Wednesday, November 8, 2017

१६ नोव्हेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७ महिन्याचे राशीभविष्य

१६ नोव्हेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७  महिन्याचे राशीभविष्य पाहू. या आधी काही काळ या पध्दतीने रवि ज्या महिन्यात राशीबदल करतो तो डोळ्यासमोर ठेऊन भविष्य लिहीत होतो यात काही कारणाने खंड पडला होता.

मागे मी लिहले होते की दर इंग्रजी महिन्याच्या १४ ते १६ या तारखांच्या दरम्यान रवि राशी बदल असतो. हा निरयन राशी बदल म्हणुन ऒळखला जातो. कोणतातरी काळ निश्चित करुन राशीभविष्य लिहीण्याची पध्दत आहे. मी रविराशीबदलाचा काळ निवडतो. याला रविमास म्हणजे रवि महिना म्हणतात.

या महिन्यात मी येणारे सण किंवा व्रत याबाबत लिहीत असतो. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या रविमासात रवि वृश्चिक राशीत असणार आहे. या वर्षी ३० नोव्हेंबर २०१७ ला मोक्षदा एकादशी येत आहे. या एकादशीला गीताजयंती म्हणुनही ओळखले जाते. ज्यांनी फ़ारसे वाचन केले नाही ते विचारतील की गीताजयंती म्हणजे काय ? या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगीतली म्हणुन ही गीता जयंती. ज्या पार्थाला ती गीता समजली त्याचा मोक्षाला जायचा मार्ग मोकळा झाला. आपण सर्व अर्जून तर आहोत. प्रत्येकाला प्रश्न पडतोच की मी हे कर्म का करतो.  तुकाराम महाराजांनी तर " रात्रंदीन आम्हा युध्दाचा प्रसंग " असा अभंग लिहलाय.

हे जर पार्थासारख्या कृष्ण सहवासात राहिलेल्या भक्ताच्या बाबतीत होत. जगतगुरु तुकाराम महाराजांनी ही वर्णन केलय तर आपण तर अतिसामान्य आहोत. याचा अर्थ त्या साक्षात्काराला सामोरे जायचेच नाही का? एकादशी व्रत यासाठीच असतात, ज्योतिषशास्त्र दृष्ट्या रवि आणि चंद्र यांचा नवपंचम अर्थात अत्यंत शुभ असलेला ग्रहयोग दर महिन्यात दोनदा येतो.

या दिवशी मन आणि आत्मा एकरुप होण्यासाठी आवश्यक ते वातावरण पृथ्वीतलावर असते. आणि म्हणुन एकादशीला आत्मतत्वाचे चिंतन आणि मनन उपवास करुन करावे असे भागवत धर्म सांगतो. या निमीत्ताने हे आपल्या वाचनात असावे या साठी हा उल्लेख. उपवास करा किंवा जमत नसेल तर करु नका पण आत्मचिंतन या दिवशी नक्की करा.

( हे भविष्य चंद्र रास व लग्न रास दोन्ही कडुनही वाचावे )

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: दिवाळी आपणास आरोग्यदायी गेली नसेल तर महिना अखेरीस आपले आरोग्य सुधारेल. शुक्र जेव्हा आठव्या स्थानी जातो तेव्हा कष्टाशिवाय येणारी संपत्ती चालून येण्याचे योग येतात. लॉटरी असो वा लाचलुचपतीने येणारे धन असो. कुठे थांबायचे ते आपण ठरवा. २६ नोव्हेंबर नंतर असे योग जास्त संभवतात व धोका सुध्दा संभवतो. मनस्ताप ही त्या सोबत नक्कीच असतो.
सातव्या स्थानी जाणारा मंगळ काही व्यावसायीक हालचाली घडवेल. जे व्यवसाय करतात त्यांनी याची प्रचिती येईल. व्यावसायीकाने सातत्याने संधीच्या शोधात असावे. या महिन्यात तर आपणच प्रपोजल घेऊन पुढे जावे असे ग्रहमान आहे. लगेच काही घडेल असे नाही. याचा अर्थ प्रयत्न करायचा नाही असे मात्र नाही. विद्यार्थी जर परिक्षा देणार असतील तर जरा जास्तीचा अभ्यास करावा. महिलांनी अरोग्य सांभाळावे.

वृषभ रास : आपल्या राशीचा स्वामी जो तुळ राशीत आहे तो २६ नोव्हेंबरला वृश्चिक राशीत म्हणजे सातव्या स्थानी जात आहे. २६ नोव्हेंबर नंतर लंग्नासाठी इच्छुक व्यक्तींच्या समोर एखादे प्रपोजल नक्कीच असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका असे हा महिना सांगतो. खास करुन मुळव्याधीने त्रासलेल्या पेशंट नी महिनाभर दुपारी जेवणानंतर गोड ताक प्यावे. आवळा, पेरु व ताक या रोगावरचे रामबाण उपाय आहेत.

माझ्या गुरुंनी मुळव्याधीवरचा सांगीतलेला मंत्र अजुनही स्मरणात आहे. ज्यांना हा त्रास आहे मग ते कोणत्याही राशीचे असोत याचा जपा करावा. तिखट खाणे कमी करावे.

ईशं, ईशो, ईशान
कंकर को न करो लालेशाम
सात अक्षर जो पड पावे
मुळ बवासीर होय न होये

वृषभ राशीचे लोक बैलासारखे काम करतात. हे जर खुर्चीवर बसुन असेल तर मुळव्याध जडणार. म्हणुन हा प्रपंच. त्यातून जेव्हा मंगळ सहाव्या स्थानी जातो किंवा वृश्चिकेत जातो ( १७ जानेवारीला जाणार आहे ) आधीपासूनच तरुणांनी काळजी घ्यावी. वय ४० नंतर हा रोग सहसा त्रास देत नाही.

विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राजवळ बसून अवघड विषय समजून घ्यावेत. परिक्षा या महिन्यात असेल तर अभ्यास जास्त करावा. १० डिसेंबर नंतर पेपर असेल तर त्याचा खुपच जास्त अभ्यास करावा. महिलांना खास करुन हा महिना उत्तम जाईल.

मिथुन रास : कलाकार व्यक्तींना १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर ही पर्वणी आहे असे समजा. खास करुन आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना कलेपासून लाभ मिळण्याचे योग आहेत. एखादी नविन कलाकृती त्यांच्या कडून निर्माण होईल. तसेच महिनाभर  जुनी येणी वसूल व्हावीत असे योग आहेत. २४ नोव्हेंबर नंतर नविन प्लॅटफ़ॉर्म मिळेल. कलाकार विद्यार्थी परिक्षा देत असतील तर यश नक्कीच आहे. महिलांना मनाप्रमाणे घडेल असे योग २६ नोव्हेंबर पर्यंत नक्कीच आहेत.

सरकारी नोकरी ज्यांना मिळावी असे वाटते त्यांनी ह्या महिन्यात असलेली लेखी परिक्षा किंवा मुलाखत चुकवू नका.

कर्क रास : सध्या घरात चांगले वातावरण २९ नोव्हेंबर नंतर घराचे चित्र पालटेल. महिनाभर किंचीत विवाद व्हावेत असे ग्रहमान आहे. गुरु महाराज चतुर्थात बसले आहेत. फ़ार काही बिघडवू देणार नाहीत. पण कर्क राशीच्या महिला मात्र जरा काही झाले की डोळ्यात गंगा- जमुना असतात. म्हणुन काही बिघडु द्यायचे नाही असा संकल्प केलात तर हा घरातला मनस्ताप टळेल.

पुष्य नक्षत्राला त्रास आहे पण ज्याला त्रासातही सुख म्हणावे लागेल असे काहीसे ग्रहमान आहे. गुरुची दृष्टी आपल्या कर्मस्थानी आहे त्यामुळे नोकरी व्यवसायाला गती असणार आहे. काही त्रास तिथली घडी जर बसली नसेल तर असू शकतात.

आश्लेषा नक्षत्राला हाच काय पुढील काही महिने धनलाभाचे आहेत. एकंदरीत मिश्र अश्या स्वरुपाचे ग्रहमान कर्क राशीला आहे. महिलांना भुरळ पडावी असे काहीसे ग्रहमान आहे. सोनेरी मृग नसतो ते संकट आहे असे ध्यानी ठेवावे. उच्च पदवी परिक्षा सोडता शाळा/ कॉलेजातील विद्यार्थ्यांना झटून अभ्यास करावा लागेल.

सिंह रास : धाड्स करायला २९ च्या मंगळाच्या राशीबदलानंतर बाहू स्फ़ुरण पावतील असे ग्रहमान आहे. मघा नक्षत्र वाल्यांनी धाडस टाळावे. मघा आणि पुर्वा नक्षत्रांच्या लोकांना काही चांगले मित्र या महिन्यात भेटतील. त्यातील काही स्त्रीया तर उच्च पदस्थ व्यक्ती असतील. आपले नोकरी व्यवसायातील अडलेले काम त्यांना अंदाज घेऊन सांगून पहा. नुकतीच ओळख झाली म्हणजे कामे होणारच नाहीत असे काही नसते.

सिंह राशीच्या सर्वच लोकांनी आपल्या मुलांकडे/त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. हा तुमचा स्वभाव नसेल तर आपल्या जोडीदाराला हे काम सांगा. शेवटी डिस्कव्हरी पाहिल्यावर कळते सिंहीणीला शिकार करणे, बालकाचे संगोपन करणे एक ना दोन अनेक कामे करावी लागतात. स्त्री असाल तर ही जबाबदारी पुढे काही दिवस आपल्याकडे असणारच आहे. सिंह पुरुष फ़क्त जेंव्हा संकट येते तेंव्हाच धावतात. 

महिला जरा शांततेने घरात राहून सुख अनुभवतील आणि विद्यार्थी  वर्ग सकाळी उठुन अभ्यासाची सवय लावाच. लक्षात छान रहाते.

कन्या रास : २४ नोव्हेंबर पर्यंत लिखाण, चिकीत्सा, टीका स्फ़ुट लेखनासाठी चांगला काळ आहे. अनेक नविन गोष्टी स्फ़ुरतील किंवा प्रसिध्द ही होतील. आजकाल डिजीटल मिडीया फ़ास्ट असल्याने मनात आले लिहले, क्लिक केले की प्रसिध्द झाले असे तंत्र आहे. चांगल्या लिखाणाला तासाभरात १०० लाईक्स मिळतात. पटत नाही तर पुण्याच्या पांडुरंग कुंभार या फ़ेसबुक लेखकाला फ़्रेंड रिक्वेस्ट टाका आणि पहा. त्यांना १०० लाइक्स मिळतात. तुम्हाला १० तर मिळतील. शेवटी व्यक्त व्हायला हवे मग ते मित्रांपाशी किंवा फ़ेसबुक मित्रांपाशी.

चवथा शनि म्हणजे छोटी पनवतीच असते. डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेवा. हा महिनाभर तर खासच आवश्यक आहे. कन्या राशीच्या लोकांना ना शारिरीक बळ ना तोंडात दम. जे काय दाखवायचे ते आपल्या कामातूनच. त्यात समय कठीण येता कोण कामास येतो? असे ग्रहमान आहे. ती एक फ़ाईट तुमच्या बुध्दीमत्तेवर  तुम्ही शत्रुला मारणार पण आत्ता नाही. जरा दमाने घ्या.

महिलांची दिवाळी संपली असेल तर जरा कामाचे पहा. विद्यार्थ्यांनो मित्र असे जोडा की जे कामाचे आहेत.

तुळ रास : २९ नोव्हेंबर पासून आपल्या राशीच्या लोकांचा पैसा एफ़ डी, सोने यात गुंतवला जावा असे योग आहेत. आपले रोकड रक्कम यात वाढ होईल. विशाखा नक्षत्र वाल्यांना हा अनुभव नक्कीच येईल. आलेले पैसे तुम्ही असेच खर्च करुन टाकणार नाही. स्वाती नक्षत्र सुध्दा याचा अनुभव घेईल. यासाठी २९ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी जास्त अनुकूल आहे.

सर्व तुळ राशीचे लोक  भेळ, पाणीपुरी अश्या चटकदार पदार्थांचा मनमुराद आनंद घ्याल. तुळ रास वाल्यांच्या घरी पाहूण्या स्त्रीया, माहेरवाशीणी यांचे आगमन होईल आणि घर भरुन जाईल. एकंदरीत महिलांनी आनंद लुटावा असा महिना आहे तर.  विद्यार्थी वर्गाने पुढचे काही महिने दररोज अभ्यास करावा. यश नक्कीच आहे.

वृश्चिक रास : गेले महिनाभर गुरु बाराव्या स्थानी त्यात रवि सुध्दा आणि शुक्र सुध्दा. खर्चाने गांजला असाल तर आता या महिन्यात खर्च आटोक्यात येतील. नोकरी निमीत्त अचानक प्रवास सुरु असेल तर तो ही थांबेल. काही योजना आखली असेल तर २९ नोव्हेंबर पर्यंत यशदायी होण्याचे योग आहेत. दरवेळेला गुप्तता राखावी असे काही नसते. काही वेळा सहज बोलून काम होते.

साडेसातीचे शेवटचे पर्व जरा अडचणीचा त्रास वाढवते असे तुमच्या बाबतीत होणार आहे. पण घाबरुन जाऊ नका. शनिदर्शन शनिवारी घ्या. वार्षीक राशीभविष्यात सांगीतलेला जप सुरु ठेवा.

महिलांनी आरोग्य संभाळा. अनुराधा नक्षत्राच्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर कालावधी उत्तम आहे. माहिती घ्या . फ़सगत होऊ नये.

धनु रास : मुळ नक्षत्रात शनि महाराजांचे आगमन आहे. ज्यांचे चरण १ आहे. मनस्ताप आहे. त्यात महिनाभर भाग्याचा स्वामी रवि बाराव्या स्थानी त्यामुळे प्रवास आहे. प्रवासात वस्तु गहाळ होणार नाहीत असे पहा. खर्च ही २६ नोव्हेंबर पासून वाढत आहे. आधीच तजवीज करा. आरोग्य संभाळा. काही नविन मित्र जोडले जाणार असे दिसते. अनेक कामे मित्रांचा सल्ला घेतल्याने मार्गी लागतील असे दिसते.

तरुणांना काही लक्षात राहतील असे प्रसंग येणार आहेत. बरेचसे मधुर, काहीसे कटु असे एकंदरीत या महिन्यात येणार्या प्रसंगांचे प्रकार आहेत. महिना फ़ार उत्तम असेल असे नाही. पण फ़ार कठीण नाही.

महिलांना महिनाभर खर्च करावा अशी इच्छा होईल. पहा अनावश्यक खर्च टाळता येतो का ? विद्यार्थी वर्ग या महिन्यात परिक्षा असतील तर चमकणार आहात. खेळाडु असाल तर एखादी स्पर्धा गाजवणार आहात.

मकर रास: नुकतीच साडेसाती सुरु झाली आहे त्याचे फ़ार परिणाम लगेच दिसत नाहीत. पण दर शनिवारी शनिदर्शन सुरु करा. महिना लाभाचा आहे. इश्नुरन्स , लॉटरी यातून या महिन्यात काही अनपेक्षीत धन अपेक्षीत आहे. नोकरी व्यवसायात महिनाभरात थोडी धावपळ वाढेल. या महिन्यात तरी फ़ार काही सनसनाटी घडावे असे योग नाहीत.

महिला वर्गाच्या अपेक्षा पुर्ण होतील. विद्यार्थी वर्गालाही जे हवे ते शैक्षणीक मिळवण्याचा हा महिना आहे. संकल्प करा यशस्वी व्हा.

कुंभ रास : तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा छोटासा अधिकार तुम्ही मागत आहात तो तुम्हाला मिळुन जाईल. याचा अर्थ प्रमोशन आहे असे नाही. काही विषीष्ठ कामासाठी तुम्हाला परवानगीची आवश्यकता लागणार नाही. तुमच्या कुंडलीला बदललेला शनि लाभदायक असेल. खडतर अश्या कामातुन थोडी उसंत मिळेल व मनाप्रमाणे लाभ ही मिळतील अशी या शनिबदलामुळे घडणार आहे त्याचे प्रत्यंतर या महिन्यातच येईल.

भाग्यस्थानी गुरु आणि बाराव्या स्थानी केतू हे वर्षभर तिर्थयात्रा यांचे योग येणार आहेत. या ही महिन्यात संधी आहेच.

महिलांचे महिनाभर घरात वर्चस्व असणार आहे. त्यामुळे कुंभेची पत्नी असणार्यांनी तर एक महिना त्यांच्या कलानेच घ्या.

विद्यार्थी वर्गाला यश मिळणार आहे. १० डिसेंबर पुर्वी महत्वाचे सबमिशन इ. शैक्षणीक कामे मार्गी लावा.

मीन रास: महिनाभर काही अप्रिय घडत असेल तर हा काळ संपत आला आहे. जोडीदाराबरोबर शाब्दीक चकमकींना तसा अर्थ नसतो. पण शब्द जपून वापरले की बरेच अनर्थ टळतात. अजुनही आरोग्याकडे लक्ष द्यावे असा महिना आहे. फ़ार काही नेत्रदिपक गोष्टी घडण्यास अजून एखादा महिना वाट पहावीच लागेल. तो पर्यंत आहे त्या पानावरुन पुढे चालू असे साधे सुधे ग्रहमान आहे.

महिलांना नवी दिशा सापडेल. विद्यार्थी वर्ग आपली फ़सगत होणार नाही यासाठी लक्षपुर्वक अभ्यास करा. या महिन्यात परिक्षा असेल तर जास्त लक्षपुर्वक गोष्टी करा. अचानक पेपर लिहला पण रोल नंबरच लिहला नाही अश्या चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या.

शुभंभवतु

Tuesday, November 7, 2017

IVF सक्सेस स्टोरी

कालचा दिवस म्हणजे ६ नोव्हेंबर २०१७ माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता. माझ्या जातकजोडप्या पैकी पुरुषाचा फ़ोन आला व त्याने त्यांना कन्या संतती झाल्याची गोड बातमी दिली.  हे जोडपे माझ्या संपर्कात मागच्या वर्षी डिसेंबर २०१६ मधे आले. संतती हा प्रश्न होता. स्त्रीच्या फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक असल्याने स्त्रीबीज गर्भाशयात येत नव्हते. यावर IVF अर्थात टेस्ट ट्युब बेबी हा प्रयोग डॉक्टरी शास्त्रानुसार सुरु होता.

