Sunday, October 1, 2017

मुंबई मेरी जान

मुंबई मेरी जान नावाचा सिनेमा काही वर्षांपुर्वी येऊन गेला. मुंबईत रहाणार्यांचा जीव तिथेच अडकलेला असतो. फ़ारच थोडे लोक मुंबई सोडुन दुसरेकडे स्थाईक व्हायला इच्छुक असतात. या चकाचक आणि वेगवान दुनियेत काही जिवघेण्या भिती ही दडलेल्या असतात. मुंबईत झालेले बॉम्ब स्फ़ोट असोत की त्यानंतर झालेल्या दंगली. लोक आजही त्या भितीदायक दिवस-रात्रीच्या आठवणी जागवून असतात. बॉम्ब स्फ़ोट पुन्हा होतील का या प्रश्नाचे उत्तर दहशत वादाला किती पाळे मुळे मुंबईत पसरता येतात यावर त्याची तिव्रता अवलंबून आहे. थोडक्यात हे संकट मानव निर्मीत आहे आणि त्याचे उत्तर ही मानवाकडे आहे.

२६ जुलै २००५ आणि २९ ऑगस्ट २०१७ रोजी या शहराला पावसाने झोडपले. हा प्रश्न जरी मानवनिर्मीत असला तरी तो निसर्गाच्या वर सुध्दा अवलंबुन आहे म्हणुन मला "कोणत्या मुंबईत योगावर जोरदार पाऊस पडला आ्णि पुन्हा अशी भिती मुंबईला कधी येऊ शकेल?"  यावर अभ्यास करण्याची प्रेरणा झाली. अर्थात हा अभ्यास आहे. मुंबईचे भविष्य मी वर्तवत नाही. मेदिनीय ज्योतिष शाखेचा मी विद्यार्थी नाही त्यामुळे या लेखाचा झालाच तर उपयोग काळजी घेण्यासाठी किंवा या विषयावर विस्त्रुत अभ्यास करण्यासाठी आहे.

पाऊस पडण्यासाठी खालील गृहीतके विचारात घेतली आहे.

१. पावसाच्या सिझनमध्ये पाऊस पडतो. सध्याच्या वातावरणात जुन जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस पडतो याला सरकारी भाषेत सुध्दा मोसमी पाऊस असे संबोधले आहे. अन्य काळात जरी पाऊस झाला तरी मुंबई बुडेल असा पाऊस होणार नाही.
२. पावसाच्या नक्षत्रात म्हणजे खालील नक्षत्रात जेव्हा रवि प्रवेश करतो आणि त्याचे वहान जर बेडूक, म्हैस,हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल, मोर, गाढव, उंदीर वाहन असता मध्यम पाऊस पडेल,घोड़ा वाहन असता पर्वतक्षेत्रात पाऊस पडेल आणि कोल्हा, मेंढा वाहन असता पाऊस ओढ़ लावील असे सांगण्यात आले आहे. ही वहाने पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे किंवा नाही याबाबत अंदाज देतात.
३. जर कर्क, वृश्चिक आणि मीन या जलराशीत जास्त ग्रहांची किंवा शुक्र, चंद्रासारख्या जलग्रहांचे अधिक्य असेल तर पाऊस जास्त पडतो
४. जून महिन्यात ढ्गांचे प्रमाण विस्कळीत असते. मुसळधार पाऊस जुलै किंवा ऑगस्ट महिन्यातच पडतो आणि जून महिन्यात पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते. यामुळे पाऊस पडला तरी पाणी कमी वहाते.
५. पाऊस जास्त पडेल म्हणजे त्या ठिकाणी कमी काळात रेकॉर्ड पाऊस पडेल किंवा त्या काळात सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस पडेल.

खालील कुंडली मुंबईचे सिंह लग्न गृहीत धरुन २६ जुलै २००५ या दिवसाची तयार केली आहे. सुर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश १९/०७/२००५ ला झाला तेंव्हा वाहन बेडुक होते. एका वहाना वरुन पाऊस जास्त पडेल की कमी असे वर्तवणे बरोबर असणार नाही. कारण ही परिस्थिती १३ दिवस असते. अश्यावेळी तेरा दिवस जोरदार पाऊस पडेल का ? तर नाही. ज्या दिवशी असे वहान असून जलराशीत जलकारक किंवा अनेक ग्रहांची गर्दी असेल त्या दिवशी पाऊस पडेल.



वरील पत्रिका पाहिली असता खालील गोष्टी दिसतात.

