मेष ते कन्या राशी साठी राशीभविष्य नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० कालावधी साठी
हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. जर लग्नरास माहित नसे तर चंद्रराशीकडून पहावे.

नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या काळात खालील मोठे ग्रह राशीबदल करत आहेत.

) नोव्हेंबर २०१९  गुरु धनु राशीत जात आहे.
) २४ जानेवारी २०२० शनि मकर राशीत जात आहे.
) २९ मार्च २०२० गुरु मकर राशीत जात आहे.
) २९ जून २०२० गुरु धनु राशीत ( वक्री ) जात आहे
) १९ सप्टेंबर २०२० राहू वृषभ राशीत जात आहे
) १९ सप्टेंबर २०२० केतू वृश्चिक राशीत जात आहे.

आता राशीनिहाय वर्षभराचे राशी भविष्य पाहू. हे राशीभविष्य लिहीताना गुरु, शनि, राहू आणि केतू या ग्रहांचा एकत्रित परीणामाचा विचार केलेला आहे.

मेष रास :

मेष राशीच्या लोकांची मोठी अडचण गुरु बदलामुळे दुर झाल्याने प्रगतीचा वेग वाढेल. आठवा गुरु निर्णय घेऊ देत नाही. नववा गुरु प्रवास दर्शवितो सोबत केतू असल्यामुळे हा प्रवास तिर्थयात्रा स्वरुपातला असेल. आज वर अध्यात्म या विषयाला स्पर्श झालेला नसेल तर एक दिव्य अनुभूती या वर्षात आपल्याला येणार आहे. याचे परिणाम स्वरुप आपण एखादी साधना करु लागाल. तुमचा स्वभाव पहाता ही साधना फ़ार दिवस घडणे शक्य नाही. जगात आपल्यापेक्षा शक्तिमान ईश्वर आहे. काही माणसे ह्या ईश्वराच्या जवळ आहेत. त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करावा इतके समजले तरी खुप आहे.

वर्षाच्या सुरवातीला ही अध्यात्मिक प्रगती झाल्यावर शनिबदल होणार आहे जानेवारी २०२० मधे. दशमेश दशमात गेल्यावर या वर्षभरात नोकरी/व्यवसायात अनेक निर्णय तुम्हाला घेणे जमले नव्हते ते घ्याल आणि याचाच परिणाम म्हणून नोकरी व्यवसायात हळू हळू प्रगती दिसू लागेल.

तुमच्या मुळ जन्मकुंडली मधे जर दशमस्थानी शनि असेल तर नोकरी मधील तुमच्या स्थानाला, अधिकाराला दशाही अनुकूल नसेल तर धक्के बसू शकतात. असे घडले तर एक लक्षात ठेवावे की जन्माला कुणी अधिकार घेऊन येत नाही आणि कधीतरी तुम्हाला अधिकार सोडून सामान्य माणूस म्हणून जगावे लागते. गुरु केतू भाग्यात असताना अधिकार सोडण्याची वेळ आली तर लगेचच जीवनाची दुसरी बाजू समजाऊन घ्या. मिळालेला जन्म हा साधू संतांच्या मते मोक्ष प्राप्ती चे साधन आहे हे जाणून त्यावर चिंतन करा.

याला जोड म्हणून की काय सप्टेंबर २०२० मधे केतू अष्टमस्थानी जात आहे. असा केतू अध्यात्म त्रिकॊणात गेल्याने पुढे दिड वर्षे योग किंवा मंत्रविद्या यावर आपल्याला रुची निर्माण होऊन मोठी प्रगती साधली जाईल.

अनेकांना हा केतू गुह्य भागाचे दुखणे देऊ शकेल. मुळव्याध, भगंदर या सारखी दुखणी पुन्हा उद्भवतील किंवा मुत्रमार्ग यांचा संसर्ग या पासून त्रास संभवतो. नोव्हेंबर २०२० हा काळ ह्या दृष्टीने जास्त त्रासदायक असेल.

राहूने तुमच्या नित्याच्या प्रवासात अडथळे निर्माण केलेले असतील. जर बसने प्रवास करत असाल तर एक सलग बस बंद होऊन त्याजागी बस बदलून पुढे जावे लागेल. कारने प्रवास करत असाल तर तुमच्या जवळच्या रस्त्यावर ओव्हरब्रीज चे काम सुरु झाल्याने प्रवास मंदगती ने होत असेल. सप्टेंबर २०२० ला ह्या सर्व अडचणी दुर होऊन तुमचा प्रवास पुन्हा नेहमीच्या पध्दतीने सुरु व्हावा.

या चार ग्रहांच्या एकत्रीत विचार करता या वर्षी सर्वच बाबतीत वेगवान असे हे वर्ष असेल.

