Sunday, June 10, 2018

१५ जून ते १५ जुलै या महिन्याचे भविष्य आणि पावसाचे प्रमाण कसे असेल याचा ज्योतिषशास्त्रीय अंदाज

नमस्कार ज्योतिष प्रेमी लोकहो. दरमहिना जेव्हा रवि राशी बदलतो त्या महिन्याचे भविष्य मी लिहून प्रसिध्द करत असतो. आपला प्रतिसादही उत्तम असतो या करिता धन्यवाद. आज मी भविष्य लिहीयला सुरवात केली आहे तो दिवस ६ जून आहे. १ जून पासूनच वातावरण पावसाळी झालेले आहे. ८ जून ला रविचा मृग या पावसाच्या नक्षत्रात प्रवेश होईल. एक अत्यंत जुने ज्योतिषशास्त्र निर्मीत पावसाचे मॉडेल आहे. रविच्या नक्षत्रावरुन ( त्याचे वाहन शोधून ) त्या द्वारे पाऊस वर्तवण्याचे. मागील वर्षी मी असे पाऊसमान वर्तवले होते जे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाशी साधारण पणे जुळले.  मी यावर्षी सुध्दा २०१८ पावसाळ्यात पाऊस कसा पडेल यावर लेख लिहला आहे.

पावसाशी आपला संबंध आपण शेतकरी असाल तर जवळचा आहेच पण भारतीय अर्थव्यवस्था आजही खरीप अर्थात पावसाच्या पाण्याशी संबंध प्रस्थापीत करुन आहे. दुष्काळ आणि महागाईचा आणि अर्थात प्रत्येक सामान्य माणसाशी संबंध आहे.

हा लेख मी माझ्या ब्लॉग वर लिहला आहे. ही त्याची लिंक घ्या आणि वाचा.

पावसाचे प्रमाण कसे असेल याचा ज्योतिषशास्त्रीय अंदाज


मागील महिन्यात मी मकरेचा मंगळ आणि जमिन/वास्तू विषयक कामासंबंधात लिहले होते. या महिन्यात २६ जून पर्यंत त्यांनी वास्तू संबंधातल्या कामाविषयी गती घेण्यास हरकत नाही. माझा वैयक्तीक अनूभव असा. माझ्या घराच्या शेजारी एका वास्तूचे काम TDR ट्रान्स्फ़र च्या कामासाठी रखडले होते. २ मे २०१८ ला मकरेत मंगळ गेला आणि ते मार्गी लागले. आता ती इमारत वेगाने पुर्ण होते आहे.

या माहिन्यापासून एक छोटासा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल. घरात देवपुजा करताना आवर्जून कापूर वापरा. कर्पुर आरती केल्याने घरातील वातावरण शुध्द होते. घरातले वाद- विवाद कमी होतात. हा उपाय सांगताना चांगला कापूर कुठे मिळतो हे ही सांगणे आवश्यक आहे. सनातन ही संस्था अत्यंत उत्तम कापूर माफ़क किमतीत उपलब्ध करुन देते. आजवर जे कापूर वापरतात पण सनातन संस्थेचा कापूर वापरला नसेल त्यांनी वापरून पहा.

आपल्या लग्नराशी व चंद्र राशीनुसार राशीभविष्य वाचा, अनुभव कळवा. आपल्या व्हाटस अप किंवा दुसर्या समुहावर फ़ॉर्वड करा त्यासाठी प्रोत्साहन आहे.

आता राशीभविष्या विषयी राशीनिहाय पाहू.

मेष रास: मेष राशीचा स्वामी मंगळ सध्या मकरेत असून तो २६ जूनला वक्री होणार आहे. या नंतर आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर नोकरी/व्यवसायात आपल्याला काम करावे लागेल. २७ ऑगस्ट पर्यत ही स्थिती असल्याने ज्यांचे व्यवसाय घरबांधणी किंवा त्या संदर्भात असेल त्यांनी एक छोटासा उपाय करावा. दर मंगळवारी एक नारळ मारुतीच्या मंदीरात वहावा/ पुजारी असल्यास वाढवावा. याने अडचणी दूर होतील.आपल्या चतुर्थात शुक्राचा प्रवास सध्या सुरु आहे. सुखाची झोप ४ जुलै पर्यंत आपल्याला आहे. एखादी नविन वस्तू नक्की खरेदी कराल ज्याने घरात रहाणे सुखकारक होईल. महिन्याच्या सुरवातील काही घरातील महिला संदर्भात घटना घडतील पण फ़ार काळजीच्या असतील असे नाही.

