Friday, September 13, 2019

विवाह लवकर व्हावा यासाठी उपाय


आपल्या उपवर मुलाचा किंवा मुलीचा वेळेवर विवाह व्हावा. त्यांना वैवाहीक सौख्य मिळावे. त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून पालक प्रयत्नशील असतात. अनेकदा उपवर मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार असताना विवाह जुळून येत नाही. अनेक ठिकाणी वधू-वर सुचक मंडळात नाव नोंदवून सुध्दा अपेक्षीत स्थळे येत नाहीत. आली तर मुलांना ती स्थळे पसंत नसतात. यासर्व मुळे उपवर मुला मुलींच्या विवाहाचे सरासरी वय वाढत आहे. अनेकदा पालक यामुळे चिंतेत पडतात.

दिवाळी २०१९ नंतर तुळशीच्या विवाहानंतर चातुर्मासामधे थांबलेले विवाह मुहूर्त पुन्हा सुरु होतात. मग पुन्हा आशा पल्लवीत होतात. पालक पुन्हा काही स्थळे पहाण्यासाठी उत्साहाने पुढे पाहू लागतात. परदेशात असलेली मुले नाताळाच्या सुट्टीत भारतात येतात आणि त्यांनाही आठ -दहा दिवसात अनेक स्थळे पाहून निर्णय घ्यायचा असतो.

आपल्या उपवर मुलांचा विवाह लवकर जमावा म्ह्णून  ज्योतिषी म्हणून मी उपाय सांगतो त्यातले अत्यंत साधे वे सोपे उपाय जे सहज करता येतात. हे उपाय साधे आणि सोपे असले तरी अनुभव सिध्द आहेत. मी अनेकदा याची प्रचिती घेतलेली आहे.

१) कुलदैवताची पुजा : दर वर्षी वर्षातून एकदा कुलदैवताचे दर्शन घेण्याचा रिवाज सर्वत्र आहे. कुलदैवत याचा कुलस्वामिनी आणि कुलदैवत किंवा कुलदेवता दोन्हीही. अनेकदा कुलस्वामिनी किंवा कुलदेवता वेगळ्या नसतात. एकाच कुलदैवताची वार्षीक पुजा केली जाते. ही पुजा कशी करायची याबाबत कोणताही बदल करायचा नाही. आपल्या परंपरेने ही पुजा सुरु ठेवायची. आपली प्रतिवार्षीक पुजा झाल्यावर आपल्या कुलदैवताच्या समोर एक जास्तीचा नारळ ठेऊन आपल्या उपवर मुलीचा किंवा मुलाचा विवाह वर्षभरात व्हावा अशी प्रार्थना मुलाच्या आई व वडीलांनी करायची. असे झाल्यास विवाह झाल्यावर वधू- वरांना दर्शनाला घेऊन येऊ इतकेच बोलायचे.

कुलदैवते महाराष्ट्रात कुलानुसार वेगवेगळी आहेत. जसे जेजूरीचा /पालीचा खंडोबा, कोल्हापुरची अंबाबाई, तुळजापुरची तुळजाभवानी, व्याडेश्वर, अंबेजोगाई इत्यादी. यांच्या वार्षीक पुजनाच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत.

कुलदैवत पुजनाच्या वेळी उपवर मुलाचे आई- वडील सोबत उपवर मुलगा किंवा मुलगी कुलदैवताच्या दर्शनाला हजर असले पाहीजे. दुर्दैवाने आई- वडील पैकी एक जर हयात नसेल, आजारी असल्यामुळे येऊ शकत नसेल किंवा अन्य कारण असेल तरी माहीत असलेल्या कुलदैवताच्या दर्शनाला आई-वडील यांच्या पैकी कुणीही एक,  उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या सोबत जाऊन, वार्षिक पुजा करून , जास्तीचा नारळ ठेऊन प्रार्थना करू शकतात.

दुदैवाने उपवर मुलाचे किंवा मुलीचे आई- वडील हयात नसतील तर काका - काकू किंवा आजोबा- आजी ( वडीलांचे वडील- आई प्रवास करु शकत असतील तर) हा उपाय करु शकतात.

