Sunday, January 8, 2017

१४ जानेवारी ते ११ फ़ेब्रूवारी महिन्याचे राशीभविष्य तसेच पौष महिना आणि विवाह या संदर्भातील प्रथा

सर्व ज्योतिषप्रेमींना नमस्कार. आपल्यापर्यंत माझा ब्लॉग पोचतो आहे याची पावती मला मिळते आहे. आपल्या प्रतिसादामुळे उत्साह अजुन वाढतो आहे. या ब्लॉगच्या माध्यमातुन ज्योतिषविषयाची उपयुक्तता पोचवणे हा उद्देश आहे तसेच काही अनिष्ट गोष्टी कालबाह्य गोष्टी सुध्दा आपल्यापर्यंत पोचवणे हा ही उद्देश्य आहे. पौष महिन्यात विवाह विषयक बोलणी करु नये ही एक अनिष्ट प्रथा भारतभर रुळली आहे. याला काहीच शास्त्राधार नाही. दाते पंचांगकर्ते यांनी कधी काळी यावर लेखही लिहला होता. याला शास्त्राधार असता तर पंचांगात पौष महिन्यात लग्नाचे मुहुर्तही आले नसते. माझ्या मते जर मराठी भाषेत ज्योतिष किंवा मुहुर्तविषयक शास्त्र शुध्द काही असेल तर ते पंचांग आहे. ज्या अर्थी दाते पंचांगात पौष महिन्यात मुहुर्त आहेत त्या अर्थी किमान विवाहाची बोलणी करायला काहिही अडचण नसावी. आपल्या हातात हे राशीभविष्य ९ किंवा १० जानेवारीला पडेल आणि २७ जानेवारी पर्यंत पौष महिना आहे. मुलांचे विवाह आजकाल लांबतात. अजुन उशीर न करता जे स्थळ आले असेल त्या वर बोलायला पाहिजे. त्या करता पौष महिना संपायची वाट पाहु नका.

विधवा केशवपन, सतीची प्रथा यासारख्या प्रथा आपण मोडुन काढल्या कारण त्याला शात्राधार तर नव्हताच. स्त्रीयांना केवळ जोडीदाराचा अपमृत्यु झाल्याने अमानुष वागणुक समाज देत होता. इतक्या मोठ्या वाईट प्रथा आपण मोडल्या आहेत. त्यामानाने काही किरकोळ प्रथा आपल्या मनात घर करुन राहिल्या आहेत. मला जेव्हा यावर या ब्लॉगवर प्रतिक्रिया येतील तेव्हा कळेल की हा विचार आपल्याला पटला आहे.

चुकीचे जो पर्यंत सोडुन देत नाही तो पर्यंत चांगले आणि खरे आपल्यापर्यंत पोचणार नाही.

फ़ेसबुकच्या माध्यमातुन मी माझ्या ब्लॉगच्या लिंक आपल्यापर्यंत पोचवतो. पण एक सोपा मार्ग आहे की तुम्ही माझा ब्लॉग subscribe करा  म्हणजे ते तुम्हाला नियमीत इमेल वर प्राप्त होत राहील. पोष्ट्च्या खाली त्याची लिंक आहे. त्यावर आपला इमेल आय डी लिहुन submit हे बटन दाबलेत की पुढील सुचना येतील. त्यानुसार तुम्ही ही कृती पुर्ण करु शकाल. ज्यांचे इमेल अकाउंट नाही त्यानी फ़ेसबुक वर पहा. त्यांना तिथे लिंक मिळेल. आणि जर आपण मला वैयक्तिक भेटुन मोबाईल नंबर दिला असेल तर whatsapp वर मी राशीभविष्याची किंवा लेखाची लिंक देत असतो.

१४ जानेवारी अर्थात मकर संक्रांत. या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसाला भारतीय संस्कृतीत महत्व देण्याचे कारण सुर्य हा शक्तीचा स्त्रोत आहे. दक्षिणायनात दिवस लहान तितके शक्तीचे वहन कमी होते. याउलट १४ जानेवारीपासुन सुरु होणारे उत्तरायण पृथ्वीवरल्या माणसासहीत अनेक जीवांना शक्तीचे वरदान देते. थंडीने गोठलेल्या पृथ्वीला नवचैतन्य मिळते.

