Tuesday, May 8, 2018

१४ मे ते १४ जून २०१८ चे राशीभविष्य, अधिक महिना आणि मकरेचा मंगळ

ज्योतिषप्रेमी लोकहो नमस्कार, दर महिन्यात आपण राशीभविष्य पहातो. रविचा राशीबदल गृहीत धरुन तो पहातो. या महिन्यात रवि वृषभ राशीत १४ मे २०१८ ते १४ जून २०१८ या कालात असणार आहे. याच दरम्यान मराठी अधिक जेष्ठ महिना येत असल्यामुळे कोणीतरी अशी शंका विचारेल की रविचा राशीबदल होत नाही तो अधिक महिना असे असताना मी, रवि वृषभ राशीत महिनाभर असेल अस कस म्हणतो ?

मराठी अधीक महिना १५ मे रोजी रात्री ०७ वाजून ५० मिनीटांनी सुरु होईल. तर रविचा राशी बदल १४ मे राजी पहाटे ०५ वाजून २ मिनीटांनी झालेला असेल. अधीक महिना १३ मे रोजी रात्री ०१ वाजून १३ मिनीटांनी संपेल तर  रविचा मिथुन राशीत प्रवेश १५ जून ला सकाळी ११ वाजून ३६ मिनीटांनी होईल. अधिक जेष्ठ महिन्यात रविचे राश्यांतर होत नाही म्हणुनच याला मल मास म्हणतात.

मलमासात विवाह होत नाहीत कारण त्या मासाला शुध्दी नसते. पण याचा अर्थ अधिक जेष्ठ मासात विवाहाची बोलणी करु नयेत असे मात्र नाही. विवाहाची बोलणी विनाकारण लांबवू नयेत. अधिक मासात साखरपुडा होऊ शकतो, नामकरण अर्थात बारसे होऊ शकते किंवा गृहप्रवेशही करायला हरकत नाही. फ़क्त विवाह मुहूर्त नसतात इतकेच लक्षात घ्यावे.

या काळात नविन जप, व्रत याचा आरंभ करु नये असे शास्त्र सांगते. पण आपली नित्याची पुजा, आधी घेतलेली व्रते सुरु ठेवण्यास अडचण नसते. अधिक मासात आपल्या जावयांना बोलावून त्यांना अनारसे द्यावेत, या निमीत्ताने भेट वस्तू देऊन नाते वृध्दींगत करावे.

ज्या मुलांनी पालकांच्या संमतीशिवाय विवाह केलेला आहे आणि मुलीशी /जावयाशी संबंध बिघडले आहेत अश्या पालकांनी या महिन्यात या निमीत्ताने जावयाला/लेकीला घरी बोलवून यथोचीत सन्मान करावा. ही नविन प्रथा सुरु करण्यास काय हरकत आहे असे मला या निमीत्ताने सुचवावेसे वाटते. ( लव्ह जिहाद सारख्या प्रकरणाची चाहूल लागताच मुलीला समजवा. ते घडुच देऊ नका.  ते प्रेम नाही. षडयंत्र आहे. यावर जास्त लिहीणे योग्य नाही. मी लव्ह जिहादचे समर्थन करत नाही इतकेच सांगणे आहे )

सैराट नावाचा सिनेमा मी पाहिला. त्याचा शेवट मला चटका लावून गेला. सिनेमा हे प्रबोधनाचे साधन आहे म्हणताना ऑनर किलींगच्या घटना महाराष्ट्रात जवळ जवळ नसताना, माननीय नागराज मंजुळे यांनी असा शेवट दाखवून काय मिळवले ? असा प्रश्न मला पडला होता. अधिक मासाच्या या निमीत्ताने एखाद्या कुटुंबाने, अश्या विवाह संबंधांना मान्यता देऊन जर जावयाला अधीक महिन्याच्या निमीत्ताने घरी बोलावले तर  नातेसंबंध सुधारतील. हा पायंडा, ऑनर किलींगसारख्या घटना घडु नयेत व  जातीय विषावरचा उतारा आहे असे मला वाटते. दर वेळेला प्रेमविवाह आंतरजातीय असतोच  असे नाही. अनेकदा पालकांचे अहंकार प्रेमविवाहाला मान्यता देत नाहीत. असे अहंकार म्हणजे सुध्दा नातेसंबध सुधरण्यास अडथळा आहे. तो दुर करण्यास ही संधी आहे.

२ मेला मंगळ मकर राशीत गेला आहे. तो ६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मकर राशीत असणार आहे. मकरेमधे गेलेला मंगळ ज्यांना स्वत: चे घर खरेदी करायचे आहे त्यांना फ़िरुन प्रयत्न करायचे आहेत अश्या लोकांसाठी उत्तम संधी आहे. ज्यांच्या पत्रिकेत मकरेचा मंगळ आहे त्यांना प्रॉपर्टीत वाढ करण्याची सुवर्ण संधी आहे. स्वत: चे घर होण्यास अनंत अडचणी आहेत असा ज्यांचा अनुभव आहे  त्यांनी घरातल्या सगळ्या लोकांच्या पत्रिका ज्योतिषाकडून तपासून घेऊन ज्यांच्या पत्रिकेत मकरेचा मंगळ आहे अश्या कुटुंबातील सज्ञान मुलांच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी केल्यास हा प्रश्न सुटेल. यासाठी कायदा व कर सल्लागाराशी बोलूनच हे करावे.

आता १४ मे २०१८ ते १४ जून २०१८ या काळासाठी असलेले राशी भविष्य पाहू

मेष रास : गेले अनेक महिने केतू तुमच्या कर्म स्थानी येऊन बसल्याने कामाच्या ठिकाणी संघर्ष, अडथळे यात वाढ झालेली असेल अश्यात आता मंगळही या स्थानी आलेला आहे. कर्मस्थानात आता मंगळाची दाहकता डबल झाल्याने अडथळे, संघर्ष यात खुप वाढ झालेली दिसेल. थंड पडलेल्या गृह निर्माण व्यवसायाला मात्र या निमीत्ताने चालना मिळेल. जे या व्यवसायात आहेत त्यांना वेगाने कामे पुर्ण करावी लागतील. ६ नोव्हेंबर पर्यंत हा काळ आहे. शनि वक्री असल्याने कामगार मिळणार नाहीत. कोर्ट केसेस पुढे जाणार नाहीत अश्या पार्श्वभुमीवर मेष रास असलेल्या लोकांना संघर्ष करायचा आहे. २७ मे नंतर कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. ८ जून पर्यंत तुम्हाला सुट्टी नाही असे ग्रहमान या महिन्यात आहे.

वृषभ रास : रवि तुमच्या राशीत महिनाभर असणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल. या निमीत्ताने या महिन्यात व्यायामाची सवय लाऊन घ्या.  कुटुंबातील अपेक्षीत गोष्टी घडण्यासाठी २७ मे पर्यंत थांबावे लागणार आहे. २७ मे नंतर मुलांच्या संदर्भात काही चिंता असतील तर त्या कमी होतील. सतत प्रवास करणार्यांना या महिन्यात जरा ब्रेक मिळेल. व्यापारी वर्ग आवक कमी झाल्याने चिंतेत असतील तर १० जून ला गुरु मार्गी झाल्यावर हा प्रश्न सुटेल. कोणी आजारी असेल आणि दिर्घकाळ सुरु असलेल्या ट्रीटमेंट १० जून नंतर पुर्ण होऊन त्याचा त्रास संपेल. या निमीत्ताने होणारा खर्च थांबेल.

मिथुन रास : या महिन्याचे ग्रहमान तुमच्या राशीला फ़ारसे चांगले नाही. २७ मे पुर्वी महत्वाची कामे उरका. २७ मे ते १० जून या काळात तुमच्या राशीचा स्वामी बाराव्या स्थानी असल्याने कामे म्हणावी तशी मार्गी लागायला अडचण होईल. त्यात रवि सुध्दा महिनाभर बाराव्या स्थानी असल्याने अपमानास्पद घटना घडतील. ज्ञान ही तुमच्या जवळ असलेली महत्वाची बाब, पण त्याबाबत शंका घेतली तर तुम्हाला अपमान झाल्यासारखा वाटेल यास्तव महत्वाच्या वेळी तुमचे ज्ञान बरोबर असल्याचे पुरावे सोबत ठेवा. शाब्दीक संघर्षात तुमचा पराजय होणार नाही याची सातत्याने काळजी घ्या.