वृषभ रास :

 नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत गुरु, शनि, राहू केतूच्या विचार करता होणारा नोव्हेंबर २०१९ ला होणारा  गुरुबदल एक मोठा ब्रेक आपल्या आयुष्याला लावणारा आहे. अनेक अश्या घडामोडी घडतील की ज्यामुळे नोकरी/व्यवसायात गती कमी होईल. वृषभ राशीचे लोक व्यवहारी मार्ग शोधून अनेक अश्या प्रसंगातून सहजपणे बाहेर पडतात पण काही काळ आपली विचारशक्ती सुध्दा काम करत नाही आणि बाहेर पडायचा मार्ग ही दिसत नाही अशी परिस्थिती येऊ शकेल.

दुसरी बाजू अशी की हा अष्टमस्थानी असलेला  गुरु आणि तिथेच सप्टेंबर २०२० पर्यंत असलेला केतू एकत्रीत पणे आपल्याला जीवनाकडे पहाण्याचा वेगळा दृष्टीकोन देतील. योग/प्राणायाम मार्गावर असाल तर आश्चर्यकारक प्रगती आपल्याला या वर्षभरात साधणार आहे. तुमच्या दृष्टीने ही प्रगती तुम्हाला शारिरीक आणि मानसीक आरोग्य प्राप्त करुन देईल. तुमच्या विचारसरणी नुसार आनंदाने जीवन जगायला जे अडथळे आहेत ते दुर होती. वजन वाढले असेल तर डॉ दिक्षीत डाएट करायला लागाल याने वजन कमी होईल शिवाय डायबेटीस असेल तर त्यावर उत्तम नियंत्रण येईल. दिवसातून दोनदा जेवणे म्हणजे योग तर चारदा चरणे म्हणजे भोग हे सुत्र समजेल.

मकरेत जाणारे शनि महाराज पुढे पाच वर्षे तुमच्या वर प्रसन्न असणार आहेत. वृषभ लग्नाला शनि राजयोग कारक असतो. याचे भ्रमण जेंव्हा नवम आणि दशम स्थानातून होणार आहे याचा फ़ायदा तुम्हाला अधिकार पद मिळेल. महादशा किंवा अंतर्दशा जर शनिची सुरु असेल आणि मुळ जन्मकुंडली शनि बलवान असेल तर राजयोगाच्या लाभाचे सर्व फ़ायदे शनि महाराज देणार आहेत.

मार्च २०१९ पासून केतूचे आठवे स्थाना भ्रमण असल्यामुळे जर काही शारिरीक व्याधी उत्पन्न झाली असेल तर शनि जानेवारी २०२० भाग्य स्थानी गेल्यावर थोडा आराम पडेल. गुरु यास्थानी आल्याने औषधासोबत योगोपचार सुध्दा लाभून दुखणे आहे पण दैनंदीन जीवनात त्रास नाही अशी अवस्था लाभेल.  सप्टेंबर २०२० ला केतू अष्टमातून बाहेर पडल्यावर शारिरीक व्याधीचा त्रास जवळ जवळ संपलेला असेल.

राहूचे भ्रमण दुसर्या स्थानी असलेल्या काही लोकांना एप्रिल २०१९ नंतर काही अनपेक्षीत धनलाभ सुरु झालेला असेल तर हा धनलाभ येत्या सप्टेंबर २०२० पर्यंतच असेल असे गृही धरुन तसे नियोजन हवे. थोडक्यात ही राजापूरची गंगा आहे. कायमची नाही हे लक्षात घ्यावे. आलेला पैसा कसा आला याचे इनकमटॅक्स खात्याला पटेल असे विवरण आपल्या सीए ला आधीच करायला सांगा.

या चार ग्रहांचे एकत्रीत फ़ळ पाहिले असता थोडे कडू आणि बरेचसे गोड असे असेल.

मिथुन रास :

एप्रिल २०१९ मधे राहू बदल झाल्यावर तुमच्या व्यक्तीमत्वात खुपच बदल झाल्याचा अनुभव आपण घेतला असेल. नोव्हेंबर ला होणारा गुरुचा धनु राशीत प्रवेश तुमच्या सातव्या स्थानी होईल. आजवर सप्तमात केतू आणि शनि च्या असल्यामुळे विवाहाचे वय असूनही उसने वैराग्य आलेले असेल तर नोव्हेंबर नंतर हे वैराग्य संपुन जाईल आणि लवकर विवाह व्हावा असे वाटेल. जे वाटले तसे अनेकांच्या बाबतीत घडेल आणि दोनाचे चार हात या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०१९ नंतरच्या वर्षभरात होऊन जातील.

अष्टमस्थानी सुरु होणारा शनिचा प्रवास जानेवारी २०२० पासून पुढे अडीच वर्षे असेल. अष्टमस्थानी शनि असताना वडीलोपार्जीत संपत्तीचा लाभ मिळणे शक्य होते. आपण जर लाईफ़ इशुरन्स एजंट असाल किंवा विमा कंपनीत कामाला असाल तर मोठे धनलाभ होण्याचा संभव येत्या अडीच वर्षांच्या काळात होईल.

केतू सप्तमात असताना विवाह झाला की काही गोंधळ होतात. विवाह नावाला होतो पण पत्नी/पत्नी ट्रान्सफ़र मिळाल्याने, नातेवाईक आजारी असल्यामुळे विवाहानंतर बराच काळ दुर असतात. सप्टेंबर २०२० नंतर सप्तमस्थानामधून केतू सहाव्या स्थानी जाईल आणि वैवाहीक सौख्यात जर बाधा असेल तर ती दुर होईल. वैयक्तीक रित्या त्रासदायक असलेल्या शत्रुला सप्टेंबर २०२० नंतर जरब बसेल

१९ सप्टेंबर २०२० ला होणारा राहू बदल अनेकांना परदेशात प्रवास देईल. असे चार ग्रहांचे फ़ळ पहाता मिश्रफ़लदायी मानावे लागेल.

कर्क रास :

आपल्या राशीला नोव्हेंबर २०१९ ला होणारा गुरुबदल नोकरी करणार्या लोकांना लाभदायक असेल. या वर्षभरात आपली कौशल्ये आपल्या वरिष्ठांना चांगली समजतील. आपल्या बॉसचे आपल्याशिवाय पान हलणार नाही अशी स्थिती वर्षभरात मिळेल. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी आपला सल्ला घेतल्याशिवाय किंवा हे काम आपल्यावर सोपविण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती निर्माण होईल. याचा पुढे फ़ायदा उच्च अधिकार मिळण्याच्या दृष्टीने चांगला होईल. शेती मधे अनेक शेतकर्यांना गुरु लाभदायक होणार आहे.

हे सर्व घडताना केतूने एप्रिल २०१९ पासून सहाव्या स्थानी राहून उत्तम भुमिका बजावली आहे असे आपल्याला जाणवेल. तुमच्या आणि तुमच्या बॉस च्या मधे विसंवाद घडवणार्या माणसांना त्यांची जागा दाखवण्याचे काम या केतूने केल्यामुळे हे घडणार आहे.

सहाव्या स्थानी असलेला केतू आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणता पदार्थ आपण नियमीत खावा याचे ज्ञान देईल. यामुळे आपल्याला उत्तम आरोग्याची किल्ली मिळेल. सप्टेंबर २०२० मधे केतू पाचव्या स्थानी जाईल आणि खेळाडूंना पुढील काळ चांगला असेल.

सातव्या स्थानी जाणारा शनि कोर्टकचेरीत यश देणारा आहे. आपला व्यावसायीक पार्टनर असेल तर तो काही बंधने आपल्यावर आणेल. यामुळे झालाच तर व्यवसायाच्या दृष्टीने फ़ायदा होणार आहे. कर्क लग्न असलेल्या लोकांना सप्तमेश सप्तमात गेल्यामुळे विवाह होणार आहे. हा विवाह झट मंगनी पट ब्याह असा नसेल तर विवाहाच्या संदर्भात दिर्घ काळ चर्चा चालेल. आज साखरपुडा तर वर्षभराने विवाह होईल. हा विवाह आपल्या वैवाहीक जोडीदारा संदर्भात खुपच अपेक्षा असतील तर त्या बाजूला ठेऊन किमान अपेक्षा पुर्ण करेल.

राहू एप्रिल २०१९ पासून कर्क राशीच्या अनेकांना परदेशात प्रवास करायला लावेल. यामुळे कंटाळा आला असेल तर सप्टेंबर २०२० पासून प्रवास थांबेल. हा राहू व्यावसायीकांना अचानक मोठा धनलाभ देईल.

वरील सर्व घडामोडी पहाता येणारा काळ कर्क राशीच्या लोकांच्या अनेक अपेक्षांची पुर्ती करणारा असेल.

सिंह रास :

आपल्या राशीला गुरु पाचवा नोव्हेंबर २०१९ ला होत आहे. विद्यार्थी वर्गाला पुढील वर्ष अनुकूल आहे. उच्च शिक्षण घेणार्यांना हे वर्ष चांगले जाईल. प्राध्यापक, लेखक, संपादक यांनाही हा काळ यशदायी असेल. या वर्षी संतती अपेक्षीत असाल तर नक्की होईल. ( स्थान हानी करोती जीव: ह्या संदर्भात माझा लेख ह्याच दिवाळी अंकात वाचा  लिंक ) हा गुरु हानी करता अपेक्षीत यश वरील व्यवसायाच्या लोकांना, खेळाडू आणि विद्यार्थ्यांना नक्की देईल.