१४ जानेवारी पासुन सुरु होत असलेल्या महिन्याचे ग्रहमान असे सांगते की काही लोकांना व्हिटॅमीन ई ची कमतरता जाणवेल. परीणामी मांडी-पोटरीत क्रॅप येणे, निरुत्साह वाटणे किंवा लो बी.पी.ची तक्रार असलेल्यांना त्रास वाढु शकतो. यासाठी मोड आलेली कडधान्ये याचे सेवन किंवा बरोबर बदामाचे सेवन गरजेचे आहे.  व्हिटॅमीन ई सोबत व्हिटॅमीन सी पण खाणे गरजेचे असते अन्यथा व्हिटॅमीन ई पुर्णपणे शरीरात शोषले जात नाही. जे संपुर्ण शाकाहारी नाहीत त्यांना ही तक्रार दिसणार नाही कारण मांसाहारातुन व्हिटॅमीन ई मोठ्या प्रमाणात मिळत असते.

१४ जानेवारीला सुरु होणारा रवि महिना अर्थात रविमास शनिसारख्या बलाढ्य ग्रहाचा राशीबदल घेऊन येतो आहे म्हणुनच स्वतंत्र लेखाने मी त्यावर लिहले आहे. हा लेख पहावा  http://gmjyotish.blogspot.in/2016/12/blog-post_20.html

या महिन्यात बुध शुक्र यांच्या राशीबदला बरोबरच मंगळ मीन राशीत जात आहे. कसा जाणार आहे नेमका महिना ते आता पाहु.

मेष रास :  २६ जानेवारीला शनि आपल्या भाग्यस्थानात जाणार आहे आणि अडीच वर्षे तिथे मुक्काम करणार आहे. ज्यांना सतत शत्रुपीडा झालेली आहे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही. लांबच्या प्रवासाचे योग येणार आहेत. कदाचित बदली सुध्दा संभवते. बदली तुम्हाला हव्या त्या शहरात घडवण्यासाठी मात्र प्रयत्नच हवेत. किमान नको त्या ठिकाणी होणार नाही ते पहा. २० तारखेला मीनेत जाणारा मंगळ एखादे छोटे आजारपण किंवा त्रास देऊ शकेल. १४-१५ जानेवारी पासुन होणारी शुक्र-मंगळ युती तुम्हाला महिनाभर जोडीदाराच्या संपर्कात रहाण्याचा योग देणार आहे.  नवविवाहीत असाल तर हनिमुनसाठी प्रवास आहेच. गुरुवारी आलेली २६ जानेवारीची सार्वत्रीक सुट्टी. २७ जानेवारीची दांडी आणि शनिवार -रविवार सुट्टी असलेल्यांना आपोआप मिळणारी सुट्टी म्हणजे पुन्हा एकदा किमान महाराष्ट्रातले  समुद्रकिनारे भरुन माणसांचे उधाण येईल. नोकरदारांना रवि दशमात येऊन काही अतिरीक्त अधिकार महिनाभर मिळतील. प्रमोशन अपेक्षीत असेल तर प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. ह्याच महिन्यात जन्मतारीख असलेल्यां मेष राशीच्या लोकांना ( १४ जानेवारी ते १२ फ़ेब्रुवारी )  याची जास्त प्रचिती येईल.

मेष राशीला चतुर्थेश आणि पंचमेश याचा योग  राजयोग कारक असते. त्यातही रवि दशमात असताना राजयोग जास्त फ़लदायी होतो. आपल्या दशमात रवि महिनाभर आहे. १९ जानेवारी, २७ जानेवारी व  ६ फ़ेब्रुवारी व ला स्मरणात राहील असे अनुभव  येतील. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना तर नक्कीच याचा अनुभव येईल.

