Friday, October 28, 2016

नविन संकल्प


ज्योतिषप्रेमी वाचकहो नमस्कार,

९ सप्टेबर २०१६ रोजी मी पुन्हा एकदा दिवसाकाठी जास्त वेळ ज्योतिष विषयाला द्यायचा असे ठरवुन त्या नंतर हा ब्लॉग लिहायला सुरवात केली. सुरवातीला ब्लॉगची लिंक मी आपल्या नातेवाईकांना आणि स्नेह्यांना whatsapp वरुन पाठवली. ज्यात खास करुन मासिक भविष्य हा उपक्रम सप्टेंबर आणि अक्टोबर २०१६ ह्या महिन्यासाठी चालवला. हा पुढे कायमच चालु राहील.

यानंतरचा उपक्रम नक्षत्रप्रकाश ज्योतिषविषयक लेखांचा दिवाळी अंक प्रसिध्द करण्याचा होता. २६ अक्टोबर २०१६ रोजी तो ही पुर्ण झाला. ह्या तीनही गोष्टींना खुप प्रतिसाद ब्लॉगवर मिळाले. १००० पेक्षा  जास्त वाचक वर्ग लाभला.

यात नक्षत्रप्रकाशला मिळालेला प्रतिसाद खुपच जास्त म्हणजे नक्षत्रप्रकाश प्रसिध्द झाल्यावर तीन दिवसात पाचशे वाचक ब्लॉगवर येऊन गेले. हे सर्व फ़ेसबुकरील छंद ज्योतिषाच्या ह्या गृपमुळेच शक्य झाले. 

या पुढेही दरमहिन्याचे भविष्य आणि आणखी एखादा लेख किंवा ज्योतिषअभ्यासु लोकांसाठी एखादी केस लिहावी असा उपक्रम असेलच.

याशिवाय माझ्याशी संपर्क व्यक्तीगत स्तरावर न साधु शकणारे प्रश्नकर्ते यांच्यासाठी खालील सेवा उपलब्ध होत आहेत.

१. मराठी , हिंदि किंवा इंग्रजी भाषेत जन्मकुंडली बनवुन PDF स्वरुपात इमेलवर पाठवणे.
२. पत्रिका गुणमेलन लग्नाकरिता ज्यात गुण, मंगळ दोष आणि विवाहसौख्य याची चिकित्सा
३. अन्य प्रश्न व त्यावरचे उपाय 

या करिता काय फ़ी असा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि फ़ीचे स्वरुप हे ऎच्छिक आहे हे मी सांगतो. दुरवर रहाणारे भारतीय  लोकांकरीता मी अकाउंटला पेमेंट करा असे न सांगता मी मोबाईल रिचार्ज स्वरुपात सांगतो जे सोपे आहे.

परदेशी व्यक्तींना मात्र असे करता येणार नाही म्हणुन माझा अकाउंट नंबर मी इमेल आल्यावर वैयक्तीक स्वरुपात ईमेल वर देईन.

या शिवाय अजुनही काही उपक्रम करण्याचा मानस आहे.

१. ज्योतिष वर्ग (मराठी) - हा उपक्रम चिंचवडला असणार आहे त्यामुळे पिंपरी- चिंचवड परिसरातले लोक याचा लाभ घेतील.
२. दुरशिक्षण युट्युब मार्फ़त व्याख्यान व त्या नंतर स्काईप द्वारे चर्चा असा  ज्योतिष वर्ग दुर असणारे प्रेमी घेतील.
३. ज्योतिष विषयावर संख्याशास्त्रीय संशोधन कसे करायचे याची सर्वमान्य पध्दत ठरविणे
४. ज्योतिष संशोधनाला प्रोत्साहन
५. ज्योतिष संशोधनपर लेखांना जर्नल द्वारे प्रसिध्दी प्राप्त करुन देणे
६. ज्योतिष परिषदांचे आयोजन करणे ज्यात ज्योतिषावर व्याख्याने व संशोधनपर निबंध वाचन असेल.

वाचकांना विनंती आहे की त्यांना कोणत्या उपक्रमात रस आहे हे खालील प्रकारे कळवावे.

1. इमेल - नितीन जोगळेकर - joglekar.nitin@gmail.com
2. दुरध्वनी - फ़ोन - 9763922176
3. Facebook - https://www.facebook.com/nitin.joglekar.9
4. Twitter - @joglekarnitin

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा.

दिपावली तसेच दिवाळी पाडव्याला सुरु होणारे नविन विक्रमसंवतसाठी शुभेच्छा !

नितीन जोगळेकर

Tuesday, October 11, 2016

१६ अक्टोबर ते १५ नोव्हेंबरचे राशी भविष्य

१६ अक्टोबर ते १५ नोव्हेंबरचे राशी भविष्य

मागच्याच महिन्याचे राशीभविष्य आल्यावर अनेकांनी १६ तारिख ला रविबदल होतो म्हणजे काय आणि त्याचा राशीभविष्यात काय Significance असा प्रश्न विचारला. साधारण २ १/४ दिवसांनी प्रत्येकाच्या राशीला चंद्र राशी बदलतो. इतक्या वेगाने राशीभविष्यात बदल होत असतो. रवि अर्थात सुर्य दर महिन्याच्या साधारण १६ तारखेला राशी बदल करत असतो. रवि सोबतच शुक्र आणि बुध हे ग्रह असतात त्यामुळे या तारखेच्या पुढे किंवा मागे पण दर महिन्याला त्यांचे पण राश्यांतर होत असते. म्हणुन मासीक राशीभविष्य लिहायला साधारण रविचे राश्यांतर होण्याचा काळ मला योग्य वाटतो.

या शिवाय मंगळ साधारण पणे दर दोन महिन्याला राशी बदल करतो. गुरु साधारण दर १३ महिन्यांनी राश्यांतर करतो  तसेच राहु आणि केतु साधारण पणे १८ महिन्यांनी राश्यांतर करतात. ज्याला आपण खुप भितो तो शनि  साधारण पणे २ १/२ वर्षे एकाच राशीत असतो. शनि २४ जानेवारी २०१७ ला धनु राशीत जाईल आणि तुळ राशीची साडेसाती संपेल.

याच महिन्यात दिवाळी येते तेव्हा माझे वार्षीक भविष्य माझ्या ब्लॉगवर प्रसिध्द होईल.

आता महिन्याचे राशी भविष्य पाहु. आज दसर्य़ाच्या मुहुर्तावर मासीक तसेच वार्षीक राशीभविष्य लिहीण्याचा मानस आहे. बाकी सिमोलंघन म्हणजे आपण चालत सीमा पार करणे इतका साधा न घेता, विचारांच्या सीमा ओलांडुन नविन विचार करणे असाही घेता येईल.

मेष राशी : आपल्या राशीला महिनाभर रवि सातवा राहिल. अर्थातच लग्न झालेले नसेल तर रवि आणि बुध हे दोन ग्रह आपल्या सप्तम म्हणजे विवाह स्थानातुन महिनाभर भ्रमण करणार आहेत. मेष राशीला रवि पंचमेश आहे. तो सप्तमात गेल्याने आपले प्रेम व्यक्त करण्यास आणि विवाह त्याच व्यक्तीबरोबर करण्याचा मानस असल्यास सुयोग्य काळ आहे. लगेच विवाह होईल असे नाही पण किमान हे प्रपोजल पुढे जाणार आहे. विद्यार्थी वर्गाने सहामहीत जरा जास्तच अभ्यास करा. वर्षभर राहु ऐन वेळेला विसरणे असा प्रभाव देणार आहे म्हणुन काळजी घ्या. दिवाळीच्या मुहुर्तावर एखादे लॉटरीचे तिकीट घ्या. बिन कष्टाचे पैसे मिळणार आहेत. १ नोव्हेंबरला जेव्हा मंगळ दशमात जाईल तेव्हा आपल्या नोकरी व्यवसायात लढाईचे वातावरण असेल ते ११ डिसेंबर पर्यंत असेल. लढाईत विजय हवा असेल तर प्लॅनिंगला महत्व आहे.

वृषभ राशी :  सप्तमात शनि महाराज गेले दोन वर्षे ठाण मांडुन आहेत. जोडीदाराशी विसंवाद सुरु असेल पण सप्तमस्थानातला शुक्र दिवाळीचा सण आनंदात संपन्न करायला समर्थ आहे. पत्नीला पाडव्याला चांगली भेट वस्तु द्याच. कायदा दाखवुन  विरोधकांचे तोंड महिनाभर बंद ठेऊ शकाल. १ नोव्हेंबर पर्यंत मंगळ अष्टम स्थानात आहे. मुत्र विकार, उष्णता या कडे दुर्लक्ष करु नका. पंचमात वर्षभर असलेला गुरु विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अभ्यासाला पोषक आहे. पण अभ्यास करायलाच हवा.

मिथुन राशी : बरेच दिवस तुम्हाला काळ बरा नव्हता तो आता होतोय.  आधी नोकरीच्या ठिकाणी १८ सप्टेंबर पासुन जोडीदाराबरोबर संघर्ष असा काळ घालवला असेल तर खात्री बाळगा आता बरा काळ येतोय. ७  नोव्हेंबरला सप्तमात येणारा शुक्र जोडीदाराबरोबर काही कटुता आलीच असेल तर ती संपवेल. १ नोव्हेंबरला मंगळ तुमच्या अष्टमात जात आहे. वडीलोपार्जीत प्रॉपर्टीचा काही लाभ होणे शक्य असेल तर त्या दृष्टीने हालचाली होतील.  या बाबतीत तुम्ही काहीच केलेले नसेल तर पुढे जा. त्याच बरोबर आरोग्य संभाळा.

कर्क राशी :  मंगळ तुम्हाला राजयोग कारक ग्रह आहे. तुम्ही रिअल इस्टेट मध्ये काम करत असाल तर १ नोव्हेंबर पासुन साधारण पुढे ४० दिवस अनुकुल काळ आहे. तुम्ही बिल्डर असा किंवा इस्टेट एजंट अनेक कामे मार्गी लागताना दिसतील. व्यापारात अनेकांना या चाळीस दिवसात मरगळ दुर होऊन हालचाली झालेल्या दिसतील. तुम्ही कलाकार असाल तर पंचमातला  शुक्र तुम्हाला ९ नोव्हेंबरच्या आधी नवनिर्मीतीत यश किंवा एखादी परफ़ॉर्मन्स करण्याची संघी घेऊनच आलेला आहे. ही संघी काहीतरी नविन करण्याची आहे. त्याचे सोने करा.

सिंह राशी : या दिवाळीत काय खरेदी करणार आहात ? ज्याला सुख-सोय म्हणता येईल अशी एकतरी वस्तु या दिवाळीत घरी येईल. वहान असो की  आरामदायक फ़र्निचर आपण खुष होणार आहात कारण आपली इच्छापुर्ती होणार आहे. ही वस्तु मिळाली म्हणजे सुख मिळते हा गैरसमज आहेच पण आजच्या काळात स्टेट्स सिंबॉल्स ला खुप महत्व दिले जाते. पण खरोखरी सुखाचा काळ जेव्हा  शनि जेव्हा तुमच्या चतुर्थातुन बाहेर पडेल तेव्हाच येईल. त्यासाठी जानेवारी पर्यंत वाट पहा. १ नोव्हेंबरला मंगळ तुमच्या सहाव्या स्थानी येईल तेव्हा तुमच्या विरोधकांची तो वाट लावणार आहे. कोणीही आपला कायमचा शत्रु नसतो हे जाणुन त्यांच्या वाईट काळावर हसु नका.

कन्या राशी : तुमच्या तृतीयात शुक्र ७ नोव्हेंबर पर्यत आहे. तो बाहेर पडला की बुध येत आहे. लिखाण व्हावे असे वाटत असेल तर जोर करा. या साठी लागणारी विचारांची बैठक तयार करण्याचे काम शनि गेले दोन वर्षे करतो आहे. आपले लिखाण प्रसिध्द होणे हे आता प्रकाशकाच्या मर्जीवर राहिले नसुन ब्लॉगच्या माध्यमातुन दर्जेदार लेखन येत आहे. तसा वाचकवर्ग ही तयार होत आहे. मग कशाची वाट पहात आहात? १ नोव्हेंबरला मंगळ पंचमात गेला की लेखनाला मनाची अनुकुलता होण्यास चांगला काळ होईल. हे सर्व वाचले की कन्या राशी वाले म्हणतील की आम्ही सगळेच लेखक थोडीच असतो परंतु लेखन हे अभिव्यक्तीचे साधन आहे. लेखक नसलेली मंडळी किमान व्यक्त व्हा. आपले विचार मुद्देसुद करुन बोला. याचा परिणाम आपल्या सभोवताली दिर्घ काळ रहातो. जो बोलतो किंवा व्यक्त होतो त्याची माती सुध्दा विकली जाते आणि जे मुल रडते त्याच्याकडे  त्याची आई लक्ष देते हे काय सांगायला पाहिजे ?

तुळ राशी : रवि तुमचा लाभेश आहे. लाभेश जेव्हा तुमच्या राशीत येतो तेव्हा तथास्तु हा शब्द घेऊनच येतो. पुढचा महिनाभर तुम्हाला वडीलांकडुन काही अपेक्षीत असेल तर ते मिळेल. आरोग्याचा लाभ होईल. सरकारी पत्र येणे, निर्णय येणे अपेक्षीत असेल तर नक्की प्रयत्न करा. सरकारी लोक स्वयंस्फ़ुर्तीने काम करत नाहीत हा व्यवहार आहे. तो विसरुन चालणार नाही. ७ नोव्हेंबर पर्यंत शुक्र तुमच्या धन स्थानात आहे. फ़क्त भेळ, चाट या सारखे पदार्थ अनेक वेळा खाण्याचा योग आहे यावर आनंदात न रहाता आलेली रोकड मुदत ठेवीत किंवा सोने खरेदीत गुंतवा.

वृश्चिक राशी : महिनाभर रवि व्यय स्थानात आहे. सरकारी कामे वेळेवर होणार नाहीत. सरकारी कामकाजाचा त्रास होईल. वडील वृध्द असतील तर लक्ष द्या. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. गेले महिनाभर रागावलेले शुक्र आणि बुध सध्या प्रेमात आहेत त्याचा लाभ करुन घ्या. निर्णय घेताना आता त्रासदायक वाटणार नाही. ८ नोव्हेबरला बुध तुमच्या राशीला आल्यामुळे काही अपेक्षा चटकन पुर्ण होतील. साडेसातीतले शेवटचे पर्व येऊ घातले आहे. अजुनही खुप चांगला काळ आहे अस नाही पण सुसह्य नक्कीच होत आहे.

धनु राशी :  तुम्हाला हा महिना बरा जाईल. आवक चांगली राहील त्याबरोबर खर्चाची तरतुद आहेच पण समतोल तर साधला जाईल असे म्हणायला हरकत नाही. दिवाळी  संमीश्र जावी असेच ग्रहमान आहे. कारण एकच आहे. कामे पडली अनंत. सुख घ्यायला वेळ नाही. घोडा उभ्या उभ्या झोप घेतो म्हणे. तुमच्या राशीचे चिन्ह अर्धा माणुस आणि अर्धा  घोडा आहे. त्यामुळे अर्धी झोप उभ्यानेच घ्या. ताजेतवाने व्हा. कामाला लागा. अजुन वर्षभर  खुप काम आहे.

मकर राशी :  या महिन्यात तुम्हाला तात्पुरता अधिकार योग आहे. त्याच बरोबर आर्थीक गणिते सुध्दा नियंत्रणात रहातील. मंगळ थोडेसे खर्च वाढवणार आहे पण तुमचा स्वभाव त्यावर नियंत्रण घालायला समर्थ आहे त्यामुळे चिंता करु नका. दिवाळी चांगलीच जाणार आहे. १ नोव्हेंबरला दिवाळी नंतर काही अपेक्षा पुर्ण होतील. वहानाचे बुकिंग केले असेल तर डिलिव्हरी १ नोव्हेंबर नंतरच मिळेल असे योग आहेत. पण हरकत काय आहे ?

कुंभ राशी :  रवि बुध भाग्यात, शुक्र दशमात आणि मंगळ लाभात. गुरु अनुकुल नसल्याने जे  त्रास आहेत त्यावर काही काळ तरी चांगले घडेल असे वातावरण पुढील दोन महिने आहे. लाभ उठवा. कुंभ राशीचे लोक भविष्य पहाण्याच्या नादात आणि काय घडेल याच्या विचारात खुप वेळ घालवतात. आपली इच्छा शक्ती जागृत करा अनेक समस्या मार्गी लागतात या विधानाला पुरक असे वर्तन करा. दिवाळि आनंदात जाईल अजुन या महिन्यात काय पाहिजे ?

मीन राशी :  हा महिनाभर रवि अनुकुल नाही. दिवाळीच्या फ़राळाची चव घ्या पण चवी पुरतीच. अतिरेक नको. एक रवि सोडला  तर या महिन्यात बुध -मंगळ शुक्र हवे ते दान देण्यासाठी तत्पर आहेत. दशमातला शुक्र तुम्हाला अचानक उत्तम संधी देईल. भाग्येश मंगळ दशमात आल्याने महिनाभर  व्यावसायीक अनुकुलता असेल. बुध सुध्दा अनुकुल असल्याने जे विचार तुम्हाला पाठपुरावा करत आहेत त्या दिशेने अपेक्षीत घडुन येताना दिसेल. अर्थात प्रयत्नांची कास धरुनच हे  मिळणार आहे हे नक्की.

शुभंभवतु