IVF तसे तंत्र काही नविन नाही. १९७८ साली ह्याची सुरवात झाली. ज्या स्त्रीयांच्या फ़ेलॊपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत अश्यांना संतती देण्यासाठी हे तंत्र उत्तम आहे. या तंत्रात स्त्रीचे स्त्रीबीज जे फ़ेलॊपीन ट्युब वाटे गर्भाशयात येऊ शकत नाही ते शस्त्रक्रियेने बाहेर काढून पुरुष बीजाशी त्याचा संयोग शरीराबाहेर घडवून पुन्हा पाच सहा दिवसांनी गर्भाशयात सोडले जाते.  यामुळे मासीक पाळी बंद होण्याच्या वयात सुध्दा स्त्रीया माता होऊ शकतात.

भारतात हर्षा वर्धन रेड्डी बुरी या भारतीय पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म १६ ऑगस्ट १९८६ साली झाला. माझ्याकडे हे जोडपे आले तेव्हा या प्रयोगाला २०१६ साली ३० वर्षे पुर्ण होऊन गेलेली होती. दुदैव असे की या जोडप्याची IVF आधी पाच वेळा फ़ेल गेली होती. कारण तसेच आहे. या प्रयोगात भारतात ५५ ते ६० % वेळेला यश मिळते. याचाच अर्थ हा प्रयोग अनेक वेळा केला तरच यशस्वी होतो. इथे खरे ज्योतिषशास्त्र काम करु शकते. जेव्हा हा प्रयोग यशस्वी होण्याची ज्योतिषशास्त्राने शक्यता आहे तेव्हा हा प्रयोग केला तर कमी वेळा प्रयोग करुन अर्थात कमी खर्चात जोडपे आपल्या अपत्याला जन्म देऊ शकेल. प्रयोग अनेक वेळा फ़ेल गेला की मन उदास होणे, मुल होण्याची उमेद संपणे ही मानसीक स्थिती न येता जोडपे दोन चार प्रयत्नात आनंदी होऊ शकेल.

मी या जोडप्याच्या पत्रिका तपासून संतती सुखाच्या शक्यता पाहिल्या. मला असे लक्षात आले की नजीकच्या महादशा अंतर्दश्या तसेच गोचरीचे ग्रह ही ह्या स्त्रीला गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याच काळात जर गर्भधारणा झाली तर ही स्त्री आई होण्याची शक्यता अधीक असल्यामुळे मी त्यांना काही तारखा सजेस्ट केल्या.

१८-४-२०१७ हा दिवस माझ्यासाठी ह्या जोडप्याच्या इतकाच आनंदाचा होता कारण ह्या जोडप्याची IVF या वेळेला यशस्वी होऊन ती स्त्री गर्भवती झाली होती.

हे यश हातातून जाते आहे की काय अशी परिस्थिती एका सोनोग्राफ़ी परिक्षेनंतर आली. मला त्या स्त्रीचा फ़ोन आला की तीच्या जुळ्या मुलापैंकी एकाचे हृदयाचे ठोके बंद पडले आहेत. आता काय करायचे ? मी त्यांना गर्भ संरक्षक देवता श्रीकृष्ण आणि कुलदेवीची आराधना करायला सांगून माझ्या देवाची आराधना केली. माझे दोन चार दिवस अस्वस्थतेत गेले. मला फ़ोन करायची छाती होईना. सातव्या दिवशी माझी चुलत बहीण आली आणि तीने मला तीच्या जावेच्या तीळ्या पैकी एकाचे ठोके बंद झाल्यावर जुळे जन्माला कसे आले याची कहाणी सांगीतली. मी लगेच इंटरनेटवर पाहीले असता. http://americanpregnancy.org/multiples/vanishing-twin-syndrome/ हा कन्सेप्ट वाचनात आला. ज्यात स्पष्ट उल्लेख होता की जुळ्या मुलांच्या गर्भापैकी एकाचे ह्रुदय बंद पडले तर पहिल्या तीन महिन्यात तो गर्भ आतल्या आत जिरतो आणि दुसरे बालक सुखरुप जन्माला येते.

ह्या स्त्रीने ज्या अर्थी मला फ़ोन केला तेव्हा त्यांच्या डॉक्टर्स ना हा कन्सेप्ट माहित नव्हता ? त्यांनी ह्या स्त्रीला घाबरु नकोस तुला अजुन तीन महिने व्हायचे आहेत. पहिल्या तीन महिन्यात एक बाळाचा गर्भ जिरुन दुसरे बालक सुखरुप जन्माला येण्याची शक्यता खुपच जास्त आहे हे सांगायला नको होते ? कधी कधी मला डॉक्टर्स असे का वागतात याची कारणे समजत नाहीत.

हे ज्ञान किंवा कन्सेप्ट डॉक्टर्स नी सांगीतला असता तर ती गर्भवती तणावाखाली येऊन मला फ़ोन केला नसता. मी काय केले फ़क्त विश्वास दिला. हेच डॉक्टर्स ने करायला हवे होते.

मग ह्या जोडप्यातील पतीचा फ़ोन दोन चार दिवसापुर्वी आला. सिझेरीयन साठी योग्य दिवस कोणता असे तो विचारत होता. मी ही ह्या दिव्यातून नुकताच गेलो होतो. माझ्या मुलीने सिझेरीयनने तीच्या मुलाला नुकताच जन्म दिला. तेंव्हा आपल्या समुहावरील विजयानंद पाटील यांच्याशी मी चर्चा केली असता यात फ़ार ढवळा ढवळ न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मला ते म्हणाले की श्रीकृष्ण देवता गर्भरक्षक आहे. स्मरण करा आणि बाकी डॉक्टर्स वर सोडा. मी माझ्या स्वत: च्या बाबतीत स्वत: चे डोके चालवत नाही. नेहमी आपल्या पेक्षा अनुभवी लोकांचा सल्ला घेतो.

दोन चार दिवसामागे हाच सल्ला मी दिला. काल फ़ोन आला की या जोडप्याला कन्या रत्न झाले आहे. काल पासून मी खुष आहे. माझा ज्योतिषीय प्रयोग यशस्वी झाला. ही माझी नाही तर त्या जोडप्याची सुध्दा खात्री आहे.

आता तांत्रिक बाबी कडे जाऊ. जर स्त्रीचा पंचमेश बिघडला असेल तर वर उल्लेखली त्या प्रमाणे गर्भधारणेत अडचणी संभवतात. या IVF तंत्राने दुर होण्यासारखी परिस्थिती असेल तर ती स्त्री गर्भवती होऊ शकते. पण तांत्रीक बाजू पाहिली असता स्त्रीच्या गर्भाशयातून स्त्री बीज बाहेर काढणे, त्याचा पुरुष बीजाशी संयोग घडवणे आणि ते पुन्हा ५-६ दिवसांनी फ़लीत झाल्याची खात्री करुन गर्भाशयात सोडणे, गर्भाशयाने ते स्वीकृत करुन गर्भाची वाढ होणे यात गुरु ग्रहाचे मोठे कार्य असते. मुळ पत्रिकेत अनेक वेळा पंचमेश सुस्थितीत असूनही स्त्रीचा गुरु वक्री किंवा अशुभ स्थानी असता , त्याच्या सोबत युतीत व्ययेश असता किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी असता हे कार्य खात्रीने होत नाही.

सर्व ज्योतिषी हेच छाती ठोक पणे सांगतात की तुमच्या पत्रिकेतले शुभ ग्रह आयुष्यभर शुभ फ़ळे देत नाहीत. त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना, गोचर ग्रह अनुकूल असताना जास्त फ़लदायी होतात. तसेच अशुभ ग्रहांचे असते. जेव्हा अशुभ ग्रह त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना जास्त अशुभ फ़लदायी होतात.

मी  यात अचुक काळ शोधला ज्या काळी पंचमेशाचे अशुभत्व कमी होऊन गर्भ धारण होईल तसेच गुरु अनुकूल असल्यामुळे गर्भाची वाढही खात्रीने होईल. या पध्दतीने अनेक वेळा हा प्रयोग करायला मिळाला तर IVF चे फ़ेल्य़ुअर प्रमाण कमी होऊन जोडप्याचा खर्च वाचेल आणि धीर ही खचणार नाही. अश्या जोडप्यांनी माझ्याशी संपर्क करावा यासाठी हा लेखन प्रपंच.

Thursday, October 19, 2017

अक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य

अक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य  नक्षत्रप्रकाश ह्या आपल्या ज्योतिषविषयक  दिवाळी अंकात लिहावे असा मानस होता. पण काही कारणाने दिवाळी अंक निघु शकला नाही. आज रोजी हे वार्षीक राशीभविष्य मात्र वाचकांना देताना आनंद होत आहे. लिहून झाल्यावर किमान तीन वाचने व्हावीत हा नियम पाळायला वेळ नाही. दिवाळीतल्या पाडव्याच्या मुहूर्तावर हे राशीभविष्य लोकांना वाचायला मिळावे असा संकल्प करुन तो सिध्दीस जाताना काही तांत्रिक चुका दिसल्याच तर जरा दुर्लक्ष करा. चांगला भाग घ्या.

