पंचांग शिकूया - भाग १

पंचांग अभ्यासाला सुरवात करण्यासाठी नक्षत्रप्रकाश ह्या ज्योतिष समुहावर आपण जो भरभरुन प्रतिसाद दिला याकरता सर्व ज्योतिषप्रेमी लोकांचे मनपुर्वक आभार. त्याच सोबत हिंदु नववर्ष विलंबीनाम संवत्सर शके १९४० सर्वांना उत्तम भरभराटीचे जावो ही परमेश्वराकडे प्रार्थना.
आपण ज्या दाते पंचांगाच्या सहायाने पंचाग अभ्यास शिकणार आहोत यात पंचांगाची पाच अंगे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण याचा समावेश असून पंचांगात किती प्रकारची माहिती असून त्याचा काय उपयोग केला जातो याबाबत माहिती देण्याचा प्रार्थमिक उद्देश मी ठरवला आहे.

पंचांगाच्या डाव्यापानावरील तिथी,वार, योग नक्षत्र आणि करण या माहितीचा अभ्यास आपण करणार आहोत.



पंचांगातील काही प्रकरणे अत्यंत किचकट असून सर्वच पंचांग आपण शिकणार आहोत हा गैरसमज नसावा.

आपण शके १९४० विलंबी नाम संवत्सर लिहलेले पंचांग हा लेख वाचण्यापुर्वी हातात घेतले असेल. त्याची आजच्या नववर्षदिना निमित्त पुजाही केलेली असेल. नसेल तर अगदी साधी पुजा करा. पंचांगाची सुस्थानी मांडणी करा. पंचांगस्थ गणपतीला हळद, कुंकू वहा, एखादे फ़ुल वहा, पंचागस्थ गणपती प्रित्यर्थ गुळ खोबरे किंवा चिमूटभर साखरेचा नैवेद्य ठेवा. या नैवेद्याभोवती पाणी फ़िरवा व नमस्कार करा.

यानंतर पान चार वरील संवत्सर फ़ल वाचायची पध्दत आहे. आपल्या वेळेनुसार हे करावे.

पान दोन वर पंचांग कसे पहावे हा लेख दिलेला आहे. तो प्रथम वाचावा. आवश्यकता असल्यास तो दोन वेळा वाचावा व काही शंका असल्यास त्या लिहून काढाव्यात.

आता पान ३० उघडावे यावर शके १९४० विलंबीनामसंवत्सरे, उत्तरायण, वसंतऋतु चैत्र शुक्ल पक्ष,  मार्च २०१८ हिजरी १४३९, संवत २०७४ लिहलेले दिसेल.



तिथी, वार , नक्षत्र , योग आणि करण यांची संपुर्ण माहिती पान दोन वर दिली आहे. त्यापुर्वी वरील गोष्टींची माहिती घेऊया.

शके १९४० हे हिंदु कालगणनेतील प्रामुख्याने वापरल्या जाणार्या शकसंवत आणि विक्रमसंवत या कालगणना आहेत. या पैकी शकसंवत ह्या कालगणनेचा प्रारंभ शक आणि हूण या आक्रमकांपैकी शकांचा पराभव केल्यानंतर उज्जैन येथील विक्रमादित्य राजाने ही कालगणना सुरु केली असून ही कालगणना दरवर्षी येणार्या चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या तिथीला नविन वर्ष सुरु झाले असे मानते.

सध्या इंग्रजी कालगणना २०१८ सुरु असताना हेमलंबीनाम संवत्सर शके १९३९ दिनांका १८ मार्च २०१८ ला संपत असून शके १९४० विलंबीनाम संवत्सर सुरु होत आहे. हिंदू कालगननेत वर्षाला नुसता नंबर देता नाव ही देण्याची पध्दत ही वेगळी आहे. व्यवहारात आपण शेवटी एखादी रक्कम आकडयात आणि अक्षरी लिहीतो यामुळे आकड्यात काही घोळ असेल तर संपेल.

आता आपल्या लक्षात आले असेल की खिस्तजन्मापासून जरी शक संवत्सर ७८ वर्षे मागे असले तरी अजून एक संवत्सर ही कालगणना जे व्यापारी  वर्ष म्हणुन ऒळखले जाते त्याचे २०१७ च्या दिवाळीला २०७४ हे वर्ष सुरु झाले आहे. हे वर्ष ख्रिस्तजन्मापासून सुरु झालेल्या कालगणनेच्या ५६ वर्षे पुढे आहे. विक्रमसंवत ही कालगणना दिवाळीच्या पाडव्याला सुरु होते. ही कालगणना नेपाळच्या विक्रमादित्याने सुरु केली असे मानतात त्यामुळे विक्रम संवत ही नेपाळची अधिकृत कालगणना म्हणुन मान्यता प्राप्त आहे.

यावर्षी विलंबी नाम संवत्सरात जेष्ठ महिना अधिक महिना येत आहे  ज्याला मलमास म्हणुनही ओळखला जातो. दर तीन वर्षांनी एक मलमास किंवा अधिक मास येतो हे अनेकांना माहित असेल पण तो का ? याचे कारण अनेकांना माहित असेलच असे नाही.

हिंदु वर्षात प्रत्येक महिना अमावस्येनंतर येणार्या प्रतिपदेला सुरु होऊन अमावस्यासोबत संपतो. म्हणजे चैत्र, वैशाख.... ते फ़ाल्गुन हे हिंदु महिने चांद्र मास आहेत. चंद्राच्या तिथीनुसार बदलतात. हिजरी या मुसलमानी कालगणनेची पध्दत हीच आहे. त्यामुळे त्यांचे सण दर वर्षी १० दिवस आधी येतात. त्यांचा उपासाचा महिना कधी कडक उन्हाळ्यात तर कधी थंडीत तर कधी पावसात येतो. यामुळे जगाचे सुर्यावर आधारीत पंचाग आणि मुसलमानी कालगणनेत साधारण ३६-३७ वर्षांनी एक वर्ष कमी पडते.

हा दोष काढण्यासाठी हिंदु कालगणनेत दर तीन वर्षांनी अधिक मास येतो तर इंग्रजी वर्षात एक लीप वर्ष येते. थोडक्यात मराठी महिने ३० तिथींचे असतात जे सुर्यावर आधारीत कालगणनेत दरवर्षी दहा दिवस कमी असतात. कारण मराठी महिना ३० दिवसांचा नसतो तर तो २९ दिवसांच्या पेक्षा थोडा मोठा असतो.

आता उत्तरायण आणि दक्षिणायन ह्या सहा सहा महिन्यांनी बदलणार्या संकल्पना पाहू. मकर राशीत रविचा प्रवेश झाला की उत्तरायण आणि कर्क राशीत प्रवेश झाला की दक्षिणायन असे म्हणतात. उतरायणात दररोज दिवस मोठा मोठा होत जातो तर दक्षिणायनात लहान होत जातो.

दोन महिन्यांच्या गटाला ऋतु असे म्हणतात.

चैत्र वैशाख हे महिने मिळुन वसंत ऋतु होतो.
जेष्ठ आषाढ हे महिने मिळून ग्रीष्म ऋतु होतो.
श्रावण भाद्रपद मिळून वर्षा ऋतु होतो
अश्विन कार्तिक मिळून शरद ऋतु होतो
मार्गशिर्ष व पौष मिळून हेमंत ऋतु होतो
माघ व फ़ाल्गुन मिळून शिशिर ऋतु होतो

आता आपण तिथी या संकल्पने कडे जाऊ. रवि आणि चंद्र यांच्या अंशात्मक अंतरावरुन तिथी ठरत असते. अमावस्या संपताना रवि व चंद्र यांच्या मधील अंशात्मक अंतर शुन्य अंश असते. रविच्या पुढे चंद्र १२ अंश गेला की एक तिथी होते. १२ अंशाच्या ३० तिथी म्हणजे १२ गुणिले ३० केले असता. ३६० अंशाचे वर्तूळ पुर्ण होते. जेंव्हा चंद्राचे एक वर्तुळ पुर्ण होते तेंव्हा महिना संपतो. तर रविचे वर्तुळ पुर्ण झाले की वर्ष संपते.

               
१८ मार्च ते ३१ मार्च या पंधरवड्यात इंग्रजी तारखा १४ येतात मात्र तिथी १५ येतात. असे का ? याचे कारण तिथीचा क्षय होतो. क्षय होणे म्हणजे ती तिथी मोजली तर जाते पण ती तिथी सुर्योदयाच्या नंतर सुरु होते आणि दुसर्या सुर्योदयाच्या आधीच संपते. मुहूर्त शास्त्रात या तिथीला अशुभ मानले जाते व या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त नसतो. या दिवशी तसेच अमावस्या या अशुभ दिवशी बालक जन्माला आले असता त्याची जननशांती करावे असे शास्त्र सांगते. या दिवशी जन्माला आलेल्या बालकाच्या आयुष्यात शुभयोग असून फ़लदायी होत नाहीत असे अनुभवाला येते यामुळे शांतीकर्माची योजना आहे.

१८ मार्च ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत नवमी तिथीचा क्षय झाला आहे अर्थात रामनवमी यावर्षी क्षयदिन आहे. आपल्याला अभ्यास म्हणुन या एकूण वर्षात असे किती क्षय दिन आहेत याचा अभ्यास करावयाचा आहे.




वरील तिथी वृध्दीचे उदाहरण समजण्यापुर्वी इंग्रजी तारीख पंचांगात कशी पहायची हे समजणे आवश्यक आहे.चंद्र राशी प्रवेश नंतरचा कॉलम वर "इं " असा शब्द आहे. त्याच्या खाली क्रमाने इंग्रजी तारखा येत आहेत.


तिथीची वृध्दी हा एक तिथीच्या संदर्भात आणखी एक कन्सेप्ट आहे. जी तिथी दोनदा सुर्योदय पहाते त्या तिथीची वृध्दी होते. तिथीचा क्षय अशुभ समजले जाते तसे तिथीच्या वृध्दीला अशुभ समजले जात नाही. किंवा अत्यंत शुभ असेही समजले जात नाही.

दशमी तिथी ९ एप्रिलच्या उत्तररात्री म्हणजे १० एप्रिल तारीख सुरु झाल्यावर २८/३४ अर्थात पहाटे ४ वाजून ३४ मिनीटांनी संपली त्यानंतरदशमी तिथी सुरु झाली ती १० एप्रिलच्या सुर्योदयाला होती व पुढे ११ एप्रिलचा सुर्योदय झाल्यावर ६ वाजून ४१ मिनीटांनी संपली म्हणुन त्याला तिथीची वृध्दी झाली असे म्हणतात.

या प्रकारे अश्या किती तिथी वृध्दी या वर्षात येतात ते अभ्यास म्हणुन आपण शोधा.


यानंतर आपण पंचांगाचे दुसरे अंग वार याबाबत आपण जाणुन घेणार आहोत. वर क्षय तिथी संदर्भातले चित्र पहा. ज्यात तिथीच्या पहिल्या कॉलम मधेच "र" म्हणजे रविवार, "सो" म्हणजे सोमवार या पध्दतीने सातही वार क्रमाने येतात. इंग्रजी वार रात्री १२ वाजता बदलतो तर हिंदू कालगणने मधे वार सुर्योदयात बदलतो हा महत्वाचा फ़रक लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीने शनिवार चा उपास केला असेल तर तो शनिवारी  रात्री १२ वाजता संपत नाही तर रविवारी सकाळी सुर्योदयाला संपतो हे प्रत्येक हिंदु ने लक्षात ठेवावे.

यानंतर नक्षत्राचे नाव व नक्षत्र समाप्तीची वेळ हा कॉलम येतो. नक्षत्रे २७ आहेत. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी या क्रमाने रेवती पर्यंत २७ नक्षत्रे आहेत. प्रत्येक नक्षत्र १३ अंश व २० कलांचे असते. पंचांगामधे येणारे नक्षत्र याचा अर्थ चंद्र या नक्षत्रात आहे असा घ्यायचा असतो. नक्षत्रे आणि राशी यांचा अतुट संबंध असतो. जसा चंद्र मेष राशीत प्रवेश करतो तसाच तो मेष राशीत असलेल्या अश्विनी नक्षत्रातही असतो. चंद्र एका नक्षत्रात सर्व साधारण पणे एक दिवस असतो.

नक्षत्रांचा संबंध ज्योतिषशास्त्रात येतो. ज्या नक्षत्रावर व्यक्ती जन्माला आला आहे त्या नक्षत्राचे गुण घेऊन व्यक्ती येते. राशी हे व्यक्तीच्या गुणाच्या संदर्भात ठोबळ स्वरुप आहे तर नक्षत्र हे सुक्ष्म स्वरुप आहे. चित्रा नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती कायम एखाद्या चित्रासारखी चिरतरुण दिसते. या प्रकारे नक्षत्रांचे गुण व्यक्तिमत्वात दिसतात.  काही नक्षत्रे अशुभ सांगीतलेली आहेत. या नक्षत्रावर जन्म झाला तर जननशांती करावी 
असे शास्त्रकारांनी सांगीतलेले आहे. आश्लेषा, मघा जेष्ठा मुळ ही गंडात नक्षत्रे असल्यामुळे यावर जन्मलेल्या व्यक्तींना इतर नक्षत्रापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागतो तो जननशांतीने कमी होतो असा अनुभव आहे.
अभ्यासासाठी आपण मुळ नक्षत्र एप्रिल महिन्यात कोणत्या तारखेला येते हे शोधावे तसेच त्याची समाप्ती कधी होते हे ही शोधावे. सोबत या पंचांगामधे जननशांतीसाठी कोणती नक्षत्रे सांगीतलेली आहेत हे पान १०८ वर पहावे.

नक्षत्रांचा संबंध मुहूर्तशास्त्राशी सुध्दा असतो. वेगवेगळ्या कामासाठी वेगळी वेगळी नक्षत्रे पुर्वाचार्यांनी शोधली आहेत. या नक्षत्रावर ते ते काम केले असता यशस्वी होते.


योग सुध्दा २७ असून दररोज एक योग असतो. पंचागातील चवथ्या कॉलममधे योगांची नावे असतात व त्याचा समोर योग समाप्तीची वेळ ही दिलेली आहे.
वैधृती आणि व्यतिपात योग दिवसभरात असता तो दिवस शुभकार्यासाठी वर्ज असतो. तसेच या योगावर जन्म झाला असता जननशांती करावी असे शास्त्र सांगते. योग या पंचांगातील अंगाचा जास्त उपयोग मुहूर्तशास्त्रात होतो. 

सिध्द, साध्य, शुभ यासारखे योग दिवसभरात असतील तर ते शुभ आहेत. या योगावर कार्य सहज सिध्द होते.  काही योगावर कार्य केले असता कार्य सहज झाले नाही तरी अडथळे कमी असतात. या उलट काही योग असता कार्यहानी होते.

योग १३ अंश २० कलांचा म्हणजेच ८०० कलांचा असतो ( १३X६० = ७८० +२० = ८०० कला ) 




     
 दिवसभरात तिथी, नक्षत्र, योग सुरु होण्याच्या आणि संपण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. तिथी आणि करणाचा एक भाग एकावेळेला सुरु होतात तर तिथी संपताना करणाचा दुसरा भाग संपतो. करण ११ असतात. या पैकी बव, बालव, कौलव, तैतील, गरज, वणिज विष्टी ही चर करणे पुन्हा पुन्हा एका पाठोपाठ येतात. पण नाग,शकुनी,किंत्सुघ्न, चतुष्पाद ही स्थिर करणे येतात. ही चार करणे अमावस्येच्या आसपास येतात. या एकूण ११ करणापैकी विष्टी हे करण अशुभ मानले गेले असून यावर जन्म झाला असता जननशांती करावी असे शास्त्र सांगते.

पाचव्या व सहाव्या कॉलम मधे दिवसाचे करण आणि रात्रीचे करण व त्याची समाप्तीची वेळ दिलेली असते.


अश्या रितीने आपण पंचांगातील पाच महत्वाची अंगे आपण पाहिली. या शिवाय सातव्या कॉलममधे दिनमान, आठव्या कॉलम मधे रवि उदय तर नवव्या कॉलम मधे रवि अस्त दिलेले असतात. दहाव्या कॉलम मधे चंद्र राशीप्रवेशाची वेळ तर अकराव्या कॉलम मधे इं अर्थात इंग्रजी तारीख दिलेली असते.

पुढील लेखात आपण पंचांगातील डाव्या पानावरील अजून माहिती घेणार आहोत. पुढील रविवारी म्हणजे २५ मार्चला पुढील भाग प्रसिध्द होईल.
पंचांगातील डाव्या पानावरील उर्वरीत संपुर्ण माहिती आपण घेऊ.

आपल्याला पंचांगातील पाने शोधून संपुर्ण वर्षभरातल्या क्षय तिथींच्या तारखा, तिथी वृध्दीच्या तारखा, मुळ नक्षत्राच्या तारखा, व्यतिपात योगाच्या तारखा, विष्टी करणाच्या तारखा शोधून लिहून काढायच्या आहेत. हा अभ्यास केला तर खुपच माहिती आपल्याला मिळेल.

5 comments:

  1. jyotish shiknya sathi khup chhan mahiti dili ahe sir. khup khup abhar. Desurkar.Belgaum

    ReplyDelete
  2. jyotish shiknya sathi khup chhan mahiti dili ahe sir. khup khup abhar. Desurkar.Belgaum

    ReplyDelete
  3. सुंदर माहिती

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर माहिती दिलेली आहे..

    ReplyDelete