१५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे मकर ते मीन राशीचे राशीभविष्य


नमस्कारहरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १५ जानेवारीला २०२० ला मकर राशीत जाणार आहे
३१ जानेवारी २०२० ला बुध कुंभ राशीत जाणार आहे.
फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मीन या स्वत:च्या उच्च राशीत जाणार आहे.
फ़ेब्रुवारी २०२० ला मंगळ धनु या अग्नितत्वाच्या राशीत जाणार आहे.
याशिवाय सर्वात मोठा ग्रह राशीबदल या महिन्यात शनिचा आहे.

२४ जानेवारीला शनि मकर राशीत जाणार आहे. यामुळे वृश्चिक राशीची साडेसाती संपुन कुंभ राशीला सुरु होणार आहे. यासाडेसातीचा त्रास धनु, मकर आणि कुंभ राशीला कसा होईल हे सांगणार्या व्हिडीओ मी युट्युब वर प्रसिध्द केल्या आहेत. त्याची लिंक या प्रमाणे खाली पहा.

साडेसाती- कुंभ राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?


साडेसाती- मकर राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?


साडेसाती- धनु राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?


१५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळात रवि, बुध, शुक्र, मंगळ आणि शनि राशीबदल करणार आहेत. चंद्र दर सव्वादोन दिवसांनी राशी बदलतो. यामुळे महिन्याच्या राशीभविष्यात त्याचा स्वतंत्र अंतर्भाव मी करत नाही. पण चंद्राशी होणारे महत्वाचे ग्रहयोग लक्षात घेऊन प्रत्येक राशीचे राशीभविष्य लिहीतो. आता पाहू राशीनिहाय भविष्य. हे भविष्य आपण आपल्या लग्नकुंडली मधील लग्नराशीप्रमाणे पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहा.

मकर रास:

या महिन्यापासून  शनि मकर राशित येत आहे. याचे नेमके परिणाम काय आहेत ते वर आपल्याला पहायला मिळेल. १५ जानेवारी पासून रवि मकर राशीत येत आहे याचा परिणाम आरोग्याच्या दृष्टीने फ़ारसा चांगला नाही. जुनी दुखणी बळावतील असे एकंदरीत फ़ळ आपल्याला मिळणार आहे. हा त्रास महिन्याच्या ३१ जानेवारी पर्यंत जरा जास्त संभवतो. बुध जोवर मकर राशीत आहे तोवर हा त्रास असेल. परंतु बुध हा १००% वाईट फ़ळे देणार नाही त्यामुळे आरोग्याची हानी संभवत नाही पण चिंता राहील.

३१ जानेवारीला बुध कुंभ राशीत गेल्यावर त्रासाचे स्वरुप बदलून दात, घसा यांचे विकार बळावतील असे ग्रहमान आहे. या शिवाय या काळात आपण फ़सवले जाऊ नये यासाठी सावध असावे. आजकाल फ़सवणूकीचे विवीध प्रकार पहायला मिळत असल्यामुळे या विषयी जागरुकता आवश्यक आहे. मकर लग्नासाठी असलेला राजयोग कारक ग्रह शुक्र धनस्थानी असल्यामुळे याचे फ़ायदे फ़ेबृवारी २०२० पर्यंत मिळतील. कलाकारांना किंवा कलाक्षेत्रात काम करणार्यांना चांगले लाभ मिळणे अपेक्षीत आहे. २७ जानेवारी हा दिवस आपल्याला काही विशेष लाभ घेऊन येईल.   फ़ेबृवारी २०२० नंतर हा राजयोग कारक शुक्र आपल्या उच्च म्हणजे मीन राशीत जातो आहे. तृतीय स्थान हे संवादाचे स्थान आहे. जे लोक सोशल मिडीया मार्केटींग, रेडीओ टीव्ही किंवा टेलीकॉम उद्योगात आहेत यांच्या साठी हा योग अनुपम असा आहे. उत्तम व्यवसाय वृध्दी होणे या काळात शक्य आहे.

मंगळ फ़ेबृवारी २०२० पासून १२ वा होत आहे. तसेच व्ययेश गुरु सुध्दा १२ व्यास्थानी असल्यामुळे आलेले उत्पन्न खर्च होऊन जाणे, शिल्लक वाढणे, व्यवसायातून अपेक्षीत फ़ायदा होणे हे घडणारच आहे. म्हणून व्यवसाय सोडणे हा काही मार्ग होत नाही. यावर नियंत्रण ठेवणे हा एकच मार्ग शिल्लक रहातो. फ़ेबृवारी २०२० नंतर बरेच दिवस नोकरी/व्यवसाया निमीत्त बाहेर गावी किंवा परदेशात सुध्दा रहाणे अपेक्षीत आहे. यामुळे सुध्दा खर्च वाढू शकतात.

काही बाजू चांगली पण बरीचशी खराब असे मिश्र ग्रहमान मकर राशीला आहे.

कुंभ रास:

आपल्या राशीला या महिन्यात साडेसाती सुरु होत आहे. साडेसाती सुरु झाल्यावर त्रास कमी व्हावा म्हणून काय करावे हे वरील व्हिडीओ मधे मी सांगीतले आहे. मकर राशी पेक्षा आपल्या राशीला साडेसातीचा त्रास किमान २०२० मधे कमी आहे.

महिनाभर रवि बारावा होत असल्यामुळे व्यवसाय करत असाल तर फ़ारशी प्रगती संभवत नाही. व्यवसायाच्या निमीत्ताने फ़िरणे क्रमप्राप्त असले तरी यामुळे फ़ारसे व्यवसायीक यश मिळेल असे नाही. परंतु सेल्स आणि मार्केटींग क्षेत्रात असलेल्या लोकांना मार्च पर्यंत टार्गेट पुर्ण करायची असतात. यामुळे आपण प्रवास १२ फ़ेबृवारी २०२० नंतर केलात तर जास्त फ़ायदा होईल असे दिसते. वैवाहीक जोडीदार लांब प्रवासाला जाणे, किंवा आजारी असणे किंवा नाराज असणे असेही काहींना या महिन्यात अनुभवास येईल.

आपल्या राशीचा राजयोग कारक असलेला शुक्र आपल्याला मोठे यश देणार आहेच याशिवाय फ़ेबृवारी नंतर धनही देणार आहे असे ग्रहयोग आहेत. मीन राशीत जाणारा शुक्र घरी स्त्रीवर्गाचे संमेलन घडवेल. माहेरवाशीण्या बहिणी, आत्या, मावशी यांचे या महिन्यात भेटणे होऊ शकेल. या निमीत्ताने सहभोजन आणि शुक्र प्रधान भेळ, पाणीपुरी या सारखे पदार्थ खाण्याचे योग फ़ेबृवारी नंतर येतील.

ही सगळी चांगली बाजू असली तरी काहींना मुलांची चिंता असेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची जमवा जमव किंवा बाहेरगावी/ परदेशात  शिक्षणासाठी जावे लागणार असल्यामुळे वेगळी चिंता काहींना सतावेल.

नोकरी व्यवसायात धावपळ असेल तर फ़ेबृवारी नंतर थोडी धावपळ कमी होऊन केलेल्या कष्टाचे फ़ळ म्हणून थोडी आवक वाढताना दिसेल. आपल्या राशीचे बरेचसे चांगले पण क्वचित चिंता करायला लावणारे ग्रहमान या महिन्यात असेल.

मीन रास:

मीन राशीला उत्साहवर्धक असे ग्रहमान या महिन्यात आहे. २७ जानेवारीला होणारे एका दिवसाकरता अशुभ ग्रहमान सोडता सर्व महिना किती देशील दोन्ही कराने असे म्हणायला लावणारा आहे. या महिन्यात रवि संपुर्ण महिनाबह्र लाभस्थानात आहे. नोकरी करणार्या सर्वांना हा दर महिन्याचा पगार देणारच आहे परंतु अनेकदा केलेल्या श्रमाचे श्रेय कुणी दुसरा लाटतो असे घडनार नाही. व्यावसायीकांना सुध्दा हाताखालचे लोक पुर्ण साथ देऊन अपेक्षीत टार्गेट पुर्ण करण्यासाठी मेहेनत करताना दिसतील. एखादे सरकारी काम वादात पडले असेल तर तेही मार्गी लागेल. एखादा खटला निकाल लागून मनासारखे यश या महिन्यात मिळेल.

संपुर्ण २०२० सालात गुरु दशमात असल्यामुळे नोकरी व्यवसायाचे काम वाढणार आहे हे मी मागील महिन्यात सांगीतले त्याचे प्रत्यंतर हळू हळू येऊ लागेल.

२४ जानेवारीला लाभेश शनि लाभस्थानात जाऊन पुढे तो अडीच वर्षे या स्थानी रहाणार असल्यामुळे उत्पन्नाचा एखादा पक्का मार्ग हातशी येईल. याच ठिकाणि ३१ जानेवारी २०२० पर्यंत असलेला बुध व्यवसायातून लाभ देऊन जाईल.

भाग्येश मंगळ फ़ेबृवारी २०२० पर्यंत भाग्य स्थानी असल्यामुळे कमी श्रमात, यश देण्याचे काम हा ग्रह करणार आहे. फ़ेबृवारी नंतर नोकरी व्यवसायात अजून सुसंधी उपलब्ध करुन देणार आहे. असे हे ग्रहमान आपल्याला फ़क्त देण्याचे काम करण्यासाठी तयार आहे. मरगळ झटकून आपण कामाला लागणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment