उपासना काय करावी याचे मार्गदर्शन.
८. इतर प्रश्नांची हाताळणी जसे विवाह कधी होईल, पत्रिकेत असणारे शुभयोग व त्याद्वारे उत्तम काळ मार्गदर्शन इ.
९. संपुर्ण भविष्य लिहून देणे.
१०. प्रश्नकर्त्याला उपासना सांगणे.


जे लोक पिंपरी चिंचवड शहरात किंवा पुणे येथे रहात नाहीत व ज्यांना दर आठवड्याला पिंपरी चिंचवड येथे येणे शक्य नाही अश्या लोकांसाठी दुरशिक्षण अर्थात व्हिडीओ व नोटस द्वारे अभ्यासाची योजना सुरु आहे. ज्यांना असा वर्ग हवा आहे त्यांनी ही फ़ेसबुक मेसेंजर द्वारे किंवा whatsapp  9763922176 द्वारे संपर्क करावा. हा वर्ग लवकरच सुरु होईल. याची संपुर्ण योजना तयार होत आहे.


Saturday, December 9, 2017

१६ डिसेंबर २०१७ ते १३ जानेवारी २०१८ या कालावधीचे राशीभविष्य



या कालावधीत महत्वाचे राशीबदल खालील प्रमाणे घडत आहेत.

१. या कालावधीत रवि महिनाभर धनू या मित्र राशीत वास्तव्य करुन असेल.
२. या कालावधीच्या सुरवातीला बुध वक्री होऊन वृश्चिक राशीत येईल तो २३ डिसेंबरला मार्गी होऊन ६ जानेवारीला पुन्हा धनु राशीत जाईल.
३. या कालावधीत २० डिसेंबरला शुक्र धनु राशीत येईल.

रवि, शुक्र, बुध सोडता अन्य ग्रह आहे त्या राशीत असतील. आपण चंद्र दर दोन दिवसांनी रास बदलत असल्याने त्याचा फ़ारसा विचार करणार नाही.

निसर्ग कुंडलीमधे चंद्र सोडता आपण हे ग्रहांचे वास्तव्य पाहू.





धनु राशीत मुळात प्लुटो आणि शनि आहेतच त्यात रवि व शुक्र महिनाभर वास्तव्यास आहेत व शेवटी बुध ही येत आहे.धनु राशीच्या लोकांना वेगवेगळी फ़ळे अनुभवास मिळणार आहेत.

आपण एव्हाना आपली लग्न राशी शोधली असेल. नसेल तर जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म स्थळ माहीत करुन घ्या आणि आपले राशीभविष्य जसे चंद्राकडून पहाता तसे लग्नराशीकडून देखिल वाचा.

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: आपल्या राशीचा स्वामी सातव्या स्थानी महिनाभर वास्तव्य करुन आहे. ही काही चांगली स्थिती नाही. जोडीदाराशी खटके उडत आहेत याचे अनुभव या राशीचे लोक घेत असतील याची जाणिव मेष राशीला कुठे असणार ? ते तर बोलून मोकळे होणार. मेष राशीचा पती असेल तर महिलांनी जरा पडते घेऊन घरातले वातावरण शांत राहील असे पहावे. पत्नी असेल तर काय विचारता ? परिस्थिती बदलणार नाही. या राशीच्या जोडीदाराला जमवून घ्यावे लागणार. अश्विनी नक्षत्राच्या लोकांनी आपले  कृती डिसेंबर महिना अखेरीनंतर तपासून मगच करावी.  सप्तम स्थानाचा अधिपती २० तारखे नंतर भाग्यात जात असल्याने प्रेम कमी होणार नाही.

 इतके जरी असले तरी अनेक ग्रह आपल्या भाग्य स्थानी येत असल्यामुळे आपल्याला हा महिना स्मरणात राहील मेष राशीच्या खेळाडु लोकांना हा महिना अनेक मॅचेस मधे यश मिळताना दिसेल. अनेक खेळाडुंना त्यांच्या नेत्रदिपक कामगिरीमुळे सन्मान मिळतील. या साठी आरोग्य नियंत्रणात असायला हवे. थंड हवेमुळे होणारे सर्दी/खोकला या पासून बचाव करा. अनेक कलाकारांना त्यांचे फ़ोलोअर्स/फ़ॅन्स चांगल्या कमेंट्स देतील.

वृषभ रास : आपल्या राशीचा स्वामी शुक्र अष्टमस्थानी जात आहे. तुमच्या अष्टमात रवि, राजयोगकारक शनि, ६ जानेवारीला जाणारा बुध , आधीच तिथे असलेला प्लुटो असे पाच ग्रह असल्यामुळे आरोग्य संभाळावे हा पहिला सल्ला. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ नयेत हा दुसरा सल्ला तर लहान मुलांचे आरोग्य संभाळा हा तिसरा सल्ला आहे. तुमची बुध्दी काहिही झाले तरी स्थिर असते हीच काय ती जमेची बाजू आहे.

नोकरी व्यवसायातही संघर्ष झाला तरी तो तुम्हाला फ़ार त्रासदायक होईल असे नाही. रवि, बुध आणि शुक्र महिनाभरच अष्टमात असतील त्यामुळे कटकटी झाल्यात तर त्या महिनाभरापेक्षा जास्त असणार नाहीत हे लक्षात असू द्या. शनि तुम्हाला अजून दोन वर्षे बांधुन घालणार आहे. नविन काहीतरी या महिन्यात सुरु करायचा विचार असेल तर जरा तो बेत पुढे ढकला.

मिथुन रास : तुमच्या राशीचा स्वामी जास्त काळ तुमच्या सप्तमस्थानी असणार आहे. मिथुन राशीचे लोक व्यापारात फ़ारसे असत नाहीत पण मार्केटींग किंवा कन्सलटंन्सी उत्तम करतात. या महिन्यात तुम्हाला काही नविन कन्सेप्ट विकायचा असेल तर त्याचा प्लॅन बनवा. हे काम यशस्वी होईल असे ग्रहमान आहे. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना ही एक मोठीच संधी आहे.

तरुण मुलांची काळजी करणे हा तुमचा स्वभाव नाही परंतु जरा एकदा त्याचे प्लॅन्स तपासून पहा. हवतर तुमच्या जोडीदाराला सांगा.

तरुणांना काही रोमॅंटिक वातावरणात जाण्याची संधी या महिन्यात आहे. काही सिरीयस प्रपोजल्स आली तर त्याकडे तुमच्या पध्दतीने हसण्यावारी नेऊ नका. तुम्हाला ही संधी वर्षभरात एकदाच येत असते.

कर्क रास : या महिन्यात शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना काही गोष्टी भाग्यकारक घट्ना म्हणुन समोर येतील. तुमचा राजयोग कारक मंगळ या महिन्यात भाग्येशाचा बरोबर असल्यामुळे काही तरी नेत्रदिपक घडणार यावर भरवसा ठेवा. या घट्ना घडताना काही सरळ नसतील त्यामुळे भांबाऊन न जाता तुमचा पक्ष बरोबरच आहे हे लक्षात ठेऊन तुम्ही या कडे पहा. यात तुमचे  भाग्योदय घडतील अश्या घटनांचे संकेत नक्कीच आहेत. ते तपासून थोडे क्रेडीट घ्याच. कनव्हीक्शन का पैसा है बॉस असे एक मराठी सिनेदिग्दर्शक संजय जाधव म्हणतो ते लक्षात ठेवा.

आपली संतती सुध्दा असेच काही या महिन्यात करणार आहे. त्यांचे कौतूक करायला विसरू नका.

सहाव्या स्थानी ग्रहांची गर्दी म्हणजे कमविण्याच्या अनंत संधी हे सुत्र व्यावसायीक लोकांनी लक्षात ठेवा. फ़ार भावनेच्या आहारी न जाता कलाकार, अभिनेते, लेखक या व्यावसायीकांनी डोळे उघडून कोण काय म्हणत आहे या कडे पहा. संधी आहेतच त्या कॅश करा.

सिंह रास : तुमचा राशीचा अधिपती बराच काळ दशमेश शुक्राच्या युतीत असणार आहे. शुक्र रवि युती ही अनेक चांगल्या नाट्य कलाकारांना स्टेज मिळवुन देत असते. सिंह राशीवर अनेक कलाकार जन्माला येतात. नाट्य काय कुठेही घडत असते. आपण प्रत्येकच कोणत्या ना कोणत्या रोल मधे सतत असतो. लेखकाने दर वेळेला प्रत्येक रोल ला न्याय दिलेला असतोच असे नाही. या महिन्यात तो आहे हे निश्चित. आपला रोल चांगला व्हावा या साठी प्रयत्न करा. रंगभुमी कलाकार असाल तर प्रिंट मिडीया तुमची दखल घेणार आहे. आणि जीवनाच्या रंगमंचावर असाल तर तुमचा रोल स्मरणात राहील असे घडणार आहे.

तुमचे उत्पन्न तुम्ही कुठे गुंतवणार आहात यावर विचार करा. जगात वेगवेगळ्या मार्गाने फ़्रॉड करणारे आपल्याला भेटत असतात. अश्या एखाद्या मृगजळात तुम्ही गुंतत नाही ना यावर विचार करुनच मग पैसे गुंतवा.

कन्या रास : या महिन्यात योजलेली कामे ६ जानेवारी पुर्वी मार्गी लागतील असे पहा. एकदा का तुमच्या राशीचा स्वामी बुध शनिच्या तावडीत सापडला म्हणजे अनेक कामांना तो ब्रेक लावेल. तुम्हाला खात्रीने सुचणारे शब्द तुम्हाला सुचणार नाही. ही स्थिती काही पुर्ण महिनाभर असेल असे नाही पण महिन्याचा शेवटी म्हणजे ६ जानेवारी नंतर जवळ जवळ दहा दिवस असेल.

चवथा शनि तुमच्या राशीत अजून दोन वर्षे असेल. तो सुख लाभु देणार नाही असे असताना शुक्राची चतुर्थात एन्ट्री तुम्हाला सुखाची झोप देईल. कधी नव्हे ते वाहन सौख्य मिळेल. ही स्थिती अगदीच महिनाभर असेल असे नाही पण काही दिवस तरी असे ग्रहमान या महिन्यात नक्की आहे.

तुळ रास : तुमच्या राशीचे वर्णन करताना राशीभविष्यकार मा. शरद उपाध्ये झुकत माप देऊन तुमच्या समतोल व्यक्तिमत्वाचे गुणगान गातात.या महिन्यात तुम्हाला क्रोध होईल आणि हा समतोल पणा ढासळेल. हे अगदी वाईटच असते असे नाही. लोक नाहितर तुम्हाला गृहीत धरतात. कधी तरी तुमचा राग पाहू द्या ना त्यांना. हव तर अस समजा की महाभारतात भीष्मांनी श्रीकृष्णाला युध्द करायला भाग पाडले अशी स्थिती तुमच्यावर येणार आहे. काय हरकत आहे अस झाल तर ?

तुम्ही लेखक/पत्रकार असाल तर तुमच्या लेखणीने अनेकांना गारद कराल. काही वेळाच अश्या असतात की सौम्य भुमिकेला तुमचा भित्रेपणा समजला जातो. तुम्ही फ़ेसबुक किंवा व्हॉट्स अप सुध्दा आपल्या भुमीकेने अनेकांना तोंडात बोट घालायला लावाल. शेवटी रात्रंदीन आम्हा युध्दाचा प्रसंग असताना एव्हरी थिंग इज फ़ेअर ही भुमिका घ्या.

वृश्चिक रास : आपल्या संततीकडे लक्ष द्या हा सल्ला या महिन्यातला मोलाचा सल्ला. संतती जर तरुण असेल तर ती नेमकी काय कृती करणार आहे याकडे लक्ष द्या. इतका इशारा लक्षात ठेवलात तर या महिन्यात अनेक चांगल्या गोष्टी कुटुंबात घडणार आहेत. कौटुंबिक संमेलन असेल. या संमेलनात अनेक बातम्या ज्या तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या संदर्भात आहेत त्या समजतील.

जी काय गुंतवणुक करणार आहात ती तुम्ही नेहमीच लक्ष देऊन करता. या महिन्यात या बाबत चुकू नका. खास करुन जी गुंतवणुक जी फ़क्त कागदपत्रांच्या द्वारे होते. तुम्हाला नेमकी स्थिती समजत नाही अश्या गुंतवणुकी नुसते रिपोर्ट कार्ड पाहून करु नका. फ़ॅक्ट्स तपासा.

