Tuesday, December 20, 2016

साडेसाती वृश्चिक - धनु आणि मकर राशीची



२६ जानेवारी २०१७ रोजी शनिमहाराज धनु राशीत प्रवेश करणार आहेत. तूळा राशीची साडेसाती २६ जानेवारीला संपली तरी १०० टक्के संपत नाही. वृश्चिक राशीला शेवटची अडीचकी सुरु होते. धनु राशीला मधली अडिचकी सुरु होते आणि मकर राशीला साडेसातीची सुरवात होत आहे. प्रत्येक राशीला काय आणि कशी फ़ळे मिळणार आहेत याबाबत आता पाहू.

तूळा रास

या प्रवेशासोबत तूळ राशीची साडेसाती २६ जानेवारी २०१६ ते २० जून २०१७ या साधारण सहा महिने कालावधीसाठी संपणार आहे. हत्ती गेला आणि शेपुट राहीले असा अनुभव तुम्हाला येणार आहे. कारण २० जुन २०१७ पासुन २६ अक्टोबर २०१७ कालावधीसाठी साडेसाती पुन्हा येईल. त्याचा परिणाम खास करुन तूळा राशीच्या शेवटच्या अंशात म्हणजे विशाखा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना थोडासा प्रभावीत करेल. त्यांनी अजिबात चिंता करण्याचे कारण नाही.

फ़क्त तूळ रास व ज्यांचे वृषभ लग्नाच्या लोकांना या साडेसातीचा  त्रास संपला असे वाटणार नाही कारण  धनु राशीतला शनि, लग्न राशीकडुन अष्टमात जात आहे. वृषभ राशीला शनि राजयोग कारक आहे. तो नवमेश- द्शमेश आहे. नोकरी- व्यवसायात पुढील अडीच वर्षात  यश हुकुमी मिळणार नाही. यशासाठी झगडावे लागेल. उत्तम ज्योतिषाला विचारा की लग्न राशीकडुन तुमचा गुरु कोणत्या स्थानात आहे. तो जर उत्तम स्थानी असेल तर चिंता करण्याचे कारण नाही.

साडेसाती संपताना काही न्युनगंड तयार होतात. कोणाला ड्रायव्हिंगची भिती तयार होते, कोणाला काही परिस्थीतीचा सामना करण्याचे धैर्य रहात नाही तर कोणाला काही नाते- संबंध म्हणजे नुसता त्रास असे वाटायला लागते. आपण अजिबात कोणती उपासना करत नसाल तर अंघोळीनंतर गायत्री मंत्राचा मनापासुन जप करा. या त्रासातुन मोकळे व्हाल. याच बरोबर आपल्या बॅक ऑफ़ द माइंड मध्ये असे कोणते न्युनगंड तयार झाले आहेत आणि ते का आहेत याची कारणे शोधा. समजा, तुम्हाला साडेसातीत एखादा अपघात झाला म्हणुन तुम्ही ड्रायव्हींग करायला भीत असाल तर मनाला बजावा की असे पुन्हा पुन्हा घडत नाही. ज्याची भिती वाटते ते हमखास करा. त्याच बरोबर आपली उपासना सुरु ठेवा.

वृश्चिक रास 

आपली साडेसाती संपायला अजुन सर्वसाधारण अडिच वर्षे बाकी आहेत. मागची अडिच वर्षे तुम्ही खुपच पोळले गेले आहात. तुमच्या चंद्रावरुन म्हणजे मनाचे नियंत्रण करणारा ग्रह यावरुन मागिल अडिच वर्षे शनिचे भ्रमण झाले आहे. मनाला खुपच त्रास झाला असेल. ज्यांचा जन्म १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर काळात आहे अश्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती जरा जास्तच त्रासल्या असतील. आजारपण, मानहानी आणि वडीलांना त्रास असे प्रकार मागील अडीच वर्षात दिसले असतील. आपला रवि जर चंद्रा बरोबर वृश्चिकेत असेल तर शक्यता आहे की बुध आणि शुक्र या पैकी एखादा ग्रह किंवा दोन्हीही ग्रह वृश्चिक राशीत असतील.  अश्यावेळी ही दाहकता फ़ारच जाणवली असेल. ह्या काळात आपल्याकडुन नीट निर्णय घेतले गेले नसतील. डायबेटीस असेल तर रक्तातली साखर वाढली असेल आणि आपल्या कुटुंबातील स्त्रीवर्गाला सुध्दा काहीना काही सहन करावे लागले असेल. पण तो खराब काळ आता संपला आहे.

आपल्याला न्युनगंड निर्माण झाले तरी त्यावर कशी मात करायची याचे चांगले तंत्र अवगत आहे. आपण खुपच पोळले असाल तरी आता मानसीक रित्या बाहेर याल.

चंद्र राशीकडुन धनु रास तुमच्या कुटुंब स्थानात येते. जर तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी काळातला असेल तर या काळात शनिचे भ्रमण तुमच्या रवि वरुन होणार आहे. याचा परिणाम म्हणुन आपल्याला मानहानी स्विकारावी लागु शकते. आरोग्याच्या तक्रारी दिसु शकतात उदा. अर्थ तंबाखु खात असाल तोंडाच्या आरोग्याबाबत जागरुक रहा. दात दुखत आहे म्हणुन घरगुती उपाय करु नका. किमान एक रात्र आपली झोप जाईल. दात दुखतो आहे आणि उद्या रविवार आहे अश्यावेळी डेंटिस्ट ना भेट द्या. कितीही गर्दी असली तरी उपचार करुन घ्या. साडेसातीमधे शिळे अन्न खाऊ नका. राहूची महादशा चालु असेल तर शपथ घ्या की शिळे खाणार नाही. हे महिलांच्या बाबतीत जास्त लागु होते. कारण फ़ेकुन कसे द्यायचे म्हणुन महिला ते अन्न खातात.

जर तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी आपले सरकारी स्कीम मधले धन धोक्यात येऊ शकते. आपण पीपीएफ़ मधे पैसे ठेवले असतील आणि १५ वर्षे उलटुन गेली असतील तर मुदत वाढीचा एक अर्ज द्यावा लागतो तो नक्की द्या. तसेच या निमीत्ताने आपण पीपीएफ़ साठी नॉमीनेशन केले आहे ना ते पहा. घाबरु नका, माझ्या या वाक्याचा चुकुनही गैर अर्थ घेऊ नका. तुमच्या जीवाला धोका आहे असे अजिबात नाही. मी कोण्या व्यक्तीचा मृत्यु वर्तवणे सोडाच हींट सुध्दा देत नाही. व्यक्ती उगाचच घाबरुन जाते. त्यामुळे सर्वच वृश्चिक राशीच्या मंडळीनी याच अर्थ समजाऊन घ्या. एकतर त्या पीपीएफ़ अकाऊंटस  सरकारी बॅकेचे कर्मचारी फ़ारसे उत्साहाने किंवा काळजीने हाताळत नाहीत. पोस्ट खात्याबाबत फ़ारसे न बोललेले बरे म्हणुन मला हे सर्व लिहावेसे वाटले.

तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी याकाळातला असुन धनु राशीत जर रवि बरोबर बुध, शुक्र हे ग्रह असतील तर काय घडेल हे जाणण्यासाठी एखाद्या जाणत्या ज्योतिषाला भेटा. तसेच मीन, मिथुन, कन्या या ही राशीत अनेक ग्रह असतील तरीही पत्रिका दाखवा. काही छोटे त्रास शनिच्या भ्रमणाने संभवतात. त्याबाबत जाणुन घ्या.

या  शिवाय विवीध लग्न राशींना चंद्राची रास वृश्चिक असताना काय फ़ळे मिळतील ते पाहु

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही.
वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा.
मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या.
कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.
सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.
कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेची चिंता करावी लागेल.
तूळा लग्न असेल तर शनि  तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.
वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील.
धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत  काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील.
मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. हे खर्च चांगल्या कामासाठी झाले तर ठीकच आहे.
कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात साडेसाती असुन घडणार आहेत.
मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

या लेखाच्या  शेवटी साडेसातीचा त्रास सुसह्य व्हावा म्हणुन काही उपासना लिहली आहे. तुमचा फ़ार विश्वास नाही या सगळ्यावर पण त्रास झाल्यानंतर काही करण्याऐवजी उपासना करत नसाल तर करा इतकेच लिहेन. तुमच्या लहान मुलांची वृश्चिक राशी - जेष्ठा नक्षत्र आहे पण अजुनही जननशांती केली नसेल तर करा. तुमचे जेष्ठा नक्षत्र आणि मुलाचे किंवा मुलीचेही जेष्ठा नक्षत्र असेल तर हा मोठा दोष आहे. त्याला होणारा त्रास तुम्हाला भोगता येत नाही. आई- वडील म्हणुन तुम्ही इतकेच करु शकता त्यांची जननशांती करा.

