Saturday, April 8, 2017

राशी भविष्य एप्रिल २०१७ करता व १४ एप्रिलला जन्म तारिख असणार्या सर्वांसाठी विशेष माहिती.

आज पर्यंत दर महिन्याला मी राशीभविष्य रवि बदलला की लिहीत होतो. एका पाक्षिकाने राशीभविष्य लिहीण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रस्तावना सोडता इंग्रजी महिन्याप्रमाणे तेच भविष्य प्रसिध्द करण्याचे आता मी ठरवले आहे. एप्रिल महिन्यात चंद्र सोडता तीन महत्वाचे ग्रह राशी बदल करत आहे. हर्षल ७ एप्रिलला पुढील सात वर्षांकरीता मेषेत येत आहे. हर्षल हा मंगळाचे मोठे स्वरुप असलेला पापग्रह आहे. भारतापेक्षा पाकिस्थान मध्ये याचे मोठे परिणाम दिसतील. मंगळ १२ एप्रीलला वृषभ राशीत जात आहे आणि १३ एप्रिलला रवि मेषेत जाईल. हर्षल मेषेत गेल्याने राशीवार काय घडेल हे मी नक्षत्रप्रकाश ह्या ज्योतिष विषयक लेखांच्या वासंतिक विशेषांकात लिहले आहे. त्याची ही लिंक. http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html

ज्यांचा जन्म १४ एप्रिलचा आहे ते मोठेच भाग्यवान असतात. रवि त्यांच्या पत्रिकेत उच्चीचा व उच्च नवमांशात असल्याने यश, किर्ती किंवा अधिकार या व्यक्तीला मिळुन या व्यक्तीचा उत्कर्ष होत असतो. माझ्याकडे १४ एप्रिलला जन्म झालेल्या दोनशे व्यक्तींच्या पत्रिका आहेत ज्या जगभरात प्रसिध्द व्यक्ति म्हणुन नावारुपास आलेल्या आहेत. याचा अर्थ त्यांना आयुष्यभर प्रसिध्दी मिळते असे नाही. त्यांच्या पत्रिकेनुसार रवि महादशेची ६ वर्षे तर या व्यक्तीला बहुदा उत्तम असतात. आता राशीवार भविष्य पाहू.

मेष रास : ह्या व्यक्ती मुळात तापट त्यात गेले महिनाभर मंगळ या राशीत आहे. ७ एप्रिलला हर्षल मेषेत येत आहे आणि १४ तारखेपासुन रवी हा मेष राशीत आल्यामुळे जवळ्च्या व्यक्तींना यांच्या डोक्यावर थंड पाण्याची धार धरावी लागेल. अश्विनी नक्षत्र वाल्यांना याचा विशेष परिणाम दिसेल. मेषेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी यांच्याकडे लक्ष द्यावे. १४ तारखेनंतर काही परिक्षा असतील तर नीट मार्गी लागतील. उष्णतेचे विकार वाढु नयेत म्हणुन विशेष काळजी घ्यावी.  

वृषभ रास : तुमचा राशीचा स्वामी महिनाभर लाभ स्थानी आहे. मीन रास शुक्राची उच्च रास आहे त्यामुळे मनात आणाल ते घडेल असे ग्रहमान आहे. फ़ायदा घ्या हे तुम्हाला सांगायला नको. आजवर अडुन राहीलेली कामे केवळ तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुर्ण होतील. नोकरीत स्थिती उत्तम राहील. मित्र मैत्रीणीच्या भेटी घडतील आणि सुवार्ता ही कानी पडतील.

मिथुन रास : तुमच्याही राशीचा अधिपती बुध मेषेत येत आहे. राशीचा अधिपती लाभात गेला की मनाप्रमाणे कामे होतात पण तुमच्या बाबतीत असे घडेलच असे नाही. कारण मेष ही बुधाची शत्रु रास आणि नीच रास आहे. कामे मार्गी लावण्यासाठी चांगले प्लॅनिंग व तुम्हाला खास शब्दांची योजना करुन काही कामे मार्गी लागतील.

कर्क रास : मेष रास तुमच्या दशम स्थानी येते. त्यात मंगळ आधीपासुन तेथे आहे ही युध्दजन्य परिस्थीती आहे. नोकरी/व्यवसायात प्रचंड कामे हातावेगळी करावी लागतील. घड्याळाकडे पहायची सोय नाही. ही परिस्थिती १२ एप्रिल पर्यंत आहे. त्यानंतर तुमच्या दशमस्थानी रवी येत आहे. महिन्याच्या उतरार्धात तुम्ही राजाप्रमाणे वागाल. तुमचा शब्द खाली पडणार नाही अशी स्थिती नोकरी/व्यवसायात १३ एप्रिल नंतर महिना अखेर असेल.

सिंह रास : १४ एप्रिल पर्यंत तुमच्या राशीचा अधिपती मीन राशीत अष्टमस्थानी असेल. ही स्थिती फ़ारशी उत्तम नव्हती. १४ एप्रिल पर्यंत किरकोळ शारिरीक तक्रारी पाठपुरावा करतील. १४ एप्रिलला रवि मेषेत गेला का हा त्रास संपेल. भाग्येश मंगळ भाग्यात १२ एप्रिल पर्यंत आहे ही चांगली स्थिती आहे. मंगळ वृषभ राशीत गेल्याने अनेक कामे मार्गी लागतील. तुम्हाला एखादा पुरस्कार मिळेल किमान चांगले शब्द तुमच्या बद्दल बोलले जातील असे योग या महिन्यात येतील.

