ज्योतिष हे संपुर्ण प्रगत शास्त्र आहे

कुंडली द्वारे जाणले जाणारे जातकाचे व्यक्तिगत भविष्य किंवा समुहाचे भविष्य ज्याला मेदिनीय ज्योतिष म्हणतात हे एक संपुर्ण प्रगत शास्त्र आहे असे माझे मत आहे म्हणुन मी इतर शास्त्रांशी त्याची तुलना करता ह्या शास्त्राचा प्रचार करतो आणि आग्रहाने नक्षत्रप्रकाश समुहावर फ़क्त कुंडलीद्वारे जाणल्या जाणार्या शास्त्रा संदर्भात चर्चा करुया असे सांगतो. अनेक वास्तुशास्त्र अभ्यासक, न्युमरोलॉजिस्ट, लोलक विद्या प्रेमी, हस्तसामुद्रिक प्रेमी इ. यांची घोर निराशा या समुहावर आल्यामुळे होते. कुंडलीविज्ञान अर्थात ज्योतिष हे संपुर्ण प्रगत शास्त्र आहे असे मी असे का म्हणतो या संदर्भात आपल्या समोर ठेवतो.

दोन-चार महिन्यांच्या अभ्यासाने वास्तूतज्ञ होऊन लोक आज समाजात फ़िरत आहेत. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ते वास्तूच्या माध्यमातून देतात. माझ्यामते ते अत्यंत अशास्त्रिय, तर्काला धरुन नाही. दुर्दैवाने ह्या वास्तू तज्ञांना वास्तू शिवाय अन्य कोणत्याच विषयाची माहिती नसल्याने त्यांची व्यावहारीक अडचण आहे. मध्यंतरी एका दुरदर्शन कार्येक्रमात मुलांच्या शैक्षणीक अप्रगती कारण रहात्या वास्तूची  एक बाजू कट असणे असे एका तज्ञाने सांगीतले. यामुळे इतका मोठा दोष निर्माण होऊ शकतो का ? हा दोष बहुमजली इमारतीत समजा १० मजले असतील तर त्या बाजूच्या एकाखाली एक रहाणार्या सगळ्या फ़्लॅट धारकांच्या मुलांच्या बाबती यायला हवा. याबाबत संशोधन न करता सरसकट नियम कसा सांगु शकतात? ही एकच संकल्पना नाही तर अश्या अनेक संकल्पनांचे पेव सध्या फ़ुटले आहे. मुलांची शैक्षणीक प्रगती हा खास करुन कोणत्याही आईचा जिव्हाळ्याचा विषय. या विषयाशी आपण काहीही जोडा ते जोडले जाते. मध्यंतरी घरात क्रिस्टल टांगले म्हणजे शालेय मुलांची एकाग्रता वाढून मार्कस जास्त मिळतात असे सांगुन अनेक क्रिस्टल बॉल्स विकले गेलेले मी पाहिलेत.


मी सुध्दा वास्तू शास्त्र डॉ धुंडीराज पाठक सर संचालित वास्तूशास्त्र वर्गात श्री य.न. मग्गीरवार आणि श्री नरेंद्र सहस्त्रबुध्दे यांच्या मार्गदर्शक व्याख्याने यामधून शिकलो आहे. मग्गीरवार सर तर कधीच जुन्या ग्रंथाच्या बाहेर जात नाहीत. सहस्त्रबुध्दे सर कायम त्या नियमांच्या मागे असलेले शास्त्र किंवा इंजिनियरीग तत्व स्वत: एम ई सिव्हील असल्याने समजाऊन सांगतात. मग विद्यार्थ्यांची शैक्षणीक अप्रगती आणि वास्तू दोष हा विषय का चर्चेला येत नाही. याचे कारण एकच वास्तूचा कोणत्याही व्यक्तीच्या प्रगती किंवा अप्रगतीमध्ये १५-२० टक्के इतकाच प्रभाव असतो असे माझे मत आहे. मुल जास्त मार्कस मिळवु शकत नाही, मग घरात हे फ़ेर फ़ार करा असे सांगणारे किंवा घर बदला असे सल्ला देणारे वास्तु तज्ञ मुलाच्या कुंडलीला हात सुध्दा न लावता कसे काय सांगू शकतात ? वास्तूत अभ्यासाला पोषक वातावरण करत असेत तर तो एक फ़ॅक्टर आहे. बुध्दीमत्ता, अभ्यास, शिकवणारे शिक्षक हे मुद्दे सोडून कसे देता येतील.

फ़क्त वास्तू बदलल्यामुळे व्यावसायीक यश मिळणार असेल तर अनेक व्यावसायीकांनी आजवर योग्य सल्ला घेऊन सर्वप्रथम हेच केले असते. मार्केटींग मधले प्रॉडक्ट, प्राईझ, प्लेस ऑफ़ डिस्ट्रिब्युशन आणि प्रमोशन स्ट्रेटिजी या फ़ोर पी ( 4P Marketing Concept ) ला महत्व न देता, त्यामागे असलेल्या हुशार पर्सन ( उद्योजक) त्याची कुंडली न तपासता. एका वास्तू मुळे यश मिळाले किंवा अपयश मिळाले असा निष्कर्ष अत्यंत अशास्त्रिय आहे.

वास्तूला जोडून आलेले फ़ेंगशुई तर एक कल्ट निर्माण करुन वस्तुंची विक्री करण्याचे मार्केटींग तंत्र आहे असा माझा समज आहे. यात विकले जाणारे क्रिस्टल्स विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगतीला पुरक असतात असे म्हणले म्हणजे मुलांच्या आया ते विकत घेऊन घरात टांगतात. तरीही मुले नापास होतात. लाफ़ींग बुध्दा ठेवल्याने घरात संपत्ती येते असाच एक अशास्त्रिय दृष्टीकोन आहे. असे अनेक कन्सेप्ट बुध्दीच्या तर्कावर घासून पाहिले असता ते अशास्त्रिय आहेत असे पटते.

थोडक्यात आपण वैयक्तिक कुंडलीचा किंवा व्यवसायात अनेकांच्या कुंडलीचा विचार न करता केवळ एका वास्तूचा विचार करणे बरोबर नाही. कारण वास्तु व्यक्तीच्या कुंडलीला पर्याय होऊ शकत नाही. हेच हस्तसामुद्रिकाच्या बाबतीत आहे. आज पाहिलेल्या हातावरुन, अजून २५ वर्षांनी काय घडेल हे अचुक रित्या सांगणे कठीण आहे. कारण हाताच्या रेषा बदलत असतात. आज उत्तम असलेली आयुष्यरेषा अचानक तुटते. ह्या दरम्यान संकटे येऊ शकतात. हेच २५ वर्षे आधी किंवा ५० वर्षे आधी हे वर्तवणे कठीण आहे. मुख्य दोष हा आहे की हे शिकवणे अजूनच दुरापास्त आहे. एक लाख कुंडली संग्रह करुन वर्गवारी ( लग्न राशी, चंद्र राशी, जन्मनक्षत्र , ग्रहयोग ) करणे अभ्यासकांना शक्य आहे. एक लाख हाताच्या रेषांचे ठसे घेणे, त्यांचा संग्रह करणे, वर्गवारी करणे अत्यंत कठीण आहे. जे जेष्ठ हस्तसामुद्रीक तज्ञ २५ वर्षांनतरचे भविष्य सांगतात आणि ते बरोबर येते त्यांना सिध्दी प्राप्त असल्याशिवाय हे शक्य नाही. आजवर किरो सोडता किंवा मोजके हस्तसामुद्रीक यात यश मिळवू शकले आहेत. याचे कारण त्यांना प्राप्त सिध्दी हेच असावे.

न्युमरोलॉजीवरुन आयुष्यभराचे भविष्य सांगणे शक्य नाही. फ़ारतर स्वभाव सांगणे, आयुष्यात महत्वाच्या घटना घडणारी वर्षे सांगणे या पलिकडे या शास्त्राचा उपयोग नाही. जुळ्या मुलांच्या आयुष्यात खुप फ़रक असतो तर ठरावीक तारखेला २४ तासात जन्माला आलेल्या लोकांचे भविष्य एकसारखे असणे शक्य नाही कारण या शास्त्राला अशी खोली नाही. नावामुळे एखाद्या व्यक्तीला यश मिळते असे म्हणणे हा तर मी कल्पनाविलास मानतो. पेशवाईतला एक बाजीराव योध्दा होतो तर दुसरा पळपुटा बाजीराव म्हणुन का दुषणे लाऊन घेतो ? छत्रपती शिवाजी्राजे हे नाव आपण आदराने घेतो. व्यवहारात एखादा शिवाजी नावाचा माणूस आपल्याला पिठाची गिरणी चालवताना दिसतो. असे का घडावे ?  आपल्या नावाचे स्पेलींग बदलण्याचा सल्ला हजारो रुपये खर्च करुन घेतेलेले, नावाचे स्पेलींग बदलून त्याचा वापर केलेले पण यामुळे आयुष्यात काहीही फ़रक न पडलेले अनेक लोक माझ्या माहितीत आहेत.

Tarot , डाउझींग याच्या सहायाने एखाद्या तात्कालीक गोष्टींचे उत्तर देता येते यापलिकडे आयुष्याचे नियोजन करायला जसे ज्योतिष उपयोगी पडते इतही ही तंत्रे अजिबातच प्रगत नाहीत. प्रश्न कुंडलीला सुध्दा पर्याय ठरु शकणार नाहीत.  कारण या दोन्ही पध्दतीने Tarot व  डाउझींग हो किंवा नाही इतकेच समजते. कालनिर्णय अर्थात हो असेल तर नेमके कधी हे घडेल याचे उत्तर ना Tarot देते ना  डाउझींग.

यामुळे मी फ़क्त कुंडलीवर आधारीत ज्योतिषशास्त्र याला संपुर्ण प्रगत शास्त्र मानतो. काही गोष्टींची अद्याप ज्योतिषशास्त्र उत्तरे देऊ शकत नाही कारण त्यावर संशोधन झालेले नाही. पण मानवी जीवनाच्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे सामर्थ्य फ़क्त ज्योतिषशास्त्रातच आहे.

No comments:

Post a Comment