तुळ ते मीन राशी साठी राशीभविष्य नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० कालावधी साठी
हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. जर लग्नरास माहित नसे तर चंद्रराशीकडून पहावे.

नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या काळात खालील मोठे ग्रह राशीबदल करत आहेत.

) नोव्हेंबर २०१९  गुरु धनु राशीत जात आहे.
) २४ जानेवारी २०२० शनि मकर राशीत जात आहे.
) २९ मार्च २०२० गुरु मकर राशीत जात आहे.
) २९ जून २०२० गुरु धनु राशीत ( वक्री ) जात आहे
) १९ सप्टेंबर २०२० राहू वृषभ राशीत जात आहे
) १९ सप्टेंबर २०२० केतू वृश्चिक राशीत जात आहे.

आता राशीनिहाय वर्षभराचे राशी भविष्य पाहू. हे राशीभविष्य लिहीताना गुरु, शनि, राहू आणि केतू या ग्रहांचा एकत्रित परीणामाचा विचार केलेला आहे.

तुळ रास :

आपल्या राशीला गुरु ४ नोव्हेंबर २०१९ ला तिसर्या स्थानी जात आहे. हे स्थान पराक्रम स्थान म्हणून ओळखले जाते. पराक्रम दरवेळेला हाताने लढाई करुन किंवा शब्द्बाण वापरून दुसर्या व्यक्तीला घायाळ करुनच केला जातो असे नव्हे. आपल्या ज्ञानाच्या प्रदर्शनाने सुध्दा पराक्रम केला जाऊ शकतो. शब्द भंडार जर योग्य क्रमाने आले तरी कधी हे शब्द भंडार रंजक होते, कधी ते ज्ञानवर्धक होते. असे शब्दअर्णव ( शब्दांचा समुद्र ) यात वाचक पोहून आनंदी न झाला तर नवल. ह्या ठिकाणी केतू आधीच येऊन बसला असल्यामुळे तत्वज्ञान, अध्यात्म, संतलीला, संतांच्या लीला, अभंग, ओवी इत्यादी प्रकार या काळात आपण सहज हाताळाल.

तुळ रास आधीच कलाकारांची रास त्यात तृतीयात आलेला गुरु आपल्या लेखणीला तसेच वाणीलाही वाचक व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकणारी प्रतिभा बहाल करेल. एखादे नियतकालीक किंवा ब्लॉग लेखन आपण सुरु कराल आणि या वर्षभरात त्याला हजारो फ़ॉलोअर्स मिळतील. साधे फ़ेसबुकाच्या वॉलवर काही लिहाल त्यालाही लाईक्स मिळतील.

जानेवारी २०२० ला चतुर्थात येणारा शनि आपल्यासाठी फ़ारसा चांगला नाही. एकाबाजूला गुरुमुळे आपले समाज जीवन बहरत असताना मात्र वैयक्तीक सुखाला हा शनि पारखा करतो. हा शनि अध्यात्म  त्रिकोणात येत असल्यामुळे आपल्याला साधेपणा आवडू लागेल. आपण अत्यंत साधे रहाण्याच्या सवयीमुळे घरच्या इतर लोकांना मात्र त्रास होऊ शकतो. कशाला पाहीजे कार, स्कुटर बरी किंवा स्कुटर तरी कशाला हवी सायकल वर फ़िरु हा अट्टाहास आपल्या सोबत जीवन कंठणार्या सहचर्याला आवडेलच असे नाही. यामुळे गृहकलह होऊ नये इतपत आपला साधेपणा जपलात तर हा शनि फ़ारसा त्रासदायक होणार नाही.

आजवर मार्च २०१९ पासून राहू तुमच्या नवम स्थानी बसलेला आहे. जो तुम्हाला प्रसिध्दी देण्यास तयार आहे. पण जसा गुरु तिसर्या स्थानी जाईल आणि आपले लेखन दर्जेदार होऊ लागेल तेंव्हा ही प्रसिद्धी आपल्याला सहज मिळेल. राहू प्रसिध्दी सोशल मिडीया मधून देतो, टीव्ही माध्यमातून देतो आणि ही प्रसिध्दी अल्पावधीत देतो.

तुळ राशीचे लोक हे राशीभविष्य वाचून खुष होतील यात शंका नाही. आपल्या प्रतिक्रियेची मी वाट पहात आहे.