धनु रास : या महिन्यात जे तुम्ही गमावले किंवा गमावणार आहात ते सर्व परत मिळण्याच्या संधी स्वत: हुन चालत येणार आहेत. तुमचे मित्र काय म्हणत आहेत या कडे लक्ष द्या. तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावलात तर मग मात्र संधी जाऊ शकते. पक्के व्यापारी आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवतात तसा ठेवा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या.

व्यापार हा तुमचा प्रांत नाही पण संधी घेताना तुम्हाला कोणी हातोहात फ़सवणार नाही ना हे मात्र ओळखण्या इतके सुज्ञ आणि बुध्दीमान तुम्ही आहात हे विसरु नका. हे भान असले तर हा महिना तुम्हाला लक्षात राहील असे नक्कीच काही देऊन जाणार आहे.

मकर रास :  बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे हे गाणे या महिनाभर लक्षात ठेवा. अनेकदा तुमचे नुकसान होऊ शकते असे ग्रहमान आहे. साडेसातीच्या पहिल्या टप्यात नुकसान असते म्हणजे दर महिना खुप नुकसान होते असे नाही पण या महिन्यात अनेक ग्रह तुम्हाला अपयश, चिंता, पीडा देताना दिसणार आहेत. तुमची चाल धिमी असते. तुम्ही अखंड सावधान असता ही काय ती जमेची बाब आहे.

या महिन्यात समजा तुम्ही शेअर घेणार असाल आणि तो पडला किंवा प्रॉपर्टी घेतली ते भाव जरा जास्त होते असे समजले तर जे दुख: होईल असे ग्रहमान आहे. आरोग्य सुध्दा साथ देणार नाही. त्यामुळे समझो इशारे. फ़ार काही चांगले घडेल अशी अपेक्षा ठेऊच नका ते जास्त चांगले.

कुंभ रास :  माझ्या राशीभविष्याची चातकासारखी वाट पहाणारी ही माणसे. कालनिर्णय पहाणार, सर्व वर्तमान पत्रे पहाणार . राशीभविष्यात जिथे जी गोष्ट सगळ्याच ठिकाणी समान वर्तवली जाईल त्याचा पडताळा घेणार हा तुमचा स्वभाव आहे. मग तयार का ऐकायला ?

किती देशील दोन्ही हाताने असे ग्रहमान या महिन्यात आहे. पाच ग्रह जर लाभ स्थानी असतील तर काय ? तुमची झोळी भरुन जाईल असे तुमचे ग्रहमान आहे. चांगल्या बातम्या, पैसे, यश, किर्ती आणि काय काय मिळाले ते तुम्हीच मला सांगा.

अविवाहीत आणि विवाहच्छु असाल तर तो ही जमेल. संततीच्या सुवार्ता येतील. सुखाचा फ़ुलोरा घेऊन तुम्ही नाचाल असा महिना कधी तरी लाभतॊ असे ग्रहमान आहे.

मीन रास : तुमच्या संथ स्वभावाला सोडुन जरा कंबर कसुन कामाला लागा. एक तुतारी द्या मज आणुन ह्या कवीतेचे वाभाडे काढताना काही लोक तुतारी आणुन दिलीत तर मी वाजवीन नाही तर गप्प बसीन असे म्हणतात. संधीच्या एक नाही तर अनेक तुतार्या तुमच्या आजुबाजूला वाजत असताना जर संथ राहिलात तर कसे होणार ?

सगळीच कामे मार्गी लागतील का तर नाही पण पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार नाही म्हणुन प्रयत्न करायचा नाही असे नाही. खर सांगु का पण तुम्ही कंबर कसा अगर नका कसू लोक तुम्हाला कामाला लावणारच आहेत. त्या पेक्षा तुम्हीच मी करतो म्हणाना ? पहा तुमच्या बद्दल असलेले मत कसे बदलते ते ?


नुकतेच प्रसिध्द झालेले माझ्या ब्लॉग वरील काही लेख पहा

१. आय व्ही एफ़ सक्सेस स्टोरी -      http://gmjyotish.blogspot.in/2017/11/ivf.html

२. अनेकदा ३६ गुण जुळूनही पती-पत्नी मधे संघर्ष किंवा प्रसंगी घटस्फ़ोट होताना दिसतात याचे कारण काय असावे ?    http://gmjyotish.blogspot.in/2017/12/blog-post.html


मी आता बराच काळ आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शनही करु शकतो. माझ्या ऑफ़ीसवर पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या लोकांसाठी पत्ता आणि फ़ोन नंबर खाली आहे तसेच. इमेल, फ़ेसबुक मेसेंजर आणि व्हाट्सअप वर सुध्दा नक्कीच संपर्क करता येईल.



Wednesday, December 6, 2017

मनातला प्रश्न १५ वा : अनेकदा ३६ गुण जुळूनही पती-पत्नी मधे संघर्ष किंवा प्रसंगी घटस्फ़ोट होताना दिसतात याचे कारण काय असावे ?

उत्तर : विवाहासाठी वधू - वरांचे गुण मिलन हा व्यावहारिक शब्द प्रयोग असला तरी खर तर नुसते गुण नाही तर कुंडली मेलन असा शब्द वापरला तर प्रथम एका शब्दामुळे होणारे गैरसमज टळतील. कारण कुंडली मेलनामध्ये, गुणमेलन हा एक निकष आहे.

कुंडली मेलनासाठी काही पुर्व गृहीतके आहेत. मुलीच्या/मुलाच्या आई वडीलांनी दिलेली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म स्थळ हे बरोबर आहे.अनेकदा लग्न जमत नाही व कुंडलीतील कुयोगाने मुलीला नाकारले जात आहे असे पाहून मुलीला/मुलाला माहित नसताना ही कुंड्ली बदलून सोयीची कुंडली देण्याचा प्रकार काही लोक समाजात करतात. प्रत्येक वेळेस मुलीची/मुलाची कुंडलीची खातरजमा करण्याची पध्दत नाही. हे सर्व करण्यासाठी वेळ ही लागतो. अनेकदा खातरजमे साठी आवश्यक माहिती पुरवली जात नाही. बायोडाटा मधे माहिती कमी असते. यामुळे कुंडलीमेलन करणारा ज्योतिषी हे गृहीत धरतो की ह्या दोन्ही कुंडल्या बरोबर आहेत.

आजही कुंडलीमेलनासाठी ज्योतिषाला फ़ी द्यावी लागते म्हणून आपण स्वत: गुणमेलन करुन थांबणारे पालक आहेत. त्याही पुढे जाऊन यापेक्षा आम्हाला जास्त पहायचे नाही असे म्हणणारे पालक आहेत. परिणामी पुढील निकष ज्याची चर्चा आपण करणार आहोत त्यावर उहापोह न होता विवाह केवळ गुणमेलनावर नक्की होतात जे बरोबर नाही.

मग गुणमेलनाबरोबर काय काय पहावे ?

१) गुणमेलनतर पहावेच ज्यात ३६ पैकी किमान १८ गुण जुळावेत व यासाठी दातेपंचांगाचाच वापर व्हावा. गुणमेलनासाठी दातेपंचांगामधे जितका अभ्यास आहे तो अन्य गुणमेलन सॉफ़्टवेअर मधे असेलच असे नाही. अनेकदा दाते पंचांग स्पष्ट विवाह करु नये असा उल्लेख करते ते अन्य सॉफ़्टवेअर मधे असेलच असे नाही.

२) मंगळ दोषाचा अभ्यास व निराकरण होत असेल तर पुढे जावे. यासाठी भावचलीत कुंडली मांडुनही अभ्यास करावा. मंगळ दोषावर कुंभ किंवा अर्क विवाहाचा, मंगळाची शांती इ. पर्याय उपलब्ध आहेत. खरच याची आवश्यकता आहे याची खातरजमा करुन नाईलाज असल्यास हे करावे. दाते पंचांगामध्ये मंगळाला प्रतिकारक कुंडली एका जोडीदाराची नसेल तर दुसर्याची असू शकते यावर ही लक्ष द्यावे.

