गुरुकृपा, ज्ञानसंपादन आणि अध्यात्मिक जीवन ( मेष ते कन्या )

या विषयावर प्रत्येक राशीला दिवाळीमधे सुरु होणारे विक्रमसंवत २०७६ हे हिंदू नविन वर्ष किंवा नोव्हेंबर डिसेंबर २०१९ तर २०२० हे संपुर्ण वर्ष कसे असेल हे जाणण्यापुर्वी  गुरुकृपा, ज्ञानसंपादन किंवा अध्यात्मिक जीवनाशी अजीबात रस नाही अश्या लोकांनी थोडे लक्षपुर्वक खालील विवेचन पहावे. अनेक लोक आपले जीवन भौतीक आहे असे मानतात. खावे प्यावे चैन करावी असाही संदेश चार्वाकाने पुर्वी दिला आहे . हेच खरे जीवन आहे असा अनेकांचा समज असतो. हा समज खोटा आहे असे माझे मत नाही. पण अनेकांना गुरुकृपा झाल्यावर मात्र जीवनात बदल झाल्याचे जाणवते. याचा अर्थ लगेचच अनेकांचे अध्यात्मिक जीवन सुरु होते असे नाही. तर असेही काही असते असा पॅरेडाईम शिफ़्ट मात्र होतो. ही गुरुकृपेची सुरवात आहे. भगवे कपडे घातले म्हणजे अध्यात्मिक जीवन असाही अर्थ कुणी काढेल तर तसे नाही. परमेश्वराच्या कोणत्याही स्वरुपावर विश्वास न ठेवणारे परंतु मानवापेक्षा समर्थ अशी अदृष्य शक्ती असते असे मानणारे आणि वैयक्तीक जीवनात कोणालाही त्रास न देता सेवा करणारे सुध्दा माझ्या मते एक प्रकारे अध्यात्मिक जीवन जगतात. येणार्या वर्षात असे वैचारीक  स्थित्यंतर आपल्या आयुष्यात येणार आहे का ? इंग्रजीत ज्याला पॅरेडाईम शिफ़्ट ( Paradigm Shift ) म्हणतात असे काही घडणार आहे का ? हे जाणण्यासाठी हे राशीभविष्य पहा. हे राशीभविष्य लग्नकुंडलीच्या माध्यमातून पहावे. पण लग्नराशी माहीत नसल्यास चंद्रराशीच्या माध्यमातुन सुध्दा पहाता येईल.

  
मेष रास :  
आपल्या राशीला ४ नोव्हेंबर २०१९ गुरु आपल्या भाग्यस्थानी जाणार आहे. हा गुरु आपल्या लग्नस्थानावर तसेच ज्ञान संपादनासाठी आवश्यक अश्या पंचमस्थानवर वर्षभर दृष्टी टाकणार असल्यामुळे आपण जर आत्मपरिक्षण केलेत तर पुढील वर्षी काही सुक्ष्म बदल नक्की जाणवतील. हे बदल कश्या स्वरुपाचे असतील तर आपण घाईघाईने निर्णय आजवर घेत आलेले असाल तर यापुढे काही क्षण थांबून निर्णय घ्याल. आपल्याला तातडीने प्रतिक्रीया द्यायची सवय असेल तर खुप विचार करुन आपल्याला ती बदलण्यात फ़ायदा आहे असे जाणवेल. ही सुध्दा गुरुकृपाच आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु हा ग्रह विवेकाचा कारक आहे असे मानले जाते. विवेक याचा अर्थ सारासार विचार किंवा दुरचा विचार करुन निर्णय घेणे. घाईघाईने घेतलेला निर्णय किंवा त्याला अनुसरुन केलेली कृती विचारांती फ़ारशी फ़ायद्याची नसते हे या वर्षभरात या होणार्या गुरु बदलामुळे आपल्याला समजले तर हा आपल्यासाठी नक्कीच पॅरेडाईम शिफ़्ट असेल.

१५ एप्रील २०२० ते १४ मे २०२० आणि १७ ऑगस्ट २०२० ते १७ सप्टेंबर २०२० हे या वर्षभरातील दोन महिने या दृष्टीने फ़ारच महत्वाचे असतील. या महिन्यात आपल्याला असे आत्मपरिक्षण करण्याची प्रेरणा ग्रहस्थिती मुळे मिळेल.  मेष राशीचे लोक दिवसभरात आत्मचिंतन करण्यासाठी वेळ काढत असतील असे नाही पण हे वाचल्यावर मात्र आपण जरा वेळ काढावा. दिवसभरात आपण घेतलेले निर्णय आणि केलेली कृती ही उत्तम होती की याही पेक्षा उत्तम निर्णय कदाचीत दोन टप्यात किंवा तीन टप्यात घेता आला असता का ? त्या प्रमाणे कृती करताना त्यातला आततायी भाग टाळता आला असता का ? यावर जरुर विचार करा. माझी खात्री आहे असा विचार करुन जेंव्हा आपण निर्णय घ्याल आणि कृती कराल यातून आपले नातेसंबंध आणि व्यावसायीक संबंध बळकट होतील. जेंव्हा असे संबंध बळकट होतात तेंव्हाच दुसरा माणूस निर्णय घेण्यापुर्वी आणि कृती करण्यापुर्वी आपला विचार करेल. असे झाले तर नक्कीच आपले जीवन एका वेगळ्या पध्दतीने वाटचाल करेल.

वर्षभर भाग्यस्थानी असलेला गुरु आपली मानसीक स्थिती  ऐहीक सुख की अध्यात्म सुख याच्या द्वंद्वात असेल. खरतर मेष राशीचे लोक द्वीस्वभाव राशी सारखे मानसीक द्वंद्वात नसतात. द्विस्वभाव राशीचे लोक कायमच द्वंद्व अनुभवतात असे नसेल पण वय लहान असेल तर प्रथमच अध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेताना हे सर्व ऐहीक सुख व्यर्थ असा अनुभव येईल. मेष राशीच्या लोकांना दर बारा वर्षांनी भाग्यस्थानी गुरु येत असल्याने हा अनुभव दर बारा वर्षांनी येईल. त्याचा प्रभाव फ़ार टिकेल असे नाही. परंतु पुन्हा जेंव्हा १२ वर्षांनी एक वर्ष गुरु भाग्यात असताना येईल तेंव्हा अध्यात्मिक प्रगती होत राहील. मेष लग्न किंवा राशी असुन ज्यांची जन्मकुंडली अध्यात्म विषयावर बोलकी असेल अश्यांना हे वर्ष अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने चांगले असेल. तिर्थयात्रा संत सहवास ही या भाग्यातल्या गुरुची खास वैषीष्ठ्ये असतात. नववे स्थान अध्यात्म विद्या, वेद विद्येच्या अभ्यासात पोषक असल्याने आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था अधे मधे प्राप्त होईल.

वृषभ रास :
आपल्या राशीसाठी गुरु आठव्या स्थानी येणार आहे. आठवा गुरु ऐहीक सुखाला बाधक असतो. अनेक दैनंदीन कामात बाधा आल्याचे दिसून येईल. आधीच या राशीत शनिचा मुक्काम होता. यात भर पडून आता गुरुचा असणार आहे. वृषभ ही भुमीराशी असल्यामुळे कोनतीही कृती विचारपुर्वक शेवटी फ़ायद्याची ठरेल अशी करतात. यामुळे ऐहीक स्वार्थ पहाताना विचार शक्ती ताणून वर्षभर निर्णय घ्यावे लागतील. असे असले तरी आठव्या गुरुचे फ़ायदे मात्र खुप आहेत हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल.

आठवे स्थान हे चवथे, आठवे आणि बारावे स्थान मिळून तयार होणार्या अध्यात्म त्रिकोणातील महत्वाचे स्थान आहे. आठव्या स्थानाचा आणि योगसाधनेचा संबंध आहे. या वर्षी योगाच्या क्लासला जावे अशी नैसर्गीक इच्छा आपल्याला झाली तर ती योग्य असेल. वृषभ राशीचे किंवा लग्नाचे लोक जीवनातील आनंद भरभरुन घेतात. परंतु आनंद घेण्यासाठी शरीर योग्य नसेल तर सगळे व्यर्थ. कल्पना करा की आपल्याला गोड पदार्थ खायला आवडतात आणि कमी वयातच मधुमेह अर्थात डायबेटीस झाला असेल किंवा HbA1c टेस्ट तुम्हाला लवकरच्या वयात डायबेटिस होणार असे सुचीत करत असेल तर मात्र हे सुख तुम्हाला घेतात येणार नाही.

पण योग क्रिया अश्या आश्चर्यकारक आहेत की तुम्हाला कार्यमग्न ठेवण्यासाठी तसेच जीवनाचा आनंद घेण्यासाठी सुध्दा शारिरीक, मानसीक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी सहायभूत होतात. योग फ़क्त अध्यात्मिक जीवन जगणार्यांच्या जीवनात नाही तर गेल्या काही वर्षात सामान्य जीवन जगणार्यांच्या जीवनात महत्वाचे स्थान मिळवून आहे. भरपूर काम करावे, उत्तम संगीत, काव्य, कला यांचा आस्वाद घ्यावा अशी विचारसरणी असणार्या लोकांना योग एक वरदान आहे असे आपल्याला यावर्षी पटेल. योग म्हणजे केवळ शारिरीक हालचाली नाही तर कोणत्याही अतिरेकापासून थांबण्यासाठी मानसीक शक्ती देणारे साधन आहे हे आपल्याला पटेल. शारिरीक आरोग्यासाठी डॉ. दिक्षीत यांच्या पध्दतीने दोनदा जेवावे यासाठी लागणारा मनोनिग्रह सुध्दा प्राणायामासारख्या योगक्रियांनी सहज प्राप्त होतो हे आपल्या या वर्षी पटले तर विशेष नाही.

जे आधीपासूनच योगक्रिया, ध्यान या सारख्या मार्गावर चालत आहेत त्यांची प्रगती यावर्षी होणे अपेक्षीत आहे. यावर्षी अष्टमेश अष्टमात असलेला गुरु आपल्याला उत्तम योग मार्गदर्शकाची भेट घडवून आणेल. आपल्या अनेक वर्षे जे शारिरीक व मानसीक फ़ायदे समजले नाहीत ते यावर्षी अल्पावधीत समजतील. ध्यानाच्या अवस्थेत कसा आत्मिक आनंद असतो व त्यामुळे कशी उर्जा मिळते व दररोजचे काम कसे कमी वेळात व जास्त कौशल्याने करता येते याचा अनुभव आपल्याला या वर्षी येईल.

मिथुन रास:   

आपल्या राशीला किंवा लग्नराशीला ४ नोव्हेंबर नंतर गुरु सातवा येणार आहे. सातवा गुरु अध्यात्मदृष्टिने फ़ळ देण्यासाठी चांगला नसतो या उलट सत्व, रज आणि तम या गुणापैकी रज गुणांची वाढ करणारा आहे. जे व्यापारी आहेत त्यांच्या साठी उत्तम आहे. ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांना विवाहाचा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे.

गुरुकडे मुलत: विवेक हे कारकत्व असल्यामुळे कामत्रिकॊणात सुध्दा विवेकाचे महत्व तरुण पिढीला समजावणारा आहे. आजकाल तरुण पिढी अनिर्बंध वागते अशी तक्रार त्याच्या आधीच्या पिढीची असणारच आहे. जनरेशन गॅप असणारच कारण तो काळाचा महिमा आहे. जे तरुण आज कोणत्याही भावनीक गुंतवणुकी शिवाय लैंगीक संबंध प्रस्थापीत करु इच्छितात त्यांना असे संबंध दिर्घकालीन सौख्य न देता फ़क्त तात्पुरते सुख देतात असे सांगणारा बदल त्यांच्या आयुष्यात होताना दिसेल. काही तरुण जे विवाह न करता दिर्घकाळ एकत्र रहाण्याची कमीटमेंट न देता लीव्ह इन सारख्या पध्दतीमधे रहात असतील त्यांना विवाह करावा अशी इच्छा होईल. हे बदल अर्थातच गुरु बदलामुळे होतील. वरील दोन्ही जीवन पध्दती या समाज जीवनासाठी फ़ारश्या योग्य नाहीत हे तरुणांना आपोआपच समजेल.