 जे ग्रह साधारणपणे वर्षभर एकाच राशीत असतात त्यांचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणे शक्य नाही. हे ग्रह ताकदवान आहेत. यांच्या शुभयोगात महिनाभरात बदलणारे ग्रह येतात तेव्हा प्रत्यक्ष घटना घडताना दिसतात. उदाहरणार्थ आता तुळेत गुरु आहे.. ज्याची शुभ दृष्टी मिथुन व कुंभ राशीवर असेल. ही दृष्टी विवाह इच्छुकांचे विवाह घडवून आणताना दिसेल. याचा अर्थ वर्षभर योग आहेत असे नाही. जेव्हा मिथुन /कुंभ राशीत शुक्र जाईल, मंगळ जाईल तेव्हा तो महिना या दृष्टीने अनुकूल असेल.

या दिवाळीच्या थोडेसे आधी किंवा लगेच नंतर कोणते मोठे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत ते पाहू सोबत त्याचा वर्षभर होणारा एकत्रीत परिणाम सुध्या या राशीभविष्याचा माध्यमातून जाणून घेऊ या.

७ ऐप्रील २०१७ ला हर्षलचा मीन राशीतुन मेष राशीत प्रवेश झाला आहे व वर्षभर मुक्काम मेष राशीत आहे.
८ सप्टेंबर २०१७ रोजी राहूचा सिंह राशीतुन कर्क राशीत प्रवेश झाला आहे व वर्षभर मुक्काम कर्क राशीत आहे.
८ सप्टेंबर २०१७ रोजी केतूचा कुंभ राशीतुन मकर राशीत प्रवेश झाला आह व  वर्षभर मुक्काम मकर राशीत आहे.
१२ सप्टेंबर २०१७ रोजी गुरु कन्या राशीतुन तुळा राशीत प्रवेश झाला आहे व वर्षभर मुक्काम तुळा राशीत आहे.
२६ अक्टोबर २०१७ रोजी शनि पुन्हा एकदा धनू राशीत प्रवेश होत आहे व व वर्षभर मुक्काम धनु राशीत आहे.

आता राशीवार फ़ळे पाहू -  ही फ़ळे लग्न रास माहित असेल तर तिकडुन ही पहावीत तशीच चंद्राच्या राशीकडुनही पहावीत.

मेष रास : मेष राशीला राहू चतुर्थ स्थानी येत आहे. रहात्या जागेतला बदल अपेक्षीत आहे. सातव्या स्थानी जाणारा गुरु व्यावसायीक संधीत वाढ करेल. व्यावसायीक असाल तर उत्पन्न वाढणार आहे.  शनि बदल भाग्य स्थानातून होत आहे. मेषेला हा बदल मिश्र फ़लदायी होतो. लाभेश लाभ स्थानाच्या लाभात म्हणुन अनेक लाभ तर दशमेश दहाव्या स्थानाच्या बाराव्या स्थानी आल्याने नोकरी व्यवसायाकारणाने परदेशी जाणे किंवा अपरिहार्य बदली होणे इत्यादी. ज्यांच्या मुळ पत्रिकेत धनु राशीत शनि असेल त्यांना याचा खास अनुभव येईल. दशमस्थानी केतू भ्रमण असणार त्यामुळे नोकरी-व्यवसाय काही सुखासुखी पुढे जाणार नाही. अर्थात तुम्हाला चॅलेंजेस हवीच असतात. यातून तुमचे क्रायसेस मॅनेजमेंट कौशल्य सुधारणार आहे.

१७ जानेवारी २०१८ ला मंगळ हर्षलशी प्रतियुती तर रविशी केंद्र योग करत आहे. ह्या योगात अपघाताचे भय आहे त्यामुळे आधीचे ५-६ दिवस तर नंतरही ५-६ दिवस वहाने जपून चालवा. वाहन स्पर्धा अजिबात टाळावी. तरुण मुलांच्या पालकांनी किमान या दिवसात नवशिक्या मुलांच्या हातात वहानाच्या किल्ल्या हातास लागणार नाहीत असे पहावे. असाच कुयोग १३ मे २०१८ च्या आसपास ही आहे. तसेच तो १ ऑगस्टच्या २०१८ दरम्यान ही आहे. मेषेच्या प्रौढांनी स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि पालकांनी तरुण वयाच्या मुलांवर नियंत्रण ठेवावे.

खेळाडूंना/पोलीस किंवा सैन्यातल्या लोकांना एखादा सरकारी सन्मान मिळण्याचे संकेत १५ डिसेंबरपासून महिनाभरात मिळतील. नोव्हेंबर आणि मे महिन्यात कुटुंबियासमवेत वेळ देण्याचे योग आहेत.

सातव्या स्थानी येणारे गुरुचे भ्रमण आपण व्यापारी असाल तर नविन करार मदार होतील असे फ़ळ देईल. करार विचार पुर्वक करा.उत्पन्न वाढेल पण त्याच सोबत काही चिंता नाहीत ना याचा विचार करा. अश्विनी, भरणी किंवा कृतीका चे पहिले चरण हे भ्रमण फ़ारसे चांगले नाही.

शनिचे भाग्य स्थानातून भ्रमण फ़ार उत्तम आहे असे नाही पण लाभेश लाभात असताना काही उत्पन्न वाढेल असे योग आहेत. अश्विनी नक्षत्रात जन्म असलेल्या लोकांना याचा अनुभव मार्च २०१८ नंतच काही महीने येईल.

वृषभ रास : या राशीला राहू तिसरा येणार आहे. भावंडांच्या बाबतीत काही चिंता राहील. गुरु सहावा येणार आहे. हा गुरु ठोबळ मानाने आर्थिक स्थिती उत्तम करेल कारण तो अर्थ त्रिकोणात आहे.  ९ मार्च २०१८ ते १० जुलै या गुरु वक्री होण्याच्या काळात ज्यांना मुळातच डायबेटीस आहे त्यांनी काळजी घ्यावी. शनि आठवा होणार आहे जो तुम्हाला बांधून ठेवणार आहे. फ़ार प्रगतीची अपेक्षा करु नये परंतु व्यावसायीकांना नविन प्रॉडक्ट च्या कल्पना साकार होताना दिसतील. प्रॉडक्ट कन्सेप्ट डेव्हलप होतील.

 जे लोक प्रिंटींग व्यवसायात आहेत त्यांनी प्रुफ़ रिडींग बाबत सावधानी घ्या अन्यथा चा मा होऊन नुकसान होईल. कृतिका नक्षत्राच्या मंडळींनी सावधान रहा. वृषभ राशीच्या लोकांनी इमेल लिहताना सावधानता घ्या. इंटरव्ह्युला जाताना पुढील दीड वर्ष राहू काळ टाळून जा. नोव्हेंबर महिना सुख समाधानाचा तर ३ मार्च २०१८ ते २५ मार्च २०१८ हा काळ अपेक्षा पुर्तीचा अनुभवाला येईल. अनेक कामे याच काळात अपेक्षीत फ़लदायी होतील. वयाने मोठ्या अश्या व्यक्तींशी मैत्री होईल. ज्या योगे त्यांच्या अनुभवाचा फ़ायदा होताना दिसेल.

सहाव्या स्थानी येणारा गुरु अर्थ त्रिकोणातून जाताना उपत्न्न वाढवणार आहे. नोकरी व्यवसायात वाढ ही होणार आहे व पैसे संग्रह वाढणार आहे. याचा अर्थ या वर्षी आपण सोने /मुदतठेवी या माध्यमातून संपत्ती साठवण्याचे योग या वर्षी निर्माण होत आहेत. ह्याचा अनुभव खास करुन मृग नक्षत्रावर जन्म असलेल्या वृषभ राशीच्या लोकांना अक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ काळात येईल.

आठव्या स्थानी येत असलेला शनि आपल्याला पुढील अडीच वर्षे फ़ारशी प्रगती देताना दिसणार नाही. आपल्या राशीला शनि राजयोग कारक असतो जो पण पहिल्या वर्षी गुरु सहायभूत असल्यामुळे खरा त्रास पुढील फ़क्त दीड वर्षच असेल म्हणजे २०१८ दिवाळी नंतर सुरु होईल. मग आत्ता कशाला या विचाराने हे वर्ष खराब घालवायचे.

मिथुन रास : तुमच्या कुटुंबस्थानात राहूचे भ्रमण आहे.  मांसाहारी लोकांना या दिड वर्षात मांसाहाराची आठवण अनेक वेळा होईल. ज्यांचे दाताचे आरोग्य खराब आहे त्यांनी आपल्या दाताच्या आरोग्याबरोबर दुर्गंधी येऊन जवळच्या व्यक्तीला त्रास होणार नाही याबाबत जागरुक असावे. हा राहू गृहकलह निर्माण करणारा आहे. कारणे काहिही असतील. संभ्रम असो कि गैरसमज आपण जागरुक असा. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना फ़ारसा राहू बदलाचा त्रास नाही पण पुनर्वसु नक्षत्र ज्याची तीन चरणे मिथुनेत तर एक चरण कर्क राशीत आहेत त्यांना पुढील काही महिने संकटे येऊ शकतात यास्तव येणार्या संकटाचा आधीच वेध घ्या. कशावरही आधीच विचार करुन पर्याय शोधून ठेवले असले म्हणजे फ़ारसा त्रास होत नाही.

