Saturday, December 9, 2017

१६ डिसेंबर २०१७ ते १३ जानेवारी २०१८ या कालावधीचे राशीभविष्य



या कालावधीत महत्वाचे राशीबदल खालील प्रमाणे घडत आहेत.

१. या कालावधीत रवि महिनाभर धनू या मित्र राशीत वास्तव्य करुन असेल.
२. या कालावधीच्या सुरवातीला बुध वक्री होऊन वृश्चिक राशीत येईल तो २३ डिसेंबरला मार्गी होऊन ६ जानेवारीला पुन्हा धनु राशीत जाईल.
३. या कालावधीत २० डिसेंबरला शुक्र धनु राशीत येईल.

रवि, शुक्र, बुध सोडता अन्य ग्रह आहे त्या राशीत असतील. आपण चंद्र दर दोन दिवसांनी रास बदलत असल्याने त्याचा फ़ारसा विचार करणार नाही.

निसर्ग कुंडलीमधे चंद्र सोडता आपण हे ग्रहांचे वास्तव्य पाहू.





धनु राशीत मुळात प्लुटो आणि शनि आहेतच त्यात रवि व शुक्र महिनाभर वास्तव्यास आहेत व शेवटी बुध ही येत आहे.धनु राशीच्या लोकांना वेगवेगळी फ़ळे अनुभवास मिळणार आहेत.

आपण एव्हाना आपली लग्न राशी शोधली असेल. नसेल तर जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म स्थळ माहीत करुन घ्या आणि आपले राशीभविष्य जसे चंद्राकडून पहाता तसे लग्नराशीकडून देखिल वाचा.

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: आपल्या राशीचा स्वामी सातव्या स्थानी महिनाभर वास्तव्य करुन आहे. ही काही चांगली स्थिती नाही. जोडीदाराशी खटके उडत आहेत याचे अनुभव या राशीचे लोक घेत असतील याची जाणिव मेष राशीला कुठे असणार ? ते तर बोलून मोकळे होणार. मेष राशीचा पती असेल तर महिलांनी जरा पडते घेऊन घरातले वातावरण शांत राहील असे पहावे. पत्नी असेल तर काय विचारता ? परिस्थिती बदलणार नाही. या राशीच्या जोडीदाराला जमवून घ्यावे लागणार. अश्विनी नक्षत्राच्या लोकांनी आपले  कृती डिसेंबर महिना अखेरीनंतर तपासून मगच करावी.  सप्तम स्थानाचा अधिपती २० तारखे नंतर भाग्यात जात असल्याने प्रेम कमी होणार नाही.

 इतके जरी असले तरी अनेक ग्रह आपल्या भाग्य स्थानी येत असल्यामुळे आपल्याला हा महिना स्मरणात राहील मेष राशीच्या खेळाडु लोकांना हा महिना अनेक मॅचेस मधे यश मिळताना दिसेल. अनेक खेळाडुंना त्यांच्या नेत्रदिपक कामगिरीमुळे सन्मान मिळतील. या साठी आरोग्य नियंत्रणात असायला हवे. थंड हवेमुळे होणारे सर्दी/खोकला या पासून बचाव करा. अनेक कलाकारांना त्यांचे फ़ोलोअर्स/फ़ॅन्स चांगल्या कमेंट्स देतील.

वृषभ रास : आपल्या राशीचा स्वामी शुक्र अष्टमस्थानी जात आहे. तुमच्या अष्टमात रवि, राजयोगकारक शनि, ६ जानेवारीला जाणारा बुध , आधीच तिथे असलेला प्लुटो असे पाच ग्रह असल्यामुळे आरोग्य संभाळावे हा पहिला सल्ला. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ नयेत हा दुसरा सल्ला तर लहान मुलांचे आरोग्य संभाळा हा तिसरा सल्ला आहे. तुमची बुध्दी काहिही झाले तरी स्थिर असते हीच काय ती जमेची बाजू आहे.