धनु राशी :

तुम्हाला जितकी उत्सुकता आहे की साडेसातीची मधली अडीचकी कशी जाईल तितकीच मलाही आहे. मला १९८६ साल ते १९८८ सालात मागच्या साडेसातीत मधली अडीचकी होती. ५ मे १९८६ साली एक छोटा अपघात प्रयाग हॉस्पीटल-  समोर पुणे येथे मला झाला होता. पुढच्या पाच मिनीटात मी जखमेवर उपचार ही केले होते पण ही जखम मला तीन महिने पुरली. शेवटी माझे सदगुरु श्री गजानन महाराज शेंगाव यांच्या कृपेने चमत्कार होऊन जखम बरी झाली. १९८७ सालच्या मार्च महिन्यात माझे लग्न होते पण मी जोरदार आजारी पडलो. तीन दिवस कोणतेही निदान नाही. पुन्हा सदगुरु धाऊन आले. मग निदान झाले की फ़क्त अ‍ॅसिडीटी झाली आहे. मग लग्नही आनंदाने पार पडले. त्या पाठोपाठ एक नको असताना ऑपरेशन झाले केवळ चुकीच्या निदानामुळे. अजुनही मानहानी होईल अशी घटना घडली. नोकरीत खुप त्रास झाला.  माझ्या मते माझे मुळ नक्षत्र असुन जननशांती न झाल्याने तसेच अमावस्येचा जन्म तीही शांती न झाल्याने हे सर्व घडले. पुढे मी वयाच्या ३० वर्षांनंतर स्व हस्ते या शांती केल्या. कारण मला आता ज्योतिष समजु लागले होते. मी साधना करत नव्हतो ती करायला लागलो. आता त्रास होणार आहेच पण तो इतका जोरदार नसेल.

तुमची धनु रास आहे आणि मुळ नक्षत्र असेल तर जननशांती केली नसेल तर करा. जर धनु रास असुन जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी काळात असेल तर जन्मकाळी अमावस्या असण्याची शक्यता आहे. मग जननशांती कराच आणि जर जाणत्या वयात ही दुसरी साडेसाती येणार असेल तर अनुभव घ्या आणि फ़रक जाणवेल. जननशांती दुसरी साडेसातीत चंद्रावरुन शनी जाण्याआधी केलीत तर ही साडेसाती सुसह्य होईल.

सर्व धनु राशीच्या लोकांना चंद्रावरुन शनिचे भ्रमण झाल्याचे  परिणाम ह्या काळात दिसतील. किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप होणार आहे. हमखास एखादी व्यक्ती असे वागेल की तुम्हाला अपेक्षा नसेल आणि म्हणुन मानसीक त्रास होईल. मुळ नक्षत्रांच्या लोकांना हे जरा जास्त जाणवेल पण पुर्वाषाढा आणि उत्तराषाढा यांना तितका त्रास होणार नाही. वर लिहील्याप्रमाणे अमावस्येचा जन्म असल्यास आणि मुळ नक्षत्रात रवि असल्यास ( १६ डिसेंबर ते २९ डिसेंबर ) जरा जास्त त्रास संभवतो. पुर्वाषाढा नक्षत्रात चंद्र आणि रवि असतानाही त्रास होणार आहे पण तो त्या मानाने कमी असेल. नविन काम सुरु करणार असाल तर गुंतवणुक कमी ठेवा. आईचे आरोग्य बिघडणार नाही हे पहा तसेच अमावस्येचा जन्म असताना आई- वडील या दोघांना जपा.

आता विवीध लग्नराशींना, धनु चंद्र रास असताना धनु राशीतल्या शनि भ्रमणाचा काय परिणाम होईल ते पाहु.

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसीक त्रास होईल.
वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमाऊ नका. यातुनही बाहेर पडणार आहात.
मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.
कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.परिस्थीतीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थानातुन जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.
कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.
तुळा लग्न असेल तर शनि  तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.
वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागतील.
धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनु राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.
मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. व्यवसायीक असाल तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठी सुध्दा करावा लागेल.
कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात साडेसाती असुन घडणार आहेत.
मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

या लेखाच्या  शेवटी साडेसातीचा त्रास सुसह्य व्हावा म्हणुन काही उपासना लिहली आहे. तुम्ही भाविक आहात. भावना जागृत ठेऊन उपासना करा. तुम्हाला नक्कीच कमी त्रास होईल. या काळात शनिशिंगणापुरला जा शनि महाराजांचे दर्शन घ्या. शनि महाराज नक्कीच कृपा करतील.

मकर रास 

तुमच्या राशीला साडेसाती साडे बावीस वर्षांनी सुरु होत आहे. ती पुढे साडेसात वर्ष सुरु रहाणार आहे. पहिल्या अडिचकीत शनी चंद्राच्या व्यय स्थानातुन भ्रमण करतो. हा काळ चांगला नसतो. लग्न राशी आणि चंद्र राशी दोन्ही मकर राशी असताना याचे जास्त वाईट परिणाम अनुभवाला येतील कारण भौतीक नुकसान होतेच म्हणजे पैसे अनावश्यक खर्च होतात किंवा ज्याला आपण नुकसान म्हणु होते शिवाय चिंता लागुन रहाते.

काही सुचवायचे आहे पहा जमते का.

१. आपण ठेवलेल्या सर्व ठेवींची कागदपत्रे बरोबर आहेत का ते तपासुन पहा. काही मुदत ठेवी संपलेल्या असतील तर पुर्नजीवीत करा म्हणजे व्याजाचे नुकसान टळेल. नोटबंदीमुळे रद्द झालेल्या सर्व नोटा सगळ्या बॅकेत जमा केलेल्या आहेत ना याची खात्री करा.
२. आपण घेतलेल्या सर्व शेअर्स चे टेक्नीकल अ‍ॅनेलिसीस पहा. अचानक काही बदल झालेले दिसत असतील आणि हे शेअर्स कोसळणार अशी शंका वाटत असेल तर आर्थीक सल्लागारांचा सल्ला घेऊन योग्य निर्णय घ्या.
३. ज्या गुंतवणुकीतुन अपेक्षीत फ़ायदा होत नसेल त्याकडे ही लक्ष द्या. त्या गुंतवणुकींचे नेमके काय करायचे यावर लक्ष द्या.
४. नाते संबंध ताणले गेले असतील तर त्यांना वेळ द्या.
५. जुनी दुखणी कायमची बरी व्हावीत म्हणुन आवश्यक वाटल्यास पॅथी बदलुन पहा. पर्यायी उपचार पध्दतीने रोग बरा होईल ते पहा.


असे म्हणतात की एक टाका वेळेवर घातला म्हणजे पुढचे अनेक टाके घालणे वाचते. ह्या साठी चक्क एक महिना हातात आहे.

यातुन काही नुकसान होणार आहे. त्याला इलाज नाही. काही शिकायला पण मिळणार आहे. शिकलेले आयुष्यभर उपयोगी पडणारच आहे. आपली आपल्या जाणते पणी म्हणजे वयाच्या १६-१८ वर्षांनी पहिलीच साडेसाती येत असेल तर वयाने जास्त असलेल्यांचा सल्ला ऐका.

आता साडेसाती निवारणार्थ उपाय पाहु

साडेसाती सुरु असताना दररोज अंघोळीनंतर खालील मंत्र किमान ११ वेळा म्हणा. म्हणताना शनि शिंगणापुरच्या शनिदेवतेचे ध्यान करा.

सुर्यपुत्रो दीर्घा देहि विशालाक्षा शिव प्रियः।
मंदाचारा प्रसन्नात्मा पीड़ां हरतु मे शनि ॥

दर  शनिवारी हनुमंताचे दर्शन सुर्यास्तानंतर घ्या. पाठोपाठ शनिमहाराजांचे घ्या. शनिमहाराजांना काळे उडीद, खडे मीठ, चमचा भर तेल, रुईच्या पानांचा हार अर्पण करा. शनिमहाराजांच्या समोर दिवा लावा. दिप दान करा. पाठोपाठ वरील मंत्र ११ वेळा म्हणा.

दर शनिवारी स्वत: तेल लाऊन अंघोळ करा म्हणजे शारिरीक व्याधी कमी होतील. साडेसातीत संकटे आल्यास १०० हनुमान चालीसाचे पाठ करा.

                                                     शुभंभवतु

१६ डिसेंबर ते १४ जानेवारी महिन्याचे भविष्य http://gmjyotish.blogspot.in/2016/12/blog-post.html

4 comments:

  1. Thank you for sharing useful information

    ReplyDelete
  2. लग्ना एवजी चंद्रा पासून शब्दप्रयोग योग्य ववाटतो

    ReplyDelete
  3. माझी रास व्रश्चिक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साडेसातीच्या मधल्या टप्प्यात खुप काही गमावुन बसलो आहे मला माझी लग्नरास माहीत नाही ती कशी समजेल ?

    ReplyDelete