Wednesday, December 6, 2017

मनातला प्रश्न १५ वा : अनेकदा ३६ गुण जुळूनही पती-पत्नी मधे संघर्ष किंवा प्रसंगी घटस्फ़ोट होताना दिसतात याचे कारण काय असावे ?

उत्तर : विवाहासाठी वधू - वरांचे गुण मिलन हा व्यावहारिक शब्द प्रयोग असला तरी खर तर नुसते गुण नाही तर कुंडली मेलन असा शब्द वापरला तर प्रथम एका शब्दामुळे होणारे गैरसमज टळतील. कारण कुंडली मेलनामध्ये, गुणमेलन हा एक निकष आहे.

कुंडली मेलनासाठी काही पुर्व गृहीतके आहेत. मुलीच्या/मुलाच्या आई वडीलांनी दिलेली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म स्थळ हे बरोबर आहे.अनेकदा लग्न जमत नाही व कुंडलीतील कुयोगाने मुलीला नाकारले जात आहे असे पाहून मुलीला/मुलाला माहित नसताना ही कुंड्ली बदलून सोयीची कुंडली देण्याचा प्रकार काही लोक समाजात करतात. प्रत्येक वेळेस मुलीची/मुलाची कुंडलीची खातरजमा करण्याची पध्दत नाही. हे सर्व करण्यासाठी वेळ ही लागतो. अनेकदा खातरजमे साठी आवश्यक माहिती पुरवली जात नाही. बायोडाटा मधे माहिती कमी असते. यामुळे कुंडलीमेलन करणारा ज्योतिषी हे गृहीत धरतो की ह्या दोन्ही कुंडल्या बरोबर आहेत.

आजही कुंडलीमेलनासाठी ज्योतिषाला फ़ी द्यावी लागते म्हणून आपण स्वत: गुणमेलन करुन थांबणारे पालक आहेत. त्याही पुढे जाऊन यापेक्षा आम्हाला जास्त पहायचे नाही असे म्हणणारे पालक आहेत. परिणामी पुढील निकष ज्याची चर्चा आपण करणार आहोत त्यावर उहापोह न होता विवाह केवळ गुणमेलनावर नक्की होतात जे बरोबर नाही.

मग गुणमेलनाबरोबर काय काय पहावे ?

१) गुणमेलनतर पहावेच ज्यात ३६ पैकी किमान १८ गुण जुळावेत व यासाठी दातेपंचांगाचाच वापर व्हावा. गुणमेलनासाठी दातेपंचांगामधे जितका अभ्यास आहे तो अन्य गुणमेलन सॉफ़्टवेअर मधे असेलच असे नाही. अनेकदा दाते पंचांग स्पष्ट विवाह करु नये असा उल्लेख करते ते अन्य सॉफ़्टवेअर मधे असेलच असे नाही.

२) मंगळ दोषाचा अभ्यास व निराकरण होत असेल तर पुढे जावे. यासाठी भावचलीत कुंडली मांडुनही अभ्यास करावा. मंगळ दोषावर कुंभ किंवा अर्क विवाहाचा, मंगळाची शांती इ. पर्याय उपलब्ध आहेत. खरच याची आवश्यकता आहे याची खातरजमा करुन नाईलाज असल्यास हे करावे. दाते पंचांगामध्ये मंगळाला प्रतिकारक कुंडली एका जोडीदाराची नसेल तर दुसर्याची असू शकते यावर ही लक्ष द्यावे.

३) सर्वात महत्वाच्या मुद्दा म्हणजे सप्तमेश व शुक्र यांच्या स्थितीचे अवलोकन. जर सप्तमेश सुयोग्य असेल तर ५०% वैवाहीक सुखाची खात्री आहे. त्यात शुक्र ही अनुकूल असेल तर अजूनही खात्री वाढते. अश्यावेळी गुण कमी असतील किंवा मंगळ दोष सुध्दा फ़ारसे प्रभाव टाकत नाहीत. थोडक्यात सप्तमेश जर सुयोग्य असेल म्हणजे लाभ स्थानी किंवा धन स्थानी असून वक्री नसेल, अशुभ ग्रहांच्या युतीत , केंद्रयोगात वा प्रतियुतीत  नसेल, अशुभ ग्रहांच्या दृष्टित नसेल तर त्याचे वैवाहीक सुख देण्याचे प्रमाण वाढते.

शुक्र स्वत: सप्तमेश असुन सुस्थितीत असेल तर अजूनही जास्त वैवाहीक सुखाची खात्री वाढते. शुक्र सप्तमेश नसताना सुध्दा स्वराशीत, उच्च राशीत असताना, स्व नवांशात/उच्च नवांशात असताना वैवाहीक सुख मिळते.

दोघांच्या पैकी किमान एकाच्या पत्रिकेत सप्तमेश आणि शुक्र दोष पुर्ण नसावेत व दुसर्या च्या पत्रिकेत सप्तम स्थानावर/ सप्तमेशावर शुभ ग्रहांची दृष्टी असल्याची खातरजमा असावी.दोघांचा शुक्र मात्र बलवान नसला तरी किमान दोषपुर्ण नसावा. इतके पाहिल्यास पतीपत्नीमधील संभाव्य विवाद लांबत नाहीत व घटस्फ़ोटाची परिस्थिती येत नाही.


४) वधू व वरांचे आयुष्य हा मुद्दा सुध्दा महत्वाचा आहे अन्यथा अनेकदा लग्नानंतर दहा वर्षे सुखाची असतात व अचानक मृत्यु ओढवला म्हणजे वरील तीनही मुद्दे अभ्यासून सुध्दा असे का घडले असा प्रश्न पडतो. वास्तविक मृत्यु वर्तवणे इतके कठीण आहे. तो खात्रीने येईलच असे कोणी सामान्य/अभ्यासू ज्योतिषी सांगू शकत नाही. या साठी हा मुद्दा स्पर्श केला जात नाही.

५) लग्नानंतर येणार्या दशा- अंतर्दशा, संतती होईल याबाबतची खात्री तसेच प्रगती होईल की नाही इतके सारे मुद्दे आवश्यक आहेत पण  ह्या मुद्यांवर अनेक पर्यायी गोष्टी आहेत. जसे प्रत्येकाला दशा-अंतर्दशा सुयोग्य येतील असे नाही पण जोडीदार चांगला असेल तर ह्या कठीण काळात निभाऊन जाण्याचे सामर्थ्य उभयतांमधे संस्काराने येते.  संतती साठी आज आय व्ही एफ़ सारखे अत्याधुनीक उपचार असताना बरेचसे प्रश्न निकाली निघतात. प्रगती होईल की नाही हा मुद्दा प्रगती म्हणजे काय ह्या गृहीतकावर आधारीत आहे. याचे उत्तर इतके स्पष्ट देता येणार नाही. मुलाच्या कुंडलित अनेक राजयोग आहेत परंतु वैवाहीक सौख्य कमी असेल अश्या मुलाला कोण पालक आपली मुलगी जाणुन बुजून देईल?

यामुळे मुद्दा नंबर ४ आणि ५ महत्वाचे असले तरी त्याला किती महत्व द्यायचे याचे भान ठेवले नाही तर या मुद्यांवरुन विवाह टाळणे हा  पर्याय ठेवला तर विवाह होणेच दुरापास्त होऊन बसेल या साठी यावर फ़ार भर दिला जात नाही परंतु जर मृत्यु आला तर मात्र ज्योतिषी बदनाम होतो हा अनेकदा अनुभव येतो.

वरील चर्चेवरुन एक निष्कर्श नक्कीच निघतो की आम्हाला अजिबात पत्रिका पहायची नाही या पेक्षा किमान पहिल्या तीन निकषांवर पत्रिका तपासल्या जाव्यात. मुद्दा नंबर ४ व ५ पालकांच्या इच्छेने पहावे पण ज्योतिषाने तपासताना तारतम्य वापरावे.

1 comment:

  1. नितीनजी , माझे अवलोकन (संशोधन ) असे सांगते की जन्म तारीख ,वेळ ,ठिकाण सर्व अक्कूरेट घेऊनही वधू वरांच्या 36 गुण जुळलेल्या लग्नाच्या केसेस या फेल गेलेल्या आहेत , मग गुण जुळवण्यात काय अर्थ आहे आणि ज्यांच्या कुंडल्या जुळत नाही गुण जुळत नाही 18 च्या खालीच ते वधूवर सुखात नांदतात हा विरोधाभास कशा करिता ??काही अजूनही बाबी आहेत ज्या गुणा शिवाय पाहावया लागतात परंतु ज्याचा विचार करावयाचा आहे ? ती गोष्ट विचारात घेतली जात नाही आणि 36 गुण असूनही विवाहा टिकत नाही

    ReplyDelete