वृषभ रास : तुमच्या पत्रिकेत एक महत्वाचा बदल म्हणजे शनि २६ जानेवारीपासुन, चंद्र राशी कडुन म्हणजे वृषभ राशी कडुन आठवा येत आहे. हा योग किंचीत  त्रास देणारा असतो. शनि बदलाच्या काळात म्हणजे दिनांक २६ जानेवारी २०१७ सायंकाळी ०४.३५ ते रात्री १०.२३ पर्यंत जप, दान किंवा शनि पुजनाने हा त्रास कमी होतो. ज्योतिषाने सांगीतले की लोक मनपुर्वक करतात हा अनुभव आहे. यासाठी दाते पंचांगाचे ( २०१६-२०१७ ) पान १९ वर विस्ताराने सर्व दिले आहे ते वाचा आणि करा. श्रध्दा महत्वाची हे विसरु नका. श्रध्दे शिवाय मॅकेनिकली कृती व्यर्थ आहे.  दाते पंचांग आठव्या शनिचे वर्णन कष्टकारक असतो असे करते. वृषभ राशीचे लोक कष्टाला घाबरत नाहीत त्यामुळे तुम्ही चिंता करुच नका.

१५ डिसेंबर ते १३ जानेवारी काळात तुमचा सुख स्थानाचा अधिपती रवि आठव्या स्थानी असताना जे त्रास झाले असतील ते १४ जानेवारीपासुन संपतील. रवि भाग्यात जाईल आणि शुक्र -मंगळ यांचे भ्रमण अनुक्रमे २७ व २० तारखांना तुमच्या लाभस्थानी सुरु होताना काही अपेक्षा पुर्ण होतील आणि लाभही घडेल असे योग महिनाभर आहेत. पंचमेश- कुटुंबेश बुधही भाग्यस्थानात जात असल्यामुळे कुटुंबातईल व्यक्ती किंवा मुलांच्या संदर्भात काहीतरी उत्तम घडेल यावर विश्वास ठेवा.

मिथुन रास : शनि तुमच्या सप्तम स्थानी २६ जानेवारीला येत आहे. पुरुषांची आजकाल बायकोसमोर बोलायची सोय नसतेच असा विनोद नेहमी केला जातो. माझ्या मते पती- पत्नी एकमेकांना पुरक असतात. सप्तम स्थान तुमच्या जोडीदारचे स्थान पुढील अडिच वर्षे शनि सप्तमात असताना जोडीदाराला त्रास असणार आहे. त्यात तुमची भर नको म्हणुन जोडीदाराचे मन जपायचा संकल्प करुन टाका. जोडीदार त्रासात असताना तुम्हाला सुख कुठुन लाभणार ? शनिचे सप्तमातले भ्रमण हे असे असते. महिनाभर रवि अनुकुल नसताना किंचीत आजारपण  येऊ शकते. सोबत लग्नेश. सुखेशही बुध अनुकुल नसणार. एक महिना जरा कुपथ्य होणार नाही याची काळजी घ्या. सुर्यदर्शन घ्यावे किंवा सुर्यनमस्कार घालावेत हे ही या काळाला अनुसरुन आहे. मग आपल्याला त्रास होणार नाही.

दशमात येणारा शुक्र मंगळ नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने मिश्र फ़ळे देईल. नोकरी व्यवसायात संघर्ष करावा लागेल पण तुम्ही मैदानात उतरलात की शत्रु पळ काढेल. तुम्ही मी संघर्षाला तयार आहे असे जाहिर करा आणि पहा काय घडते.

कर्क रास : शनि महाराज आपल्याला राशीबदलानंतर काही अडचणीत टाकु शकतात.  एखाद्या व्यवसायीक पैसे वसुलीबद्दल शंका असेल तर गोडी गुलाबीने जेव्हडे पैसे २६ जानेवारीच्या आधी मिळत असतील तर ते घेऊन टाका मग भांडत बसा. किंवा  प्रॉप्रर्टी येणे असेल तर जी मिळते आहे ती घ्या मग अपेक्षीत काय त्याचा विचार करा. अष्टमेश शनि जेव्हा सहाव्या स्थानात येतो तेव्हा दुखणे वाढु शकते. आपल्या सध्याच्या दुखण्याची तिव्रता व औषध उपचार याकडे लक्ष द्या. गंभीर विचार करावा असे नाही पण दुर्लक्ष नको इतकेच सांगणे.