नोकरी व्यवसायातही संघर्ष झाला तरी तो तुम्हाला फ़ार त्रासदायक होईल असे नाही. रवि, बुध आणि शुक्र महिनाभरच अष्टमात असतील त्यामुळे कटकटी झाल्यात तर त्या महिनाभरापेक्षा जास्त असणार नाहीत हे लक्षात असू द्या. शनि तुम्हाला अजून दोन वर्षे बांधुन घालणार आहे. नविन काहीतरी या महिन्यात सुरु करायचा विचार असेल तर जरा तो बेत पुढे ढकला.

मिथुन रास : तुमच्या राशीचा स्वामी जास्त काळ तुमच्या सप्तमस्थानी असणार आहे. मिथुन राशीचे लोक व्यापारात फ़ारसे असत नाहीत पण मार्केटींग किंवा कन्सलटंन्सी उत्तम करतात. या महिन्यात तुम्हाला काही नविन कन्सेप्ट विकायचा असेल तर त्याचा प्लॅन बनवा. हे काम यशस्वी होईल असे ग्रहमान आहे. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना ही एक मोठीच संधी आहे.

तरुण मुलांची काळजी करणे हा तुमचा स्वभाव नाही परंतु जरा एकदा त्याचे प्लॅन्स तपासून पहा. हवतर तुमच्या जोडीदाराला सांगा.

तरुणांना काही रोमॅंटिक वातावरणात जाण्याची संधी या महिन्यात आहे. काही सिरीयस प्रपोजल्स आली तर त्याकडे तुमच्या पध्दतीने हसण्यावारी नेऊ नका. तुम्हाला ही संधी वर्षभरात एकदाच येत असते.

कर्क रास : या महिन्यात शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना काही गोष्टी भाग्यकारक घट्ना म्हणुन समोर येतील. तुमचा राजयोग कारक मंगळ या महिन्यात भाग्येशाचा बरोबर असल्यामुळे काही तरी नेत्रदिपक घडणार यावर भरवसा ठेवा. या घट्ना घडताना काही सरळ नसतील त्यामुळे भांबाऊन न जाता तुमचा पक्ष बरोबरच आहे हे लक्षात ठेऊन तुम्ही या कडे पहा. यात तुमचे  भाग्योदय घडतील अश्या घटनांचे संकेत नक्कीच आहेत. ते तपासून थोडे क्रेडीट घ्याच. कनव्हीक्शन का पैसा है बॉस असे एक मराठी सिनेदिग्दर्शक संजय जाधव म्हणतो ते लक्षात ठेवा.

आपली संतती सुध्दा असेच काही या महिन्यात करणार आहे. त्यांचे कौतूक करायला विसरू नका.

सहाव्या स्थानी ग्रहांची गर्दी म्हणजे कमविण्याच्या अनंत संधी हे सुत्र व्यावसायीक लोकांनी लक्षात ठेवा. फ़ार भावनेच्या आहारी न जाता कलाकार, अभिनेते, लेखक या व्यावसायीकांनी डोळे उघडून कोण काय म्हणत आहे या कडे पहा. संधी आहेतच त्या कॅश करा.

सिंह रास : तुमचा राशीचा अधिपती बराच काळ दशमेश शुक्राच्या युतीत असणार आहे. शुक्र रवि युती ही अनेक चांगल्या नाट्य कलाकारांना स्टेज मिळवुन देत असते. सिंह राशीवर अनेक कलाकार जन्माला येतात. नाट्य काय कुठेही घडत असते. आपण प्रत्येकच कोणत्या ना कोणत्या रोल मधे सतत असतो. लेखकाने दर वेळेला प्रत्येक रोल ला न्याय दिलेला असतोच असे नाही. या महिन्यात तो आहे हे निश्चित. आपला रोल चांगला व्हावा या साठी प्रयत्न करा. रंगभुमी कलाकार असाल तर प्रिंट मिडीया तुमची दखल घेणार आहे. आणि जीवनाच्या रंगमंचावर असाल तर तुमचा रोल स्मरणात राहील असे घडणार आहे.

तुमचे उत्पन्न तुम्ही कुठे गुंतवणार आहात यावर विचार करा. जगात वेगवेगळ्या मार्गाने फ़्रॉड करणारे आपल्याला भेटत असतात. अश्या एखाद्या मृगजळात तुम्ही गुंतत नाही ना यावर विचार करुनच मग पैसे गुंतवा.

