पंचांग शिकूया - भाग २


पहिल्या भागात आपण फ़क्त तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगाचा विचार केला. याचा विचार ज्योतिषशास्त्र या दृष्टीने केला. या संदर्भात दाते पंचांगामधे असलेली ही माहिती यावर्षीच्या दातेपंचांगात पान १०८ वर आहे ती इथे देणे आवश्यक वाटते.

दर वर्षीच्या दाते पंचांगात खालील प्रमाणे जननशांती सांगीतल्या आहेत.

तिथी - कृष्ण चतुर्दशी, अमावस्या, क्षय तिथी

नक्षत्रे - अश्विनीची पहीली ४८ मिनीटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेशा पुर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण्,चित्राचा पुर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पुर्ण, मुळ पुर्ण, पुर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनीटे.

योग - वैधृती, व्यतीपात,

करण - भद्रा ( विष्टी )

इतर - ग्रहण पर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म ,अधोमुख जन्म, माता -पिता-भाऊ - बहिण यांच्यापैकी एकाच्या जन्मनक्षत्रावर जन्म झालेला असताना, तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुला नंतर मुलगी तसेच सुर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग या पैकी कारण असेल तर शांती करावी.

जननशांती न केल्यास काही सुक्ष्म परिणाम अनुभवायला येतात. जसे पत्रिकेतील चांगले योग फ़लदायी होताना दिसत नाही. जातकाचा दुराग्रह वाढीला लागतो इत्यादी.

या संदर्भात याच ब्लॉगवर माझा लेख आहे त्याची ही लिंक माहितीसाठी देतो. जननशांतीने मानसीक परिवर्तन होते. एखादा दुराग्रह जातक सोडुन व्यवहार्य मार्ग स्विकारतो असे दृष्य परिणाम मी पाहिले आहेत. जननशांती करणे आर्थिक कारणांमुळे शक्य नसल्यास काही अल्पखर्चाचे / बिनखर्चाचे उपाय आहेत जे करता येतात.

http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_81.html

पंचांगाचा उपयोग मुहूर्तशास्त्र यासाठीही करतात. पंचांगामधे अनेक ग्रंथांचा आढावा घेऊन मुहूर्त दिलेले आहेत. केवळ दिनशुध्दी पाहून व सुयोग्य नक्षत्रावर जे मुहूर्त असतात. ज्याला ठराविक वेळ जसे विवाहात मंगलाष्टके संपवुन वधू वरांचे एकमेकांना पहाण्याची वेळ असते अशी मुहूर्तवेळ आवश्यक नसलेले मुहूर्त पंचांगात डाव्यापानावर दिलेले असतात ज्याचा वापर आपण सहजपणे करु शकतो.

इथे कधी कधी "प." व "नं" हे शब्द आहेत. "प." याचा अर्थ पर्यंत उदा वरील चित्रात डोहाळजेवण याच्या आडव्या रेषेत मार्च २०- १६ प. याचा अर्थ २० मार्चला डोहाळजेवणासाठी असलेला मुहूर्त किंवा दिनशुध्दी किंवा नक्षत्र दुपारी ४ नंतर संपत आहे.

त्याच आडव्या रेषेत डोहाळजेवणाचा मुहूर्त २३ मार्च ला १७ "नं" याचा अर्थ संध्याकाळी ५ नंतर सुरु होतो इतके लक्षात घेतले की डाव्या पानावरील दिलेल्या मुहूर्तासंदर्भात अजून समजून घ्यावे असे काही माझ्या मते नाही.

अनेकदा वाहन खरेदीला चांगला दिवस कोणता असे विचारणारा फ़ोन येतो. दरवेळेला साडेतीन मुहूर्तापैकी ( दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या अर्ध्या मुहूर्तापैकी)  दिवस साधता येत नाही. अश्यावेळी खालील कोष्टकातला पंचागाच्या डाव्या पानावरील शुभ दिवस पाहून एखादे कमी महत्वाचे काम करता येते.


