Friday, February 7, 2020

१३ फ़ेबृवारी ते १३ मार्च २०२० या महिन्याचे मेष, वृषभ आणि मिथुन राशीचे राशीभविष्य


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १३ फ़ेबृवारी २०२० ला कुंभ राशीत जाणार आहे
२८ फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मेष राशीत जाणार आहे.
मार्च  २०२० ला प्लुटो मकर राशीत जाणार आहे. हा प्लुटो मकर राशीत १४ जून २०२० पर्यंत
असेल. १५ जुन २०२० ला प्लुटो पुन्हा वक्री गतीने धनु राशीत प्रवेश करतो.

थोडक्यात हा महिना १३ फ़ेबृवारी २०२० ला सुरु झाल्यावर शुक्र प्लुटो हे दोनच ग्रह राशीबदल करत आहेत.

ज्यांची मकर रास आणि उत्तराषाढा जन्मनक्षत्र असून दुसरे चरण आहे अशांना मार्च, एप्रिल मे २०२० हे महिने त्रासाचे असू शकतील.

प्लुटो जेंव्हा राशीबदल करतो तेंव्हा व्यक्तीच्या जीवनात फ़ार मोठे बदल घडतात असे नाही. परंतु असा राशीबदल एखाद्या मोठ्या घटनेची नांदी ठरणारा असतो. नोव्हेंबर १९८९ रोजी प्लुटो वृश्चिक राशीत गेला. या दिवशी जगाच्या इतिहासात दोन मोठ्या घटना घडल्या. दुसर्या महायुध्दाने झालेली जर्मनीची फ़ाळणी होऊन जर्मनीचे तुकडे करणारी बर्लीन भिंत याच दिवशी जमिनदोस्त झाली. याच दिवशी अयोध्येमधे पहिली कारसेवा होऊन श्रीराम मंदीराचा शिलान्यास झाला. या दोन घटनांनी जगाला इतिहासात नोंद घ्यायला लावली.

श्रीराममंदीर शिलान्यासाने, १९८४ साली ५४२ पैकी फ़क्त दोन जागा जिंकलेल्या भाजपने पुन्हा मुसंडी मारुन ८९ जागा जिंकल्या आणि नोव्हेंबर १९८९ महिना अखेरीस असलेल्या निवडणुकांच्या मधे १९८४ साली ४०० पेक्षा जास्त जागा आलेल्या कॉंग्रेसचा पराभव केला. श्रीराममंदीर निर्माण हा मुद्दा भाजपच्या निवडणुक जाहीरनाम्या मधे महत्वाचा मुद्दा झाला. पुढचा इतिहास ताजा आहे.

मार्च २०२० आणि जानेवारी २०२१ आणि ३० अक्टोंबर २०२१ रोजी एकदा वक्री होऊन पुन्हा मार्गी होऊन प्लुटो मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही भारताची रास आहे त्यामुळे या तिनही दिवशी काय घडेल याचा आढावा त्या त्या महिन्यात घेईन. श्रीराममंदीर शिलान्यासासारखी एखादी घटना घडण्याचे संकेत याच महिन्यात धनु राशीत होणारी मंगळ- गुरु युती देत आहे. राजकीय आंदोलनांनी ह्या दरम्यानचा काळ पुन्हा ढवळून निघणार आहे. मार्चला होणारी रवि नेपच्युन अंशात्मक युती, तिथीचा क्षय होत असल्यामुळे क्षयदिन तसेच आश्लेषा या उग्र नक्षत्रामधील चंद्र काही घडण्याची नांदी देत आहे. या दिवशी ही घटना फ़क्त नांदी असेल. याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ प्लुटो युती आणि त्या आधी २० मार्च ला होणारी मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना घडवतील.

आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय राशीभविष्य, मेष, वृषभ आणि मिथुन राशींच्या साठी. हे राशी भविष्य आपण लग्नराशीकडून पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी माहित नसेल तर मात्र चंद्र राशीकडून हे राशी भविष्य अनुभवा.

मेष रास:
आपल्या राशीचा मालक मंगळ महिनाभर धनु या अग्निराशीत असणार आहे. यातील केतूच्या मुळ या उग्र नक्षत्रात मंगळ २६ फ़ेबृवारी पर्यंत म्हणजे १३ दिवस असणार आहे. २६ फ़ेबृवारीला असलेली मंगळ केतू युतीमुळे अनेकांना संघर्ष करुन काहीतरी विधायक घडवावे अशी प्रेरणा देईल यामुळे हा दिवस लक्षात रहाणारा असेल.

दशमामध्ये २४ जानेवारीला गेलेला शनि आपले वय तीस किंवा साठ च्या आसपास असल्यास नोकरीत महत्वाचे स्थान देईल. अनेकांना प्रमोशन होण्याच्या दृष्टीने जरा संथ परंतु सकारात्मक हालचाली सुरु होतील. २८ फ़ेबृवारी २०२० पर्यंत जोडीदाराच्या हट्टाखातर एखादा खर्च होणे किंवा प्रवासासाठी खर्च होणे अपेक्षीत आहे. १३ फ़ेबृवारी पासून मुलांच्या बाबतीत काही सकारात्मक घडताना दिसेल. तुम्ही शिकत असाल तर  यश या महिन्यात हाती पडेल असे ग्रहमान आहे. हाताखालचे नोकर किंवा कनिष्ठ  १ ते १० मार्च कालावधी सोडता महिनाभर चांगले सहकार्य करतील हे लक्षात ठेऊन तसे त्यांच्यावर काम सोपवा.

८ मार्च २०२० च्या आसपास मुलांच्या बाबतीत अनपेक्षीत घटना घडतील. याचा अंदाज घेऊनच जर काही योजना आखल्यात तर दुर्दैवाने वाईट घटना घडण्याची शक्यता असेल तर तुम्हाला त्या थांबवता येतील. महिना उत्साहवर्धक असेल यात शंकाच नाही.

एकंदरीत महिना चांगला जाईल.

वृषभ रास:
वृषभ राशीला २८ फ़ेब्रुवारी २०२० पर्यंत उत्तम कालावधी असून जे मागाल ते मिळेल किंवा ती इच्छा आज नाही होऊ शकली तरी त्या दृष्टीने हालचाल सुरु होईल. नोकरदारांच्या हातात पगाराशिवाय नोकरीमधून इन्सेंटीव्ह किंवा बोनस स्वरुपात अजून काही उत्पन्न हातात पडेल. वकील, डॉक्टरी पेशातल्या लोकांना व्यवसायातून जरा जास्त लाभ अपेक्षीत आहे. सर्वच प्रकारचे व्यावसायईक सुखावतील असे फ़ळ वृषभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. मुलांच्या प्रगतीचे कौतूक होताना या महिन्यात दिसणार आहे.

काही लोकांना बक्षीसपत्राने, वारसा हक्काने धन मिळेल. उत्तम आरोग्य राखण्यासाठी आणि दिर्घायुष्य मिळण्यासाठी महत्वाचे सुत्र सापडेल.

ही सर्व बाजू चांगली असताना जोडीदाराचे आरोग्य काहींना चिंतेचा विषय होऊ शकेल. २६ फ़ेबृवारी त्याच्या आसपास थोडी चिंता वाढेल. याच बरोबर होणारा खर्च हा काहींना चिंतेचा विषय राहील. २८ फ़ेबृवारी नंतर मात्र ग्रहमान थोडेसे प्रतिकूल होत असल्याने महत्वाची कामे त्यापुर्वी केल्यास हा महिना छान नसला तरी चांगला जाईल.

मिथुन रास :

आपल्या राशीला बुध या महिन्यात भाग्यस्थानी असल्यामुळे अनेक योजना मार्गी लावाल. योजना मार्गी लावण्याच्या कामात मार्च ते १० मार्च २०२० काळात काही अवरोध निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सुरवातीलाच महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी नियोजन करा. या महिन्यात विद्यार्थी वर्गाला खास करुन उच्च शिक्षण घेणार्या वर्गाला प्रगती होऊन महत्वाची पदवी प्रत्यक्ष हातात पडली नाही तरी त्याची किल्ली हातात आल्याचा आत्मविश्वास निर्माण होईल.

कोणत्याही प्रकारचे लेखन करणार्यांना प्रसिध्दी, लाईक्स मधे वाढ असे फ़ळ मिळेल. कविता करणार्या लोकांना मार्च २०२० च्या जवळपास आपल्या कविता मीटर मधे बसणार्या किंवा गेयतापुर्ण असल्यातरी दुर्बोध होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागेल.

आपल्या वैवाहीक जोडीदाराचे उत्पन्नात वाढ होताना काही मिथुन राशीच्या लोकांना दिसेल. सोबत याची गुंतवणुक कशी करायची या विषयावर एखाद्या वेळीस खटका उडण्याचा संभव असल्यामुळे किंवा अन्य कारणाने खटका उडू नये म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. मिथुन राशीला नर्म विनोद करण्याची सवय असली तरी आवर घाला.  हा महिना सर्वसाधारण पणे चांगलाच असेल.

No comments:

Post a Comment