Sunday, January 8, 2017

१४ जानेवारी ते ११ फ़ेब्रूवारी महिन्याचे राशीभविष्य तसेच पौष महिना आणि विवाह या संदर्भातील प्रथा

सर्व ज्योतिषप्रेमींना नमस्कार. आपल्यापर्यंत माझा ब्लॉग पोचतो आहे याची पावती मला मिळते आहे. आपल्या प्रतिसादामुळे उत्साह अजुन वाढतो आहे. या ब्लॉगच्या माध्यमातुन ज्योतिषविषयाची उपयुक्तता पोचवणे हा उद्देश आहे तसेच काही अनिष्ट गोष्टी कालबाह्य गोष्टी सुध्दा आपल्यापर्यंत पोचवणे हा ही उद्देश्य आहे. पौष महिन्यात विवाह विषयक बोलणी करु नये ही एक अनिष्ट प्रथा भारतभर रुळली आहे. याला काहीच शास्त्राधार नाही. दाते पंचांगकर्ते यांनी कधी काळी यावर लेखही लिहला होता. याला शास्त्राधार असता तर पंचांगात पौष महिन्यात लग्नाचे मुहुर्तही आले नसते. माझ्या मते जर मराठी भाषेत ज्योतिष किंवा मुहुर्तविषयक शास्त्र शुध्द काही असेल तर ते पंचांग आहे. ज्या अर्थी दाते पंचांगात पौष महिन्यात मुहुर्त आहेत त्या अर्थी किमान विवाहाची बोलणी करायला काहिही अडचण नसावी. आपल्या हातात हे राशीभविष्य ९ किंवा १० जानेवारीला पडेल आणि २७ जानेवारी पर्यंत पौष महिना आहे. मुलांचे विवाह आजकाल लांबतात. अजुन उशीर न करता जे स्थळ आले असेल त्या वर बोलायला पाहिजे. त्या करता पौष महिना संपायची वाट पाहु नका.

विधवा केशवपन, सतीची प्रथा यासारख्या प्रथा आपण मोडुन काढल्या कारण त्याला शात्राधार तर नव्हताच. स्त्रीयांना केवळ जोडीदाराचा अपमृत्यु झाल्याने अमानुष वागणुक समाज देत होता. इतक्या मोठ्या वाईट प्रथा आपण मोडल्या आहेत. त्यामानाने काही किरकोळ प्रथा आपल्या मनात घर करुन राहिल्या आहेत. मला जेव्हा यावर या ब्लॉगवर प्रतिक्रिया येतील तेव्हा कळेल की हा विचार आपल्याला पटला आहे.

चुकीचे जो पर्यंत सोडुन देत नाही तो पर्यंत चांगले आणि खरे आपल्यापर्यंत पोचणार नाही.

फ़ेसबुकच्या माध्यमातुन मी माझ्या ब्लॉगच्या लिंक आपल्यापर्यंत पोचवतो. पण एक सोपा मार्ग आहे की तुम्ही माझा ब्लॉग subscribe करा  म्हणजे ते तुम्हाला नियमीत इमेल वर प्राप्त होत राहील. पोष्ट्च्या खाली त्याची लिंक आहे. त्यावर आपला इमेल आय डी लिहुन submit हे बटन दाबलेत की पुढील सुचना येतील. त्यानुसार तुम्ही ही कृती पुर्ण करु शकाल. ज्यांचे इमेल अकाउंट नाही त्यानी फ़ेसबुक वर पहा. त्यांना तिथे लिंक मिळेल. आणि जर आपण मला वैयक्तिक भेटुन मोबाईल नंबर दिला असेल तर whatsapp वर मी राशीभविष्याची किंवा लेखाची लिंक देत असतो.

१४ जानेवारी अर्थात मकर संक्रांत. या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसाला भारतीय संस्कृतीत महत्व देण्याचे कारण सुर्य हा शक्तीचा स्त्रोत आहे. दक्षिणायनात दिवस लहान तितके शक्तीचे वहन कमी होते. याउलट १४ जानेवारीपासुन सुरु होणारे उत्तरायण पृथ्वीवरल्या माणसासहीत अनेक जीवांना शक्तीचे वरदान देते. थंडीने गोठलेल्या पृथ्वीला नवचैतन्य मिळते.

