साडेसाती धनु मकर आणि कुंभ राशीची

शनि लवकरच म्हणजे २४ जानेवारी २०२० ला सकाळी ०९ वाजून ५३ मिनीटांनी मकर राशीत प्रवेश करतो. असा शनिचा मकर राशीत प्रवेश झाल्यावर वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीला सुरु होईल.

मकर आणि कुंभ ह्या दोन्हीही शनिच्या स्वत:च्या  राशी असल्यामुळे शनि जास्त त्रास देत नाही असे म्हणतात. वास्तवीक शनि च्या या दोन राशींना आयुष्यात सर्व काही उशीरा मिळते असा अनुभव आहे. यामुळे यांचे आयुष्य परिस्थितीशी समझोता करत पुढे जाते आणि म्ह्णुन त्यांना दु: सहन करण्याची शक्ती मिळते. या कारणाने त्यांना फ़ारसा त्रास होत नसावा.

माझा ज्योतिषी म्हणून अनुभव असा आहे, मकर राशीच्या बाबतीत हे बरोबर आहे. पण कुंभ राशीचे लोक जरा दु:खाने लवकर पोळतात. त्यातही त्यांच्या मुळच्या जन्मकुंडली मधे जर चंद्र शनि किंवा नेपच्युन किंवा राहूच्या अंशात्मक अशुभ योगात असेल तर असे दु: या लोकांना लवकर होते.

आता राशीनिहाय शनि भ्रमणाचे परिणाम पाहू

वृश्चिक रास : पुढील तीन महिन्यात साडेसाती पुर्ण संपणार आहे. यानंतर परत साडेसाती यायला साडेबावीस वर्षे अवकाश आहे. त्यामुळे शनि साडेसाती पर्व संपल्याचा आनंद या दिवाळी पासून घ्यायला लागा. मनाची धारणा साडेसाती संपली अशी आत्तापासूनच तयार करा. अनेकदा साडेसाती संपली तरी मनाची धारणा दु: करण्याची तयार होते. काही भिती मनात घर करुन रहातात. या भितीच्या भिंती पाडून पुन्हा मुक्त आणि आनंदी मनाने जगण्यास सुरवात करायला दिवाळी २०१९ चे पर्व चांगला मुहूर्त आहे.

धनु राशी : आपल्या राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा किंवा शेवटची अडीचकी सुरु होत आहे. ही अडचकी २९ एप्रिल २०२२ ला संपेल. साडेसातीचा मोठा टप्पा आपण पार केला आहे आता बस उतरती साडेसाती आहे. २४ जानेवारी २०२० पासून चंद्र कुंडली जर आपण पाहिली ( राशी कुंडली ) तर राशी कुंडलीच्या धन स्थानातुन किंवा कुटुंब स्थानामधून शनि भ्रमण करणार आहे.

तुमच्या जन्मकुंडली नुसार हे वेगळे स्थान असेल किंवा जर तुमचा चंद्र जर लग्नस्थानी असेल तर लग्नकुंडली कडून सुध्दा कुटुंबस्थानाकडून हे भ्रमण सुरु होते. शनि आणि गुरु फ़ळे कशी देतात पहा. जेंव्हा गुरु कुटुंबस्थानातुन भ्रमण करतो तेंव्हा कुटुंबातील लोकांची संख्या किमान एक ने वाढते. याचा अर्थ तुम्हाला संतती होईल किंवा मुलाला मुल होईल किंवा मुलाचे लग्न होऊन त्याची पत्नी घरी येईल असे अनेकदा दिसते. या उलट जेंव्हा शनिचे भ्रमण कुटुंबस्थानातुन होते तेंव्हा किमान एक व्यक्ती कुटुंबातून जाते असा सर्वसाधारण अनुभव येतो. गुरु कुटुंबात वाढ करतो तेंव्हा आनंद होतो तर शनि कुटुंबातील एक व्यक्ती कमी करतो तेंव्हा दु: होते. याचा अर्थ मुलीचे लग्न झाल्याने मुलगी सासरी गेल्यावर जे होते असे दु: नाही नाही. मुलीचा विवाह ही मिश्र म्हणजे आनंद आणि दु: याचा एकत्र अनुभव असतो. किंबहुना यात आनंद जास्त असतो कारण मुलगी दुर गेली तरी नाते संपत नाही.

शनिचे कुटुंबस्थानातुन भ्रमण एखाद्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यु होईल अशी घटना दर्शवते. अर्थात अगदी जवळच्या म्हणजे आई- वडील यांचा मृत्यु होतो असे अजिबात नाही. आजी, आजोबा, अश्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यु होईल अशी शक्यता ह्या शनि भ्रमणाने निर्माण होते. शनिचे कामच दु: देणे आहे त्यामुळे अश्या घटनांचे दिर्घकाळ दु: होते. व्यक्ती वयस्कर असेल तर हे घडणे स्वाभावीक आहे. परंतु एक आपल्या समवेत जीवन व्यतीत करणारी, आपल्या जीवनाचा भाग असलेली व्यक्ती कायमची जाते तेंव्हा दु: होणार आहे.

मकर राशी : आपल्या राशीतून शनिचे भ्रमण २४ जानेवारी २०२० ते २९ एप्रिल २०२२ पर्यंत असेल. ही मधली अडीचकी आहे. मधल्या अडचकी मधे शनि भ्रमण प्रत्यक्ष चंद्रावरुन असल्याने तुमची रास सोडता सर्वांना जास्त त्रास होतो. मकर राशीला फ़ारसा त्रास नसतो. याचे कारण विलंब, दुर्लक्ष, मानहानी, श्रम हे मकर राशीला कायम असतात. मनस्ताप काय तो वाढतो. पण सततचे कष्ट, विलंब , नकार पचवून मकर राशीचे लोक मनस्ताप सुध्दा सहज पचवतात. आपण मकर राशीच्या लोकांना विचारा. खास करुन एखाद्या कटकट्या माणसाबद्दल विचारा. ते म्हणतील तो तसाच आहे. आपण मनाला फ़ार लाऊन घ्यायचे नाही. आपण आपले काम करायचे.

इतकी साधी, सरळ, सोपी मनोभुमीका मकर राशीच्या लोकांना कठीण प्रसंगी स्थिर रहायला उपयोगी पडते. त्यातल्या त्यात मकर राशीच्या खास करुन उतराषाढा नक्षत्राच्या लोकांना २०२० सालात जरा जास्त कठीण असेल. त्यामाने श्रवण आणि धनिष्ठा ला  शनिचे भ्रमण त्यांच्या नक्षत्रातून नसल्यामुळे फ़ार मनस्ताप २०२० सालात संभवत नाही. २०२१ सालात श्रवण आणि २०२२ सालात धनिष्ठा च्या पहिल्या दोन चरणांना खास करुन अनुभव येईल.

मकर राशीच्या सगळ्या नक्षत्रातील लोकांना साडेसातीत २०२० साल फ़ारसे चांगले नाही. कारण चंद्राच्या बाराव्या म्हणजे व्यय स्थानी गुरु आहे. चंद्राच्या व्ययात गुरु आणि चंद्रावरुन शनिचे भ्रमण हा काळ मानसीक दृष्टीने निराशा येण्याचा आहे. अनेक वाचकांना आता समजेल की जेंव्हा दोन दोन मोठे ग्रह अनुकूल नसतात तेंव्हा काय स्थिती होते.

जेंव्हा व्यक्तीच्या आयुष्यात पहिली साडेसाती येते आणि व्यक्ती जाणती असते तेंव्हा हा अनुभव प्रथमच घेत असते. हा अनुभव चांगला लक्षात रहातो. मग दुसरी साडेसाती जर फ़ार वाईट गेली नाही तर लोक म्हणतात पहिली वाईट असते. वास्तवीक साडेसाती तुलना जेंव्हा हे गोचर ग्रह विशिष्ठ पद्धतीने येतात तेंव्हा जास्त कठीण असतो.

वाचकहो, पण मकर राशीच्या लोकांना तुम्ही अनुभवा. या साडेसातीत सुध्दा ते रडताना दिसणार नाहीत. हिंमतीने काम करत राहतील. यशाचे टोक गाठतील असे माझे म्हणणे नाही पण "महापुरे झाडे जाती परी लव्हाळे वाचती " या तुकाराम महाराजांच्या उक्ती नुसार ते आपली उर्जा टिकवून ठेवतील. भावनाविवश होणार नाहीत.

साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून साडेसातीत करायचा उपाय सर्वच राशींना मी शेवटी सांगणार आहे. तो पर्यंत कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीत काय फ़ळे मिळतील ते पाहू.

कुंभ रास : सशाचे पाठीवर पिंपळाचे पान पडते. ससा आभाळ पडले आभाळ पडले असे म्हणत ओरडत सुटतो. असा भेदरलेला जीव म्हणजे कुंभ रास. परमेश्वराने या शनिच्या दोन राशीमधे केवढा फ़रक केलेला आहे पहा. मकर राशीला फ़ार हुशार नाही बनवले पण कर्तव्य कठोरता, जिद्द आणि चिकाटी देऊन तारले. कुंभ राशीला उत्तम बुध्दीमत्ता, स्मरणशक्ती, विचार करण्याची शक्ती असे सगळे गुण देऊन विचाराचा गुंता मोठा दुर्गूण सुध्दा दिलाय. कुंभ रास आणि द्विस्वभाव लग्न म्हणजे मिथून, कन्या , धनु आणि मीन असे मिश्रण एखाद्याच्या वाट्याला आले तर तो कायमच निर्णय क्षमतेच्या अभावी आता काय करु असा प्रश्न इतरांना विचारत रहातो.

साडेसातीत कुंभ राशीला अनुभव येतो तो भितीचा. मी शेजारच्या मुलाला माझ्या घरी आलेला असताना केळ खायला दिल आणि त्याचे पोट बिघडले. या दोन गोष्टींचा संबंध नसताना माझ्यामुळेच हे घडले ही व्यर्थ भिती यासाडेसातीत कुंभ राशीच्या लोकांना सतावते. यासाठी यासाडेसातीत कुंभ राशीच्या लोकांनी इतर अकरा राशीच्या लोकांनी साडेसातीत काय उपाय करायला सांगणार आहे ते तर कराच. याशिवाय काही विशेष उपाय करा म्हणजे ही व्यर्थ भितीची बाधा सतावणार नाही.

मकर राशीला व्ययात गुरु येण्यामुळे होणारा त्रास तुम्हाला नाही. कारण धनु राशीत गेलेला गुरु तुमच्यासाठी चंद्राच्या कडून २०२० सालात अकरावा असेल. फ़क्त बारावा शनिच काय तो तुम्हाला मानसीक अस्वास्थ्य देऊ शकतो. असे घडू नये म्हणून आपण प्रदोष व्रत करावे. या दिवाळी अंकात मी कायमची साडेसाती हा लेख लिहला आहे त्यांनी सुध्दा महिन्यात दोनदा येणार्या प्रदोष व्रताचा अनुभव घ्यावा.

आता ज्या राशींना साडेसातीचा त्रास सुरु आहे किंवा जानेवारी २०२० पासून होणार आहे त्यांनी हा उपाय दर शनिवारी करावा.

दर शनिवारी संघ्याकाळी आपल्या गावात जर शनि मंदीर असेल तर शनिला तेल, काळे उडीद, मीठ आणि रुईच्या पानांचा हार घालून नमस्कार करावा. तसेच साडेसातीची पीडा होऊ नये साठी प्रार्थना करावी. या मंदीरात शनिचा पीडा हर मंत्र २१ वेळा म्हणावा. हा मंत्र आहे

सुर्यपुत्रॊ दिर्घ देहॊ विशालाक्ष शिवप्रिय:
मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हरतु में शनि

पीडा हरण करा या अर्थाचा हा मंत्र साडेसातीत किंवा अन्यकाळी जेंव्हा शनि पीडा असताना म्हणणे पीडा कमी व्हावी यासाठी उपयुक्त आहे. हा मंत्र साडेसातीत दररोज सकाळी अंघोळी नंतर किमान ११ वेळा म्हणावा. म्हणताना शनि शिंगणापुर येथील शनि देवताचे चित्र ध्यानासाठी घ्यावे.

कधीतरी शनि शिंगणापुरला जाऊन दर्शन करावे.

ज्या गावी शनि मंदीर नाही त्यांनी मारुतीचे दर्शन शनिवारी संध्याकाळी घ्यावे. अश्यावेळी मारुतीला प्रसन्न व्हावा म्हणून  एखादा श्लोक जरुर म्हणावा  जसे

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

प्रदोष व्रत कसे करावे एका स्वतंत्र लेखात याच दिवाळी अंकात पहा.

No comments:

Post a Comment