मिथुन राशीला तुळ राशीत गेलेला गुरु पाचवा आहे ज्यायोगे उत्पन्नात दिवाळीनंतर वर्षभर चांगली वाढ अपेक्षीत आहे. मृग नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना हा अनुभव अक्टोबर ते डिसेंबर २०१७ मधे येईल तर आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना हा अनुभव डिसेंवर १७ ते मार्च १८ या काळात येईल.  भाग्य वृध्दी करणारा हा योग आहे. भाग्य वृध्दी याचा अर्थ काही गोष्टी सहजासहजी प्राप्त होतील. तुमच्या भाग्यात कुंभ रास आहे. गुरु ज्ञानाचा कारक असल्याने एखाद्या विषयावर आपण संशोधन करु इच्छित असता हे ज्ञान सहज प्राप्त होईल. ज्या योगे आपले व्यक्तीमत्व ही उजळेल. आपल्या वरिष्ठांच्या मर्जीत वर्षभर रहाल.

शनि तुमच्या सप्तमस्थानी जाणार आहे. विवाहीत असाल तर जोडीदाराशी पुढील अडीच वर्षे वाद घालायचा नाही असे सुत्र लक्षात ठेवा. मृग नक्षत्रावर जन्मलेले जातक जरा हे सुत्र जास्त लक्षात ठेवा. सप्तमातला शनि सुध्दा तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी ठेऊन आहे. शनि तुमचा भाग्येश आहे त्यामुळे पुढील अडीच वर्षे हळु हळु भाग्य वृध्दी होताना दिसेल. तुमच्या व्यक्तीमत्वात जो बालीशपणा चुकून शिल्लक असेल तो हळु हळु कमी होऊन तुम्ही जास्त विचारी व परिपक्व व्हाल.

कर्क रास : तुमच्या राशीतून राहूचे भ्रमण सुरु आहे. तुमच्या मनात अनेक संभ्रम होणे अपेक्षीत आहे. विचारांची दिशा फ़ार वेगळी होणे स्वाभावीक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होत असल्याचे अनेकांना जाणवेल. तुम्ही अचानक अनप्रेडीक्टेबल होत आहात असे इतरांना जाणवेल. पुष्य नक्षत्राला अचानक संपत्ती जमा करण्याचे योग आहेत. आश्लेषा नक्षत्राला हे राहूचे भ्रमण फ़ारसे उत्तम आहे असे नाही. आश्लेषा नक्षत्राला स्वत: चे काही वैचारीक प्रश्न असतात त्यात भर पडल्याचे जाणवेल. काही नविन वैचारीक बदल होणार आहेत त्यासोबत तुम्ही काही नविन विचार आत्मसात कराल किंवा नविन विचार धारेला जन्म द्याल.

गुरु तुमच्या चतुर्थ स्थानी येणार आहे. तुमचा अधिकार वाढेल. अध्यात्मिक असाल तर उत्तम अनुभव या वर्षी तुम्हाला येतील. योग करत असाल तर पुढली पातळीवर या वर्षभरात पोहोचाल.

शनि तुमच्या सहाव्या स्थानी पुढील अडीच वर्षे भ्रमण करणार आहे. सप्तमेश आणि अष्टमेश सहाव्या स्थानी येत आहे. ज्यांचे वैवाहीक संबंध जास्त ताणलेले आहेत त्यांनी ते अजुन ताणले जाणार नाहीत यासाठी योजना करा. सर्वच नक्षत्रावर जन्मलेल्यांनी यावर खास लक्ष द्यावे. आरोग्याची पुढील अडीच वर्षे घ्यावी लागणारच आहे.

सिंह रास : सिंह राशीला राहूचे  हे बाराव्या स्थानातले भ्रमण फ़ारसे चांगले नाही.  व्यावसायीक असाल तर हा राहू  अनावश्यक अनपेक्षीत खर्च वाढवेल. फ़ार मित्र वाढवणे असा मघा नक्षत्राचा स्वभाव नाही तरी नविन मित्र आपल्याला खड्यात घालणार नाहीत ना ह्याचा विचार अवश्य करा. पुर्वा नक्षत्राच्या लोकांनी कोणाची दोस्ती करायची यावरही विचार करुन ठेवा. त्यांनाही मैत्री खातर नुकसान संभवते. " तुमच्या साठी काय पण" असा डायलॉग मारणारे जरा सावध रहा असे या निमीत्ताने सांगावेसे वाटते. उत्तरा नक्षत्राचा एक चरण सिंह राशीत तर उरलेले तीन कन्या राशीत असतात सिंह रास उत्तरा नक्षत्र यांनी अनेक कामे साध्य करताना जास्तीचा खर्च होत नाही ना याचा विचार करावा नाहीतर दर्द से दवा दुखदायक असा अनुभव यायचा.

आपल्या राशीला गुरु तिसर्या स्थानी येणार आहे त्यामुळे भाग्य वृध्दी, उत्पन्न वृध्दी, व्यापारी असाल तर व्यापार वृध्दी, विवाह इच्छुक असाल तर विवाह इतकी सगळी फ़ळे मिळणार आहेत. काय पाहिजे ते तुम्हीच ठरवा.

शनिचे भ्रमण आपल्या पंचम स्थानातुन होणार आहे. आपल्या संततीच्या अभ्यासाची चिंता लागून राहील त्या ऐवजी नियमीत आढावा घ्या हा सल्ला आहे. सातत्याने आढावा घेतला की प्रश्न सुटेल. हे काम आपल्याला जमेल की त्याच्या आईने करायचे तेव्हडे ठरवा.

कन्या रास: गेले दिड वर्षे हा राहू तुम्हाला आर्थिक संकटात टाकून बसला असेल तर आता पैशाची आवक वाढताना दिसेल. मग कुणाला ती नोकरीतल्या बदलाने असेल तर कुणाला अन्य मार्गाने. उत्तरा नक्षत्राला मित्र काही चांगले काम किंवा चांगली नोकरी मिळवुन देण्यास सहायक होताना दिसतील. हा बदल सुखावह असेल असे नाही. त्रासदायक बदल असला तरी पैसे वाढवून मिळणार आहेत. चॉईस तुम्ही करा. हस्त नक्षत्राच्या लोकांना काही गोष्टी सहज साध्य होऊन पैसे जास्त मिळतील असे ग्रहमान आहे. एकंदरीत कुणाला कष्ट/त्रास /मानहानी जास्त पण पैसे येणार तर कुणाला पैसे मिळवण्याची ट्रीक साधणार हा फ़रक असणार आहे. तुमची रास अर्थतत्वाची असल्याने आपल्याला काय पदरात पडत आहे हा तुमचा विचार असतो म्हणुन हा फ़रक सांगीतला. चित्राचे दोन चरण कन्या राशीत आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आणि त्रास  आहे असे ग्रहमान आहे.

गुरुचे भ्रमण कुटुंब स्थानी आहे. कुटुंबस्थानी जेव्हा गुरु येतो तेव्हा कुटुंबात एका सदस्याची संख्या वाढते याचा अनुभव नुकताच मी लग्न कुंडलीच्या बाजूने मी स्वत: घेतला आहे. दुसरे स्थानी असलेला गुरु सहाव्या स्थानी व दहाव्या स्थानी दृष्टी टाकतो. एकंदरीत कामही वाढणार म्हणजे उत्पन्न ही वाढणार असा अनुभव तुम्हाला येईल. उत्पन्न दोन मार्गांने वाढणार आहे. हस्त नक्षत्रावर जन्मलेल्यांना हा अनुभव नक्कीच येईल.  एकतर स्वत:चे कष्ट आणि इतरांचे कष्ट. याचा अर्थ तुमच्या हाताखालचे लोक साथ देतील आणि मेहेनत करतील पण नीट दिशा देणे तुमचे काम आजे.

शनिचे चतुर्थ स्थानचे भ्रमण मात्र आपले सुख कमी करेल. नोकरी- व्यवसायात वृध्दी होत असताना तुम्हाला किमान वर्षभर घरी सुख अनुभवायला तुम्ही कमीच असणार. काहीतरी मिळवायचे म्हणजे काहीतरी गमवावे लागणारच ना ? सर्वच नक्षत्रावरचे लोक हा अनुभव घेतील.

तूळा रास : एखादा मोठा सन्मान, किंवा अधिकाराचे पद मिळवताना नोकरीचे ठिकाण किमान टेबलाची जागा बदल घडणे करावेच लागते. पोर्ट फ़ोलीओ किंवा नोकरी/ व्यवसायात बदल असे योग आहेत. याचे चांगले परिणाम किंवा त्रासदायक परिणाम आहेतच. हे बदल अनपेक्षीत आहेत हे नक्की. ज्यांनी अजून नोकरी व्यवसायात पदार्पण केलेले नाही त्यांना अचानक नविन नोकरीच्या /व्यवसायाच्या संधी चालून येतील. " हारी बाजी को जितना मुझे आता है " असेही घडुन ज्या नोकरी/ व्यवसायाची अपेक्षा सोडली होती अश्या हुकलेल्या संधी पुन्हा चालून येतील. चित्राला हा बदल त्रासदायक आहे. स्वातीला नाही तर विशाखाला हा बदल जरा जास्तच त्रास देईल. तुमच्या साठी हा बदल म्हणजे शिक्षा म्हणुन बदली किंवा त्रास देण्यासाठी बदली असे असेल. विशाखा नक्षत्राच्या लोकांना व्यावसायीक काही संधी आल्याच तर पारखुन घ्या हे सांगणे गरजेचे आहे.

तुमच्या राशीला आलेले गुरु भ्रमण तुमचे व्यक्तीमत्वात बदल घडवेल. सडपातळ असाल तर जर जाड दिसाल. सहसा तूळ राशीची माणसे वजनदार नसतात त्यामुळे तुम्ही खुप जाड व्हाल असे मात्र घडणे लग्नी गुरु असता शक्य आहे पण हा योग वर्षभरच त्रास देईल सबब जरा गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा. या वर्षी तुम्हाला शैक्षणीक यश आहे, भाग्य वृध्दी आहे आणि विवाह इच्छुक असाल तर तो ही घडेल.

तिसर्या स्थानी येणारा शनि साडेसाती संपुर्णपणे संपवून तुम्हाला मानसीक स्वास्थ्य देईलच शिवाय लेखनाची आवड असल्यास दिर्घ लेखन हातून घडेल. भाग्यवृध्दी ही करेल कारण तुळा राशीला शनि राजयोग कारक आहे. विद्यार्थ्यांना कष्टाने पण यश नक्की मिळेल.

वृश्चिक रास : आपल्या भाग्यात राहू येत आहे. भाग्य स्थानातून राहू जात असताना तिर्थ यात्रा घडू शकतात. तिर्थ यात्रा करताना काही नियम असतात. भ्रष्टाचाराने पैसे मिळवुन लोकांना काशीला नेणारे उद्योग राजकीय नेते करतात. अश्या मंडळींनी केलेल्या तिर्थयात्रात सहभागी झाल्यावर फ़ारसे पुण्य लाभत नाही. अश्या यात्रा तुम्ही करणार का ? विचार करा. विशाखा नक्षत्राला अशी केलेली यात्रा एखादा अपघात तर घेऊन येणार आहे असे ग्रहयोग दर्शवितात. किंवा तुमच्या पित्याने घेतलेल्या निर्णयाने काही चुकीचे तर होणार नाहीना हे तपासावे लागेल. अनुराधा नक्षत्राला तुमची यात्रा कंपनी/ टुर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय लाभदायक ठरेल. जेष्ठा नक्षत्रवाले टुर अ‍ॅरेंजर्स असतील तर काही क्रियेटीव्ह टुर्स पॅकेजेस तयार करुन दाखवतील. एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांना फ़िरण्याचे योग आहेत.

तुमच्या बाराव्या स्थानी येणारा गुरु तुमचे खर्च वाढवणार आहे पण चतुर्थ स्थानावर त्याची दृष्टी असल्याने हा खर्च एकतर प्रॉपर्टी खरेदी साठी असेल किंवा ज्यामुळे आपल्याला सुख मिळेल अश्या परदेशी प्रवास किंवा तिर्थयात्रा यासाठी होऊ शकतो.

साडेसाती मधे शेवटचा टप्पा सुरु होत आहे. हा टप्पा कुटुंबस्थानातून आहे. कौटुंबिक संघर्ष किंवा वृध्दांचा वियोग अशी दुखदायक फ़ळे हा शनिच्या तिसर्या टप्यात मिळताना दिसतात. वृध्दांचा वियोग ही गोष्ट अपरिहार्य आहे पण असे दरवेळी घडेल असे नाही. अनुराधा व जेष्ठा नक्षत्रावरच्या जन्मलेल्या लोकांना कटु अनुभव जरा जास्त येतील.

धनू रास : आपल्या राशीच्या लोकांना कर्क रास अष्टमस्थानात आणि त्या राशीतून राहूचे भ्रमण काही शारिरीक पिडा घेऊन येईल. आपली साडेसाती सुरु आहेच. त्यात दीड वर्ष हा त्रास आहे. ऑपरेशन्स किंवा दिर्घकाळ आजारातून जाण्याचे योग टाळावेत यासाठी असे काही झाल्यास खालील मंत्र जप केल्यास नक्कीच ह्या त्रासापासून सुटका होईल. उत्तराषाठाचे एक चरण धनू राशीत आहे त्यांना अनुभव येऊ शकतो.
अनेक रूपवर्णेश्च शतशोऽथ सहश:।
उत्पातरूपो जगतां पीडां हरतु मे तम:।।
ज्यांना मंत्र जप शक्य नाही त्यांनी भटक्या कुत्र्याला पोळी/भाकरी खाऊ घाला तेच फ़ळ मिळे. घरी कुत्रा असेल तर त्याची व्यवस्था पहा.  मूळ व पुर्वाषाठा नक्षत्राच्या व्यक्तींना आपले काही मित्र या काळात आपल्याला शेअर्स च्या टीप्स देतील त्या दुर्लक्ष न केल्यास फ़ायदा होईल. इन्शुरन्सचे पैसे मिळण्यात अडचण असेल तर मित्रांचे सहकार्य घ्या. या दोन नक्षत्रांना मित्रांच्या सहायाने धनलाभ संभवतो.

लाभ स्थानातून गुरुचे भ्रमण आवक वाढवताना दिसेल. संततीचे योग आहेत. विवाह इच्छित असणारे विवाह बंधनात अडकतील आणि भावंडे प्रगती करतील असे वर्षभर योग आहेत.

आपल्या राशीतुन होणारे शनिभ्रमण चंद्रावरुन आहे त्यामुळे  मानसीक त्रास ही देणार आहे. मानसीक त्रासाचा हा "पीक पिरियड" आहे. मुळ नक्षत्राला या वर्षी हा त्रास जाणवणार आहे. शनिवारी शनिपुजन आणि शनि पीडाहर मंत्राचे दररोज अंघोळी नंतर पठण केल्यास ह्यातून त्रास कमी होईल.

हा घ्या तो मंत्र.

सुर्यपुत्रो दिर्घ देहो विशालाक्ष शिवप्रिया:।
मंदाचार प्रसंनात्मा पीडा हरतु मे शनि: ॥

माझे गुरुवर कायम सांगत की साडेसाती पीडा हरणासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. निलांजन समाभासं हा मंत्र शनि पुजनाचा आहे. स्तुती करण्याचा आहे. पण साडेसाती पीडा हरण किंवा शनिची पीडा अन्य कोणत्या प्रभावामुळे होत असता वरील मंत्र जपावा.

मकर राशी : उत्तराषाठा नक्षत्राच्या तीन चरणांचा सहभाग मकर राशीत आहे आणि हे नक्षत्र असलेल्या मकर राशीच्या लोकांना स्वत: ला त्रास नाही पण आपल्या वैवाहीक जोडीदाराला आजारपण/ अपघात अश्या विपत्तीला पहिले काही महीन्यात तोंड द्यावे लागेल अशी शक्यता आहे. सप्तमातला राहू हा काही काळ अचानक आय़ुष्यात काही व्यक्ती येण्याचा काळ दर्शवितो. मग ते प्रेमप्रकरण असेल किंवा अनैतीक संबंध असतील. जे असले निर्णय घ्यायच्या वयात आहेत अश्यांना खास करुन उत्तराषाठा व्यक्तीच्या लोकांनी या प्रकरणापासून अलिप्तता बाळगावी. विवाह ठरत असल्यास चौकशी जास्त करावी. ज्यांचे विवाह ठरण्यास उशीर होत होता अश्या श्रवण नक्षत्राच्या लोकांना झट मंगनी पट ब्याह असा अनुभव येईल. धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मकर राशीत आहेत त्यांना व्यावसायीक असतील तर पार्टनरने अडचणीत आणले अश्या संकटांना सामोरे जाण्याची शक्यता दिसते. आपल्या वैवाहीक जोडीदाराच्या चारित्र्यावर उगाचच शंका मनात यावी असा काळ आहे. ही शंका घेताना मकर राशीच्या लोकांनी उगाचाच पराचा कावळा होत नाही ना ? याची काळजी घ्या.

दशमातून होणारे गुरु भ्रमण आपली नोकरीत कामाच्या कक्षा वाढवणार आहे. आपल्यावर अकस्मात जबाबदारी वाढल्याचा अनुभव येईल. याचे फ़ळ पुढील वर्षी वेतन वाढीत किंवा प्रमोशनसहीत वेतन वाढीत मिळेल म्हणुन नोकरीत/ व्यवसायात चालढकल करु नका.

साडेसातीच्या सुरवातीच्या टप्यात कष्ट पडतात, खर्च वाढतात किंवा मानसीक कष्ट ही वाढतात. परदेश भ्रमण होते. शनि धनु राशीत जाईल तेव्हा हे फ़ळ मिळणार आहे. खर्च झाला तरी तो इन्व्हेस्टमेंट कशी होईल ते पहा. मानसीक कष्ट काही शिकवून जातात याकडे लक्ष द्या. परदेशगमनाने काही लाभ निश्चित होतात. ज्ञान वाढते. सबब साडेसातीकडे फ़ार निराशाजनक पध्दतीने पाहू नका. शनि शिक्षक आहे, न्यायाधीश आहे. तो चुकांचे फ़ळ देतो. देताना जाणिवही देतो. या चुका करायच्या नाहीत हा संदेश आपण घ्यायचा असतो.

