Saturday, January 13, 2018

१४ जानेवारी २०१८ ते १२ फ़ेबृवारी २०१८ पर्यंतचे राशीभविष्य

दर महिन्यात जेंव्हा रवि आपली राशी बदलतो तो महिना गृहीत धरुन मी राशीभविष्य लिहतो हे आता ज्योतिष प्रेमींना माहित झाले असेल. १४ जानेवारी रोजी रवि मकर राशीत प्रवेश करतो. दर महिन्याला हा रविचा राशीप्रवेश साधारणपणे १३-१४-१५ तारखांना होतो हे गृहीत धरुन मी राशीभविष्य १० तारखेपर्यंत प्रसिध्द करतो. यामहिन्यात ज्योतिष वर्गाची नविन बॅच १४ जानेवारी २०१८ ला सुरु होत असल्याने राशीभविष्याला विलंब झाला. ज्योतिष वर्गाविषयीची माहिती या लिंकवर पहा. http://gmjyotish.blogspot.in/2017/12/blog-post_22.html


या महिन्यापासून राशीभविष्य लिहण्याच्या पध्दतीत थोडा बदल असणार आहे. आपण मला लिहून कळवा की हा बदल तुम्हाला कसा वाटतो ?

सामान्य माणुस भविष्यातून काय पहातो ? एकतर पैसे आवक ठिक असेल ना आणि नातेसंबंध ठिक असतील ना ? नाते संबंध म्हणजे दरवेळी आई-वडील, भाऊ -बहिण, वैवाहीक जोडीदार आणि मुले इतकाच भाग नसतो तर नोकरी व्यवसायातले आपले सहकारी, वरिष्ठ आणि कनिष्ठ सुध्दा आपले जीवन आनंददायी किंवा कटु करु शकतात. तुमचे वरिष्ठ म्हणजे नोकरीतील बॉस आणि व्यवसाय करत असाल तर आपले ग्राहक हेच आपले वरिष्ठ. कनिष्ठ म्हणजे आपण अधिकारी असाल तर आपल्याला रिपोर्ट करणारे किंवा घरगुती स्वरुपात सेवा देणारे यांना कनिष्ठ संबोधता येईल.

हे राशी भविष्य जसे चंद्र राशीकडून पहावे तसेच ते लग्नराशीकडून देखील पहावे व अनुभवावे.

आपण राशीभविष्य पाहू

मेष राशीच्या लोकांना जर लहान भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांच्या बाबत चांगली बातमी येईल. आजवर तुमची भेट घ्यायला ते टाळत असतील तर आत्ता ते प्रयत्नपुर्वक २७ जानेवारीनंतर भेटतील.  हाताखालचे लोक किंवा सेवेदार सुध्दा आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत.  आपला वैवाहिक जोडीदार या महीन्यात नोकरी व्यवसाय या मध्ये व्यस्त असेल. एकंदरीत आपले जोडिदाराबरोबर काही आनंदाचे क्षण जमून येतील इतकी उसंत या महिन्यात नाही. आपले वरिष्ठ  यांच्या बाबतीत फ़ारसे वेगळे काही घडणार नाही. आपली मुले देखील काहीतरी चमकदार कामगिरी करतील. एकंदरीत नातेसंबध स्तरावर महिना चांगला असेल.

नोकरदारांना वेळच्या वेळी पगार मिळत असतो. व्यावसायीकांना येणे असेल तर ६ फ़ेब्रुवारीपर्यंत देणेकरी झुलवत ठेऊ शकतो हे गृहीत धरुन नियोजन केलेले बरे.

वृषभ राशीच्या लोकांना आपल्या जोडादाराच्या बाबतीत जानेवारी महिन्यात संघर्षाची स्थिती आलेली असेल तर या महिन्यात तशी असणार नाही. तुम्ही अधिकारी असाल आणि गेले २ -३ महिने हाताखालचे लोकांनी असहकार केला असेल तर आता परिस्थिती बदलेल. हेच लोक तुमच्या वरिष्ठांकडे तुमची प्रशंसा करतील. यामुळे वरिष्ठ खुष होतीलच असे नाही पण नाराजी असेल तर कमी होईल. मुलांच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर २७ जानेवारीनंतर ते सुटतील.  बाकीच्या नातेसंबंधाबाबत फ़ारसे वेगळे काही घडणार नाही. आपलाही महिना नातेसंबंध स्तरावर बरा असेल.