कर्क रास : शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना नविन करार, व्यावसायीक शिक्षण, इंजिनीयरींग क्षेत्रात वेगळ्या संधी चालून येतील. आपले व्यावसायीक आडाखे चुकू नयेत यास्तव १० जून पुर्वी महत्वाचे विषय मार्गी लावा. ज्या लोकांना कामासाठी परदेशात रहावे लागत आहे त्यांना ८ जून कामे संपवून परत येण्याची संधी मिळणार आहे. वैवाहीक जोडीदाराशी असलेले रुसवे फ़ुसवे, ब्रेक अप्स या महिन्याच्या शेवटी संपुष्टात येऊन तुम्हाला अपेक्षित गोडवा पुन्हा निर्माण होईल.  आरोग्याचे प्रश्न, व्यावसयीक प्रश्न निर्माण होणार नाहीत ना ? यावर विचार करा.

सिंह रास : राशीचा स्वामी आपल्या दशमस्थानी आला आहे. आपण सरकारी नोकरीत असा किंवा खाजगी, या वर्षी प्रमोशन अपेक्षीत असेल तर हाच महिना महत्वाचा आहे. या महिन्यात तुमचे अ‍ॅप्रेजल किंवा कॉन्फ़िडेन्शीयल रिपोर्ट म्हणजे सी. आर. ( जो कधीच गुप्त रहात नाही ) आपल्या प्रमोशनची खात्री देणारा असेल असा बनवून घ्या. प्रमोशन अपेक्षीत नसले तरी आपल्या अधिकार क्षेत्रात वाढ देण्याचे ग्रहमान आहे. महत्वाचा निर्णय घेताना तुमचा सल्ला वरिष्ठ घेत असतील तर ते एक प्रकारे प्रमोशन आहे. सहाव्या स्थानी मंगळ दर दोन वर्षांनी येतो. याचाच अर्थ तुमच्या विरोधकांना गप्प बसविण्याची कृती करण्याचे दिवस सुरु आहेत. तुमच्या प्रमोशनच्या आड कुणी येत असतील तर त्यांना चारी मुंड्या चित करा.

कन्या रास: विनाकारण चिंता करण हा आपला स्वभावच आहे. या महिन्यात असे कारण मला दिसत नाही. विनाकारण चिंता करण्यावर अनुलोम विलोम प्राणायामासारखा  सारखा दुसरा प्रभावी उपाय नाही. तुमच्या राशीचा स्वामी २७ मे ला वृषभ राशीत गेला की एखादी चिंता असेलच त्याचे निराकरण होताना दिसेल. व्यावसायीक असाल तर अन्य मार्गाने जसे व्याज किंवा परमेश्वर कृपेने फ़ारच कमी कष्टात काही लाभ ८ जून नंतर होऊ शकतात. संतती बाबतच्या चिंता संपल्या नाहीत तरी एखादी सुवार्ता नक्कीच या महिन्यात ऐकायला मिळेल.

तूळ रास : तूळ राशीला चतुर्थात गेलेला मंगळ घरात वाद निर्माण करेल पण तुम्ही तो योग्य रितीने हाताळाल. पण प्रॉपर्टीच्या संदर्भात काही घडेल. एखादी नविन इस्टेट किंवा अद्याप स्वत: च्या घरात रहायला गेलेला नसाल तर त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलाल. व्यापारी असाल तर महत्वाचे सौदे २७ मे पुर्वी पुर्ण करा अन्यथा १० जून पर्यंत रखडतील. तुमच्या राशीचा मालक सध्या भाग्यस्थानी आहे जो ८ जूनला कर्म स्थानी जाणार आहे. जे काम करणे तुमच्या मनात आहे त्यावर जेष्ठांचा सल्ला घेऊन ८ जून नंतर प्रत्यक्ष कृतीत आणा. सर्व बाजुने विचार करुन घेतलेला निर्णय योग्यच ठरेल.