कन्या रास : या महिन्यात योजलेली कामे ६ जानेवारी पुर्वी मार्गी लागतील असे पहा. एकदा का तुमच्या राशीचा स्वामी बुध शनिच्या तावडीत सापडला म्हणजे अनेक कामांना तो ब्रेक लावेल. तुम्हाला खात्रीने सुचणारे शब्द तुम्हाला सुचणार नाही. ही स्थिती काही पुर्ण महिनाभर असेल असे नाही पण महिन्याचा शेवटी म्हणजे ६ जानेवारी नंतर जवळ जवळ दहा दिवस असेल.

चवथा शनि तुमच्या राशीत अजून दोन वर्षे असेल. तो सुख लाभु देणार नाही असे असताना शुक्राची चतुर्थात एन्ट्री तुम्हाला सुखाची झोप देईल. कधी नव्हे ते वाहन सौख्य मिळेल. ही स्थिती अगदीच महिनाभर असेल असे नाही पण काही दिवस तरी असे ग्रहमान या महिन्यात नक्की आहे.

तुळ रास : तुमच्या राशीचे वर्णन करताना राशीभविष्यकार मा. शरद उपाध्ये झुकत माप देऊन तुमच्या समतोल व्यक्तिमत्वाचे गुणगान गातात.या महिन्यात तुम्हाला क्रोध होईल आणि हा समतोल पणा ढासळेल. हे अगदी वाईटच असते असे नाही. लोक नाहितर तुम्हाला गृहीत धरतात. कधी तरी तुमचा राग पाहू द्या ना त्यांना. हव तर अस समजा की महाभारतात भीष्मांनी श्रीकृष्णाला युध्द करायला भाग पाडले अशी स्थिती तुमच्यावर येणार आहे. काय हरकत आहे अस झाल तर ?

तुम्ही लेखक/पत्रकार असाल तर तुमच्या लेखणीने अनेकांना गारद कराल. काही वेळाच अश्या असतात की सौम्य भुमिकेला तुमचा भित्रेपणा समजला जातो. तुम्ही फ़ेसबुक किंवा व्हॉट्स अप सुध्दा आपल्या भुमीकेने अनेकांना तोंडात बोट घालायला लावाल. शेवटी रात्रंदीन आम्हा युध्दाचा प्रसंग असताना एव्हरी थिंग इज फ़ेअर ही भुमिका घ्या.

वृश्चिक रास : आपल्या संततीकडे लक्ष द्या हा सल्ला या महिन्यातला मोलाचा सल्ला. संतती जर तरुण असेल तर ती नेमकी काय कृती करणार आहे याकडे लक्ष द्या. इतका इशारा लक्षात ठेवलात तर या महिन्यात अनेक चांगल्या गोष्टी कुटुंबात घडणार आहेत. कौटुंबिक संमेलन असेल. या संमेलनात अनेक बातम्या ज्या तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या संदर्भात आहेत त्या समजतील.

जी काय गुंतवणुक करणार आहात ती तुम्ही नेहमीच लक्ष देऊन करता. या महिन्यात या बाबत चुकू नका. खास करुन जी गुंतवणुक जी फ़क्त कागदपत्रांच्या द्वारे होते. तुम्हाला नेमकी स्थिती समजत नाही अश्या गुंतवणुकी नुसते रिपोर्ट कार्ड पाहून करु नका. फ़ॅक्ट्स तपासा.

धनु रास : या महिन्यात जे तुम्ही गमावले किंवा गमावणार आहात ते सर्व परत मिळण्याच्या संधी स्वत: हुन चालत येणार आहेत. तुमचे मित्र काय म्हणत आहेत या कडे लक्ष द्या. तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावलात तर मग मात्र संधी जाऊ शकते. पक्के व्यापारी आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवतात तसा ठेवा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या.

व्यापार हा तुमचा प्रांत नाही पण संधी घेताना तुम्हाला कोणी हातोहात फ़सवणार नाही ना हे मात्र ओळखण्या इतके सुज्ञ आणि बुध्दीमान तुम्ही आहात हे विसरु नका. हे भान असले तर हा महिना तुम्हाला लक्षात राहील असे नक्कीच काही देऊन जाणार आहे.

