Wednesday, November 14, 2018

१६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २९१८ या कालावधीचे राशीभविष्य आणि कार्तिक स्वामी दर्शन.

नमस्कार ज्योतिषप्रेमी लोकहो. घेऊन आलो आहे १६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २९१८ या कालावधीचे राशीभविष्य आणि कार्तिक स्वामी दर्शन.



या महिन्यात येणारी पोर्णिमा कार्तिकस्वामी दर्शनासाठी उत्तम दिवस समजला जातो. कार्तिकस्वामी ह्या देवतेचे दर्शन आवर्जून दररोज घेण्याचा प्रघात महाराष्ट्र आणि त्यावरील राज्यात नाही. महाराष्ट्रात कार्तिकस्वामींचे दर्शन कार्तिक पोर्णिमेला घेतले जाते. संपुर्ण दिवस हा ह्या दर्शनासाठी योग्य मानला जात नाही तर पोर्णिमेच्या दिवशी जेंव्हा कृतिका नक्षत्र असते तो कालावधी कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी उत्तम मानला जातो. कार्तिकस्वामी अर्थात कार्तिकेय म्हणजेच पुराणात ज्यांना शंकर पार्वतीचा जेष्ठ पुत्र व गणपतीचा मोठा भाऊ ह्या देवतेच्या दर्शनाने वर्षभर आर्थीक संकटे सतावत नाहीत असा हा उपाय आहे. यामुळे जे कर्जबाजारी आहेत. कर्जाने त्रासले आहेत किंवा ज्यांना अर्थिक व्यवस्थापन निटसे जमत नाही त्यांनी आवर्जून कार्तिक स्वामींचे दर्शन २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजून ५० मिनीटानंतर घ्यावे. कार्तिक स्वामींचे दर्श २३ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेपर्यंत आपण घ्यावे. ही पुजा कशी करावे याचे वर्णन दातेपंचाग शके १९४० मधे पान २५ वर आहे. मंत्र पठणाने विधीवत केलेली पुजा जास्त लाभदायक असते.

 कार्तिकस्वामींना मोरपीस अर्पण करण्याची पध्दत आहे. या साठी २२ तारखेपर्यंत वाट न पहाता जेंव्हा मिळेल तेंव्हा ते घेऊन ठेवावे कारण त्या दिवशी मोरपीसाला सुध्दा खुप पैसे मोजावे लागतात.
आपण जवळच्या कार्तिक स्वामींच्या मंदीरात जाऊन पुजा करावी. जिथे मंदीर नाही अश्यांनी वरील प्रतिमा व्यवस्थित स्थापन करून पुजन करावे. अगदीच शक्य झाले नाही तर स्मरण करावे.


वरील पॅरेग्राफ़ वाचल्यावर अनेक लोक असे म्हणतील की वर्षभरात एकदा दर्शन घेऊन काही काम धंदा न करता पैसे कसे येतील. मलाही तेच म्हणायचे आहे. काम धंदा /नोकरी तर करायलाच पाहीजे. परंतु या दिवशी कार्तिक स्वामींची पुजा केल्यानंतर अजून पैसे कोणत्या मार्गाने सहज, बुध्दीचा किंवा कष्टाचा किंवा दोन्हींचा वापर करुन मिळवावेत याचा मार्ग सापडू शकतो. कोणतिही पोर्णिमा शुभ असते. शुभ असते याचा अर्थ त्या दिवशी मानसीक स्थिती उत्तम असते. या दिवशी पुजा झाल्यावर सहज मन एकाग्र होऊ शकते व चिंतनातून अर्थप्राप्तीचा एखादा नविन मार्ग सापडू शकतो किंवा आपण करणार आहात ती गुंतवणूक चुकीची तर नाही याचे ज्ञान झाल्याने आपण आर्थीक संकटात पडणार असाल तर त्यापासून मुक्तता मिळू शकेल.

आता पाहू या १६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या वृश्चिक राशीत रवि महिनाभर असलेल्या महिन्याची इतर ग्रहांची स्थिती आणि या महिन्याचे राशीभविष्य



१६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ काळाची चंद्र सोडून ग्रहस्थिती पाहीली असता जो तो ग्रह आहे त्याच राशीत या काळात रहातो.