अनेकदा हा उपाय केल्यावर महिनाभरात विवाह ठरल्याचे मी स्वत: पाहिले आहे.

आई- वडील अनेक वर्षात गेलेले नसतील तर या निमीत्ताने जावे. मनोभावे वार्षीक पुजेत खंड पडल्याबद्दल क्षमायाचना करुन वार्षीक पुजेपेक्षा जास्तीची पुजा आपल्या क्षेत्रोपाध्यांना विचारुन यथासांग करावी. यानंतर कुलदैवताच्या पुजनात खंड न येता दर वर्षी पुजन करावे. विवाह घडून आल्यावर मात्र सुन-मुलगा किंवा मुलगी व जावई यांच्या समवेत कुलदैवताचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास विसरु नये.

उपवर मुलांच्या जन्मकुंडलीमधे दोष नसताना, योग नसताना सुध्दा विवाहाचा योग येतो असे कुलदैवताच्या पुजनाचे फ़ळ आहे.

२) श्रीकृष्ण पुजन : आपले कुलदैवत दर्शन नुकतेच झालेले आहे किंवा नजीकच्या काळात उपवर मुलाच्या- मुलीच्या समवेत घेणे शक्य नसेल तर श्रीकृष्ण पुजन हा उपाय उपवर मुलाने किंवा मुलीने करायचा आहे. त्यांच्या ऐवजी दुसर्या कोणी करु नये. उपाय अगदी सोपा आहे. उपवर मुलाने किंवा मुलीने दर बुधवारी घरातल्या बाळकृष्णाच्या देवपुजेच्या मुर्तीला तुळस वाहून विवाह लवकर व्हावा अशी प्रार्थना करावी. साधारण पणे २१ बुधवार पर्यंत हा उपाय सुरू ठेवावा. या कालावधीत विवाह ठरला तर मात्र विवाह होई पर्यंत हा उपाय सुरू ठेवावा.

उपवर मुलगा किंवा मुलगी जर नोकरी - व्यवसायाच्या निमीत्ताने परगावी असतील तर तिथे एखादा श्रीकृष्णाचा फ़ोटो ठेऊन हा उपाय करता येईल. अनेकदा या साध्या उपायाने विवाह घडून येतो. उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमविवाहातले अडथळे दुर होतात.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहात अनेक अडथळे आले होते. यावर संत एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहीला असून त्याचे विधीवत संपुट युक्त पारायण केल्याने कठीण योग असलेला विवाह जुळून येतो. आपल्या उपवर मुलाच्या- मुलीच्या जन्मकुंडलीत विवाहाचे कठीण योग असताना हा उपाय करतात परंतु कठीण योग नसताना मात्र वरील साध्या उपायाने विवाह जुळून येतो.

३) जन्मनक्षत्र शांती :  अनेकदा शास्त्रात दिल्याप्रमाणे जननशांतीची आवश्यकता असताना जननशांती झालेली नसेल तर विवाह जमून येण्यास अडथळे येतात. मघा १ ले चरण, आश्लेषा, जेष्ठा, मुळ किंवा पुर्वाषाढा ३ रे चरण, वैधृती किंवा व्यतीपात योगावरचा जन्म तसेच विष्टी करणावरचा  यावर जन्म असता जननशांती प्रयोग आवश्यक असतो. ती केलेली नसेल तर त्वरीत करावी. यासाठी भुमीवर अग्नी असलेला दिवस निवडावा. असे केल्याने त्वरीत विवाह जमतो असा अनुभव आहे.

जर, जेंव्हा गोप्रसव जननशांती सांगीतलेली आहे आणि जननशांती झालेली आहे तरीही विवाह होत नाही अश्यावेळी जननशांती प्रयोगात काही त्रुटी आहेत असे जाणावे. याला उपाय जन्मनक्षत्राच्या दिवशी बांधलेल्या गावरान गाईला ( जर्सी नाही ) योग्य ती सुरक्षीतता बाळगून गुळ व गहू उपवर मुलाने किंवा मुलीने आपल्या तळहातावर घेऊन खायला द्यावेत. हे होताना गायीच्या जीभेचा स्पर्श तळहाताला झाल्याची खात्री होई पर्यंत २-३ वेळा ही कृती करावी. अनेकदा पुरॊहीत जननशांती करताना प्रत्यक्ष गाय न आणता चांदीच्या गाय ठेऊन हा प्रयोग करतात. याने अपेक्षित फ़ळ मिळत नाही म्हणून हा उपाय करावा.