वृश्चिक रास :

आपल्या राशीला ४ नोव्हेंबर २०१९ ला गुरु कुटुंबस्थानी जात आहे. तिथे केतू आधीच विद्यमान आहे. केतू कुलस्य कारक: असे विधान आहे. आपल्या कुटुंबात येणारा गुरु जसा आपल्या कुटुंबाची संख्या एक ने वाढवतो तसा केतू कुलाची वृध्दी करतो. यामुळे आपल्याला संतती होणार, आपण आई/वडील असाल तर आपल्या सासु/सासरे किंवा आजी/आजोबा होण्याचा योग या वर्षात येणार आहे.
कुटूंबस्थानाला धन स्थान ही म्हणतात. या ठिकाणी येणारा गुरु संपत्तीचा कारक असल्यामुळे आपली संपत्ती वाढणार यात शंका नाही. संपत्ती अनेक प्रकाराने वाढते. काहींची रोख रक्कम वाढते, काही प्रॉपर्टी घेतात. पण या वर्षी सोने खरेदीचे योग आपल्या राशीला आहेत. वर्षभरात गोड खाण्याचे योग ही अनेकदा येतील. आपल्याला डायबेटीस नसेल तर चिंता नाही आणि असेलही तर म्हणे दिक्षीत डाएट करुन डायबेटीस जातो हे ज्ञान हा गुरु देईल. गुरु जसा ज्ञानाचा कारक आहे तसाच तो विवेकाचा कारक आहे त्यामुळे आहारावर नियंत्रण हवे हा विवेक सुध्दा आपल्याला देईल.

तिसर्या स्थानी येणारा शनि हा सुध्दा साहस करण्यासाठी चांगला आहे. प्रत्येकाची साहस करण्याची पध्दत वेगळी असते. तिसर्या स्थानी मंगळ असेल तर आरडा ओरडा करत शारिरीक लढाई करेल. गुरु तिसर्या स्थानी गेला तर लेखन किंवा वादविवादाने साहस करेल. शनिची साहस करण्याची पध्दती फ़ारच वेगळी आहे. शनिचे साहस अनेकांना ते कार्य पार पडल्यावर समजते. जे घडले त्या मागे कोण आहे असे जेंव्हा विचारले जाते तेंव्हा कर्ता शनिप्रधान व्यक्ती असते. वृश्चिक ही गुप्तता ठेवणारी राशी आहे. त्यात तिसर्या स्थानी शनि गेल्यावर जे घडवाल त्याने अनेकांची झोप उडेल हे निश्चित आहे.

आपल्या आठव्या स्थानामधून सध्या राहूचे भ्रमण सुरु आहे. अकल्पित लाभ हे या स्थानामधील राहू भ्रमणाचे विशेष फ़ळ आहे. आपण ज्याची कल्पना करु नये अश्यामार्गाने हा राहू फ़ळ देतो. काय फ़ळ मिळाले हे तुमच्या घरच्या लोकांना तरी समजले तर खुप कारण गुप्तता हा आपल्या राशीचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही प्रतिक्रिये मधून हो असे घडले असे सांगणार नाही याची खात्री आहे.

एकंदरीत हे वर्ष तुम्हालाही आनंदाचे जाणार आहे यात शंका नाही.

धनु राशी

आपल्या राशीला गुरु बाराव्या स्थानी असल्यामुळे मागील वर्षी काही जणांना आजारपण, खर्च, मनस्ताप इत्यादी भोगावे लागले असेल पण नोव्हेंबर २०१९ पासून गुरुचा होणारा राशीबदल आपल्याला यशदायी असणार आहे. आपल्या व्यक्तीमत्वात या वर्षात बदल होईल आणि अजूनही सकारात्मक बदल दिसतील. सध्या केतू याच ठिकाणी वास्तव्य करुन आहे. केतू आणि गुरुच्या एकत्रीत फ़ळाच्या परिणामाने आपण योजलेले मोठे काम सहज रित्या पुर्ण करु शकाल.

आपल्या दुसर्या स्थानी जानेवरी २०२० मधे शनि जात आहे. आपल्याकडून सत्य परंतु कठोर शब्द बोलले जाण्याची शक्यता आहे. अनेकांना सत्य आवडत नाही. त्यातून सत्य कठोर शब्दातून व्यक्त होत असेल तर बाहेरची काय कुटूंबातील माणसे नाराज होऊ शकतात. शेवटी सत्य ज्याचे त्याला उमगत असतेच. आपण कशाला सत्य वेळेच्या आधी सांगावे ? असे वागल्यास भांड्याला भांडे लागणार नाही आणि साडेसाती  असेल तर  शेवटची अडीचकी सुध्दा चांगली जाईल.

राहू आपल्या सप्तम स्थानी एप्रिल २०१९ पासून आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा राहू सिनेमा, फ़ोटोग्राफ़ी या व्यवसायासाठी उत्तम आहे. राहू च्या अंमलाखाली काही नविन व्यवसायाची  क्षेत्रे अनुभवाला येत आहेत. ज्याला व्हर्च्युअल अश्या शब्दाने संबोधले जाते असा व्यापार करता उत्तम होतो. Affiliate मार्केटींग मधे लोक आभासी दुनीयेत विक्री करतात. किंवा आपल्या युट्युब चॅनलवर / ब्लॉग्ज वर जाहीरातीसाठी जागा देऊन त्याची फ़ी मिळवतात अश्या प्रकारच्या व्यवसायात लाखो रुपये कमवणारे लोक आहेत. मुळ जन्मकुंडली व्यवसायासाठी फ़ायदेशीर असेल तर असे लाभ नक्कीच होतील.

धनु राशीला खुप काही भव्य दिव्य व्हावे असे स्वप्न असते परंतु काहीच होणार नाही असे हे वर्ष असणार नाही. काही पावले आपण नक्कीच पुढे जाल.


मकर राशी

आपल्या राशीला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने कटकटीचे असतील कारण गुरु व्यय स्थानी जात आहे तसेच राशीचा मालक गुरु २४ जानेवारी २०२० पर्यंत बाराव्या स्थानी असणार आहे. अनेक कामात ही जोडी अडथळे आणणार आहे. जमेची बाजू हीच आहे की आपल्याकडे धिरोदात्त स्वभाव आहे. आपण हार मानत नाही.

बाराव्या स्थानी गुरु, केतू आणि शनि असे तीन महिने असताना प्रवास, आजारपण, अपयश, मनस्ताप . भोगावे लागणार आहे परंतु ही स्थिती फ़ार काळ रहाणार नाही कारण २४ जानेवारी २०२० ला शनि मकर राशीत येणार आहे, २९ मार्चला गुरु सुध्दा काही काळासाठी मकर राशीत येणार आहे. आपण या काळात विचारपुर्वक पावले टाकाल तर याकाळात त्रास कमी होईल.

अध्यात्म मार्गावर चालणार्या लोकांना हा काळ वेगळा अनुभव देईल. एकांतवास नको असलेल्या प्रवासामुळे आलाच तर आपल्याला आत्मचिंतनासाठी चांगला असेल. 

एप्रिल २०१९ पासून राहू आपल्या सहाव्या स्थानी आहे. हा राहू माणसाला कधी कधी काळजीत टाकणारे आजार देतो. हा राहू जखमा लवकर भरुन येण्यास अडथळे करतो. असा काही जंतु संसर्ग होतो ज्यावर Antibiotics काम करत नाही तर कधी आजारपणाचे कारण ही समजत नाही. माझ्या गुरुंनी एक उपाय सांगीतला आहे तो सांगायचा मोह आवरत नाही.  डॉक्टरी उपायाने बरे वाटत नसेल तर अश्या व्यक्तीवरुन दही भात उतरवून नदी किंवा ओढ्याच्या किनारी सोडावा.

मकर राशीला येणारे वर्ष फ़ार आनंददायी असेल असे नाही पण त्रास संपणार हा संदेश मात्र घेऊन येत आहे.

कुंभ रास

आपल्या राशीला आजवर दिवस चांगले होते यात २४ जानेवारी २०२० पर्यंत फ़ारसा बिघाड अपेक्षीत नाही. पुढील वर्षभर गुरु धनु राशीत म्हणजे लाभस्थानी आहे. केतू सुध्दा तिथेच आहे. शनि २४ जानेवारी नंतर मकरेत जाईल त्यानंतर काही काळ उत्तम असणार नाही पण फ़ार त्रासदायक असेल असे नाही.