३) सर्वात महत्वाच्या मुद्दा म्हणजे सप्तमेश व शुक्र यांच्या स्थितीचे अवलोकन. जर सप्तमेश सुयोग्य असेल तर ५०% वैवाहीक सुखाची खात्री आहे. त्यात शुक्र ही अनुकूल असेल तर अजूनही खात्री वाढते. अश्यावेळी गुण कमी असतील किंवा मंगळ दोष सुध्दा फ़ारसे प्रभाव टाकत नाहीत. थोडक्यात सप्तमेश जर सुयोग्य असेल म्हणजे लाभ स्थानी किंवा धन स्थानी असून वक्री नसेल, अशुभ ग्रहांच्या युतीत , केंद्रयोगात वा प्रतियुतीत  नसेल, अशुभ ग्रहांच्या दृष्टित नसेल तर त्याचे वैवाहीक सुख देण्याचे प्रमाण वाढते.

शुक्र स्वत: सप्तमेश असुन सुस्थितीत असेल तर अजूनही जास्त वैवाहीक सुखाची खात्री वाढते. शुक्र सप्तमेश नसताना सुध्दा स्वराशीत, उच्च राशीत असताना, स्व नवांशात/उच्च नवांशात असताना वैवाहीक सुख मिळते.

दोघांच्या पैकी किमान एकाच्या पत्रिकेत सप्तमेश आणि शुक्र दोष पुर्ण नसावेत व दुसर्या च्या पत्रिकेत सप्तम स्थानावर/ सप्तमेशावर शुभ ग्रहांची दृष्टी असल्याची खातरजमा असावी.दोघांचा शुक्र मात्र बलवान नसला तरी किमान दोषपुर्ण नसावा. इतके पाहिल्यास पतीपत्नीमधील संभाव्य विवाद लांबत नाहीत व घटस्फ़ोटाची परिस्थिती येत नाही.


४) वधू व वरांचे आयुष्य हा मुद्दा सुध्दा महत्वाचा आहे अन्यथा अनेकदा लग्नानंतर दहा वर्षे सुखाची असतात व अचानक मृत्यु ओढवला म्हणजे वरील तीनही मुद्दे अभ्यासून सुध्दा असे का घडले असा प्रश्न पडतो. वास्तविक मृत्यु वर्तवणे इतके कठीण आहे. तो खात्रीने येईलच असे कोणी सामान्य/अभ्यासू ज्योतिषी सांगू शकत नाही. या साठी हा मुद्दा स्पर्श केला जात नाही.

५) लग्नानंतर येणार्या दशा- अंतर्दशा, संतती होईल याबाबतची खात्री तसेच प्रगती होईल की नाही इतके सारे मुद्दे आवश्यक आहेत पण  ह्या मुद्यांवर अनेक पर्यायी गोष्टी आहेत. जसे प्रत्येकाला दशा-अंतर्दशा सुयोग्य येतील असे नाही पण जोडीदार चांगला असेल तर ह्या कठीण काळात निभाऊन जाण्याचे सामर्थ्य उभयतांमधे संस्काराने येते.  संतती साठी आज आय व्ही एफ़ सारखे अत्याधुनीक उपचार असताना बरेचसे प्रश्न निकाली निघतात. प्रगती होईल की नाही हा मुद्दा प्रगती म्हणजे काय ह्या गृहीतकावर आधारीत आहे. याचे उत्तर इतके स्पष्ट देता येणार नाही. मुलाच्या कुंडलित अनेक राजयोग आहेत परंतु वैवाहीक सौख्य कमी असेल अश्या मुलाला कोण पालक आपली मुलगी जाणुन बुजून देईल?

यामुळे मुद्दा नंबर ४ आणि ५ महत्वाचे असले तरी त्याला किती महत्व द्यायचे याचे भान ठेवले नाही तर या मुद्यांवरुन विवाह टाळणे हा  पर्याय ठेवला तर विवाह होणेच दुरापास्त होऊन बसेल या साठी यावर फ़ार भर दिला जात नाही परंतु जर मृत्यु आला तर मात्र ज्योतिषी बदनाम होतो हा अनेकदा अनुभव येतो.

वरील चर्चेवरुन एक निष्कर्श नक्कीच निघतो की आम्हाला अजिबात पत्रिका पहायची नाही या पेक्षा किमान पहिल्या तीन निकषांवर पत्रिका तपासल्या जाव्यात. मुद्दा नंबर ४ व ५ पालकांच्या इच्छेने पहावे पण ज्योतिषाने तपासताना तारतम्य वापरावे.