या महिन्याच्या सुरवातीला   गेले दीड महिना वक्री असलेला शुक्र मार्गी् होणार असून तो स्वत:च्या तूळ राशीत राहून उत्तम फ़ळे देणार आहे. बुध या महिन्याच्या सुरवातीलाच १७ नोव्हेंबरला वक्री होणार असून तो ७ डिसेंबरला मार्गी होईल. याचे शेअर बाजारात दिसती.
गुरु सुध्दा १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात अस्तंगत असल्यामुळे याचे ही परिणाम म्हणून विवाह विषयक बोलणी पुढे जाणार नाहीत. कर्जे किंवा आर्थिक व्यवहार वेगाने चालणार नाहीत असे दिसतील.

राशीवार भविष्य पहाताना हे आपण लग्नराशी किंवा चंद्र राशी किंवा दोन्ही राशीकडून वाचून अनूभव घेऊ शकाल.

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: मेष राशीचा मालक मंगळ महिनाभर कुंभ या शनिच्या राशीत लाभ स्थानी असल्यामुळे महिनाभर जे अपेक्षीत असेल ते प्रयत्न केल्याने मिळेल. याला अपवाद फ़क्त ६ डिसंबर ते १० डिसेंबर या काळाचा आहे. या काळात आपण संभ्रमात पडाल त्यामुळे नेमके काय हवे त्याकडे फ़ोकस न करता आल्यामुळे काही भलतेच स्विकारून बसल्याने घोळ होऊ शकेल. यासाठी ज्या कामांचा महिनाभर पाठपुरावा करुन मार्गी लावायची आहेत त्या संदर्भात ६ ते १० डिसेंबर २०१८ या काळात निर्णय घेताना सावधानता बाळगा.

ज्यांचा संबंध फ़ोटॊग्राफ़ी, सिनेमा, एक्स रे याच्याशी आहे अश्यांना ४ डिसेंबर नंतर मोठ्या व्यावसायीक संधी येतील. ज्यांचा व्यवसाय ह्या क्षेत्रात नाही त्यांनी मात्र ४ डिसेंबर नंतर येणार्या व्यावसायीक संधी पारखून घ्याव्यात. वैवाहीक जोडीदार व एकंदरीत कौटुंबीक स्तरावर वातावरण आनंददायी असेल.

ज्यांना दमा, फ़ुफ़्फ़ूसे, सर्दी, पचन यासंदर्भात त्रास आहेत ते जास्त वाढणार नाहीत यासाठी त्रास होताच आपल्या डॉक्टरची भेट घेऊन औषधे घ्यावीत.थोडक्यात आरोग्याच्या बाबतीत चालढकल न करता काळजी घ्यावी.

वृषभ रास : ग्रहस्थिती उत्तम आहे असे नाही. आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. मद्य प्राशन करणार्यांनी विशेष सावधानता बाळगावी. एकतर आरोग्य बिघडेल आणि नशेत खिसा ही मारला जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. जे शेअर बाजारात रिस्क घेतात त्यांनी व्यवहार करताना अनेक वेळा तपासून पहावेत.

एका बाजूला नोकरी/व्यवसायात कामाचे प्रेशर आणि दुसर्या बाजूला आरोग्याच्या तक्रारी यामुळे हैराण होऊ नये असे वाटत असेल तर महिन्याच्या सुरवातीला ज्यांना आरोग्याचे कायमचे त्रास जसे डायबेटीस किंवा अन्य काही असल्यास त्याची तपासणी करुन आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमीत औषधे घ्यावीत.

याच महिन्यात बुध वक्री होणार आहे जो तुमच्या कुटुंबास्थानाचा आणि संततीच्या स्थानाचा मालक आहे. या दोन्ही स्तरावर १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ हा काळ काही उत्तम असेल असे वाटत नाही. तुमच्या कुटुंबाची किंवा संततीसंदर्भात एखादी चिंता सतावेल.