यातील क्षय दिवस हा संपुर्ण दिवस कोणत्याही कामासाठी उपयुक्त नाही. तसेच प्रतिकूल दिवस सोडता, उर्वरीत दिवस एखाद्या चांगल्या कामासाठी जसे नविन मशीन सुरु करणे, नविन काम सुरु करणे इ. यासाठी आपण उपयोगात आणु शकतो. यापेक्षा जास्त खोलात जाऊन नक्षत्रानुसार कोणते कार्य करावे याचे वेगवेगळे शास्त्र अनेक पुस्तकात आपल्याला सापडेल. 

थोडक्यात शेजारील कोष्टक पाहून आपल्याला दिवस चांगला आहे की नाही ( दिनशुध्दी ) समजते परंतु पुढे नक्षत्रानुसार विहीर खणणे ( अधोमुखी नक्षत्रे ) दरवाज्याची चौकट लावणे ( उर्ध्वमुखी नक्षत्रे ) यानुसारअनेक प्रकारे मुहूर्त साधण्याचे तंत्र अनेक पुस्तकात सापडेल. 

व्यवहार दृष्ट्या आपण किती महत्वाचे काम करत आहोत यानुसार अजून चांगला मुहूर्त शोधावा. नविन दुकान सुरु करताना अनेकांनी कर्जे काढून भांडवल उभे केलेले असते किंवा आयुष्यभराची पुंजी व्यवसायात लावलेली असते अश्यावेळी श्रध्देप्रमाणे फ़क्त दिनशुध्दी न पहाता नक्षत्र व ( स्थिर लग्न, ) पहावे. पण दुय्यम दर्जाचे काम करताना किंवा फ़ारसे भांडवल, भावना न गुंतवता केलेल्या कामासाठी फ़क्त दिनशुध्दी पहावी हे चांगले.

या शिवाय पंचांगामधे विवाहाचे मुहूर्त, उपनयनाचे मुहूर्त, वास्तूशांतीसाठी मुहूर्त तसेच मुर्तीस्थापनेचे मुहुर्त हा भाग शके १९४० च्या पंचांगात पान १६ पासून २३ पर्यंत दिलेले आहेत ज्याचा उपयोग त्याच कामासाठी होऊ शकतो. विवाहमुहूर्त अनेक असले तरी वधु-वरांना लाभणारा विवाहाचा मुहूर्त शोधणे हे अजून एक तंत्र आहे. लेखाची लांबी वाढेल यासाठी हा भाग आपण स्वतंत्रपणे ज्योतिष शिकताना पाहू.

शेतीच्या कामाचे मुहूर्त स्वतंत्रपणे पान ८४ वर दिलेले आहेत तसेच गोरक्षमते गमनास मुहूर्त हे प्रवासासाठीचे मुहूर्त तर तिथी, नक्षत्र न पहाता शुभमुहुर्त पाहिजे असल्यास माहेंद्र संज्ञक वेळा  मुहूर्त पान १०४ वर दिलेले आहेत. शिवाय पान १०५ वर असलेले होरा कोष्टक हे सुध्दा प्रचलीत मुहूर्ततंत्र आहे.


ज्योतिष हा विषय स्वतंत्र आहे तर मुहूर्तशास्त्र हा स्वतंत्र विषय आहे. अनेकदा पौरोहित्य करणार्या गुरुजींना मुहूर्ताचे ज्ञान उत्तम असते. तरी सुध्दा ज्योतिषांनी मुहूर्त शोधावा असा आग्रह केला जातो. दोन्हीही शास्त्रासाठी पंचांगाचे ज्ञान आवश्यक असल्याने व पंचांग जवळ ठेवणारे हे दोन वेगळ्या विषयावर काम करणारे लोक असतात. सामान्य लोकांना यातला फ़रक माहित नसतो किंवा काही वेळा समाजाची ती गरज असते. यास्तव ज्योतिष शिकणार्या व्यक्तीला मुहूर्ताचे ज्ञान असावे असे माझे मत आहे.




No comments:

Post a Comment