कन्या रास : तुमच्या राशीचा स्वामी बुध महिनाभर मेष ह्या शत्रु राशीत आहे. काही काळ तो वक्री असल्यामुळे राश्याधीपती बलहीन आहे. शारिरीक आणि मानसीक शक्तीची कमतरता जाणवेल पण लग्नी गुरु असल्यामुळे विपरीत फ़ळे मिळणार नाहीत. सप्तमात भाग्येश शुक्र आहे. १५ तारखेनंतर व्यावसायीक असाल तर काही फ़ायद्याचे व्यावसायीक प्रस्ताव येतील. व्यावसायीक बाजूचा विचार करुन ते स्विकारण्यास हरकत नाही. व्यवसायात असलेला स्त्री वर्ग हे फ़ायद्याचे करार घडवण्यासाठी महत्वाचा भुमिका बजावतील.

तुळ रास : सातव्या स्थानी असलेला मेषेतला मंगळ विवाहीत असाल तर जोडीदाराचे मानसीक स्वास्थ्य बिघडवेल. ही स्थिती १२ एप्रिल पर्यंत रहाणार आहे यामुळे डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेऊनच जोडीदाराशी बोलावे तरच सुसंवाद होईल. आईच्या घरचे लोक ( मातुल घराणे ) विवीध कारणांनी वरचे वर भेटतील आणि जुन्या आठवणी सुखावतील.

वृश्चिक रास : १२ तारखेपर्यंत तुमच्या शत्रुची खैर नाही. सहाव्या स्थानी असलेला मेषेचा मंगळ तुम्हाला शत्रुला नामोहरम करायला रसद पुरवेल. १४ तारखेनंतर प्रशासन विभागात काम करणारे सरकारी नोकर आपल्या पदाचा वापर करुन शत्रुला अडकवुन ठेवतील. आपण कलाकार असाल तर एक उत्तम कलाकृती तुमच्या हातुन निर्माण होण्याचे योग आहेत. ह्या संधीचा शोध घ्या. १५ तारखेनंतर याचा अनुभव वेगाने येताना दिसेल.

धनु रास :  इंजिनीयरींगची परिक्षा देणारे विद्यार्थी १२ एप्रिलपर्यंत परिक्षा असल्यास खुप यश मिळवु शकतील असे योग आहेत. बारा तारखेपर्यंत खेळाडु सुध्दा चमकतील असे योग आहेत. सुख स्थानातला मीनेचा शुक्र धनु राशीच्या लोकांना जे सुख वास्तु, वहाने व  वस्तु मिळवुन देऊ शकतात असे सुख घेऊ शकतील. हे योग अगदी महिनाभर तुमच्या राशीला आहेत.

मकर रास : चतुर्थ स्थानात मंगळ असल्याने १२ तारखेपर्यंत घरात  सुसंवाद होणे जरा दुरापास्त असेल पण १२ तारखेनंतर मात्र वातावरण निवळेल. ह्या वर्षी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणीक यश सहजपणे मिळेल पण अभ्यास करणे आवश्यक आहे. इंजिनीयरींगचे विद्यार्थी १२ तारखेनंतर अगदी मे अखेर चांगले यश मिळवु शकतील.

कुंभ रास: आपल्या राशीचा अधिपती लाभ स्थानात आहे. २६ जानेवारी २०१७ पासुन आपल्याला थोडे मनासारखे घडताना दिसत आहे त्याला थोडासा ब्रेक लागणार आहे. कारण शनि ६ एप्रिल पासुन वक्री होणार आहे. तुमच्या आयुष्यात याने फ़ार मोठे नाही पण मनासारख्या घटना न घडणे असा फ़रक ऑगस्ट पर्यंत दिसु शकतो. तिसर्या स्थानी गेलेला मंगळ तुम्हाला साहस करण्याची प्रेरणा देईल पण तुम्ही साहस करु नका. साहस करणे हा कुंभ राशीचा स्वभाव नाही. मीनेचा शुक्र तुमच्या धनस्थानी आहे. भेळ- पाणीपुरी सारख्या चटकदार पदार्थांची मेजवानी महिनाभर असेल. एकंदरीत ग्रहमान तुम्हाला चांगलेच आहे.

मीन रास : तुमच्या ही राशीचा स्वामी गुरु सप्तमात वक्री आहे. पण लग्नी शुक्रासारखा शुभ ग्रह महिनाभर असणार आहे. शुक्राची गुरुवर आणि गुरुची शुक्रावर दृष्टी आहे. फ़ार बिघडणार नाही. घरात कौटुंबीक वातावरणात १२ एप्रिल पर्यंत ताण असेल. पण नंतर वातावरण निवळेल. बुध फ़ारसा अनुकूल नसल्यामुळे फ़ारसे या महिन्यात फ़ार काही घडेल असे नाही. मागील पानावरुन पुढे सुरु असे ग्रहमान आहे.

नितीन जोगळेकर
ज्योतिषशास्त्री
चिंचवड पुणे
संपर्काकरीता फ़ोन नंबर -9763922176
पत्रिका पाहून ज्योतिषसल्ला  घेण्यासाठी फ़ोनवर भेटीची वेळ ठरवुन 

माझ्या ब्लॉगवर ज्योतिष विषयक लेखांचा वासंतीक विशेषांक गुढीपाडव्याला प्रसिध्द झाला. हा ज्योतिषप्रेमी साठी कोणत्याही शुल्का शिवाय उपलब्ध आहे. ही लिंक उघडुन वाचा आणि आपल्या स्नेह्यांना ही लिंक पुढे पाठवा. http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html

No comments:

Post a Comment