मिथुन रास: आपल्याही राशीचा स्वामी बुध हा जवळ जवळ तीन आठवडे वक्री असणार आहे व तो सहाव्या स्थानी वक्री होणार आहे. हा बुध आपल्या वाणीने अकारण शत्रुत्व निर्माण करेल यास्तव जाता जाता मस्करी करायची, शाब्दीक कोटी करायची यावर नियंत्रण ठेवा. लग्नेश सहाव्या स्थानी वक्री झाला म्हणजे प्रतिकार शक्ती कमी असेल. प्रतिकार शक्ती देणारा दुसरा ग्रह रवि सुध्दा याच स्थानी असल्याने साथीचे रोग सहजपणे शिरकाव करु शकतील यास्तव महिनाभर अरोग्याच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असेल. मिथुन लग्न रास असलेल्या लोकांना याचा अनुभव येऊ शकेल.

पंचमात शुक्र तो ही तुळेचा आपल्याला विशेष फ़ळ देऊन जाईल. ज्यांचा कला क्षेत्रात संबंध आहे ते काही कलाकृती निर्माण करतील. विद्यार्थी वर्गाला खास करुन कला क्षेत्रातील लोकांना परिक्षा मधे यश नक्कीच मिळेल.  तरुणांना ह्र्दयात वाजे समथिंग ह्या ओळीचा अनुभव नक्कीच येईल.

भाग्यातला लाभे्श आणि सहाव्या स्थानाचा मालक मंगळ आपले आजवर लिटीगेशन मधले प्रॉपर्टी मॅटर्स वर हालचाल होऊन एक टप्पा पुढे जाताना दिसतील. पण अजून पुर्ण निकाल लागायला वेळ लागेल असे अनुमान आहे.

कर्क रास: आपली संतती आपल्यासाठी फ़ारच गंभीर विषय असतो. ६ ते १० डिसेंबर या काळात संतती साठी काही वेळ द्यावा लागेल. एखादे छोटेसे आजारपण असेल किंवा काही काळजीचा विषय निर्माण झाल्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष वळवावे लागेल.

हा काळ सोडला तर तुळेचा शुक्र चतुर्थात आल्याने "सुख म्हणजे काय असत " ह्या प्रशांत दामले यांच्या गाण्याचा प्रत्यय वारंवार येईल. घरातले फ़र्निचर, सॉफ़्ट फ़निर्शिंग याबाबत नीट रचना करायला आता वेळ मिळेल. शिवाय आजवर ज्या घरगुती साधनांचा सोय म्हणुन वापर करायला जमले नसेल तो मोड आता सापडेल.

इतके सारे चांगले  घडत असताना घरातल्या माणसांशी संवाद घडत नाही ही रुखरुख मात्र असेल. दरवेळेला शाब्दीक संवादच सर्वकाही असते असे नाही. घरातले सगळे आनंदात दिसत आहेत ही स्थिती पाहून आनंदी नसाल तर नवलच.

सिंह रास : तुमच्या राशीचा मालक महिनाभर वृश्चिक या राशीत मुक्कामाला आहे. तुमचे जे काही आहे ते खुले. कोल्ह्याच्या चालीने छुपे काही करावे हा तुमचा स्वभाव नाही. तरी सुध्दा छुपे पणाने झोपल्याचे सोंग आणून जरा पहा तुमच्या आजूबाजूला काय घडते आहे. कोण तो उंदीर तुम्ही झोपला हे पाहून तुमची आयाळ कुरतडायला येतो ते या महिन्यात शोधून ठेवा.

सिंह राशीची अनेक माणसे कलाकार असतात. तुळेत गेलेला शुक्र आपल्याला काही लिखाण करायला स्फ़ुर्ती देईल. जरा त्याचा अनुभव घेऊन पहा. शेअर मार्केटमधे जरा जपून रिस्क घ्या. या महिन्यात तुमचे नियमीत येणारा पगार आणि गुंतवणूक या बाबत जरा जागरुक रहा.

उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी ६ ते १० डिसेंबर या काळात परिक्षा आल्यास अती आत्मविश्वासाने परिक्षा देऊ नये. नेहमी पेक्षा जरा जास्तच अभ्यास करावा तसेच खेळाडू, पोलीस यांनी ही ह्या काळात अति आत्मविश्वास दाखवू नये.

कन्या रास : कन्या राशीचा मालक बुध जवळ जवळ महिनाभर वक्री असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी आपले नोकरी/व्यवसायातले काम काळजीपुर्वक करण्याची आवश्यकता आहे. खास करुन अकाऊंटस, कम्युनिकेश्न, प्रिटींग यात काही चुका होऊ नयेत म्हणून सर्व माहिती पुन्हा तपासणे आवश्यक आहे.

कौटुंबीक वातावरणात अजिबात ताण नसेल. भेळ पुरी, पास्ता, पिझ्झा या सारख्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचे क्षण अनेकदा या महिन्यात येतील. नात्यामधल्या अनेक स्त्रीया जसे बहिणी, मावश्या यांचे संमेलन घरात भरेल. यामुळे बंधू वर्गाला विनाकारण अस्वस्थता येणार नाही ना या साठी खुलासा करणे आवश्यक ठरेल.

जे पत्रकार आहेत, संपादक आहेत यांनी आपल्या लिखाणामुळे शत्रूता निर्माण होणार नाही ना याचा विचार करुन लेखन करावे. सोशल मिडीया वर जे कायम लिहीतात त्यांनी सुध्दा आपण काय लिहीतो, काय फ़ॉर्वर्ड करतो हे तपासून मगच कृती करावी.

तुला रास : आपल्या राशीचा स्वामी शुक्र महिनाभर तुला या स्वत:च्या राशीत असणार आहे. कलाकारांच्या साठी हा महिना उत्तम असेल.  खरेदी विक्री करणारे व्यापारी, सौंदर्य प्रसाधनाचे व्यवसाय करणारे, सुगंधाचे व्यापार करणारे यांना या महिन्यात खुप उलाढाल करण्याचे योग आहेत.

कलाकारांना आपण कोणत्या अ‍ॅगलने छान दिसतो याचा शोध लागेल आणि त्याचा वापर करुन ते जास्त प्रसिध्दी मिळवतील. स्वत:ची सेल्फ़ी काढण्यात गर्क असलेल्या लोकांना सुध्दा हे अ‍ॅगल सापडतील. काहींना लाईफ़ इन्शुरन्स पॉलीसी संपल्यामुळे, लॉटरीच्या तिकीटामुळे पैसे मिळतील.

किरकोळ आरोग्याचे प्रश्न डोके वर काढू नयेत म्हणुन काळजी घ्यावी. काही आर्थिक जबाबदार्या मात्र नको असताना घ्याव्या लागतील. पण हे सर्व व्यवस्थीत मॅनेज करता आले तर हा महिना चांगला जाईल.

वृश्चिक रास : खरे बोललेले सख्या आईला पटत नाही हा अनुभव या महिन्यात येईल. एकंदरीत घरगुती संघर्षाचे वातावरण असेल यासाठी आपली भुमिका तपासून, शब्द विश्वासार्ह असतील असे पहावे म्हणजे सगळे नियंत्रणात राहील.

या महिन्यात आपल्या हातात येणारे धनादेश ( चेक्स ) यावरची तारीख व रक्कम इत्यादी तपासून घ्यावी. कॅशीयर मंडळींनी नोटा तपासून घ्याव्यात अन्यथा फ़सगत होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीला या महिन्यात खर्चाची जुळवणी करताना बेजार होण्याचा हा महिना आहे अश्यावेळी कामात गडबड होऊन अजून भुर्दंड नको म्हणून वर लिहील्याप्रमाणे रोखीचे, कॅश चे व्यवहार तपासून पहावेत.

धनू रास : धनू राशीतील मूळ नक्षत्राचा साडेसातीचा त्रास कमी होईल.  आता शनि पुर्वाषाढा नक्षत्रात २७ नोव्हेंबरला प्रवेश करत आहे. ज्यांचे धनू राशीत पुर्वाषाढा नक्षत्र आहे त्यांना साडेसातीत अनेकदा मनस्ताप होईल. असे जरी असले तरी या महिन्यात आवक जोरदार असेल. या सोबत अनेक लाभकारक गोष्टी या महिन्यात आपल्याला मिळणार आहेत.

