१३ फ़ेबृवारी ते १३ मार्च २०२० या महिन्याचे तुळ, वृश्चिक आणि धनु राशीचे राशीभविष्य


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १३ फ़ेबृवारी २०२० ला कुंभ राशीत जाणार आहे
२८ फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मेष राशीत जाणार आहे.
७ मार्च  २०२० ला प्लुटो मकर राशीत जाणार आहे. हा प्लुटो मकर राशीत १४ जून २०२० पर्यंत
असेल. १५ जुन २०२० ला प्लुटो पुन्हा वक्री गतीने धनु राशीत प्रवेश करतो.

थोडक्यात हा महिना १३ फ़ेबृवारी २०२० ला सुरु झाल्यावर शुक्र व प्लुटो हे दोनच ग्रह राशीबदल करत आहेत.

ज्यांची मकर रास आणि उत्तराषाढा जन्मनक्षत्र असून दुसरे चरण आहे अशांना मार्च, एप्रिल व मे २०२० हे महिने त्रासाचे असू शकतील.

प्लुटो जेंव्हा राशीबदल करतो तेंव्हा व्यक्तीच्या जीवनात फ़ार मोठे बदल घडतात असे नाही. परंतु असा राशीबदल एखाद्या मोठ्या घटनेची नांदी ठरणारा असतो. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी प्लुटो वृश्चिक राशीत गेला. या दिवशी जगाच्या इतिहासात दोन मोठ्या घटना घडल्या. दुसर्या महायुध्दाने झालेली जर्मनीची फ़ाळणी होऊन जर्मनीचे तुकडे करणारी बर्लीन भिंत याच दिवशी जमिनदोस्त झाली. याच दिवशी अयोध्येमधे पहिली कारसेवा होऊन श्रीराम मंदीराचा शिलान्यास झाला. या दोन घटनांनी जगाला इतिहासात नोंद घ्यायला लावली.

श्रीराममंदीर शिलान्यासाने, १९८४ साली ५४२ पैकी फ़क्त दोन जागा जिंकलेल्या भाजपने पुन्हा मुसंडी मारुन ८९ जागा जिंकल्या आणि नोव्हेंबर १९८९ महिना अखेरीस असलेल्या निवडणुकांच्या मधे १९८४ साली ४०० पेक्षा जास्त जागा आलेल्या कॉंग्रेसचा पराभव केला. श्रीराममंदीर निर्माण हा मुद्दा भाजपच्या निवडणुक जाहीरनाम्या मधे महत्वाचा मुद्दा झाला. पुढचा इतिहास ताजा आहे.

७ मार्च २०२० आणि ८ जानेवारी २०२१ आणि ३० अक्टोंबर २०२१ रोजी एकदा वक्री होऊन पुन्हा मार्गी होऊन प्लुटो मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही भारताची रास आहे त्यामुळे या तिनही दिवशी काय घडेल याचा आढावा त्या त्या महिन्यात घेईन. श्रीराममंदीर शिलान्यासासारखी एखादी घटना घडण्याचे संकेत याच महिन्यात धनु राशीत होणारी मंगळ- गुरु युती देत आहे. राजकीय आंदोलनांनी ह्या दरम्यानचा काळ पुन्हा ढवळून निघणार आहे. ८ मार्चला होणारी रवि नेपच्युन अंशात्मक युती, तिथीचा क्षय होत असल्यामुळे क्षयदिन तसेच आश्लेषा या उग्र नक्षत्रामधील चंद्र काही घडण्याची नांदी देत आहे. या दिवशी ही घटना फ़क्त नांदी असेल. याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ प्लुटो युती आणि त्या आधी २० मार्च ला होणारी मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना घडवतील.

आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय राशीभविष्य, तुळ, वृश्चिक आणि धनुराशींच्या साठी. हे राशी भविष्य आपण लग्नराशीकडून पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी माहित नसेल तर मात्र चंद्र राशीकडून हे राशी भविष्य अनुभवा.

तुळ रास:

आपल्या राशीचा मालक शुक्र मीन या उच्च राशीत सहाव्या स्थानी २८ फ़ेबृवारी पर्यंत आहे. या नंतर तो मेष राशीत आणि सातव्या स्थानी जाणार आहे. "दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत" अशी म्हण या ग्रहस्थितीला लागू पडते. कुंडली मंत्र तंत्र भाग एक या पुस्तकात सहाव्या स्थानी असलेल्या शुक्राचे वर्णन गुरुवर्य व दा भट करतात की लंडन, न्युयॉर्क किंवा पॅरीसला रहाणार्या माणसाला खुर्द किंवा बुद्रूक अश्या खेडेगावी रहायला लागणे. आपल्या कलागुणांचे प्रदर्शनच करता येत नाही. मीनेचा शुक्र सर्वात बलवान पण सहाव्या स्थानी आणि नंतर शुक्र बलहीन राशीत जातो तिथे सप्तमस्थान आहे.

२८ तारखेपर्यंत तुळ राशीच्या लोकांना सहाव्या स्थानी असलेल्या शुक्राचा फ़ारसा उपयोग नाही. हाताखालचे नोकर खास करुन स्त्रीवर्गातले नोकर तेव्हडे न सांगता, बोलता उत्कृष्ट काम करतील. मावशी, मामांच्या बाबतीत सुखद वार्ता समजेल. २८ तारखेनंतर मात्र शुक्र सातव्या स्थानी जाईल. विवाह इच्छुकांना स्थळे चालून आली तर क्लिक होतीलच असे ग्रहमान शुक्र अश्विनी नक्षत्रात असे पर्यंत कठीण आहे. मार्च १३ नंतरच शुक्र भरणी नक्षत्रात गेल्यावर काही घडेल. यामुळे विवाह इच्छुकांना आधी पौष महिन्याच्या कुप्रथेमुळे आणि मग शुक्र अनुकूल नसल्यामुळे काही न घडण्याचा अनुभव घ्यावा लागेल.

तुळ राशीचे लोक जर सिनेमा, नाटक इत्यादी क्षेत्रात असतील तर या महिन्यात काही भरीव घडेल आणि आर्थिक लाभही संभवेल. हा महिना विद्यार्थ्यांच्या साठी उत्तम असेल. जर पारंपारिक विद्या जसे ज्योतिष, किंवा मंत्र विद्या याचे शिक्षण घेत असाल तर या महिन्यात प्रगती संभवते. या महिन्यात लिखाण काम करणार्या तुळ राशीच्या लोकांना लिखाण मनासारखे होण्याचे योग आहेत. इतर नोकरदार, व्यापारी यांना प्रवास सुखकर होतील असे ग्रहमान आहे.

वृश्चिक रास:

आपल्या राशीचा मालक महिनाभर धनु राशीत असणार आहे. धनु राशीतला मंगल काही वेळा पेल्यात वादळे निर्माण करेल असा अनुभव काहींना येईल. अर्थात ही वादळे पेल्यात असल्याने याची चर्चा घराच्या बाहेर जाणार नाही. महिनाभर वृश्चिक राशीच्या लोकांनी अन्न घेताना खास करुन बाहेरचे अन्न घेताना सावधानता बाळगावी. वृश्चिक राशीच्या काही लोकांना काही वडीलोपार्जित किंवा मामांच्या कडून धन प्राप्ती व्हावी असे योग येतील.

या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात फ़ारशी दगदग असेल असे वातावरण नसेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जाताना येताना त्रास झाला, वहान बिघडले, लोकल रद्द झाली असे काही न घडता प्रवास सुखकर घडतील. हा सुखद अनुभव महिनाभर आला तरी मात्र महिन्याच्या शेवटी नोकरीत अश्या काही घटना घडतील ज्याची चिंता लागेल. नको असताना एखाद्या प्रकरणात गुंतवले गेल्याचा अनुभव काही लोकांना येऊ शकेल.

आपल्या राशीला शुक्र २८ तारखेपर्यंत पंचमात असल्यामुळे तसेच हा महिना प्रेम व्यक्त करण्याचा असल्यामुळे अशी संधी वारंवार येईल. जे आधीच प्रेमात पडले आहेत त्यांना हा काळ लक्षात राहील असा रोमॅंटीक असेल. नाटक किंवा स्टेज आर्टीस्ट असणार्या लोकांना २८ फ़ेबृवारी पर्यंत अनेक उत्तम संधी चालून येतील.

विवाहाला उशीर होत आहे ? त्यावरील उपाय

धनु रास:

आपल्या राशीला हा महिना लक्षात राहील असा आहे. या महिन्यात राशीचा मालक मंगळ महिनाभर धनु राशीत मुक्कम करुन असणार आहे. विद्यार्थी असाल तर व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळेल. नेतृत्व गुण म्हणजे काय याचा अनुभव येईल जो आयुष्यभर कामास येईल.

हा महिना लेखक, प्रकाशक, टेलीफ़ोन तसेच विविध प्रकारच्या एजंन्सी मधे काम करणार्या तसेच रेडीओ, दुरदर्शन च्या माध्यमातून संपर्क करुन व्यवसाय करणार्या लोकांच्या साठी चांगला आहे. एल आय सी किंवा अन्य सल्लागार ज्यांना काही टार्गेट्स असतात त्यांनी या महिन्यात अशी टार्गेट पुर्ण होतील असा प्लॅन केल्यास यश मिळेल.

२८ तारखेपर्यंत चतुर्थात असलेला मीन राशीतला शुक्र या महिन्यात आपल्याला सुखदायी अनुभव देणार आहे. घरात गरम गरम जेवायला मिळणे. अत्यंत आवडीचा परंतु क्वचित तयार होणार पदार्थ खायला मिळणे. आपल्या आवडीचा पुन्हा पुन्हा पहावासा वाटणार सिनेमा किंवा नाटक चक्क टीव्हीवर पहायला मिळणे अश्या सुखदायी गोष्टी घडतील. एखादी नवीन गृहौपयोगी वस्तू घरात येईल. याशिवाय तरुणांना या महिना अखेरपर्यंत काही रोमॅंटीक क्षण सुध्दा अनुभवास देणारे ग्रहमान आपल्यासाठी आहे.


ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर यांचे whatsapp वर मार्गदर्शन मिळण्यासाठी हे वाचा.

No comments:

Post a Comment