हा उपाय मुळ जननशांतीला पर्यायी नाही. त्यातील त्रुटी निवारणाचा आहे असे लक्षात ठेवावे.


४) पितर दोष निवारण ( अ)  : देवघरात अनेकदा मृत माता/पिता यांचे टाक बनवून ठेवले जातात किंवा त्यांचे फ़ोटॊ देवघरात ठेवले जातात. ही जागा यासाठी योग्य नाही. याने देवपुजेचे अपेक्षीत फ़ळ मिळत नाही. असे टाक शास्त्रानुसार विसर्जन करावेत. फ़ोटो शक्यतो असूच नयेत पण तशी भावना असल्यास देवघरापासून दुर वेगळ्य़ा खोलीत स्थापन करावेत. घरातल्या देवपुजेचे अपेक्षीत फ़ळ मिळाल्याने सुध्दा विवाहातले अडथळे दुर होतात.

( ब) अनेकदा आमचा विश्वास नाही असे सांगून श्राध्द /पक्ष टाळले जातात. अनेक ज्योतिषांनी सांगीतलेल्या तारखा टळल्या असतील आणि आपले ज्योतिषी पत्रिकेत दोष नाही असे सांगत असतील व उपवर मुला मुलीचे आई वडील श्राध्दाचे अधिकारी असता श्राध्द टळले असेल तर सुरवातीस त्रिपींडी श्राध्द करावे. यानंतर विवाह होतो असा अनुभव आल्यास मात्र श्राध्द/पक्ष यांचा लोप करु नये. श्राध्द/पक्ष लोप पावल्याने कुटुंबास पितरांचे शुभ आशिर्वाद मिळण्यास अडथळा निर्माण होतो.

५ ) नुकत्याच विवाह झालेल्या वधू-वरांचे आशिर्वाद : उपवर मुलाच्या/मुलीच्या मित्राचे/ मैत्रीणीचे भावंडाचे विवाह संपन्न होताच ( मंगलाष्टके संपुन वधू- वर एकमेकांस हार घातल्यावर ) उपवर मुलीच्या डोक्यावर हात ठेवण्यास नववधू/ वरास आधीच सांगून ठेवावे. यामुळे पुढील विवाह विधी लांबू नयेत यासाठी उपवर मुलीने /मुलाने विवाह वेदीवर थांबून तो सर्व विवाह सोहळा आत्मीयतेने पहावा. आपल्या मित्रास/ मैत्रीणीस/ जवळच्या भावंडास ( ज्यांचे लग्न नुकतेच लागले आहे ) डोक्यावर हात ठेऊन माझ्या सारखा विवाह यामुलाचा/मुलीचा त्वरीत व्हावा असे मनातल्या मनात म्हणायला सांगावे.

उत्तर भारतात हा उपाय प्रसिध्द आहे. जन्मकुंडली मधे विवाह होण्यासाठी दोष नसताना हा साधा उपाय सुध्दा जोरदार आहे.

सर्वसाधारण पणे वरील पाच उपाय हे उपवर मुलांच्या जन्मकुंडलीत विवाह होण्यासाठी विलंब म्हणजे मंगळ दोष किंवा शनि दोष नसताना, सप्तमेष व शुक्र बलवान असताना उपवर मुलाचे वय २१ ते २७ या वयातच अनुभवास येतात.

जर मंगळ दोष किंवा शनि दोष असताना विवाहाला विलंब होतो. या पेक्षा ही काही कठीण विवाह योग असतात त्यावरचे उपाय वेगळे असतात. जन्मकुंडली पाहून, उपवर मुलाशी- मुलीशी बोलून त्यांची मानसीकता समजून काही तांत्रिक उपायाने यावर मार्ग निघतो.

No comments:

Post a Comment