जननशांती प्रयोग

 ज्योतिष शिकायला लागल्यानंतर वयाच्या ३३ व्या वर्षी मला लक्षात आले की माझी स्वतःची मुळ नक्षत्राची शांत झालेलीच नाही. आधी अनुभवावे मग सांगावे यान्यायाने प्रथम मी माझी स्वतःची मुळ नक्षत्र आणि अमावस्या योगावर जन्माला आल्याची शांत केली. तहान लागली पाणी पिले आणि समाधान झाले इतका कार्यकारण भाव जरी या शांती नंतर दिसला नाही तरी आरोग्यात सुधारणा, स्वभावात सकारत्मक बदल, अकारण चिडणे कमी  झाले इतके स्पष्ट बदल स्वतःला जाणवले. पाठोपाठ माझ्या मुलीचे पुष्य नक्षत्रावर जन्म असल्यामुळे जननशांती कर्म खुप उशीरा म्हणजे तीच्या वयाच्या ९ वर्षी मी करवले.

दर वर्षीच्या दाते पंचांगात खालील प्रमाणे जननशांती सांगीतल्या आहेत.

तिथी - कृष्ण चतुर्दशी, अमावस्या

नक्षत्रे - अश्विनीची पहीली ४८ मिनीटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेशा पुर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण्,चित्राचा पुर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पुर्ण, मुळ पुर्ण, पुर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनीटे.

योग - वैधृती, व्यतीपात, 

करण -  भद्रा ( विष्टी )

इतर - ग्रहण पर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म ,अधोमुख जन्म, माता -पिता-भाऊ - बहिण यांच्यापैकी एकाच्या जन्मनक्षत्रावर जन्म झालेला असताना, तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुला नंतर मुलगी तसेच सुर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग या पैकी कारण असेल तर शांती करावी.

मी याला अनुसरुन आलेल्या जातकांना मार्गदर्शन करायला सुरवात केली.

एक केस अशी आली की आमच्या एका साहेबांची मुलगी अभ्यास पुरेसा न झाल्याने बारावीला परिक्षेला ड्रॉप घेण्याचे म्हणत होती. आई वडील मुलीला समजाऊन हैराण झाले की हा निर्णय घेऊ नको. शेवटी पत्रीका पहाणे या विचारापर्यंत वडील पोहोचले आणि पत्रीका माझ्याकडे आली. या मुलीला मेडीकलाला जाण्याची तीव्र इच्छा होती. त्याकाळात फक्त बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकल शाखेला प्रवेश मिळत होता. सी ई टी नव्हती.

पत्रीकेत शिक्षणाचे योग्य योग असताना असे का म्हणुन मी पाहिले असता या मुलीचे नक्षत्र आश्लेषा आढळले. आश्लेषा नक्षत्र राक्षस गणी असल्यामुळे आपल्या अपेक्षापुर्ती साठी तडजोड करणारे नसते.

मी जननशांतींची चौकशी केली असता ती न झाल्याचे समजल्याने शेवटी करण्याचा सल्ला तीच्या वडीलांना दिला पण हे करत असताना उत्तम पौरोहित्य जाणणारे गुरुजी सुचवुन अग्नी पृथ्वीवर असलेल्या योगावरच शांती कर्म करण्याचे दिवस शोधुन दिले. हे सर्व त्या मुलीच्या नशीबाने बारावीच्या परिक्षेच्या आधी जुळुन आले.

शांतीकर्म घडताच एक दृष्य बदल असा घडला की जी मुलगी बारावीच्या परिक्षेला बसणार नाही म्हणत होती ती स्वतःहुन परिक्षा देण्यास तयार झाली. पुढे निकाला अंती उत्तम गुण मिळाले. त्याच वर्षी मुलींसाठी मेडीकलला वेगळा कोटा सिस्टीम आल्याने तीला हवे ते कॉलेजही मिळाले. ती पुढे एम. बी. बी एस झाली हे वेगळे सांगणे नको.

यानंतर लग्न जुळत नाही म्हणुन न केलेली जननशांती दुसर्‍या एका मुलीला लग्नाच्या आधीच्या वयात करायला सांगीतली आणि आश्चर्यकारक रित्या त्वरीत लग्न जुळल्याचे अनुभवले.

असे अनेक अनुभव घेतल्यानंतर आज हे लिहण्याचे कारण घडले. माझ्या मते यावर आणखी संशोधन व्हावे. ह्या संशोधनाला जर लोक पुढे आले तर यातुन निष्कर्ष निघु शकेल.

माझ्या अनुभावात तरी जननशांती कर्म निष्फळ झाल्याचे दिसले नाही. यात या यज्ञ कर्माचा योग्य दिवस शोधणे आणि अग्नी भुमीवर त्या दिवशी असणे हे ज्योतिषाने शोधुन जातकाला सांगणे व त्या दिवशी उत्तम पौरोहीत्य करणार्‍या गुरुजींच्या हस्ते हे घडवणे आवश्यक आहे हे निक्षुन सांगावेसे वाटते.

                      यथा शस्त्रप्रहाराणा कवच विनिवारकम |
                     तथा दैवोपघातानं शान्तिर्भवती वारणम ||

या श्लोकानुसार शस्त्रप्रहाराच्या आघातापासुन जसे कवच शरिराला संरक्षण देतात. तसेच शांती कर्म केल्याने दैवी दोष ( जन्मत: आलेले ) यांचे निवारण होते. अकालमृत्यु भय, शोक, शारिरीक व मानसिक व्याधी दुर होऊन सौख्य, मन:शांती, सुभाग्य, आरोग्य, धन याची प्राप्ती होते.   आजकाल शांतीकर्म ही खर्चीक बाब झाली आहे. शांतीकर्म ज्या कारणासाठी करायचे आहे त्या नक्षत्राच्या देवतांचे जप करणे हा त्याला पर्याय आहे. उदा. वरच्या लेखात मुळ नक्षत्राला शांती सांगीतली आहे. त्याचे शांती कर्म करण्याची ऐपत एखाद्या व्यक्ती कडे नसेल तर त्याने ऒम निऋती नम: हा नक्षत्र जप केल्याने तोच परिणाम साधला जातो. अर्थात जपाची संख्या किमान रोज १०८ इतकी असावी. हे लिहीण्याचा उद्देश इतकाच की शांतीकर्म शक्य नसल्यास काय हे वाचक आणि ज्योतिष अभ्यासकांना समजावे. परंतु शक्य असल्यास शांती कर्म टाळु नये.

No comments:

Post a Comment