शुक्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुम्हाला भरपुर सुख महिनाभर देईल. एखादी सुखदायी वस्तु तुमच्या संसारात येईल. तसेच भाग्यस्थानातील मंगळाचे भ्रमण आपण खेळाडु असाल तर अपेक्षीत निवड झाल्याची बातमी घेऊन येईल. या महिनाभरात जर तुम्हाला खेळाचे प्रदर्शन करायचे असेल तर तुम्ही नक्की चमकाल. मग प्रॅक्टीसला सुरवात करताय ना ? सराव न करता भविष्यावर विश्वास ठेवाल तर मग गफ़लत होईल.

सिंह रास: चवथा शनि म्हणजे छोटी पनवती अस म्हणतात ती २६ जानेवारीला संपते आहे. शनि तुमच्या पंचम स्थानी जातो. मघा नक्षत्र वाल्यांना हा शनि सुखकारक नाही. पुर्वा नक्षत्राच्या लोकांनाही फ़ारसा सुखकारक नाही. पण अजुनही म्हणाव तस ग्रहमान तुमच्या राशीला अनुकूल नाही तेव्हा जरा शांतच रहा. सिंहाने नुसता दृष्टिक्षेप टाकला तरी भागते त्यामुळे तुमच्या शत्रुच्या हालचालींवर नुसती नजर टाका. थोडीशी नाराजी दाखवा. या महिन्यात तुम्ही इतकेच करु शकता.

अनेक ग्रह तुमच्या राशीला याही महिन्यात फ़ारसे अनुकुल नसल्यामुळे कोंडी होते की काय असे वाटेल पण ही स्थिती फ़ारकाळ टिकणारी नाही. एखादे लेखी फ़र्मान काढण्याचा प्रशासकीय अधीकार तुमच्याकडे असेल तर विचारपुर्वक काढा आणि गंमत पहा. या पध्दतीने नोकरी/व्यवसाय किंवा या ठिकाणी असलेल्या अडचणी संपणार आहेत पण अजुन महिनाभर थांबा मग हळु हळु ग्रहमान बदलेल.

कन्या राशी: २६ जानेवारीपासुन एक छोटीशी पनवती येते आहे. चतुर्थ स्थानातले शनिचे भ्रमण तुमचे सुखाने बसणे, झोपणे किंवा भौतीक सुख देणारे वस्तुंचा  उपभोग घेण्यास अडचणी निर्माण करणार आहे. पुढील अडीच वर्षात असा अनुभव येईल की तुमच्या आवडीच्या वहानाने तुम्हाला प्रवास करता येणार नाही. इतकच काय सुखाच्या झोपेत अडथळे येतील. शनिमहाराज जे अडथळे निर्माण करुन एकच संदेश देत असतात की भौतीक वस्तु चिरकाल सुख देत नाहीत. उलट आपल्या आवडीच्या वस्तु उपलब्ध झाल्या नाहीत की त्याच वस्तु दु:खाचे कारण होतात. आपली मनोवृत्ती बदला मग दु:ख होणारच नाही. कार बिघडली तर शिवनेरी/वॉल्वो बस आहेच आणि शिवनेरी/वॉल्वो फ़ुल असेल तर लाल डब्याच्या गाडीतुन लोक प्रवास करतात. ते ही आपल्या परीने सुखाने प्रवास करतात. मग आपल्याला काय हरकत आहे. उशाशी कापुस ठेवा. जवळच कुणी घोरत असेल तर कापुस कानात भरा आणि झोपा. मनोवृत्ती बदला आणि दु:ख विहीन अवस्थेचा अनुभव घ्या.

तुम्हाला एखाद्या विषयावर विचार करण्याची संधी या महिन्यात येत आहे. तुमच्या परिक्षणावर अनेकांचे लक्ष असेल तेव्हा ते काम चांगले कसे होईल याकडे लक्ष द्या. नविन मित्र लाभतील त्यामुळे काही प्रश्न सुटण्यास मदत होईल. काही व्यावसायीक संधी समोर येतील त्यावर नीट विचार करुनच निर्णय घ्या.

तूला राशी: आपल्या जन्मगावी जावे असे मनात येत असेल तर ते नक्की करा. नॉस्टेल्जीक होणे ही काही गैर नाही. आपल्याच मुळ गावी रहात असाल तर शाळा-कॉलेजच्या पर्वातले मित्र भेटुन ते दिवस आठवतील. शनिचे भ्रमण आपल्या कुटुंबस्थानातुन २६ जानेवारीला संपेल आणि तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल.