वृषभ रास: आपल्या राशीचे चिन्ह आपण कष्टाळू आहात असे दर्शविते. हे खुप छान आहे. कधीतरी आराम करावा अशी संधी ४ जुलै ते १ ऑगस्ट २०१८ पर्यंत आहे. काही जमले नाही तर वेळेवत घरी या. आपल्या घरच्या लोकांच्या समवेत वेळ द्या. पहा एका वेगळा आनंद आपल्याला मिळेल. आपण व्यावसायीक असा किंवा नोकरदार. काही चिंता असणारच आहेत. पण कधीतरी आराम करा किंवा घरच्यांना वेळ द्या. १० जुलै नंतर आपले अर्थिक प्रश्न हळू हळू मार्गी लागतील ही जमेची बाब या महिन्या पासून चांगली घडणार आहे.

मिथुन रास: आपल्या राशीचा स्वामी स्वत:च्या राशीत आणि तुमच्या राशीत २५ जुन पर्यंत असल्याने काही महत्वाची कामे मार्गी लावा. २७ जून ते ७ जुलै या कालावधीत जी कामे आपण सहजा सहजी करता त्याला खिळ लागू शकेल. या कालावधीत जर काही महत्वाचे घडणार असेल त्याचे प्लॅनिंग चांगले करा. तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करुन आजवर बुडीत खात्यात पडलेले धन पुन्हा मिळवण्याची संधी २७ जून पर्यंतच आहे. यामुळे यावर विचार करा. १० जुलै नंतर संतती संदर्भात एखादी सुवार्ता कानी पडेल.

कर्क रास: आपल्याला २३,२८ ३० जून आणि ४ व ७ जुलै हे दिवस मनाला त्रास देणारे ठरतील. बाकी दिवस नेहमीसारखेच असतील. ४ जुलै नंतर आपल्या धनस्थानी शुक्र जात आहे. काही पैसे शिल्लक दिसत असतील तर योग्य ठिकाणी गुंतवा असा संदेश घेऊन हा शुक्र आलेला आहे. आपल्याला कुणी लग्नासाठी प्रपोज केले असेल तर त्यावर विचार करा. चांगली व्यक्ती असून उत्तर देण्यात चाल ढकल केली असेल तर हे सर्व दिर्घ काळ मागे पडू शकेल.  यासाठी २६ जून पुर्वी विचार पुर्वक निर्णय घ्या.

सिंह रास : राशीचा मालक कर्म स्थानात महिनाभर मुक्काम ठोकून असेल. पॉलिसी प्रमाणे जर प्रमोशन मिळणे असेल तर त्या दृष्टीने हा कालावधी उत्तम आहे. प्रयत्न करा. सरकारी खात्यात असाल तर या महिनाभरात चांगली शिफ़ारस मिळेल. हे सर्व आधीच घडले असेल तर प्रमोशनचे ऑर्डर हातात मिळेल. राशीभविष्यावर टिकाकार म्हणतात की याचा अर्थ जगातल्या १/१२ टक्के लोकांना प्रमोशन मिळणे शक्य आहे का ? याचे उत्तर नाही. पण या दृष्टीने चांगले केलेले काम वरिष्ठांच्या नजरेस पडण्यास अनुकूल काळ आहे. अनेकांना ह्या महिनाभरासाठी विशेष अधिकार प्राप्त होऊ शकतो मग तो साहेबांच्या दिर्घकालीन रजे मुळे असेल किंवा डेप्युटेशन मुळे असेल. इतर लोकांची सरकारी खात्यात अडकलेली कामे मार्गी लागतील.  व्यावसायीकांना उत्तम लाभ घडेल असे ग्रहमान आहे. २५ जून ते ४ जुलै हा खर्चाचा काळ सोडला तर तर बाकी महिना ठिक जाईल.

कन्या रास: राशीचा मालक बुध महिनाभर कर्म व लाभ स्थानातून भ्रमण करणार असल्याने कर्म केले की तात्काळ फ़ळ असे ग्रहमान सध्या दिसत आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लावा. त्यात नक्की काही प्रमाणात यश मिळणारच आहे. २५ जून ते ४ जुलै तर येणारे संभाळण्यास दोन हात अपुरे पडतील असे ग्रहयोग आहेत. ४ जुलै नंतर प्रवासाचे योग आहेत. तिर्थयात्रा असो की प्लेजर टुर यातून नक्की आनंद मिळेल. लक्ष पुर्वक येणार्या संधीचा लाभ घ्या.

तूळ रास : तूळा राशीवर सुध्दा या महिन्यात ग्रह प्रसन्न आहेत. नोकरी / व्यवसायात अश्या अनेक संधी पुढे येतील. अनेकदा नोकरदारांना एखादे अचानक /अनपेक्षीत काम त्रासाचे वाटते. पण हीच पुढे संधी असते हे वाक्य लक्षात ठेऊन महिनाभर येणार्या कामाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. अचानक शेअर्स चा भाव भुतो न भविष्यती वाढेल. किंवा अचानक धन लाभाचे योग चार जुलै नंतर येऊ शकतात. वारसा हक्क मिळणे अडकले असेल तर ते ही काम होऊन जाईल. लाईफ़ इन्शुरन्स पॉलीसी मॅच्युअर होणार असेल तर अनपेक्षीत जास्त मॅच्युरिटी बोनस मिळेल. प्रॉपर्टी संदर्भातली कामे मार्गी लागण्याचे योग ही मागील महिन्यापासून आहेत. घराचा ताबा अडला असेल तर तो २६ जून पर्यंत प्रयत्न केल्यास  मिळून जाईल असे उत्तम ग्रहमान आहे.

वृश्चिक रास : काय धाडस करायचे ते २६ जून पुर्वीच करुन निर्णय घ्या. एकदा मंगळ २६ जून नंतर वक्री झाला त्यानंतर की जरा जास्तच प्रयत्न करुन मगच यश मिळेल. नोकरी व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रसिध्दी मिळेल असे योग आहेत. गेले एक दोन महिने खराब असलेले ग्रहमान या महिन्यात पुर्ववत होऊ लागेल. ४ जुलै नंतर रखडलेले खुप काही मार्गी लागेल असे ग्रहमान आहे. महिना खुप उत्तम जाईल असे नाही परंतु खराब निश्चित नाही.

धनू रास : राशीचा स्वामी गेले ३-४ महिने वक्री होता तो १० जुलैला मार्गी झाल्याने त्यातूनही त्याचा मुक्काम अक्टोबर पर्यंत लाभ स्थानी असल्याने अनेक प्रकल्पांना दिशा मिळेल. अनेक नव्या व्यावसायीक संधी चालून येतील असे ग्रहमान या महिन्याचा पुर्वार्धात आहे. रवि सहाव्या स्थानी आल्याने आपल्याला सरकारी कागदाचा वापर करुन अनेक कामे मार्गी लावता येतील. वडीलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तुमच्या स्वत: च्या तब्येतीचे प्रश्न असतील तर या महिन्यात चांगले औषध मिळून किंवा त्याच्या शिवाय आराम पडेल असे ग्रहमान आहे.

मकर रास : जोवर शनि मार्गी होत नाही आणि धनु राशीतून मकरेत येत नाही ( २४ जानेवारी २०२० )  तोवर कष्ट/त्रास/खर्च आपली पाठ सोडणार नाही हा पार्श्वभुमीवर येणारे ग्रहमान कितीही अनुकूल असले तरी सुर्यापुढे काजव्यांचा प्रभाव कितीसा पडणार ? जमेची बाजू आपली चिकाटी आणि स्थिर बुध्दी आहे. दशमात गुरु मार्गी झाल्यावर कामाचे तास वाढणार आहेत. सप्तमात आलेला शुक्र व्यवसायात भरपूर फ़ायदा देणार आहे तसेच आपल्या जोडीदाराचा सहवास आपल्याला सुखावह वाटणार आहे. प्रेमात असाल तर होकार मिळेल. होकार असेल तर सहवास लाभेल असे ग्रहयोग तरुणाई साठी आहेत. चांगला रोमॅंटिक सिनेमा पहायला जा उगाच डोक्याला ताप होईल असे काही पाहू नका. या महिन्यात हेच काय ते फ़ळ तुमच्या तपाला.

कुंभ रास : राशीचा मालक वक्री असला तरी लाभात आहे त्यामुळे महिनाभर यश मिळेल पण विलंब होणार याची जाणते झाल्यापासून सवय झालेली असेल. तुमच्या राशीचा भाग्येश शुक्र सहाव्या स्थानी असल्याने ४ जुलै पर्यंत खोळंबा होतो आहे असे जाणवत राहील. ४ जुलै नंतर मात्र तो सुख घेऊन येईल. तत्पुर्वी वायू राशीतील बुध आणि गुरु यांचे योग झाल्याने अनेक प्रमेये बुध्दीच्या जोरावर तुम्ही लिलया सोडवाल.  हे प्रमेय आपण कसे सोडवले याबाबत आश्चर्य करत रहाल. नवनिर्मीतीचा खुप आनंद या महिन्यात सुरवातीलाच तुम्हाला मिळून जाईल.

मीन रास :  निराशा होण्यास कारण आहे पण जिद्दीने प्रयत्न करत रहा असा सल्ला द्यावासा वाटतो. दगड फ़ोडुन मुर्ती घडवायचे काम तुम्हाला नियतीने दिले आहे. प्रत्येक दगडावरच्या घावाला लगेच काही घडत नाही. पण याचा अर्थ ते श्रम/ कष्ट फ़ुकट गेले असे मात्र नाही. यासाठी दररोज पुढे जाण्याचा संकल्प मात्र करणे आवश्यक असते. तेव्हढे नियमाने करा. १० जुलै नंतर मुर्तीला आकार प्राप्त होईल. यानंतर मात्र आकार मिळालेली मुर्ती सुबक कशी दिसेल याकडे लक्ष द्यावे लागेल. श्रमाचा/कष्टाचा मार्ग जिद्दीने चालायचा आहे हा मतितार्थ आहे.

शुभंभवतु



1 comment: