संकल्पाचे महत्व

ज्योतिषामधे एखादी गोष्ट होणार आहे किंवा नाही असा प्रश्न विचारला जातो तसेच ती कधी होणार असाही प्रश्न विचारला जातो. हिंदू धर्मामधे एखादे फ़ळ वेळेच्या आधी मिळावे म्हणून काही उपासना, पुजा, जप , दान किंवा हवन अर्थात यज्ञ असे उपाय सांगीतलेले आहेत. हे उपाय केल्याने अनेकदा अपेक्षीत फ़ळ मिळते आणि जातकाला म्हणजे जो प्रश्न विचारतो त्याला आनंद होतोच तसा मलाही होतो.

अनेकदा असे फ़ळ मिळत नाही. ते का मिळाले नाही असे ही विचारले जाते. याची कारणे अनेक आहेत. ते व्रत, ती पुजा जशी सांगीतली आहे तशी, ज्या व्यक्तीने करायला पाहीजे त्या व्यक्तीने करता दुसर्याच्या हातून केली तर अपेक्षीत फ़ळ मिळत नाही. ज्या मुलींचे विवाहास किंवा मुलांच्या विवाहास विलंब होतो त्यांच्या मातोश्री अशी व्रते करतात. अश्यावेळी फ़ळ मिळेल याची खात्री देता येत नाही. का खात्री देता येत नाही याची अनेक कारणे आहेत. आज आपण त्यावर चर्चा करणार नाही.

पुजेचे, व्रताचे, पारायणाचे किंवा यज्ञाचे अपेक्षीत फ़ळ मिळण्यामागे संकल्प केलेला नसणे किंवा योग्य तो संकल्प ज्यात स्थान, काळ आणि कर्ता यांचा उल्लेख नसणे हे एक कारण आहे.

आपण एखाद्या नातेवाईकाकडे कडे मदत मागण्यासाठी गेलो गेलो आणि जी मदत आपल्याला अपेक्षीत आहे त्याचा स्पष्ट उल्लेख केला नाही तर कितीही चांगला खात्रीचा नातेवाईक आपल्या उपयोगी पडणार नाही. तो काही अडचण आहे का असे विचारायचे विसरला तर चहा/जेवण देऊन आपल्याला परत पाठवेल. संकल्पाचे सुध्दा असेच आहे. हा जर नीट झाला नाही तर अपेक्षीत फ़ळ मिळत नाही म्हणून हा विशेष लेख आहे.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट आपण का करतो याचे उद्दीष्ट काय, याचे सोबत अनेक गोष्टींचे स्मरण ती गोष्ट अर्थात एखादा प्रकल्प ( Project ) सुरु करण्यापुर्वी करावा असे सांगीतले आहे. याला संकल्प असे म्हणतात.

हिंदू धर्मातच कशाला जपानी माणसाला जर एखादा प्रोजेक्ट बद्दल विचारा तो अस सांगतो की एखादा प्रोजेक्ट जर २१ दिवसात पुर्ण करायचा असेल तर त्या आधी एकवीस दिवस ते तयारी करतात. कारण प्रोजेक्ट सुरु झाल्यावर एखादी गोष्ट हा प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी लागते हे विसरले तर प्रोजेक्ट पुर्ण होत नाही. झालाच तर हव्या त्या वेळेला होत नाही आणि अपेक्षीत फ़ळ मिळाले नाही तर पैसा, वेळ वाया जातो.

तसच काहीसे व्रतांचे आहे. जी व्रते निष्काम आहेत त्याबाबतीत संकल्पाचे फ़ारसे महत्व नाही परंतु काम्य व्रतांच्या बाबतीत संकल्प महत्वाचा आहे. काम्य व्रत आपण काही मिळावे यासाठी करतो. मनातल्या इच्छापुर्तीसाठी करतो. अश्यावेळी व्रत करताना अनेक महिने यासाठी वेळ काढतो, आराम करत नाही, नियमीत जप करतो, पारायण करतो किंवा भरपुर पैसे खर्च करुन विद्वान ब्राह्मण यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ अर्थात पुजन, हवन इत्यादी करतो. याचे फ़ळ काय मिळावे याचा उच्चार करणे म्हणजे संकल्प.

कर्माच्या सिध्दांतानुसार प्रत्येक कर्माचे मग ते चांगले असो की वाईट असो फ़ळ मिळतेच. ते तात्काळ मिळावे, यासाठी संकल्पाला महत्व आहे. संकल्पामधे युग, शक, महिना, तिथी आणि नक्षत्र याचा उल्लेख रेफ़रन्स साठी केलेला आहे. जसे एखादे डॉक्युमेंट जेंव्हा आपण रजिस्टर करतो तेंव्हा सुध्दा तारखेचा उल्लेख महत्वाचा असतो.

 याप्रमाणे आपण संकल्प करताना वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे ___ शालिवाहन शके, ___मासे, ____ पक्षे, ___ तथौ  , ___ दिवस नक्षत्रे  जसे काळाचे वर्णन आपण संकल्पात करतो तसेच जंबुद्विपे, भरतवर्षे, नर्मदातीरे, रेवाखंडे ( नर्मदेच्या दक्षिणेला रेवाखंड म्हणण्याची प्रथा आहे जर नर्मदेच्या उत्तरेला असु तर संकल्पात तसा उल्लेख करतात ) पुढे ग्रामाचा उल्लेख केला जातो. यानंतर __ गोत्रोत्पन्नोहं ____ नाम्ने ( आपले गोत्र नावाचा उल्लेख ) मग काय फ़ळ मिळावे याचा उल्लेख येतो फ़ल: प्राप्यर्थ ........ मग कोणती पुजा याचा उल्लेख येतो.

कोणतीही पुजा/यज्ञ हा प्रयोग आहे. तंत्रज्ञान नाही हे लक्षात ठेवावे. हे समजण्यासाठी सायन्स आणि इंजिनीयरींग मधला फ़रक समजून घ्यायला हवा. सायन्स ची प्रगत शाखा म्हणजे इंजिनीयरींग आहे. सायन्स ने सिध्द झालेले प्रयोग दरवेळेस यशस्वी होण्यासाठी निर्माण केले तंत्र हा इंजिनीयरींग आहे. अजूनही समजण्यासाठी असे म्हणता येईल की लोखंडापासून सोने तयार करता येईल पण दहा ग्रॅम सोन्याची किंमत दहा लाख होत असेल तर अर्थशास्त्राला धरुन होणार नाही. इंजिनीयरींग म्हणजे एखादा प्रयोग ठरावीक वेळात, प्रयोगाच्या अपेक्षीत किंमतीमधे, खात्रीने अपेक्षीत फ़ळ देणारा, असे तंत्र निर्मीती आहे.

दुर्दैवाने कोणतीही पुजा, जप किंवा यज्ञ यात तुम्ही किती एकाग्र होता, याच बरोबर मंत्राचे उच्चारण, यज्ञासाठी अग्नि भुमीवर आहे अथवा नाही, नवग्रहांपैकी ग्रह अनुकूल आहेत अथवा नाही ( शुक्र गुरुच्या अस्तकाळात विवाह होत नाहीत याच साठी ) इतकी अवधाने पाळून अनेकदा अपेक्षीत फ़ळ मिळत नाही. याचे कारण पुजा, जप किंवा यज्ञ अद्यापही तंत्रज्ञान झालेले नाही.

मग पुजा, जप किंवा यज्ञ जर काम्य म्हणजे अपेक्षीत काळात फ़ळ मिळणे आवश्यक असेल तर सुरवातीस सर्व विघ्नांचे अर्थात अडचणी /संकटे यांचे हरण करणार्या श्रीगणपती देवतेचे स्मरण केले जाते. त्याच सोबत इष्टदेवता, ग्रामदेवता, नवग्रह इत्यादी देवतांचे स्मरण करुन किंवा पुजन करुनच मग पुजा, जप किंवा यज्ञ आरंभ केला जातो. जर कार्य खुपच महत्वाचे असेल तर पुण्याहवाचन आणि नांदी अर्थात तात्कालीक श्राध्द करुन पितरांचे आशिर्वाद घेऊन मगच असे व्रत केले जाते.

थोडक्यात जर संकल्पच केला नाही तर त्याचे फ़ळ कधी मिळणार याबाबत कर्मफ़ळाला आपण दिशा देत नाही. परिणामी मी जर रुक्मिणी स्वयंवर हा सहा महिने चालणारा उपाय सांगीतला तर त्याचे फ़ळ कधी मिळणार हे समजत नाही. याचे फ़ळ आपण श्रीकृष्ण लीला म्हणून वाचतोय की विवाह व्हावा म्हणून वाचतोय हे कर्मफ़ळाला समजत नाही. श्रीरुक्मिणीस्वयंवर जर संकल्प करता वाचले तर त्याचे फ़ळ पुण्य म्हणून जमा होते.  श्रीरुक्मिणीस्वयंवर जर लवकर विवाह व्हावा असा संकल्प करुन वाचले तर लवकर विवाह होतो.  श्रीरुक्मिणीस्वयंवर जर  मनाप्रमाणे पती मिळावा विवाह लवकर व्हावा म्हणून वाचले तर मनाप्रमाणे पती मिळतो आणि विवाह ही लवकर होतो.

हे थोडेसे बॅकेंमधल्या विवीध खात्यांसारखे आहे. समजा आपल्याकडे जास्त पैसे आले आणि आपण जर बॅंकेत जमा करण्याचे चलन भरले तर आपल्याला ते सेव्हींग अकाउंटला जमा करायचे, कर्ज घेतलेले असेल तर त्या खात्यात जमा करायचे, करंट अकाउंटला जमा करायचे, मुदतठेव म्हणजे फ़िक्स्ड डिपॉझीट अर्थात एफ़.डी करायची की पी.पी.एफ़ मधे जमा करायचे याचा उल्लेख करावा लागतो. जर असा उल्लेख केला नाही तर बॅंकेला त्याचे फ़ळ कसे द्यायचे हे समजत नाही.

त्याप्रमाणे संकल्प म्हणजे हा उल्लेख आहे. कोणत्या ठिकाणी पैसे जमा केले हे कळावे म्हणून जसे बॅक ब्रांच चा उल्लेख असतो त्याप्रमाणे जंबुद्विपे, भरतवर्षे, नर्मदातीरे…… हा स्थान उल्लेख आहे. पैसे जमा करण्याच्या स्लीप वर आपण तारीख महिना आणि वर्ष लिहीतो तसा वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे ___ शालिवाहन शके, ___मासे, .... काळाचा उल्लेख आहे. ज्या प्रमाणे आपण आपले नाव लिहीतो किंवा खातेदार असल्यास खात्याचा उल्लेख करतो तसे आपले नाव, कुळ किंवा गोत्राचा उल्लेख आहे.

हे सर्व करण्याचा उद्देश जो सर्वशक्तीमान परमेश्वर किंवा ईश्वरी शक्ती किंवा सो कॉल्ड सिस्टीम कर्मफ़ळ देते त्याच्या योग्य त्या खात्यात ते कर्म जमा व्हावे आणि त्या कर्माचे फ़ळ हवे तेंव्हा मिळावे.

गेले तीन वर्षे मी पुर्णवेळ मार्गदर्शन करत आहे. त्यातही गेले एक वर्ष मी युट्युब व्हिडीओ माध्यमातून मार्गदर्शन करत आहे. अनेकदा मी व्हिडीओ मधे संकल्पाचा उल्लेख करतो पण या लेखाच्या माध्यमातून आपणास विनंती आहे की मीच काय कोणत्याही ज्योतिषाने संकल्प सांगता चुकून उपाय सांगीतला तर संकल्प काय करायचा विचारावे. किंवा संकल्प आपण स्वत: योग्य ते शब्द उच्चारुन करावा.

संकल्प करुन केलेली सर्व काम्य व्रते आपणास फ़लदायी होवोत या शुभेच्छा !

No comments:

Post a Comment