कुंभ राशी : आपल्या सहाव्या स्थानातून राहू जाताना खासच काळजी करावी असे ग्रहमान आहे. रोगाचे निदान ना होणे. झाले तरी योग्य औषध ना मिळणे. गुप्त शत्रुंच्या कारवाया असे ग्रहमान आहे. डॉक्टर/ वैद्य याच बरोबर आजार असता ज्योतिषाची मदत घेतलीत तर निदान योग्य होईल हे जरा धाडसाचे मी विधान मी करतो आहे असे नाही. पण जेव्हा सर्व प्रयत्न हरतात तेव्हा काही वेगळे मार्ग नक्कीच उपयोगी ठरावेत. शततारका नक्षत्राला हा त्रास फ़ारसा नाही पण पुर्वा भाद्रपदाचे जे तीन चरण कुंभेत आहेत अश्या व्यक्तीला हा त्रास नक्कीच संभवतो. यास्तव कोणता आजार, काय ट्रीटमेंट या कडे राहू बदलानंतर पहिले काही महिने लक्ष द्या. उगाच औषधे घेत राहू नका नाहीतर " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी " अस एक नाट्यपद जुन्या नाटकात होते तसा अनुभव यायचा.

भाग्य स्थानातून होणारे गुरुचे भ्रमण परदेश गमन, तिर्थयात्रा यासाठी अनुकूल आहे. कुंभ रास ही अध्यात्मात रममाण होणारी रास आहे असे म्हणतात यादृष्टीने विशेष गुरु कृपा मिळेल. ज्यांना गुरु मंत्र हवा आहे त्यांनी खास प्रयत्न करावेत. ज्यांना संतती हवी आहे त्यांना संतती योग आहेत. संततीची प्रगती वर्षभर होणार आहे. आपले व्यक्तीमत्व उजळून निघेल असे मान सन्मान या वर्षी प्राप्त होतील.

लाभ स्थानी येणारा शनि आपल्याला कष्टाच्या मार्गाने येणार्या धनामधे वृध्दी देताना दिसेल. काही कान पिळणारे जेष्ठ मित्र मिळतील. त्यांचा सल्ला महत्वपुर्ण असेल.


मीन रास : पाचव्या स्थानातून होणारे राहूचे भ्रमण पूर्वा भार्द्रपदा नक्षत्राच्या शेवटच्या चरणाला चांगले नाहीत. मुलांच्या कारणाने चिंता राहील. आपली संतती अडचणीत कशाने येऊ शकेल याचा शोध घ्या आणि त्यावर पर्याय शोधून ठेवा. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्राला क्रिडा प्रकार, कला, विचार प्रदर्शनातून चांगला लाभ या काळात मिळु शकेल. रेवती नक्षत्राला मात्र आपल्या विचारांनी भ्रमीत झाल्याचा भास काही काळ होईल. संतती अपेक्षा असणार्यांना या काळात नक्कीच संतती लाभ आहे. पाचवा राहू कधी काळी संतती होताना अडथळे निर्माण करतो हा अनुभव काहींना येऊ शकतो. गर्भपात ही टर्म पहिल्या तीन महिन्यात नैसर्गीक प्रक्रिया आहे हे खास करुन स्त्रीयांनी लक्षात ठेवावे. विकृत गर्भ निसर्ग ठेऊन घेत नाही. म्हणुन ही बातमी कळाल्यास तपासण्या करा. आजकाल अगदी पहिल्या महिन्यापासून सोनोग्राफ़ीत विकृती निदान होते. रेवती नक्षत्रांच्या स्त्रीयांनी गर्भ राहीला असता हे राशीभविष्य वाचून चिंता करण्या ऐवजी श्रीकृष्णाच्या आवडत्या मंत्राचा जप करावा.

अष्टमस्थानी आलेला गुरु व्यावहारीक जगात फ़ारसा शुभ नसतो. परंतु ज्यांना योगाभ्यासाची आवड आहे त्यांना खासच पर्वणी आहे. काही यौगीक प्रक्रियात प्राविण्य मिळवून अध्यात्म क्षेत्रात प्रगती कराल.

शनिचे दशमस्थानी असलेले भ्रमण तुम्हाला नोकरीच्या/ व्यवसायाच्या ठिकाणी कष्टाचे असेल. कामाचा बोजा वाढेल किंवा ज्या कामाची प्रोसेस नक्की माहित नाही अशी कामे करावी लागल्यामुळे शारिरीक  व मानसीक कष्ट वाढतील. तुमच्या क्षमता वाढणे कधीतरी आवश्यकच असते या शिवाय पुढचे प्रमोशन मिळत नाही या दृष्टीने या कडे पहा.

शुभंभवतु

Sunday, October 1, 2017

मुंबई मेरी जान

मुंबई मेरी जान नावाचा सिनेमा काही वर्षांपुर्वी येऊन गेला. मुंबईत रहाणार्यांचा जीव तिथेच अडकलेला असतो. फ़ारच थोडे लोक मुंबई सोडुन दुसरेकडे स्थाईक व्हायला इच्छुक असतात. या चकाचक आणि वेगवान दुनियेत काही जिवघेण्या भिती ही दडलेल्या असतात. मुंबईत झालेले बॉम्ब स्फ़ोट असोत की त्यानंतर झालेल्या दंगली. लोक आजही त्या भितीदायक दिवस-रात्रीच्या आठवणी जागवून असतात. बॉम्ब स्फ़ोट पुन्हा होतील का या प्रश्नाचे उत्तर दहशत वादाला किती पाळे मुळे मुंबईत पसरता येतात यावर त्याची तिव्रता अवलंबून आहे. थोडक्यात हे संकट मानव निर्मीत आहे आणि त्याचे उत्तर ही मानवाकडे आहे.

२६ जुलै २००५ आणि २९ ऑगस्ट २०१७ रोजी या शहराला पावसाने झोडपले. हा प्रश्न जरी मानवनिर्मीत असला तरी तो निसर्गाच्या वर सुध्दा अवलंबुन आहे म्हणुन मला "कोणत्या मुंबईत योगावर जोरदार पाऊस पडला आ्णि पुन्हा अशी भिती मुंबईला कधी येऊ शकेल?"  यावर अभ्यास करण्याची प्रेरणा झाली. अर्थात हा अभ्यास आहे. मुंबईचे भविष्य मी वर्तवत नाही. मेदिनीय ज्योतिष शाखेचा मी विद्यार्थी नाही त्यामुळे या लेखाचा झालाच तर उपयोग काळजी घेण्यासाठी किंवा या विषयावर विस्त्रुत अभ्यास करण्यासाठी आहे.

पाऊस पडण्यासाठी खालील गृहीतके विचारात घेतली आहे.

१. पावसाच्या सिझनमध्ये पाऊस पडतो. सध्याच्या वातावरणात जुन जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस पडतो याला सरकारी भाषेत सुध्दा मोसमी पाऊस असे संबोधले आहे. अन्य काळात जरी पाऊस झाला तरी मुंबई बुडेल असा पाऊस होणार नाही.
२. पावसाच्या नक्षत्रात म्हणजे खालील नक्षत्रात जेव्हा रवि प्रवेश करतो आणि त्याचे वहान जर बेडूक, म्हैस,हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल, मोर, गाढव, उंदीर वाहन असता मध्यम पाऊस पडेल,घोड़ा वाहन असता पर्वतक्षेत्रात पाऊस पडेल आणि कोल्हा, मेंढा वाहन असता पाऊस ओढ़ लावील असे सांगण्यात आले आहे. ही वहाने पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे किंवा नाही याबाबत अंदाज देतात.
३. जर कर्क, वृश्चिक आणि मीन या जलराशीत जास्त ग्रहांची किंवा शुक्र, चंद्रासारख्या जलग्रहांचे अधिक्य असेल तर पाऊस जास्त पडतो
४. जून महिन्यात ढ्गांचे प्रमाण विस्कळीत असते. मुसळधार पाऊस जुलै किंवा ऑगस्ट महिन्यातच पडतो आणि जून महिन्यात पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते. यामुळे पाऊस पडला तरी पाणी कमी वहाते.
५. पाऊस जास्त पडेल म्हणजे त्या ठिकाणी कमी काळात रेकॉर्ड पाऊस पडेल किंवा त्या काळात सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस पडेल.

खालील कुंडली मुंबईचे सिंह लग्न गृहीत धरुन २६ जुलै २००५ या दिवसाची तयार केली आहे. सुर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश १९/०७/२००५ ला झाला तेंव्हा वाहन बेडुक होते. एका वहाना वरुन पाऊस जास्त पडेल की कमी असे वर्तवणे बरोबर असणार नाही. कारण ही परिस्थिती १३ दिवस असते. अश्यावेळी तेरा दिवस जोरदार पाऊस पडेल का ? तर नाही. ज्या दिवशी असे वहान असून जलराशीत जलकारक किंवा अनेक ग्रहांची गर्दी असेल त्या दिवशी पाऊस पडेल.



वरील पत्रिका पाहिली असता खालील गोष्टी दिसतात.

१. मुंबईच्या पत्रिकेत अष्टमस्थानी राहू आणि चंद्र यांची युती जलराशीत झालेली आहे.
२. मुंबईच्या पत्रिकेत व्ययस्थानी रवि,शनि व बुध हे ग्रह आहेत.
३. मुंबईच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी अनेक दुर्घटना आणि एकावेळी अनेकांचे अपघाती मृत्यु घडविणारा प्लुटॊ जलराशीत आहे.

यावरुन एकूण जलराशीत १२ पैकी ६ ग्रह दिसतात. यात चंद्र एकटाच जलकारक ग्रह आहे.

आता आपण २९ ऑगस्ट २०१७ ची मुंबईची पत्रिका पाहू ज्या दिवशी पुन्हा मोठा जलप्रलय झाला. या दिवशी रवि सिंह राशीत मघा नक्षत्रात होता व त्याचे वहान मेंढा होते. याचा अर्थ भरपुर पाऊस पडेल असे वहान नसताना सुध्दा जोरदार पाऊस झाला. ही परिस्थिती अनेक ग्रह जल राशीत असताना चंद्र जलराशीत गेला असता तयार होते.



१. मुंबईच्या पत्रिकेत अष्टमस्थानी मीन या जलराशीत एकही ग्रह नाही.
२. मुंबईच्या पत्रिकेत व्ययस्थानी कर्क राशीत राहू आणि रवि हे दोन ग्रह आहेत पण युतीत नाहीत.
३. मुंबईच्या पत्रिकेत चतुर्थात वृश्चिक राशीत चंद्र आणि शनि हे दोन ग्रह आहेत,

यातला कोणता ग्रह जलराशीत असताना अशी घटना घडू शकते (पावसाचे प्रमाण वाढू शकते ? ) यावर विचार केला असता.
१. दर वर्षी जुलै महिन्याच्या १५-१६ तारखेला रवि जल राशीत जातो पण दरवेळी पाऊस वाढतोच असे नाही.
२. बुध आणि शुक्र रवि पासून लांब जात नाहीत म्हणजे एखाद्या पावसाळ्यात रवि, बुध, शुक्र आणि एखाद्या दिवशी चंद्र त्यांच्या सोबत कर्क राशीत असणे शक्य आहे. असे असूनही दर दोन चार वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक मुंबईत पाऊस पडला असेही घडत नाही.
३. या दोन्ही कुंडल्यांच्या विचार केला असता दोन्ही वेळेस शनि जल राशीत होता आणि दोन्ही वेळेस राहू जल राशीत होता.
४. या दोन्ही पत्रिकात अजून एक साम्य असे आहे की दोन्ही वेळेस गुरु कन्या राशीत होता याचा काही संबंध आहे का?
५. गुरु जल राशीत दर चार वर्षांनी जातो म्हणुन तो काही जलप्रलय करत नाही कारण गुरुचे कारकत्व वाढ करणे असले तरी नुकसान करणे असे नाही. यामुळे कन्या राशीतला गुरु स्वत: काही घडवत नसला तरी २००५ च्या जलप्रलयात त्याची दृष्टी मीन राशीतल्या ग्रहांवर असल्याने काही प्रमाणात प्रलयाला जबाबदार असावा.
६. या सर्व विवेचनावरुन असे वाटते की जलकारक ग्रहाच्या बरोबर राहू असेल तर पाऊस जोरदार पडेल.



एका जुन्या ग्रंथाचा संदर्भ घेतला तर चंद्र जेव्हा अनेक ग्रहांशी जलराशीतून योग करतो तेव्हा त्या काळात जास्त पाऊस पडतो असे अनुमान वरील हिंदी ग्रंथाच्या संदर्भातून मिळते.

यावरुन असे वाटते की पुढील वर्षी म्हणजे २०१८ मधे पावसाळ्यात राहू जलराशीतच असणार आहे. त्याचा चंद्राशी योग पावसाळ्यातल्या जुलै आणि ऑगस्ट या पावसाळ्याच्या महिन्यात होणार आहे. जर याच वेळी अनेक ग्रह जलराशीत असतील तर मोठाच पाऊस मुंबईत पडे.

सामान्य माणसाला काही भोगावे लागेल की नाही याचे उत्तर त्याच दिवशी भरती आहे किंवा रविवार सारखा सुट्टीचा दिवस नसून कामाचा दिवस असेल तर मात्र हे घडेल. आपण पाहू या संभाव्य तारखा.

१. जुन २०१८ मधे १६ व १७ ला चंद्र, शुक्र व राहू कर्क राशीत फ़क्त तीन ग्रह जलराशीत असल्याने पाऊस थोडा जास्त असेल.
२. जुलै २०१८ मधे १४ व १५ तारखेला चंद्र, बुध व राहू कर्क या जलराशीत तीन ग्रह असतील त्यामुळे पाऊस जास्त पडेल.
३. ऑगस्ट २०१८ मधे १० व ११ तारखेला चंद्र रवि बुध आणि राहू असे चार ग्रह कर्क या जलराशीत असतील इथे थोडा जास्त
   पाऊस अपेक्षीत आहे. रवि चे नक्षत्र आश्लेषा आहे व त्याचे वहान ( कोल्हा ?) असल्याने ढगांची उत्पत्ती फ़ारशी नाही.

या नंतर २८ नोव्हेंबर २०२३ ला राहू मीन या जलराशीत प्रवेश करतो त्या वर्षीच्या पावसाळ्यात इतर ग्रहांची काय परिस्थिती आहे ते पाहू.

१. जून महिन्यात फ़क्त चंद्र आणि राहू जलराशीत आहेत. असे तीन वेळा घडेल पण फ़ारसा पाऊस नसेल.
२. ७ व ८ जुलै २०२४ ला चंद्र, बुध आणि शुक्र कर्क या जल राशीत तर राहू या मीन राशीत असेल तेव्हा पाऊस जास्त पडेल.
३. १७ व १८ जुलै २०२४ ला चंद्र, बुध, शुक्र व रवि हे कर्क राशीत तर नेपच्युन व राहू मीन राशीत आहे अश्याही वेळी जास्त पाऊस पडेल.
४. २६ व २७ जुलै २०२४ ला शुक्र व रवि हे कर्क राशीत तर चंद्र व राहू व नेपच्युन मीन राशीत अशी असाधारण परिस्थिती असेल.
या दिवशी रवि पुष्य नक्षत्रात असेल. रविचा पुष्य नक्षत्रातला प्रवेश १९ जुलैला असेल व वहान बेडूक असेल. याचा अर्थ पाऊस जास्त पडेल
अशी स्थिती जुलै महिन्यात याच तारखेला असेल.

माझ्या मते जेव्हा राहू आणि चंद्र एकत्र असतात ते जास्त प्रभावी असतात. २६ जुलै २००५ ला असे ग्रहमान होते. चंद्र व प्लुटोचा केंद्रयोग २७ जुलै २०२४ ला आहे. हा एक अशुभ योग मानता येईल.

आता या तारखांना भरती आहे का हे तपासण्याची गरज आहे. नेटवर शोधले असता पुढील काही वर्षातल्या काही तारखांना  भरती असेल का ? हे शोधण्याचे टेबल काही सापडले नाही.

या शोध निबंधाचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.

१. २०१८ साली तरी किमान मुंबई जलमय होण्याचा धोका दिसत नाही.
२. हा धोका २०२४ सालच्या पावसाळ्यात होऊ शकतो.
३. २६ व २७ जुलै २०२४ हे ते संभाव्य दिवस असतील ज्या वेळी मुंबई जास्तच जलमय होऊ शकते.

घाबरुन जाण्याचे कारण नाही. मुंबईने २६ जुलै २००५ नंतर खुपच मोठा बोध घेतला आहे.  या वेळी २४ तासात ९४४ एम एम पाऊस पडला होता. या दुर्घटनेत १०९४ लोकांना प्राण गमवावे लागले होते. वीत्त हानी ही मोठी होती.

२९ ऑगस्ट २०१७ च्या घटनेत १२ तासात ४६८ एम एम पाऊस पडला जो सहसा ऑगस्ट महिन्यात इतका पडत नाही. २१ लोकांना ह्यात प्राण गमवावे लागले यात बिल्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेची जोड आहे. मुंबई या वेळेला सावध होती. अनेकांनी ऑफ़सच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अचानक येणारी संकटे कमी झाली. दुर्घटनापासून बचाव करणारी पथके रोडवर होती.

२०१७ ते २०२४ ह्या काळात नेमका कोणता भाग जास्त जलमय होतो ते शोधून त्या भागात  काही बचावात्मक यंत्रणा उभी करता आली तर ह्या लेखाचा उपयोग होईल. लोकशिक्षणाचा वापर करुन इशारा मिळेल तेंव्हा लोकांना रस्त्यावर येण्यापासून थांबवण्यात आले तर इतकीही मनुष्य हानी न होता ह्या संकटातून बाहेर पडता येईल असे वाटते. जपान मधे भुकंप कायमच होतात या साठी लोकशिक्षणाचा परिणामकारक उपयोग करुन दुर्घटनामधून होणारी मनुष्यहानी टाळण्याचे शिक्षण शाळेपासूनच दिले जाते. या पासून आपणही भारतात शिकायला हवे.

शुभ तेच घडावे. अशुभ मनुष्याने प्रयत्नाने टाळावे हाच ज्योतिषाचा उपयोग आहे हा विचार सांगून लेखनसीमा.