खर्च कमी झाले म्हणजे उत्पन्न वाढल्यासारखे आहे असा अनुभव २७ जानेवारीनंतर अनावश्यक खर्च नियंत्रणात आल्याने येईल. व्यावसायीकांना फ़ार मोठे उत्पन्न येईल असे नाही. नेहमीचे व्यवहार सुरु राहतील.

मिथून राशीच्या लोकांना अधिकारी असाल तर हाताखालचे लोक गुप्त कारवाया करुन तुमची झोप उडवतील. तुमचे मित्र वाटणारे सहकारी त्यांना साथ देतील.  ते जास्तीत जास्त काय करतील याचा आढावा घेऊन ठेवा. यासगळ्या प्रकाराने तुमचे वरिष्ठ अडचणित येणार नसतील  तर ते आपली साथ देतील.  भावंड आजारी असेल तर ती चिंता दुर होईल. मुलांचे  होणारे कलाप्रदर्शन इतकेच काय ते चांगले ह्या महिन्यात दिसेल.

या महिन्यात आवक वाढेल असे नाही पण आवक पेक्षा खर्चाचे प्रमाण वाढलेले दिसेल. यात अचानक आलेले खर्च असतील. यासाठी आत्ताच तरतूद करुन ठेवा. आपले प्लॅनिंग चांगले असेल तर संकटावर मात करणे सोपे होते.

कर्क वैवाहीक जोडीदार याच्यासोबत एखादा सिनेमा पहाणे किंवा हॉटेलमधील जेवणाचा आस्वाद घेणे असे सुखद प्रसंग नक्कीच आहेत.  भावंडे कटू बोलली तरी २७ जानेवारीनंतर ही कटूता कमी होईल. नोकरी-व्यवसायातले आपले कनिष्ठ आणि वरीष्ठ यांच्या स्तरावर काय चालले आहे ह्या बाबत जरा चाचपणी करा. मागील महिन्यात या दोघांनी एकत्र येऊन आपल्या विरुध्द षडयंत्र केलेले असेल तर आता वातावरण निवळेल. मुलांच्या बाबतीत फ़ारसे मनावर घेऊ नका.

व्यावसायीक असाल तर एक मोठे डील फ़ेबृवारी महिन्याच्या ६ तारखेपर्यंत येणार आहे. लगेच काही नविन व्यवसायाचे उत्पन्न येते असे नाही पण हालचाली तर नक्कीच सुरु होतील.

सिंह राशीला महिनाभर वरिष्ठ तुम्हाला घरी काही सुख लाभू देतील असे वाटत नाही. घरी असताना सुध्दा फ़ोनवरुन काहीतरी अपमानास्पद बोलून आपली झोप उडवतील. महिनाभर वरीष्ठांचे चमचे काही तरी चुकीचे बोलून आपल्याला अडचणीत आणतील. मित्र वाटणारे सहकारी सुध्दा संशयास्पद भुमिका घेतील. भावंडे खास करुन लहान बहीण असेल तर ती रुसली आहे असे महिनाभरात कधी तरी घडेल.  वैवाहीक जोडीदार तुमच्या मनस्तापात भर घालणार नाहीत हे मात्र नक्की. असा एकंदरीत नातेसंबंध स्तरावर संमिश्र वातावरणाचा महिना असेल.

व्यावसायीकांना  काही येणे असेल तर २७ जानेवारी पुर्वी सतत फ़ॉलोअप करुन मिळवा. खास करुन एखादे येणे जर उशीर झाला तर मिळणार नसेल किंवा ती व्यक्ती शब्द फ़िरवेल असे वाटत असेल तर अश्या वसूलीला २७ जानेवारीपुर्वी जमा करुन घेण्याला प्राधान्य द्या.

कन्या राशीला  या महीन्यात भावंडांशी जुळवूनच घ्यावे लागणार आहे. हाताखालचे लोक फ़ारसे त्रासदायक नसतील . वरिष्ठ तुमचा सल्ला घेतील. ही परिस्थिती जरा नाजूक असते तेव्हडी कुशलतेने हाताळा. वरिष्ठांच्या फ़ार पुढे किंवा मागे असून चालत नाही. त्यांनी सल्ला मागीतला म्हणजे आपण फ़ार मोठे झालो असे नाही.

अजून विवाह झाला नसेल तर रोमान्स ला ग्रहण लागेल. लगेच ब्रेक अप होत नाही हे खरे. पण काहीतरी बिनसलय हे जाणवेल. या ठिकाणी हम मुश्ताक है वो बेजार हा शेर आठवावा अशी परिस्थिती आहे.  विवाह झाला असेल तर तिकडे जैसे थे असेल. म्हणजे रोमान्स  नसेल पण भांडणेही नक्कीच नसतील. ही केवळ नाराजी असेल.

कन्या राशीचे लोक फ़ारसे व्यावसायीक नसतात. त्यांना व्यावसायीक तेजी किंवा मंदी फ़ारशी झेपत नाही. आपली नोकरी करावी आणि गुजराण करावी असे साधे लोक असतात. प्लॅनिंग जबरदस्त असते. नाही म्हणायला शेअर मार्केटचा तुमचा अभ्यास बरोबर असतो. पण डेरिंग नसते. यावेळेला डेरिंग करुन पहा. ६ फ़ेब्रुवारीच्या आत पोझीशन क्लिअर करा. जास्त रिस्क नको.

तूळ राशीला वैवाहीक जोडीदार जरा तिखट बोलून तुम्हाला हर्ट करेल. काय करणार त्यांचा स्वभाव आहे. आपल्याला ही परिस्थिती कशी हाताळायची याचे चांगले कौशल्य आहे.  भावंडे तुमच्या शब्दाबाहेर नसतील. हाताखालचे किंवा वरीष्ठ , मुले यांच्या सर्वांच्या स्तरावर सर्वकाही ठिक असेल. नोकरी व्यवसायात काही लहान प्रवास मागे लागले असतील तर २७ जानेवारी नंतर थांबतील. २७ जानेवारी ते ६ फ़ेबृवारी कुशल मंगल असल्याचे जाणवेल.

व्यावसायीक असाल तर आर्थिक स्तरावर फ़ारसे काही घडताना दिसणार नाही. आराम तरी कधी करणार ? घ्या जरा निवांत झोप.

वृश्चिक राशीला भावंडे अबोला धरतील. मुलांच्या खर्चाला ब्रेक लागेल अशी परिस्थिती नाही. नोकरी/व्यवसायात हाताखालचे लोक गुप्त कारवाया करत असतील तर या महिन्यात तुम्ही आक्रमक पणे त्यांना अडवाल. कनिष्ठ तुमच्याच शाळेत शिकलेले असतील त्यामुळे त्यांचा रोख नक्की तुम्हाला कळेल. वरिष्ठ अचानक पवित्रा बदलून अडचणीत आणतील. वैवाहीक जोडीदार काय तो तुमच्याशी प्रेमाने वागेल असे महिनाभर वातावरण आहे.

या महिन्यात आलेले पैसे योग्य जागी गुंतवण्याच्या संधी येतील. २७ जानेवारी पुर्वी हे काम लक्षपुर्वक संपवा. एकदा हातात आलेले पैसे गुंतवले नाहीत तर त्याला वाटा फ़ुटतील.