वृश्चिक रास : दिर्घकालीन ग्रह स्थिती फ़ारशी अनुकूल नाही असे जरी असले तरी राशीचा स्वामी मंगळ पुढील काही महिने बलवान होऊन तुमच्या शौर्य स्थानात येणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जाते असे वाटले तर ती नियंत्रणात आणताना धाडस करण्यास अनुकूल काळ आहे. कसा डाव टाकायचा आणि नियंत्रण मिळवायचे याचे कौशल्य तुमच्याकडे जन्मजात आहे. जिथे कुठे तुम्हाला बोलायची, लिहायची संधी मिळणार आहे तुमच्या फ़ायद्याची ठरणार आहे. नोकरी व्यवसायात तुम्हाला ट्रेंड सेट करण्याची संधी मिळणार आहे.

धनू रास : नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने फ़ारच महत्वाचा काळ येत आहे. अनेक संधी चालून येत आहेत. तुमच्या नवकल्पना आमलात आणुन त्या यशस्वी करण्याच्या दृष्टीने पावले टाका. तुमच्या कल्पना नक्कीच लाभदायी होतील. बुडीत खात्यात टाकलेले पैसे मागण्याचा काळ आहे. आजवर ज्यांना पैसे दिले आणि त्यांनी परत दिले  नाहीत त्यांना मागा. जोडीदारा बरोबर आनंदाने अनेक गोष्टी करण्याचे योग आहेत. मग ते फ़िरायला जाणे असेल किंवा खरेदीला.

मकर रास : मकर राशीत मंगळ गेल्याने आपल्या विचार करण्यात किंवा कृतीत वेग आल्याचे आपल्या स्वत:ला जाणवेल. अनेक गोष्टी पेंडीगला पडल्या असतील त्या या काळात कार्यान्वीत होतील.   प्रॉपर्टीचे काम मागे पडले असेल तर ते आधी करा. इच्छाशक्तीचा वापर जरा वाढवूनच कामे मार्गी लागतील. मकर राशीच्या लोकांना कुणाला प्रपोज करायचे असेल तर ८ जून पर्यंत थांबा. जरा स्वत:ला आपण प्रपोज करण्यासाठी सुयोग्य बनवा. श्री विष्णु अवतार ज्यांचे आराध्य आहे त्यांना २७ मे नंतर भक्तीत रममाण होण्यासाठी अनुपम काळ आहे.

कुंभ रास : मकरेचा मंगळ बाराव्या स्थानी आल्याने खर्च वाढणार असला तरी तो प्रॉपर्टी खरेदी, दुरुस्ती यासाठी असल्याने प्रॉडक्टीव्ह असेल. कामाच्या निमीत्ताने प्रवासाचे योग येतील. प्रवास फ़ारसा सुखकर नसेल यासाठी प्लॅनिंग जोरदार करा. आजच रेल्वे तिकीट बुकिंगच्या IRCTC ने त्यांचे वॅलेट वापरात आणले आहे. तात्काळ तिकीट वॅलेट वापरुन वेगाने हातात पडल्याने कन्फ़र्म होण्याचे प्रमाण वाढेल असे म्ह्णतात. मकर राशीतला मंगळ काही विमान प्रवास देत नाही त्यामुळे तो खडतर होणार नाही हे पहा.  शेअर मार्केटवाल्यांनी कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायला हरकत नाही. काही लाभ आत्ता पदरात पडले नाहीत तरी पोर्ट्फ़ोलीओ सुधारेल.

मीन रास : तुम्ही मुळचे सुखासीन वृत्तीचे आहात त्यात चतुर्थात शुक्र म्हणजे सुखाची झोप काढावी अश्या मनस्थितीत असणार. राशीचा स्वामी अनुकूल नाही म्हणुन प्रयत्न करायचा नाही का ? आपले वरिष्ठ, वडीलधारे किंवा वडील  आणि आपले कुटुंब तुम्हाला हव ते देण्यास तयार असतील. मागून तर पहा. याचा उपयोग काही प्रॉडक्टीव्ह गोष्टींसाठी करा. पुढील काही काळ भाग्य अनुकूल आहे. जरा प्रयत्न वाढवा यश मिळेल असे ग्रहमान आहे. याचा फ़ायदा आपल्या स्वप्नपुर्ती साठी करा.

शुभंभवतु