नोकरी व्यवसाया निमीत्ताने या  महिन्यात काहींना खुपच प्रवास करावा लागेल तर काहींना प्रवासाचे बेत  काही अडचणीमुळे रद्द करावे लागतील. धनू राशीचा मालक गुरु वर्षभर बाराव्या स्थानी असणार आहे. त्याच्या सोबत रवि आणि बुध असल्याने प्रवासा बरोबरच खर्च सुध्दा जास्त असणार आहे. एका बाजूला उत्तम आवक आणि खर्च सुध्दा असल्याने महिन्याची गोळाबेरीज शेवटी शुन्य असेल.

मकर रास : हा महिना आपल्या नोकरी/व्यवसायात भक्कम परिस्थीती बनविणार आहात. यामुळे जेंव्हा केंव्हा बढती किंवा पगारवाढ मिळेल तेंव्हा आपले कर्तुत्व कोणी नाकारू शकणार नाही. या महिन्यात शिलकीत असलेले पैसे कसे चांगल्या पध्दतीने गुंतवणूक करायचे यावर निर्णय घ्यायला लागणार आहे. पैसे कसे साठवायचे आणि वाढवायचे यावर आपला खुप अभ्यास असल्याने गुंतवणूकीचे निर्णय बरोबरच असतील.

आपल्या घरात असलेले नोकर आणि नोकरी- व्यवसायात आपले कनिष्ठ काय करत आहेत याचा अंदाज घ्या. अनेक वर्ष आपण ज्यांना खात्रीचे, विश्वासाचे वाटणारे हे लोक आपल्याला अडचणीत आणणार नाहीत ना याची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. ही बाब नियंत्रणात ठेवली तर हा महिना आपल्याला चांगला जाईल.

कुंभ रास : कुंभ राशीचा मालक शनि लाभ स्थानात अजून खुप काळ असणार आहे त्यामुळे कुंभ राशीची अजून काही काळ चांगली स्थिती आहे. अकारण चिड चिड करणे हा अपला स्वभाव नाही तरी सुध्दा मंगळ महिनाभर कुंभ राशीत असल्यामुळे थोडीशी चिड चिड होईल.

या महिन्यात राजयोग कारक शुक्र स्वत:च्या राशीत भाग्यात असल्याने महिनाभर सुख लाभेल. उच्च शिक्षण घेणार्यांना हा काळ अनुकूल असेल. या काळात एखादा कठीण विषय देखील सहज समजेल. अनेकांना वरिष्ठांच्या गैरहजेरीत जास्तीचे अधिकार मिळतील.

आपल्या पित्याशी विनाकारण संघर्ष होण्याची शक्यता असल्यामुळे जो विषय खात्रीने संघर्ष निर्माण करेल असा विषय या महिन्यात टाळलेला चांगला.

मीन रास : ११ अक्टोंबर नंतर वर्षभराने प्रथमच चांगले वातावरण तयार होत आहे. राशीचा स्वामी गुरु चांगल्या स्थितीत आलेला आहे जो पुढे तीन वर्षे उत्तम स्थितीत असणार आहे. तीन महत्वाचे ग्रह बुध, रवि आणि गुरु चांगल्या स्थितीत आल्यामुळे आपण जे करणार आहात त्याच्या प्लॅनिंग साठी हा काळ अनुकूल असेल. उत्साहाने कामाला लागा.

जितके नियोजन अर्थात प्लॅनिंग उत्तम तितक्या अडचणी कमी व दैनंदीन कामे मार्गी लागतील. जेंव्हा अनेक छोटे टप्पे पार पाडाल तेंव्हाच मोठे यशाचे शिखर गाठू शकाल याचा विश्वास ठेऊन काम सुरु ठेवा. नजीकच्या काळात अजून काही ग्रह आपल्या यशाकडे जाण्याच्या मार्गावर आपल्याला सहाय करतील

शुभंभवतू

No comments:

Post a Comment