धनु राशीला भावंडांशी सुसंवादाच्या संधी येणार आहेत. जर काही तातडीचा नसलेला पण महत्वाचा संवाद साधायचा असेल तर  जरुर करा.या महिन्यात मुले खर्च वाढवणार आहेत तर क्वचित चिंताही करायला लावतील. मुले तरुण, धाडशी असतील तर जरा जास्त लक्ष द्या. यावर नियंत्रण कसे करायचे याचा आधी विचार करा. आपल्या ऑफ़ीसमधले हाताखालचे लोक काही तरी कारण काढून घरच्या व्यक्तींशी संपर्क करतील.  वरिष्ठ ही याला साथ देतील. ऑफ़ीसच्या लोकांना घरी बोलावण्याची संधी हवी असेल तर चांगले प्लॅनिंग करा. आपले सर्वांशीच संबंध चांगले होतील.

या महिन्यात तुम्हालाही गुंतवणूकीची संधी आहे. काही सरकारी योजना जसे पीपीएफ़ ची गुंतवणुक असेल किंवा अन्य योजना यांचा विचार करा. गुंतवणुक चांगली झाली तर ते एक प्रकारे उत्पन्नच असते.

मकर राशीला सुदैवाने भावंडांची सध्या प्रगती असल्याने ती चिंता नाही. तुमचा जोडीदार सहसा तुम्हाला अडचणित आणत नाही. मुलांच्या स्थितीत फ़ारसा फ़रक पडणार नाही.  कनिष्ठ म्हणजे तुम्हाला सेवा देणारे आणि वरिष्ठ यांची मानसीकता चांगली असल्यामुळे महिनाभर ह्या स्तरावर काही तणाव नाही. नुकत्याच सुरु झालेल्या साडेसातीच्या पार्श्वभुमीवर हा महिना तरी त्रासदायक असणार नाही.

या महिन्यात आपल्याला शेती/प्रॉपर्टी इ अन्य मार्गाने उत्पन्न सुरु होईल. एखादी प्रॉपर्टी भाडेकरार करुन देण्याच्या विचारात असाल तर योग्य पर्याय आहे.

कुंभ राशीला भावंडे सोडता  वैवाहीक जोडीदार असो की मुले असोत, तुम्हाला सेवा देणारे असो की वरिष्ठ; सर्वच स्तरावर तणावाची परिस्थिती असेल. कुणाची तब्येत बिघडेल तर कोणी तुमच्यावर नाराज होईल. बुध्दीमत्तेच्या जोरावर तुम्ही हे सर्व मॅनेज कराल. बुध्दीमत्ता अनेक प्रकारची असते. जे मुळात बुध्दीमान असतात त्यांना भावनीक स्तरावरचे प्रश्न कसे हाताळावेत याचे उत्तम ज्ञान असते. या पैकी कुंभ रास आहे. महिन्याचा सुरवातीला ही स्थिती असली तरी ही परिस्थिती उतरार्धात नियंत्रणात येणार आहे त्यामुळे काळजी घ्या पण अनावश्यक काळजी करु नका.

या महिन्यात अठन्नी आमदनी खर्चा रुपया असे वातावरण आहे. अनावश्यक खर्चाने बेजार होणार आहात. याची तरतूद आधीच करा.

मीन राशीला या महिन्याच्या सुरवातीपासून भावंडे आपल्याला सहकार्य करतील. एखाद्या महत्वाच्या कागदपत्रांवर सही हवी असेल तर उत्तम संधी आहे. हाताखालचे लोक मनापासून सहकार्य महिनाभर करणार आहेत त्यामुळे ऑफ़ीसचे एखादे महत्वाचे रेंगाळलेले काम पार पाडा. वरिष्ठ त्यांच्या व्यापात असतील त्यांचा फ़ारसा त्रास नसेल. मुले किंवा वैवाहीक जोडीदार सुध्दा आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत त्यामुळे महत्वाच्या योजना आखा.

व्यावसायीक असा किंवा नोकरदार या महिन्यात अनेक मार्गांनी जास्तीचे पैसे येणार आहेत. त्याचे काय करायचे याचा विचार करुन ठेवा.


1 comment:

  1. वृष्चिक रास- वरिष्ठांनी पवित्रा बदलून अडचणीत आणले आहे,जोडीदार प्रेमाने वागत आहे , धन्यवाद सर प्रत्येक महिन्याच भविष्य जुळतात...

    ReplyDelete