१. मुंबईच्या पत्रिकेत अष्टमस्थानी राहू आणि चंद्र यांची युती जलराशीत झालेली आहे.
२. मुंबईच्या पत्रिकेत व्ययस्थानी रवि,शनि व बुध हे ग्रह आहेत.
३. मुंबईच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी अनेक दुर्घटना आणि एकावेळी अनेकांचे अपघाती मृत्यु घडविणारा प्लुटॊ जलराशीत आहे.

यावरुन एकूण जलराशीत १२ पैकी ६ ग्रह दिसतात. यात चंद्र एकटाच जलकारक ग्रह आहे.

आता आपण २९ ऑगस्ट २०१७ ची मुंबईची पत्रिका पाहू ज्या दिवशी पुन्हा मोठा जलप्रलय झाला. या दिवशी रवि सिंह राशीत मघा नक्षत्रात होता व त्याचे वहान मेंढा होते. याचा अर्थ भरपुर पाऊस पडेल असे वहान नसताना सुध्दा जोरदार पाऊस झाला. ही परिस्थिती अनेक ग्रह जल राशीत असताना चंद्र जलराशीत गेला असता तयार होते.



१. मुंबईच्या पत्रिकेत अष्टमस्थानी मीन या जलराशीत एकही ग्रह नाही.
२. मुंबईच्या पत्रिकेत व्ययस्थानी कर्क राशीत राहू आणि रवि हे दोन ग्रह आहेत पण युतीत नाहीत.
३. मुंबईच्या पत्रिकेत चतुर्थात वृश्चिक राशीत चंद्र आणि शनि हे दोन ग्रह आहेत,

यातला कोणता ग्रह जलराशीत असताना अशी घटना घडू शकते (पावसाचे प्रमाण वाढू शकते ? ) यावर विचार केला असता.
१. दर वर्षी जुलै महिन्याच्या १५-१६ तारखेला रवि जल राशीत जातो पण दरवेळी पाऊस वाढतोच असे नाही.
२. बुध आणि शुक्र रवि पासून लांब जात नाहीत म्हणजे एखाद्या पावसाळ्यात रवि, बुध, शुक्र आणि एखाद्या दिवशी चंद्र त्यांच्या सोबत कर्क राशीत असणे शक्य आहे. असे असूनही दर दोन चार वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक मुंबईत पाऊस पडला असेही घडत नाही.
३. या दोन्ही कुंडल्यांच्या विचार केला असता दोन्ही वेळेस शनि जल राशीत होता आणि दोन्ही वेळेस राहू जल राशीत होता.
४. या दोन्ही पत्रिकात अजून एक साम्य असे आहे की दोन्ही वेळेस गुरु कन्या राशीत होता याचा काही संबंध आहे का?
५. गुरु जल राशीत दर चार वर्षांनी जातो म्हणुन तो काही जलप्रलय करत नाही कारण गुरुचे कारकत्व वाढ करणे असले तरी नुकसान करणे असे नाही. यामुळे कन्या राशीतला गुरु स्वत: काही घडवत नसला तरी २००५ च्या जलप्रलयात त्याची दृष्टी मीन राशीतल्या ग्रहांवर असल्याने काही प्रमाणात प्रलयाला जबाबदार असावा.
६. या सर्व विवेचनावरुन असे वाटते की जलकारक ग्रहाच्या बरोबर राहू असेल तर पाऊस जोरदार पडेल.



एका जुन्या ग्रंथाचा संदर्भ घेतला तर चंद्र जेव्हा अनेक ग्रहांशी जलराशीतून योग करतो तेव्हा त्या काळात जास्त पाऊस पडतो असे अनुमान वरील हिंदी ग्रंथाच्या संदर्भातून मिळते.

यावरुन असे वाटते की पुढील वर्षी म्हणजे २०१८ मधे पावसाळ्यात राहू जलराशीतच असणार आहे. त्याचा चंद्राशी योग पावसाळ्यातल्या जुलै आणि ऑगस्ट या पावसाळ्याच्या महिन्यात होणार आहे. जर याच वेळी अनेक ग्रह जलराशीत असतील तर मोठाच पाऊस मुंबईत पडे.

सामान्य माणसाला काही भोगावे लागेल की नाही याचे उत्तर त्याच दिवशी भरती आहे किंवा रविवार सारखा सुट्टीचा दिवस नसून कामाचा दिवस असेल तर मात्र हे घडेल. आपण पाहू या संभाव्य तारखा.

१. जुन २०१८ मधे १६ व १७ ला चंद्र, शुक्र व राहू कर्क राशीत फ़क्त तीन ग्रह जलराशीत असल्याने पाऊस थोडा जास्त असेल.
२. जुलै २०१८ मधे १४ व १५ तारखेला चंद्र, बुध व राहू कर्क या जलराशीत तीन ग्रह असतील त्यामुळे पाऊस जास्त पडेल.
३. ऑगस्ट २०१८ मधे १० व ११ तारखेला चंद्र रवि बुध आणि राहू असे चार ग्रह कर्क या जलराशीत असतील इथे थोडा जास्त
   पाऊस अपेक्षीत आहे. रवि चे नक्षत्र आश्लेषा आहे व त्याचे वहान ( कोल्हा ?) असल्याने ढगांची उत्पत्ती फ़ारशी नाही.

या नंतर २८ नोव्हेंबर २०२३ ला राहू मीन या जलराशीत प्रवेश करतो त्या वर्षीच्या पावसाळ्यात इतर ग्रहांची काय परिस्थिती आहे ते पाहू.

१. जून महिन्यात फ़क्त चंद्र आणि राहू जलराशीत आहेत. असे तीन वेळा घडेल पण फ़ारसा पाऊस नसेल.
२. ७ व ८ जुलै २०२४ ला चंद्र, बुध आणि शुक्र कर्क या जल राशीत तर राहू या मीन राशीत असेल तेव्हा पाऊस जास्त पडेल.
३. १७ व १८ जुलै २०२४ ला चंद्र, बुध, शुक्र व रवि हे कर्क राशीत तर नेपच्युन व राहू मीन राशीत आहे अश्याही वेळी जास्त पाऊस पडेल.
४. २६ व २७ जुलै २०२४ ला शुक्र व रवि हे कर्क राशीत तर चंद्र व राहू व नेपच्युन मीन राशीत अशी असाधारण परिस्थिती असेल.
या दिवशी रवि पुष्य नक्षत्रात असेल. रविचा पुष्य नक्षत्रातला प्रवेश १९ जुलैला असेल व वहान बेडूक असेल. याचा अर्थ पाऊस जास्त पडेल
अशी स्थिती जुलै महिन्यात याच तारखेला असेल.

माझ्या मते जेव्हा राहू आणि चंद्र एकत्र असतात ते जास्त प्रभावी असतात. २६ जुलै २००५ ला असे ग्रहमान होते. चंद्र व प्लुटोचा केंद्रयोग २७ जुलै २०२४ ला आहे. हा एक अशुभ योग मानता येईल.

आता या तारखांना भरती आहे का हे तपासण्याची गरज आहे. नेटवर शोधले असता पुढील काही वर्षातल्या काही तारखांना  भरती असेल का ? हे शोधण्याचे टेबल काही सापडले नाही.

या शोध निबंधाचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.

१. २०१८ साली तरी किमान मुंबई जलमय होण्याचा धोका दिसत नाही.
२. हा धोका २०२४ सालच्या पावसाळ्यात होऊ शकतो.
३. २६ व २७ जुलै २०२४ हे ते संभाव्य दिवस असतील ज्या वेळी मुंबई जास्तच जलमय होऊ शकते.

घाबरुन जाण्याचे कारण नाही. मुंबईने २६ जुलै २००५ नंतर खुपच मोठा बोध घेतला आहे.  या वेळी २४ तासात ९४४ एम एम पाऊस पडला होता. या दुर्घटनेत १०९४ लोकांना प्राण गमवावे लागले होते. वीत्त हानी ही मोठी होती.

२९ ऑगस्ट २०१७ च्या घटनेत १२ तासात ४६८ एम एम पाऊस पडला जो सहसा ऑगस्ट महिन्यात इतका पडत नाही. २१ लोकांना ह्यात प्राण गमवावे लागले यात बिल्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेची जोड आहे. मुंबई या वेळेला सावध होती. अनेकांनी ऑफ़सच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अचानक येणारी संकटे कमी झाली. दुर्घटनापासून बचाव करणारी पथके रोडवर होती.

२०१७ ते २०२४ ह्या काळात नेमका कोणता भाग जास्त जलमय होतो ते शोधून त्या भागात  काही बचावात्मक यंत्रणा उभी करता आली तर ह्या लेखाचा उपयोग होईल. लोकशिक्षणाचा वापर करुन इशारा मिळेल तेंव्हा लोकांना रस्त्यावर येण्यापासून थांबवण्यात आले तर इतकीही मनुष्य हानी न होता ह्या संकटातून बाहेर पडता येईल असे वाटते. जपान मधे भुकंप कायमच होतात या साठी लोकशिक्षणाचा परिणामकारक उपयोग करुन दुर्घटनामधून होणारी मनुष्यहानी टाळण्याचे शिक्षण शाळेपासूनच दिले जाते. या पासून आपणही भारतात शिकायला हवे.

शुभ तेच घडावे. अशुभ मनुष्याने प्रयत्नाने टाळावे हाच ज्योतिषाचा उपयोग आहे हा विचार सांगून लेखनसीमा.

No comments:

Post a Comment