आपल्या राशीला शनि २४ जानेवारी २०२० ला सहाव्या स्थानात जात आहे. सहावे स्थान आणि मकर रास असताना सहाव्या स्थानाच्या दृष्टीने शनि महाराज उत्तम फ़ळे देतील. आपले शत्रु आपापसात लढून संपतील असे चित्र पुढील अडीच वर्षात दिसेल अशी परिस्थिती आहे. पण या शनिचा लाभ घेण्यासाठी अशा कलागती लावणारा एक लाचार समर्थक शोधा. तुम्ही स्पष्ट शब्दात सांगीतले नाहीत तरी तो समजेल आणि हे काम करुन मोकळा होईल. स्पष्ट शब्दात त्याचे आभार मानले नाहीत तरी तुमची कृपादृष्टी त्याच्यावर ठेवा हे काही सांगायची आवश्यकता नाही. वकील वर्गाला या वर्षी प्रयत्न केल्यावर जोरदार यश मिळेल. तुमचा अशील खुष होऊन तुमच्या बुध्दीमत्तेचा योग्य मोबदला देईल.

आपली शेतीवाडी विकसीत करण्यासाठी चांगला काळ आहे. आज असे केलेत तर पुढील वर्षी याची चांगली फ़ळे मिळतील.

लाभस्थानी असलेला राहू आपल्याला एखादा नविन अर्थप्राप्तीचा मार्ग शोधण्यास सहायभूत झाला असेल. हा नविन मार्ग कायमच्या उत्पन्नाचा मार्ग होण्यासाठी १९ सप्टेंबर २०२० पुर्वी शक्कल लढवा. आपल्याला हे जमले तर जितके काळ शक्य आहे तितके काळ हा लाभ मिळवा.

पंचमात असलेला केतू अध्यात्म क्षेत्रात काम करणार्या लोकांना सुध्दा प्रगतीसाठी चांगला असेल. वेदांत सोप्या भाषेत समजाऊन सांगण्याची हातोटी याकाळात आपण आत्मसात कराल.

एकंदरीत सिंह राशीच्या लोकांना हे वर्ष खुपच चांगले जाईल यात काहीच शंका नाही.

कन्या रास:

आपल्या राशीच्या लोकांना गुरु चवथा म्हणजे सुखाच्या स्थानी येणार आहे. विश्वास ठेवा हा गुरु सुखाची हानी करणारा नाही. या गुरुची कर्मस्थानावर म्हणजे दशमावर पुर्ण दृष्टी असणार आहे यामुळे नोकरी/व्यवसायात वृध्दी म्हणजे वाढ होणार आहे. आपण ही वाढ संभाळण्याची क्षमता निर्माण करा म्हणजे कामाचे तास वाढता मॅनेजमेंट करायला शिका. मॅनजमेंट हा सुध्दा गुरुचा आवडता विषय आहे.

आपल्या पाचव्या स्थानी २४ जानेवारी २०२० ला शनि येणार आहे. हा शनि विद्यार्थी वर्गासाठी फ़ार चांगला लाभणार नाही. यावर सल्ला एकच खुप आत्मविश्वास ठेऊन सिलेक्डेड अभ्यास कामाचा नाही. इंटीग्रेटेड अभ्यास पुढील अडीच वर्षे आवश्यक आहे अन्यथा हा शनि आपली हमखास फ़सगत करेल.

दशमातला राहू राजकारणात असलेल्या लोकांना यश देतो. दशमेश जर बलवान असेल तर राजकारणात एक उंची सहज गाठता येईल. ज्यांचे व्यवसाय/नोकरी वस्तू शी संबंधीत नसून फ़क्त ह्युमन रिसोर्सेस शी संबंधीत आहे त्यांना ह्या नोकरी/व्यवसायात नविन करुन दाखवण्याची संधी प्राप्त होईल. यासाठी सप्टेंबर २०२० पुर्वी येणारी प्रत्येक संधी गमाऊ नका.

चतुर्थ  स्थानी असलेला केतू सुखाच्या दृष्टीने फ़ारसा चांगला नसतो. अध्यात्म मार्गावर चालणार्या लोकांना फ़क्त हा केतू फ़क्त चांगला असतो. सुखाच्या क्षणांमध्ये रममाण होण्याचा विवेक हा केतू देतो.

या चारही ग्रहांचा विचार करता हे वर्ष चांगले असणार आहे.

1 comment:

  1. नितीनजी -२०१९-२०२० चे वार्षिक भविष्य वाचले आमच्या राशींचे छान लिहिले आहे ,धन्यवाद.गुरु बदलाची माहिती राशीनुसार छान आहे . मनोगत पण छान आहे.गो .ग . अभ्यंकर .

    ReplyDelete