मकर रास :  बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे हे गाणे या महिनाभर लक्षात ठेवा. अनेकदा तुमचे नुकसान होऊ शकते असे ग्रहमान आहे. साडेसातीच्या पहिल्या टप्यात नुकसान असते म्हणजे दर महिना खुप नुकसान होते असे नाही पण या महिन्यात अनेक ग्रह तुम्हाला अपयश, चिंता, पीडा देताना दिसणार आहेत. तुमची चाल धिमी असते. तुम्ही अखंड सावधान असता ही काय ती जमेची बाब आहे.

या महिन्यात समजा तुम्ही शेअर घेणार असाल आणि तो पडला किंवा प्रॉपर्टी घेतली ते भाव जरा जास्त होते असे समजले तर जे दुख: होईल असे ग्रहमान आहे. आरोग्य सुध्दा साथ देणार नाही. त्यामुळे समझो इशारे. फ़ार काही चांगले घडेल अशी अपेक्षा ठेऊच नका ते जास्त चांगले.

कुंभ रास :  माझ्या राशीभविष्याची चातकासारखी वाट पहाणारी ही माणसे. कालनिर्णय पहाणार, सर्व वर्तमान पत्रे पहाणार . राशीभविष्यात जिथे जी गोष्ट सगळ्याच ठिकाणी समान वर्तवली जाईल त्याचा पडताळा घेणार हा तुमचा स्वभाव आहे. मग तयार का ऐकायला ?

किती देशील दोन्ही हाताने असे ग्रहमान या महिन्यात आहे. पाच ग्रह जर लाभ स्थानी असतील तर काय ? तुमची झोळी भरुन जाईल असे तुमचे ग्रहमान आहे. चांगल्या बातम्या, पैसे, यश, किर्ती आणि काय काय मिळाले ते तुम्हीच मला सांगा.

अविवाहीत आणि विवाहच्छु असाल तर तो ही जमेल. संततीच्या सुवार्ता येतील. सुखाचा फ़ुलोरा घेऊन तुम्ही नाचाल असा महिना कधी तरी लाभतॊ असे ग्रहमान आहे.

मीन रास : तुमच्या संथ स्वभावाला सोडुन जरा कंबर कसुन कामाला लागा. एक तुतारी द्या मज आणुन ह्या कवीतेचे वाभाडे काढताना काही लोक तुतारी आणुन दिलीत तर मी वाजवीन नाही तर गप्प बसीन असे म्हणतात. संधीच्या एक नाही तर अनेक तुतार्या तुमच्या आजुबाजूला वाजत असताना जर संथ राहिलात तर कसे होणार ?

सगळीच कामे मार्गी लागतील का तर नाही पण पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार नाही म्हणुन प्रयत्न करायचा नाही असे नाही. खर सांगु का पण तुम्ही कंबर कसा अगर नका कसू लोक तुम्हाला कामाला लावणारच आहेत. त्या पेक्षा तुम्हीच मी करतो म्हणाना ? पहा तुमच्या बद्दल असलेले मत कसे बदलते ते ?


नुकतेच प्रसिध्द झालेले माझ्या ब्लॉग वरील काही लेख पहा

१. आय व्ही एफ़ सक्सेस स्टोरी -      http://gmjyotish.blogspot.in/2017/11/ivf.html

२. अनेकदा ३६ गुण जुळूनही पती-पत्नी मधे संघर्ष किंवा प्रसंगी घटस्फ़ोट होताना दिसतात याचे कारण काय असावे ?    http://gmjyotish.blogspot.in/2017/12/blog-post.html


मी आता बराच काळ आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शनही करु शकतो. माझ्या ऑफ़ीसवर पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या लोकांसाठी पत्ता आणि फ़ोन नंबर खाली आहे तसेच. इमेल, फ़ेसबुक मेसेंजर आणि व्हाट्सअप वर सुध्दा नक्कीच संपर्क करता येईल.



No comments:

Post a Comment