१४ जानेवारी पासुन सुरु होत असलेल्या महिन्याचे ग्रहमान असे सांगते की काही लोकांना व्हिटॅमीन ई ची कमतरता जाणवेल. परीणामी मांडी-पोटरीत क्रॅप येणे, निरुत्साह वाटणे किंवा लो बी.पी.ची तक्रार असलेल्यांना त्रास वाढु शकतो. यासाठी मोड आलेली कडधान्ये याचे सेवन किंवा बरोबर बदामाचे सेवन गरजेचे आहे.  व्हिटॅमीन ई सोबत व्हिटॅमीन सी पण खाणे गरजेचे असते अन्यथा व्हिटॅमीन ई पुर्णपणे शरीरात शोषले जात नाही. जे संपुर्ण शाकाहारी नाहीत त्यांना ही तक्रार दिसणार नाही कारण मांसाहारातुन व्हिटॅमीन ई मोठ्या प्रमाणात मिळत असते.

१४ जानेवारीला सुरु होणारा रवि महिना अर्थात रविमास शनिसारख्या बलाढ्य ग्रहाचा राशीबदल घेऊन येतो आहे म्हणुनच स्वतंत्र लेखाने मी त्यावर लिहले आहे. हा लेख पहावा  http://gmjyotish.blogspot.in/2016/12/blog-post_20.html

या महिन्यात बुध शुक्र यांच्या राशीबदला बरोबरच मंगळ मीन राशीत जात आहे. कसा जाणार आहे नेमका महिना ते आता पाहु.

मेष रास :  २६ जानेवारीला शनि आपल्या भाग्यस्थानात जाणार आहे आणि अडीच वर्षे तिथे मुक्काम करणार आहे. ज्यांना सतत शत्रुपीडा झालेली आहे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही. लांबच्या प्रवासाचे योग येणार आहेत. कदाचित बदली सुध्दा संभवते. बदली तुम्हाला हव्या त्या शहरात घडवण्यासाठी मात्र प्रयत्नच हवेत. किमान नको त्या ठिकाणी होणार नाही ते पहा. २० तारखेला मीनेत जाणारा मंगळ एखादे छोटे आजारपण किंवा त्रास देऊ शकेल. १४-१५ जानेवारी पासुन होणारी शुक्र-मंगळ युती तुम्हाला महिनाभर जोडीदाराच्या संपर्कात रहाण्याचा योग देणार आहे.  नवविवाहीत असाल तर हनिमुनसाठी प्रवास आहेच. गुरुवारी आलेली २६ जानेवारीची सार्वत्रीक सुट्टी. २७ जानेवारीची दांडी आणि शनिवार -रविवार सुट्टी असलेल्यांना आपोआप मिळणारी सुट्टी म्हणजे पुन्हा एकदा किमान महाराष्ट्रातले  समुद्रकिनारे भरुन माणसांचे उधाण येईल. नोकरदारांना रवि दशमात येऊन काही अतिरीक्त अधिकार महिनाभर मिळतील. प्रमोशन अपेक्षीत असेल तर प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. ह्याच महिन्यात जन्मतारीख असलेल्यां मेष राशीच्या लोकांना ( १४ जानेवारी ते १२ फ़ेब्रुवारी )  याची जास्त प्रचिती येईल.

मेष राशीला चतुर्थेश आणि पंचमेश याचा योग  राजयोग कारक असते. त्यातही रवि दशमात असताना राजयोग जास्त फ़लदायी होतो. आपल्या दशमात रवि महिनाभर आहे. १९ जानेवारी, २७ जानेवारी व  ६ फ़ेब्रुवारी व ला स्मरणात राहील असे अनुभव  येतील. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना तर नक्कीच याचा अनुभव येईल.

वृषभ रास : तुमच्या पत्रिकेत एक महत्वाचा बदल म्हणजे शनि २६ जानेवारीपासुन, चंद्र राशी कडुन म्हणजे वृषभ राशी कडुन आठवा येत आहे. हा योग किंचीत  त्रास देणारा असतो. शनि बदलाच्या काळात म्हणजे दिनांक २६ जानेवारी २०१७ सायंकाळी ०४.३५ ते रात्री १०.२३ पर्यंत जप, दान किंवा शनि पुजनाने हा त्रास कमी होतो. ज्योतिषाने सांगीतले की लोक मनपुर्वक करतात हा अनुभव आहे. यासाठी दाते पंचांगाचे ( २०१६-२०१७ ) पान १९ वर विस्ताराने सर्व दिले आहे ते वाचा आणि करा. श्रध्दा महत्वाची हे विसरु नका. श्रध्दे शिवाय मॅकेनिकली कृती व्यर्थ आहे.  दाते पंचांग आठव्या शनिचे वर्णन कष्टकारक असतो असे करते. वृषभ राशीचे लोक कष्टाला घाबरत नाहीत त्यामुळे तुम्ही चिंता करुच नका.

१५ डिसेंबर ते १३ जानेवारी काळात तुमचा सुख स्थानाचा अधिपती रवि आठव्या स्थानी असताना जे त्रास झाले असतील ते १४ जानेवारीपासुन संपतील. रवि भाग्यात जाईल आणि शुक्र -मंगळ यांचे भ्रमण अनुक्रमे २७ व २० तारखांना तुमच्या लाभस्थानी सुरु होताना काही अपेक्षा पुर्ण होतील आणि लाभही घडेल असे योग महिनाभर आहेत. पंचमेश- कुटुंबेश बुधही भाग्यस्थानात जात असल्यामुळे कुटुंबातईल व्यक्ती किंवा मुलांच्या संदर्भात काहीतरी उत्तम घडेल यावर विश्वास ठेवा.

मिथुन रास : शनि तुमच्या सप्तम स्थानी २६ जानेवारीला येत आहे. पुरुषांची आजकाल बायकोसमोर बोलायची सोय नसतेच असा विनोद नेहमी केला जातो. माझ्या मते पती- पत्नी एकमेकांना पुरक असतात. सप्तम स्थान तुमच्या जोडीदारचे स्थान पुढील अडिच वर्षे शनि सप्तमात असताना जोडीदाराला त्रास असणार आहे. त्यात तुमची भर नको म्हणुन जोडीदाराचे मन जपायचा संकल्प करुन टाका. जोडीदार त्रासात असताना तुम्हाला सुख कुठुन लाभणार ? शनिचे सप्तमातले भ्रमण हे असे असते. महिनाभर रवि अनुकुल नसताना किंचीत आजारपण  येऊ शकते. सोबत लग्नेश. सुखेशही बुध अनुकुल नसणार. एक महिना जरा कुपथ्य होणार नाही याची काळजी घ्या. सुर्यदर्शन घ्यावे किंवा सुर्यनमस्कार घालावेत हे ही या काळाला अनुसरुन आहे. मग आपल्याला त्रास होणार नाही.

दशमात येणारा शुक्र मंगळ नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने मिश्र फ़ळे देईल. नोकरी व्यवसायात संघर्ष करावा लागेल पण तुम्ही मैदानात उतरलात की शत्रु पळ काढेल. तुम्ही मी संघर्षाला तयार आहे असे जाहिर करा आणि पहा काय घडते.

कर्क रास : शनि महाराज आपल्याला राशीबदलानंतर काही अडचणीत टाकु शकतात.  एखाद्या व्यवसायीक पैसे वसुलीबद्दल शंका असेल तर गोडी गुलाबीने जेव्हडे पैसे २६ जानेवारीच्या आधी मिळत असतील तर ते घेऊन टाका मग भांडत बसा. किंवा  प्रॉप्रर्टी येणे असेल तर जी मिळते आहे ती घ्या मग अपेक्षीत काय त्याचा विचार करा. अष्टमेश शनि जेव्हा सहाव्या स्थानात येतो तेव्हा दुखणे वाढु शकते. आपल्या सध्याच्या दुखण्याची तिव्रता व औषध उपचार याकडे लक्ष द्या. गंभीर विचार करावा असे नाही पण दुर्लक्ष नको इतकेच सांगणे.

शुक्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुम्हाला भरपुर सुख महिनाभर देईल. एखादी सुखदायी वस्तु तुमच्या संसारात येईल. तसेच भाग्यस्थानातील मंगळाचे भ्रमण आपण खेळाडु असाल तर अपेक्षीत निवड झाल्याची बातमी घेऊन येईल. या महिनाभरात जर तुम्हाला खेळाचे प्रदर्शन करायचे असेल तर तुम्ही नक्की चमकाल. मग प्रॅक्टीसला सुरवात करताय ना ? सराव न करता भविष्यावर विश्वास ठेवाल तर मग गफ़लत होईल.

सिंह रास: चवथा शनि म्हणजे छोटी पनवती अस म्हणतात ती २६ जानेवारीला संपते आहे. शनि तुमच्या पंचम स्थानी जातो. मघा नक्षत्र वाल्यांना हा शनि सुखकारक नाही. पुर्वा नक्षत्राच्या लोकांनाही फ़ारसा सुखकारक नाही. पण अजुनही म्हणाव तस ग्रहमान तुमच्या राशीला अनुकूल नाही तेव्हा जरा शांतच रहा. सिंहाने नुसता दृष्टिक्षेप टाकला तरी भागते त्यामुळे तुमच्या शत्रुच्या हालचालींवर नुसती नजर टाका. थोडीशी नाराजी दाखवा. या महिन्यात तुम्ही इतकेच करु शकता.

अनेक ग्रह तुमच्या राशीला याही महिन्यात फ़ारसे अनुकुल नसल्यामुळे कोंडी होते की काय असे वाटेल पण ही स्थिती फ़ारकाळ टिकणारी नाही. एखादे लेखी फ़र्मान काढण्याचा प्रशासकीय अधीकार तुमच्याकडे असेल तर विचारपुर्वक काढा आणि गंमत पहा. या पध्दतीने नोकरी/व्यवसाय किंवा या ठिकाणी असलेल्या अडचणी संपणार आहेत पण अजुन महिनाभर थांबा मग हळु हळु ग्रहमान बदलेल.

कन्या राशी: २६ जानेवारीपासुन एक छोटीशी पनवती येते आहे. चतुर्थ स्थानातले शनिचे भ्रमण तुमचे सुखाने बसणे, झोपणे किंवा भौतीक सुख देणारे वस्तुंचा  उपभोग घेण्यास अडचणी निर्माण करणार आहे. पुढील अडीच वर्षात असा अनुभव येईल की तुमच्या आवडीच्या वहानाने तुम्हाला प्रवास करता येणार नाही. इतकच काय सुखाच्या झोपेत अडथळे येतील. शनिमहाराज जे अडथळे निर्माण करुन एकच संदेश देत असतात की भौतीक वस्तु चिरकाल सुख देत नाहीत. उलट आपल्या आवडीच्या वस्तु उपलब्ध झाल्या नाहीत की त्याच वस्तु दु:खाचे कारण होतात. आपली मनोवृत्ती बदला मग दु:ख होणारच नाही. कार बिघडली तर शिवनेरी/वॉल्वो बस आहेच आणि शिवनेरी/वॉल्वो फ़ुल असेल तर लाल डब्याच्या गाडीतुन लोक प्रवास करतात. ते ही आपल्या परीने सुखाने प्रवास करतात. मग आपल्याला काय हरकत आहे. उशाशी कापुस ठेवा. जवळच कुणी घोरत असेल तर कापुस कानात भरा आणि झोपा. मनोवृत्ती बदला आणि दु:ख विहीन अवस्थेचा अनुभव घ्या.

तुम्हाला एखाद्या विषयावर विचार करण्याची संधी या महिन्यात येत आहे. तुमच्या परिक्षणावर अनेकांचे लक्ष असेल तेव्हा ते काम चांगले कसे होईल याकडे लक्ष द्या. नविन मित्र लाभतील त्यामुळे काही प्रश्न सुटण्यास मदत होईल. काही व्यावसायीक संधी समोर येतील त्यावर नीट विचार करुनच निर्णय घ्या.

तूला राशी: आपल्या जन्मगावी जावे असे मनात येत असेल तर ते नक्की करा. नॉस्टेल्जीक होणे ही काही गैर नाही. आपल्याच मुळ गावी रहात असाल तर शाळा-कॉलेजच्या पर्वातले मित्र भेटुन ते दिवस आठवतील. शनिचे भ्रमण आपल्या कुटुंबस्थानातुन २६ जानेवारीला संपेल आणि तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल.

शत्रुंचा पाडाव करण्याचे इतके दिवस टाळले असेल तर  शत्रुला अनपेक्षीत खेळी करुन खिंडीत गाठण्यास एक अनुकूल परिस्थिती आली आहे. खेळाची सुत्रे आपल्या ताब्यात घ्या. आजपर्यंत तुम्ही बॅलन्स करत आलात त्या ऐवजी पारडे तुमच्या बाजुला झुकवा आणि मग पहा शत्रुच्या गोटात कशी खळबळ उडते. भारताचेच पहाना इतके दिवस पाकिस्थानला नुसते नाराजीचे खलीते पाठवत होतो. एकदा सर्जीकल स्ट्राईक केल्याशिवाय तुमच्या उपद्रव मुल्याचे आकलन शत्रुला होणारच नाही. तुम्ही कोणाचेही घोडे मारणार नाही मग स्वत:चे घोडे मेल्यावर शांत राहु नका कारण काळ सोकावतो.

वृश्चिक राशी: शनि तुमच्या धन स्थानी किंवा कुटुंबस्थानी जातो आहे. अनेकांना कुटुंबात क्लेश निर्माण झाल्याचे हळु हळु जाणवु लागेल. अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना याचा अनुभव जास्त येईल.  याचा अनुभव दरवेळी घरातल्या माणसांच्याच वागण्याने क्लेश होतील असे नाही. बाहेरील व्यक्ती सुध्दा कारण असतील. कुटुंबातील काही व्यक्ती नोकरी/व्यवसाय निमीत्ताने दुर जातील हे ही क्लेशाचे कारण असेल. शनि कुटुंबातील व्यक्तींची संख्या किमान १ ने कमी करतो हे या शनिच्या भ्रमणाचे वैषिष्ठ्य आहे. सर्वांनाच हा अनुभव पुढील वर्षात येईल असे नाही.  शनिमहाराज तु एकटा जन्माला आला आहेस. शेवटी एकटा जाणार आहेस याची जाणीव करुन देतात. जेष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना हे शनिभ्रमण संपत्ती मिळवुन देईल.

सप्तम स्थानाच्या अधिपतीचे पंचमातुन भ्रमण म्हणजे तरुणाईला प्रेमात पडण्याचे कारण मिळत आहे. प्रेम व्यक्त करण्याचा महिनाही पुढे आहे. प्रेम हे आंधळ असत ही म्हण मात्र खोटी करण्याची वेळ आहे. हे खरच प्रेम आहे की केवळ आकर्षण याचा विचार नक्की करा.

धनु राशी:  तुम्ही सत्वगुणी आहात पण शनि महाराज या अडीच वर्षात तुम्हाला सुळाच्या जवळ नेऊन उभे करणार हे नक्की. शनि उपासना सुरु ठेवा. जे घडत आहे ते खास शिकण्यासाठी यावर विश्वास ठेवलात म्हणजे साडेसातीचा त्रास होणार नाही.

लाभेश शुक्र चतुर्थातुन जात आहे. तो सुखाचा अनुभव २६ जानेवारीनंतर महिनाभर देणार आहे. एखादा प्रबंध लिहीण्याचा विचार असेल तर त्याचा प्रारंभ करण्यास अनुकूल काळ महिनाभर आहे. परदेशी जर्नल मधे अभ्यासपुर्ण संशोधनात्मक लेख लिहीणार असाल तर लिहा. यासाठीचा विचार पुर्ण होऊन ते काम पुर्ण होईल.

मुळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या व्यक्तींनी जे पैसे बुडाले असे गृहीत धरुन आपण चालला होतात ते पैसे मिळवण्यासाठी ह्या महिन्यात प्रयत्न केल्यास ते हमखास मिळतील. मोठ्या व्यावसायीक संधींचे सोने करु शकाल.

मकर राशी:  मकर राशीचा अधिपतीच व्ययस्थानात गेल्याने साडेसातीचा प्रभाव खासा जाणवेल. आजवर ज्या दृढ इच्छा शक्तीने आपण काम करत होतात ती पुढील अडीच वर्षे क्षीण झालेली जाणवेल.  दर शनिवारी http://gmjyotish.blogspot.in/2016/12/blog-post_20.html या लेखात लिहल्या प्रमाणे उपासना सुरु करा. त्या पुर्वी २६ जानेवारी संध्याकाळी जप, दान किंवा पुजनाने वरील दर शनिवारी करायच्या नियमीत पुजनाचा आरंभ करा. मग साडेसातीचा  त्रास कमी जाणवेल.

तुमच्या तृतीयात शुक्र-मंगळाचे भ्रमण होत आहे. लेखक असाल तर काही लेखन हातावेगळे होईल. नोकरी- व्यवसायाच्या निमीत्ताने लहान प्रवास घडतील. काही पुरुषार्थ करण्यासाठी  इच्छा होईल. हा खरा पुरुषार्थ आहे की अजुन काही ते ओळखुन कृती करणे इष्ट. साहस अंगाशी येणार नाही हे पहा.

कुंभ राशी: लाभस्थानी जाणारा शनि अनेक लाभ घेऊन येत आहे. यात अनेक इच्छा पुर्ती सोबत पुर्वी अक्कल खाती टाकलेल्या खर्चाचे विचार करुन आता त्या खात्यातुन उत्पन्न येईल का असे विचार करण्याची वेळ आलेली आहे. NPA म्ह्णजे नॉन प्रॉडक्टीव्ह असेट्स खरच नॉन प्रॉडक्टीव्ह आहेत का याचा शोध घ्या. काही बदल होऊन ते पैसे द्यायला सुरवात होईल. हे  असेट्स प्रॉडक्टीव्ह करा किंवा विकुन टाका. तुमच्या संपत्तीत वाढच होईल असा अनुभव आता येईल. यासाठी पुढील महिना विचार करुन निर्णय घ्यायला योग्य आहे. फ़ेब्रुवारी महिन्यात NPA झालेल्या शेअर्सच्या किमतीत अचानक वाढ होऊन तुम्हाला ते फ़ायद्याचे ठरतील. शततारका नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना याचा अनुभव येईल.

 "नसतेस घरी तु जेव्हा" ही संदीप खरे यांची कविता महिनाभर अनुभवायचे योग आहेत. जोडीदाराचे दुरवर प्रवासाला जाण्याचे योग आहेत त्यामुळे खास करुन कुंभ राशीच्या स्त्रीयांना याचा जरा जास्त अनुभव येईल.  कुंभ राशीच्या पुरुषांना मात्र अध्यात्मीक अनुभव येतील. कोणा सत्पुरुषाचे अध्यात्मीक बोल मनात घर करुन राहतील. हा उपदेश दिर्घ काळ स्मरणात राहील.

मीन रास:  तुमच्या दशम स्थानात शनिचे भ्रमण २६ जानेवारीपासुन सुरु होत आहे. नोकरीत काय किंवा व्यवसायात कष्टाचे पर्व सुरु झाले आहे असे नक्की समजा. पुर्वी पेक्षा जास्त काम करायला लावणारा हा योग आहे. पण हे काय कधीतरी घडतेच. कधी कमी किंवा जास्त काम हे अनेक वर्षे नोकरी-व्यवसायात असलेल्या व्यक्तींच्या अंगवळणी पडलेले असते. जे नव्यानेच नोकरी व्यवसायात जातात ते गांगरतात. आपले वैयक्तीक जीवन संपले असे समजुन नोकरीचा राजीनामा देतात किंवा ह्या व्यवसायात काही मजा नाही असा अमज करुन घेतात. लक्षात ठेवा, दहा वर्षे नोकरी- व्यवसाय करुन जे समजले नाही ते समजण्याचा हा काळ आहे. याचा फ़ायदा म्हणजे मॅच्युरीटी. सध्याचा तुमचा नोकरी- व्यवसायातला सध्याचा रोल मॅच्युअर झाल्याशिवाय तुम्ही पुढचा रोल घेऊ शकत नाही.

पुर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या मीन राशीच्या लोकांच्या चंद्रावरुन मंगळ आणि शुक्राचे भ्रमण आहे. चंद्रावरुन मंगळ जाताना धनलाभ आहेतच पण उच्चीचा शुक्र सुध्दा मनाला सुखवुन जाणार आहे. ही फ़ळे मिश्र आहेत.

तुमची एखादा सरकारी क्लेम येणे असेल उदा. इनकम टॅक्स चा परतावा  किंवा इन्शुअरन्स कंपनीचा क्लेम असो किंवा एखाद्या केस मधे तुम्ही मागीतलेली नुकसान भरपाई मिळेल. तुमच्या कडुन विवाहाचे प्रपोजल गेले आहे असे असेल तर नक्कीच होकार मिळणे अपेक्षीत आहे.

एकंदरीत नोकरी व्यवसायात कष्टाचा असलेला कालखंड मात्र या महिन्यात तरी किमान वैयक्तीक जीवनात सुखावणारा आहे हे निश्चित.