आजवर धनुराशीत शनि होता त्यामुळे उशीरा का होईना मनासारखे फ़ळ मिळत होते. त्यात नोव्हेंबर पासून गुरु आल्यामुळे भर पडणार आहे. यामुळे आपल्याला अनेक लाभ आपल्या मित्रमंडळी पासून मिळू शकतील. यासाठी आपण श्रेष्ठ पदावर असलेल्या काही व्यक्तींना फ़क्त भेटा आणि आपली समस्या सांगा. सर्व वेळी नाही पण असे वैयक्तिक मित्र आपली अडचण सोडवतील किंवा शक्य असल्यास लाभ मिळवून देतील. हे सर्व घडवून आणण्यासाठी नोव्हेंबर २०१९  ते २४ जानेवारी २०२० या काळात विशेष प्रयत्न करा.

कुंभ राशीच्या लोकांचा ज्योतिषावर अफ़ाट विश्वास असतो. लाभस्थानी जन्मकुंडलीमधे केतू असेल उत्कृष्ट ज्योतिषी आपले मित्र असतील. समजा जन्मकुंडलीमधे केतू लाभस्थानी नसेल तरी सप्टेंबर २०२० पर्यंत हा केतू आपल्याला उत्तम ज्योतिषाचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देईल. ज्यात व्यवहाराच्या पुढे जाऊन मित्रत्वाचा सल्ला आपल्याला लाभदायी ठरेल.

आपल्या पंचमस्थानी राहू एप्रिल २०१९ पासून आहे. हा राहू आपण विद्यार्थी असाल तर अजिबात चांगला नाही. अभ्यास सोडून आपल्याला तो भलत्या गोष्टींचे छंद देईल. परंतु आपण विद्यार्थी नसाल आणि आपल्याला गुढ वि्द्या शिकण्याचा छंद असेल तर ज्योतिष, मंत्र-तंत्र, जादू, इत्यादी गुढ विद्यामधे आपली सप्टेंबर २०२० पर्यंत उत्तम प्रगती होईल.

हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांना लाभस्थानी असलेला गुरु जे काय लाभ देणार आहे ते सोडता खुप काही आशादायक चित्र नाही असे म्हणावे लागेल. पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग हे सुत्र विचारात घेतलेत तर वर्ष सुसह्य असेल.


मीन रास

आपल्या राशीवर हे वर्ष समृध्दीचा वर्षाव करणारे असेल. दहावा म्हणजे कर्म स्थानी जाणारा गुरु आपले कार्यक्षेत्र वाढवेल. आपल्याला नोकरी किंवा व्यवसायात खुप काम पुढील वर्षी करावे लागणार आहे. खुप काम केले की त्याचे फ़ळ मिळते. त्यामुळे ज्यांची नोकरी नसेल किंवा गेलेली असेल त्यांना नोकरी मिळेल. जे नोकरी/व्यवसायात असतील त्यांचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. पुढे जाऊन हे प्रमोशन मिळण्यासाठी सोयीचे होणार आहे. गरज आहे आपण स्थिर विचार ठेऊन वाटचाल करण्याची.

गेले वर्षभर दशमस्थानी असलेले केतू आणि शनि आपल्याला कष्टदायक काम देत असतील तर त्यातील शनि लाभस्थानी जाऊन आहे तेच काम सोपे कसे करावे, त्यातील काही काम हाताखालच्या लोकांना सोपवून सुपरवाईझ कसे करावे याचे तंत्र जानेवारीपासून आत्मसात होऊन कंटाळवाणे काम संपुन नवीन काम करायचा उत्साह येईल.

एप्रिल २०१९ पासून चवथ्या स्थानी असलेला राहूमुळे विनाकारण काही घरगुती कलह, क्लेष निर्माण झाले असतील तर ते सप्टेंबर २०२० अखेर पुर्णपणे संपतील. राहत्या जागेचा प्रश्न निर्माण झालेला असेल तर तो ही निकाली निघेल. विनाकारणच घरापासून दुर जावे अशी भावना निर्माण झाली असेल तर ती ही संपुन जाईल.  स्थिर जीवनाचा आरंभ त्यासोबत गुरु, शनि आपल्याला समृध्दीची नुसती चाहूल नाही तर समृध्दी देणार आहे.

नुसता आशावाद नाही तर जीवनात सकारात्मक बदल देणारे हे वर्ष आपल्याला लक्षात राहील

शुभंभवतु

1 comment: