राशी भविष्य लिहून ते ब्लॉगवर प्रसिध्द करायला लागल्याला वर्ष पुर्ण होत आहे. या निमीत्ताने काही नविन संकल्पाचे मनात आहे. फ़ेस बुक वर जसा नक्षत्रप्रकाश ज्योतिषविषयक नविन समूह मागील महिन्यात सुरु झाला आहे. याचे सदस्य होण्यासाठी ही लिंक घ्या https://www.facebook.com/groups/npastrogroup/ राशीभविष्य दरमहिन्याला प्रसिध्द झाले की त्याची माहिती या फ़ेसबुकच्या नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर आपल्या मिळणारच आहे.
मागच्या महिन्यात मुंबई शेअर मार्केटने उच्चांक नोंदवला होता. करेक्षन होऊन हा निर्देशांक स्थिर ही झाला असेल. काही तात्कालीक कारणे अशी घडतील की निर्देशांक पुन्हा खाली येईल असा. शेअर बाजारात बुध वक्री झाला की निर्देशांक खाली येतो. असा अनुभव आहे त्यामुळे १३ ऑगस्ट पुर्वी आपली पोझीशन आधीच तपासुन घ्या. बुध वक्री झाल्याचे बरेच परिणाम कमोडीटी मार्केटवर सुध्दा पडतात असाही अनुभव आहे.
१५ ऑगस्टला लाल किल्यावरुन भाषण होताना प्रधानमंत्री नविन संकल्प करतील त्यामुळे राजकारणाला नविन दिशा मिळेल. मागील वर्षीच्या भाषणात पाकिस्थान मधे बलुचिस्थानच्या स्वतंत्र होण्याचा उल्लेख केला गेला आणि त्यामुळे पाकिस्थानला ते झोंबले असेल. यामुळे ह्या भाषणानंतर काश्मिरमधला पाकिस्थानी कारवायांचा वेगही वाढला आहे. यावर्षी मोदीजी अजुनही काही बोलतील. सिंह या स्वत:च्या राशीत रवि गेल्याने ही डरकाळी येणे स्वाभाविक आहे. त्याचे परिणाम जेव्हा मंगळ -हर्षलचा प्रतियोग होईल तेव्हा दिसेल. ३० नोव्हेंबर पासुन हे दिसेल.
ऑगस्ट महिन्यात २५ तारखेला गणेश चतुर्थी आहे. ही बुध्दीची देवता आहे. ज्यांना असे वाटते की जन्मत: आपल्याला बुध्दीचे वरदान नाही त्यांनी किमान दीड दिवसाचे हे व्रत करावे. गणेश पुराणात या व्रताचे वर्णन दीड दिवसाच्या व्रताचेच आहे. आता बुध्दीप्रामाण्यवादी किंवा विज्ञानवादी म्हणतील की बुध्दीची वाढ वय ८ ते १० नंतर थांबते पण बुध्दीचा वरचा स्तर ज्याला प्रज्ञा असे म्हणतात तो योगाभ्यासाने किंवा ईश्वरप्रणिधानाने जागृत होतो असे सुत्र " योगसुत्र" ह्या पतंजली महामुनींच्या ग्रंथात आहे. " विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धन, पुत्रार्थी लभते पुत्रा, मोक्षार्थी लभते गतीं " असे सुत्र सांगताना सहा महिन्याच्या उपासनेने हे सर्व मिळते संशय घेऊ नका असे स्त्रोत्र कर्ते सांगतात. माणसाला अजुन काय हवे ? श्री गणपती अथर्वशिर्ष हे तर एक उपनिषद आहे. यावर भाष्य करणे माझा अधिकार नाही. हे लिहायचा उद्देश्य इतकाच की अनुभव घेतला नसेल तर ह्या गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची घरी स्थापना करा. ज्याच्या घरी गणेश पुजा होते त्याला वर उल्लेखलेले सर्व लाभते. ही उपासना श्रध्देने करावी.
आता ऑगस्ट महिन्याचे राशीभविष्य पाहू.
मेष रास: अश्विनी नक्षत्रावर जन्म असलेल्या व्यक्तींना आई संदर्भात एखादी घटना या महिन्यात चटका लावेल. प्रकृती बिघडेल. राशीचा मालक मंगळ नीच राशीत बसल्यामुळे नेहमी मिळणारे हुकमी यश या महिन्यात मिळणार नाही. शत्रु कुरघोडी करतील. हा महिना शत्रुचा आहे असे समजा. शत्रुला धाडसाने प्रतिकार करु नका. नोकरी व्यवसायात तुमच्या हितशत्रुच्या कारवाया सोडता, व्यवसाय वृध्दीच्या दृष्टीने महत्वाचे घडणार नाही. किंबहुना अडचणी तशाच राहतील. महिनाभर वहाने हळु चालवा. वीजेशी खेळु नका. महिलांना बहिणी माहेरवाशीणी श्रावणात भेटुन आनंद होईल.
वृषभ रास : या महिन्यात काही जास्त रक्कम हाती येईल ती व्यवस्थित गुंतवा हे सांगण्याची गरज वृषभेच्या लोकांना नसते. भावंडे या महिन्यात कशी वागु शकतात याचा नमुना पहायला मिळेल. मुलांकडे या महिन्यात जरा लक्ष देऊन त्यांचे बरोबर चालले आहे ना हे पहा. भेळ-पुरी, वडा-पाव सारखे बेत या महिन्यात वारंवार येतील पण पावसाळी हवेत त्याचा अतिरेक होऊ देऊ नका अन्यथा अरोग्य बिघडेल. जोडीदाराच्या मानसीक स्वास्थाची या महिन्यात काळजी घ्या.
मिथुन रास: या महिन्यात महिला असाल तर जरा जास्त काळ आरश्यासमोर असाल. या निमीत्ताने पुरुषांना यावर विनोद करायचे सुचेल. लिखाण पुर्ण करायचे असल्यास १३ ऑगस्ट पर्यंत संपवा. बुध वक्री झाल्यावर सुचेलच असे नाही. कर्केचा मंगळ कुटुंबात कपात वादळे आणेल. बुध्दीमत्ता वापरुन अशी वादळे थांबवण्याचे कौशल्य तुमच्या कडे आहेच. दिर्घकाळ असलेले एखादे दुखणे महिनाभरात मोठे होणार तर नाहीना या कडे लक्ष द्या.
कर्क रास : या महिन्यात नोकरी/व्यवसायात तुम्हाला नको असलेला संघर्ष करायचे बळ येईल. यामुळे आर्थिक नुकसान होत नाही ना या कडे पहा. महिनाभर मनस्ताप आहेच पण ७ आणि ८ ऑगस्टला परमवधी आहे असे या महिन्याचे चित्र आहे. लहान भावंडे असतील तर त्यांचे या महिन्यात काहीतरी प्रश्न निर्माण होतील आणि तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
सिंह रास : राशीचा मालक रवि १६ तारखेपर्यंत अनुकूल नाही. यानंतर मात्र महिनाभर तुम्हाला बळ मिळत आहे. वर्षातून एकदाच राशीचा मालक राशीत आल्याने तुम्ही सिंहगर्जना करुन सर्वांना आपले स्थान दाखवून द्याल. कर्क राशीत मंगळ ही महिनाभर तिथेच मुक्काम ठोकून आहे. त्यामुळे मनासारखे घडणार नाही. पण नाराजी व्यक्त करायला योग्य काळ १६ तारखेनंतरच आहे. १३ तारखेपर्यंत पैशाची आवक मात्र समाधानकारक राहिल इतकाच काय तो दिलासा. २१ तारखेनंतर खर्चात वाढ होणार आहे पण सिंह राशीच्या मालकाला खर्चाची चिंता नसते.
कन्या रास: कन्या रास आधीच निर्णय घ्यायला कमकुवत असते. त्यात राशीचा स्वामी आणि कर्म स्थानाचा स्वामी सिंह राशीत असल्यावर मती कुंठीत होईल. शेअर मार्केट मधली गुंतवणुक तपासुन योग्य निर्णय घ्या. तुमचा सल्ला आजवर उत्तम समजला जायचा त्याकडे दुर्लक्ष होईल. यात तुमचा काय दोष आहे ? १३ तारखेनंतर नेमके शब्द सुचणार नाहीत असे ग्रहमान आहे. कुटुंबातल्या एखाद्या महिला व्यक्तीसंदर्भात भाग्यकारक घटना घडेल ही ह्या महिन्याची चांगली बाजु आहे.
तुळ रास : हा महिना तुम्हाला चांगलाच जाणार आहे. नोकरी /व्यवसायात जरा संघर्ष असेल पण कधी ज्याचा मागमुस नाही अश्या संधी चालून येतील. २३ ऑगस्ट नंतर त्यावर प्रत्यक्ष काम सुरु होईल. या महिन्यात तुम्हाला काही अधिकारही चालून येतील. त्याच बरोबर काही नको असलेला त्रास ही आहे. व्यावसायीकांना आवक चांगली राहील. वैवाहीक जोडीदाराचे मन कसे ओळखायचे आणि त्याची नाराजी कशी दुर करायची यावर मी काय तुम्हाला मार्गदर्शन करणार ?
वृश्चिक रास : जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गुप्त गाठी भेटी ची संधी चालून येईल आणि काही खलबते होतील. हा तुमचा स्वभाव आहे आणि अस्त्रही आहे. या महिन्यात मात्र डाव यशस्वी होणे कठीण आहे. १६ ऑगस्टनंतर मात्र तुम्हाला अपेक्षीत घडेल. दशमात बलवान रवि आल्याने १६ ऑगस्ट नंतर महिनाभर नोकरीत तुम्हाला काही खास अधिकार मिळतील. तुमचे वरिष्ठ ही तुम्हाला " तु सांग तसे करु " असे म्हणुन मान देतील. एखादी अनेक वर्षे न पुर्ण झालेली मागणी ह्या अधिकारात मागुन घ्या.
धनु रास : महिना जरा रोमॅन्टीकच असेल. पुरुष असाल तर हा अनुभव लक्षात राहील कारण धनु राशीची व्यक्ती काही अगदीच अरसिक नसते. १३ तारखे पर्यंत उत्तम कार्यसिध्दीचे योग आहेत. आपले मित्र आणि शत्रु देखील मदत करतील. पुरुष असाल तर स्त्रीया आपल्या मदतीला येतील असे ग्रहमान आहे. नविन व्यावसायिक प्रस्ताव येतील. संततीची किंचीत चिंता निर्माण होईल.
मकर रास : जोडीदाराबरोबर काही मतभेद होतील पण फ़ार काळ टिकणारे नाहीत. दिर्घ काळ प्रयत्न करुन एखादे अपेक्षीत यश या महिन्यात हातचे जाईल. आज ना उद्या तुम्ही ते परत मिळवणार हा तुमचा स्वभाव आहे पण या महिन्यात जरा निराशा येईल. महिनाभर आरोग्याकडे लक्ष द्या. किंचीतही प्रकृतीत झालेले बदल नजरेआड न करता वैद्यकीय सल्ला घ्या. काट्याचा नायटा व्हायला नको. शैक्षणीक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीना महिना अखेरीला एखाद्या अपेक्षीत गोष्टीचे फ़ळ मिळेल.
कुंभ रास : महिना सुखाचा असल्याचा भास होईल. मागील महिन्यात जर काही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असतील तर ते सुटतील . रोजचेच प्रवास सुखदायक असतील असे या महिन्यात जाणवेल. लांबचा प्रवासही घडण्याची शक्यता आहे. आपण काय लिहितो कशावर सही करतो या कडे दुर्लक्ष नको की तुमच्या नको त्या ठिकाणी लिहण्याने , सही करण्याने काही आफ़त ओढवेल. या करिता कितीही इच्छा झाली तरी फ़ेसबुक व व्हॉट्स अप वर लुज कमेंट नको.
मीन रास : महिनाभर सुखशय्या मिळणार आहे. सुख स्थानी असलेला शुक्र तुम्हाला अनेक सुख या महिन्यात देणार आहे. याचा अर्थ असा की सुखाची साधने असली तरी अनेकांना सुख अनुभवायला वेळ नसतो अशांना नक्कीच उसंत आहे. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. काहींना परदेश गमनाचे योग आहेत. काही लोकांच्या बाबतीत या महिन्यात काही महत्वाचे घडणार नाही याचा अर्थ विचारच करायचा नाही असे नाही. हा काळ प्लॅनिंग साठी उपलब्ध आहे. आराखडे तयार करा.
शुभंभवतु
No comments:
Post a Comment