सप्तमस्थान येणारा गुरु जसा जशी वैवाहीक जोडीदाराबरोबर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यासाठी विवाहाचे महत्व पटवणारा असेल तसेच तो व्यापारातही धर्म शिकवणारा असेल. पुर्वीचे व्यापारी व उद्योगपती आपलॊ व्यावसायीक कर्मे करताना सोबत धर्म म्हणून काही कर्म करीत. धर्म याचा अर्थ दरवेळी "रिलीजन" या अर्थाने न घेतात जबाबदारी या अर्थाने पाहणे आवश्यक आहे. व्यवसाय करताना गरजू लोकांना मदत करणे ही सुध्दा एक सामाजीक जबाबदारी आहे. सामाजीक स्वास्थ्य उत्तम असेल तर व्यवसाय होईल. अन्यथा रोटी, कपडा आणि मकान या नैसर्गीक गरजा भागवल्या गेल्या नाहीत तर सामाजीक गुन्हे वाढतात. अश्या समाजात व्यापार करणे अत्यंत कठीण असते. ही सामाजीक जाणिव म्हणा किंवा सी.एस.आर अर्थात कार्पोरेट सोशल रिस्पॉनसीबीलीटी या कायद्याने आपल्याला आपल्या जबाबदारीचे महत्व पटेल.

ज्यांच्या सप्तमस्थानी जन्मकुंडलीमधे  गुरु आहे ते तरुण मध्यम मार्ग न स्विकारता विवाह करावा या विचाराने विवाहाचा निर्णय घेण्यासाठी प्रवृत झाल्याने त्यांचे पालक सुखावतील. कारण वेळेवर विवाह न होणे ही एक मोठी समस्या खास करुन उच्च शिक्षीत आणि शहरी समाजात वाढत आहे. याच प्रमाणे जे व्यावसायीक व्यवसायात स्थिरावले आहेत ते सामाजीक जबाबदारीकडे डोळसपणे पहातील त्यातही काही मुलभूत सामाजीक गरजा ओळखून काम करतील. याचा अर्थ विवाहीत आणि नोकरी करणार्या मध्यमवर्गीय लोकांना हे समजणार नाही असे नाही. ते सुध्दा आपापल्य़ा परीने आपल्या वैवाहीक, सामाजीक जबाबदार्या नव्याने समजाऊन घेतील.

कर्क रास :

आपल्या राशीला सहाव्या स्थानी येणारा गुरु हा अर्थ त्रिकोणात येणार गुरु दुसरे सहावे आणि दहाव्या स्थानाला अर्थात अर्थ त्रिकोणाला बल देणारा आहे. दहावे स्थान कर्म स्थान समजले जाते. कर्क राशीच्या लोकांना ४ नोव्हेंबर पासून धनु राशीत जाणारा गुरु त्यांच्या कामात, जबाबदारीत वाढ देणारा आहे. याच बरोबर याचा परिणाम म्हणून आपल्या आर्थिक स्थितीतही सुधारणा वर्षभर होणार आहे. खास करुन उत्पन्न वाढेल किंवा खर्च कमी होतील पण कोणत्याही परिस्थितीत शिल्लक वाढणार आहे.

सहावे स्थान शत्रुचे स्थान ही समजले जाते. अनवधानाने किंवा गैरसमजातून आपण अनेकदा शत्रुत्व निर्माण करत असतो. परिणामी पोलीस केस, कोर्ट केस किंवा असहकार यामुळे त्याची किंमत मोजावी लागत असते. येणारा गुरु हा विवेकाचा कारक असल्याने एकतर शत्रु आपल्याला समजाऊन सांगेल किंवा आपण शत्रुला समजाऊन सांगाल यामुळे शत्रुत्व कमी होईल,  वर्कींग कॉप्रमाईझ होईल, किंवा सलोख्याचे संबंध निर्माण होऊन शत्रुत्व संपेल. यामुळे विनाकारण होणारा खर्च, शत्रुत्व भावामुळे होणारा मनस्ताप संपवणारा असेल.

वाढता संघर्ष कुणाच्याच फ़ायद्याचा नसतो हे समजायला काळ जावा लागतो. ती वेळ कर्क राशीच्या लोकांच्यासाठी आलेली आहे. आता सर्व केसेस सामोपचाराने संपवल्या पाहीजेत अशी भावना निर्माण गुरु बदलाने होईल. अश्यावेळी समोरच्या पार्टीकडून असा प्रस्ताव येईल याची वाट न पहाता आपण सामोपचाराचा प्रस्ताव पुढे केला पाहीजे ही सुध्दा मानसीकता यामुळे निर्माण होईल. संघर्ष संपला तर नक्कीच येणारा चांगला काळ चांगली कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो. अन्याय झालेला असताना संतच फ़क्त चांगली कर्मे करत रहातात. पण सामाजीक सद्भावना असेल, झगडे नसतील तर अर्थातच चांगली कर्मे वाढतात.

शत्रु स्थानाला रोग स्थान म्हणुन ओळखले जाते. तात्पुरते औषध घेऊन रोगशमन करणे हा मानवी स्वभाव आहे. आपले स्वत:चे शत्रुत्व अनेक रोग शरिरात निर्माण करते असे म्हणतात. सततच्या संघर्षाला सामोरी जाणारी माणसे जीवघेण्या आजाराला सामोरी जातात असे संशोधन आहे. येणारा गुरु शत्रुत्व संपवेल व त्याकारणाने आरोग्य लाभेल किंवा तात्पुरता उपचार न करता दिर्घकालीन उपचार व त्याला सोबत आवश्यक असलेला व्यायाम, व्यवहार करण्याचा विवेक हाच गुरु कर्क राशीच्या माणसांना देईल. कर्क राशीची माणसे भावनाप्रधान असतात, शत्रुत्व संपल्याने मनस्ताप कमी होईल आणि आरोग्य सुधारेल.

सिंह रास:

आपल्या राशीला धनु राशीचा गुरु पाचव्या स्थानामधे वर्षभर असणार आहे. कोणत्याही व्यक्तीला दोन प्रकारे ज्ञान होत असते. एक इंद्रियांच्या मार्फ़त येणारे संदेश जे प्रायमरी ब्रेन ला सरळ सरळ समजतात. उदा. एखाद्या परिचीत माणसाचा आवाज कानी पडल्यावर ही व्यक्ती दिसत नसेल तरी सुध्दा हा अमुक एका व्यक्तीचा आवाज आहे हे समजते.

गुरुकडे ज्ञान संपादनाची अदभुत शक्ती असते. ही शक्ती म्हणजे तीन चार संदेशाचा एकत्र अर्थ लावून काढायचा अर्थ ज्याला परिक्षण किंवा इंग्रजीत ॅनेलीटीकल कौशल्य म्हणतात. या वर्षी आपल्या परिक्षण क्षमतेमधे वाढ होण्याचे योग आहेत. व्यवहारात अनेकदा लोक तोंडाने होकार देतात पण देहबोली अर्थात बॉडी लॅग्वेज काही वेगळे सांगत असते. याचे परिक्षण जमायला लागले म्हणजे व्यवहार उत्तम जमू लागतो. व्यापार करणार्याला, लोकांशी संबंध असलेल्या व्यवसायात असे कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. यादृष्टीने हे वर्ष अनुकूल आहे. पाचव्या स्थानी आलेला गुरु आपल्या व्यक्तीमत्वातही बदल घडवेल. याचा अर्थ व्यक्तिमत्वात एका वर्षात बदल होतील असे नाही परंतु या दृष्टीने महत्वाचे बदल होतील.

सिंह राशीचे जे लोक मुळातच उत्तम परिक्षणाचे कौशल्य घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना या गुरुबदलाचे आणखी चांगले फ़ायदे अनुभवाला येतील. गुरुकृपा होऊन गुरुसाधना घडेल. कोणतीही साधना वाया जात नाही. काही सहजपणे दिसणारे आणि काही सहजपणे समजणारे फ़ायदे साधना केल्याने होत असतात. गुरुकृपा झाल्याने आपण कोणत्या मार्गाने पुढे जावे याचा बोध होतो. हा झालेला बोध सामान्य ज्ञान, परिक्षणाचे कौशल्य यापुढे जाऊन ज्याला इंग्रजीत सिक्थ सेन्स किंवा प्रज्ञा जागृती म्हणतात असे ज्ञान होऊ लागते.

वास्तवीक आपण कोणत्या मार्गाने गेलो तर जीवन सफ़ल होईल असे सांगणारे पुस्तक नसते. तो मार्ग आपला आपल्याला शोधावा लागतो. हा मार्ग म्हणजे आपली स्वत:ची नवनिर्मीती असू शकते. एखादा नविन ट्रेंड आपण ज्या मार्गाने चालू लागतो यामुळे निर्माण होत असतो. याला नविन ट्रेंड का म्हणावे तर यामार्गाने आधी कुणीच गेलेले नसते. यामुळे पुढे काय अडचणी येतात याचे ज्ञान आपल्याला नसते. सहसा अश्या अपरिचित मार्गावर चालण्याचे धाडस कोणी करत नाही. पण हा गुरु आपल्याला या मार्गाचे ज्ञान देईल तसेच यातील अडचणी कश्या सोडवायच्या याचेही उत्तम मार्गदर्शन करेल.


कन्या रास:

आपल्या राशीला गुरु चवथा येणार आहे. --१२ ही अध्यात्म त्रिकोणातील स्थाने आहे. पैकी चवथे स्थान सुख स्थान मानले जाते. या ठिकाणी शुक्र असता व्यक्ती सुखलोलुप असते. परंतु या ठिकाणी गुरु असता मात्र ती  भौतीक सुखांना विवेकाने दुर ठेवते.   जनक राजा आणि संत एकनाथ महाराज अत्यंत श्रीमंत आणि समाजावर अधिकार असलेले होते परंतु सर्व भौतीक सुखे असताना त्यात रममाण होत नव्हते. तसेच जन्मकुंडलीमधे या धनु राशीत चवथ्या स्थानी गुरु असलेली व्यक्ती भौतीक सुखाला हपापलेली नसते.

आपल्या कन्या लग्नाच्या किंवा राशीच्या जन्मकुंडली मधे चवथ्या स्थानी गुरु नसेल तरी भौतीक सुखे मिळवण्यासाठी दिवसभरात किती कष्ट करायचे याबाबत आपल्याला अर्थबोध होऊ लागेल. येणारा गुरु जर तुम्ही सुखलोलुप असाल तर सुख हे मनाच्या स्थितीत असते, भौतीक वस्तू मधे नसते याबाबतचे ज्ञान आपल्याला देईल.


आजही असे व्यावसायीक आहेत की ते सहजपणे  साधी फ़ारसा स्टेटस सिंबॉल नसलेली कार आरामात मेंटेन करुन राहू शकतात. पण मला महागडी कार पाहीजे यासाठी ते दिवसभरात खुप कष्ट करतात शेवटी त्या कारमधे फ़िरायला वेळ नसतो. त्यांची कार एकतर घरच्या पार्किंग मधे तर कधी ऑफ़िसच्या पार्कींग मधे उभी असते. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सुध्दा हे ऑफ़ीसला येतात. थोडक्यात ही लग्जरी कारचे सुख ते घेऊ शकत नाहीत.

अश्या लोकांना या वर्षी हे समजेल की सुख हे मनाच्या अवस्थेवर अवलंबुन असते. भौतीक गोष्टीवर अवलंबुन नसते. महागड्या गोष्टींवर सुध्दा नसते. चतुर्थ स्थानी शनि असलेला मनुष्य भौतीक सुखाला पारखा झालेला असतो आणि त्यामुळे तो इतर ग्रह जन्मकुंडलीमधे अनुकूल असता सहज अध्यात्म विद्येकडे ओढला जातो. जन्मकुंडलीमधे चवथ्या स्थानी गुरु असता सर्व सुखे मिळतात सोबत ज्ञान ही मिळते की हे सुख शाश्वत सुख नाही.

ज्यांच्या जन्मकुंडली मधे चवथ्या स्थानी गुरु आहे अश्या लोकांना जर दिर्घ लेखन, प्रबंध लिहायचा असेल तर या वर्षात लिहून पुर्ण होईल. ज्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरु आहे अश्यांना योग्य मार्गदर्शन मिळून ते पुर्ण होईल. ज्यांना अध्यात्मामधे रस आहे त्यांना योगाभ्यास करण्याची किंवा ध्यान करण्याची प्रेरणा मिळेल तसेच तंत्र आत्मसात करता येईल. या वर्षा अखेर अध्यात्म विषयात रस असलेल्यांची चांगली प्रगती झाली असेल.

No comments:

Post a Comment