शत्रुंचा पाडाव करण्याचे इतके दिवस टाळले असेल तर  शत्रुला अनपेक्षीत खेळी करुन खिंडीत गाठण्यास एक अनुकूल परिस्थिती आली आहे. खेळाची सुत्रे आपल्या ताब्यात घ्या. आजपर्यंत तुम्ही बॅलन्स करत आलात त्या ऐवजी पारडे तुमच्या बाजुला झुकवा आणि मग पहा शत्रुच्या गोटात कशी खळबळ उडते. भारताचेच पहाना इतके दिवस पाकिस्थानला नुसते नाराजीचे खलीते पाठवत होतो. एकदा सर्जीकल स्ट्राईक केल्याशिवाय तुमच्या उपद्रव मुल्याचे आकलन शत्रुला होणारच नाही. तुम्ही कोणाचेही घोडे मारणार नाही मग स्वत:चे घोडे मेल्यावर शांत राहु नका कारण काळ सोकावतो.

वृश्चिक राशी: शनि तुमच्या धन स्थानी किंवा कुटुंबस्थानी जातो आहे. अनेकांना कुटुंबात क्लेश निर्माण झाल्याचे हळु हळु जाणवु लागेल. अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना याचा अनुभव जास्त येईल.  याचा अनुभव दरवेळी घरातल्या माणसांच्याच वागण्याने क्लेश होतील असे नाही. बाहेरील व्यक्ती सुध्दा कारण असतील. कुटुंबातील काही व्यक्ती नोकरी/व्यवसाय निमीत्ताने दुर जातील हे ही क्लेशाचे कारण असेल. शनि कुटुंबातील व्यक्तींची संख्या किमान १ ने कमी करतो हे या शनिच्या भ्रमणाचे वैषिष्ठ्य आहे. सर्वांनाच हा अनुभव पुढील वर्षात येईल असे नाही.  शनिमहाराज तु एकटा जन्माला आला आहेस. शेवटी एकटा जाणार आहेस याची जाणीव करुन देतात. जेष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना हे शनिभ्रमण संपत्ती मिळवुन देईल.

सप्तम स्थानाच्या अधिपतीचे पंचमातुन भ्रमण म्हणजे तरुणाईला प्रेमात पडण्याचे कारण मिळत आहे. प्रेम व्यक्त करण्याचा महिनाही पुढे आहे. प्रेम हे आंधळ असत ही म्हण मात्र खोटी करण्याची वेळ आहे. हे खरच प्रेम आहे की केवळ आकर्षण याचा विचार नक्की करा.

धनु राशी:  तुम्ही सत्वगुणी आहात पण शनि महाराज या अडीच वर्षात तुम्हाला सुळाच्या जवळ नेऊन उभे करणार हे नक्की. शनि उपासना सुरु ठेवा. जे घडत आहे ते खास शिकण्यासाठी यावर विश्वास ठेवलात म्हणजे साडेसातीचा त्रास होणार नाही.

लाभेश शुक्र चतुर्थातुन जात आहे. तो सुखाचा अनुभव २६ जानेवारीनंतर महिनाभर देणार आहे. एखादा प्रबंध लिहीण्याचा विचार असेल तर त्याचा प्रारंभ करण्यास अनुकूल काळ महिनाभर आहे. परदेशी जर्नल मधे अभ्यासपुर्ण संशोधनात्मक लेख लिहीणार असाल तर लिहा. यासाठीचा विचार पुर्ण होऊन ते काम पुर्ण होईल.

मुळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या व्यक्तींनी जे पैसे बुडाले असे गृहीत धरुन आपण चालला होतात ते पैसे मिळवण्यासाठी ह्या महिन्यात प्रयत्न केल्यास ते हमखास मिळतील. मोठ्या व्यावसायीक संधींचे सोने करु शकाल.

मकर राशी:  मकर राशीचा अधिपतीच व्ययस्थानात गेल्याने साडेसातीचा प्रभाव खासा जाणवेल. आजवर ज्या दृढ इच्छा शक्तीने आपण काम करत होतात ती पुढील अडीच वर्षे क्षीण झालेली जाणवेल.  दर शनिवारी http://gmjyotish.blogspot.in/2016/12/blog-post_20.html या लेखात लिहल्या प्रमाणे उपासना सुरु करा. त्या पुर्वी २६ जानेवारी संध्याकाळी जप, दान किंवा पुजनाने वरील दर शनिवारी करायच्या नियमीत पुजनाचा आरंभ करा. मग साडेसातीचा  त्रास कमी जाणवेल.

तुमच्या तृतीयात शुक्र-मंगळाचे भ्रमण होत आहे. लेखक असाल तर काही लेखन हातावेगळे होईल. नोकरी- व्यवसायाच्या निमीत्ताने लहान प्रवास घडतील. काही पुरुषार्थ करण्यासाठी  इच्छा होईल. हा खरा पुरुषार्थ आहे की अजुन काही ते ओळखुन कृती करणे इष्ट. साहस अंगाशी येणार नाही हे पहा.

कुंभ राशी: लाभस्थानी जाणारा शनि अनेक लाभ घेऊन येत आहे. यात अनेक इच्छा पुर्ती सोबत पुर्वी अक्कल खाती टाकलेल्या खर्चाचे विचार करुन आता त्या खात्यातुन उत्पन्न येईल का असे विचार करण्याची वेळ आलेली आहे. NPA म्ह्णजे नॉन प्रॉडक्टीव्ह असेट्स खरच नॉन प्रॉडक्टीव्ह आहेत का याचा शोध घ्या. काही बदल होऊन ते पैसे द्यायला सुरवात होईल. हे  असेट्स प्रॉडक्टीव्ह करा किंवा विकुन टाका. तुमच्या संपत्तीत वाढच होईल असा अनुभव आता येईल. यासाठी पुढील महिना विचार करुन निर्णय घ्यायला योग्य आहे. फ़ेब्रुवारी महिन्यात NPA झालेल्या शेअर्सच्या किमतीत अचानक वाढ होऊन तुम्हाला ते फ़ायद्याचे ठरतील. शततारका नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना याचा अनुभव येईल.

 "नसतेस घरी तु जेव्हा" ही संदीप खरे यांची कविता महिनाभर अनुभवायचे योग आहेत. जोडीदाराचे दुरवर प्रवासाला जाण्याचे योग आहेत त्यामुळे खास करुन कुंभ राशीच्या स्त्रीयांना याचा जरा जास्त अनुभव येईल.  कुंभ राशीच्या पुरुषांना मात्र अध्यात्मीक अनुभव येतील. कोणा सत्पुरुषाचे अध्यात्मीक बोल मनात घर करुन राहतील. हा उपदेश दिर्घ काळ स्मरणात राहील.

मीन रास:  तुमच्या दशम स्थानात शनिचे भ्रमण २६ जानेवारीपासुन सुरु होत आहे. नोकरीत काय किंवा व्यवसायात कष्टाचे पर्व सुरु झाले आहे असे नक्की समजा. पुर्वी पेक्षा जास्त काम करायला लावणारा हा योग आहे. पण हे काय कधीतरी घडतेच. कधी कमी किंवा जास्त काम हे अनेक वर्षे नोकरी-व्यवसायात असलेल्या व्यक्तींच्या अंगवळणी पडलेले असते. जे नव्यानेच नोकरी व्यवसायात जातात ते गांगरतात. आपले वैयक्तीक जीवन संपले असे समजुन नोकरीचा राजीनामा देतात किंवा ह्या व्यवसायात काही मजा नाही असा अमज करुन घेतात. लक्षात ठेवा, दहा वर्षे नोकरी- व्यवसाय करुन जे समजले नाही ते समजण्याचा हा काळ आहे. याचा फ़ायदा म्हणजे मॅच्युरीटी. सध्याचा तुमचा नोकरी- व्यवसायातला सध्याचा रोल मॅच्युअर झाल्याशिवाय तुम्ही पुढचा रोल घेऊ शकत नाही.

पुर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या मीन राशीच्या लोकांच्या चंद्रावरुन मंगळ आणि शुक्राचे भ्रमण आहे. चंद्रावरुन मंगळ जाताना धनलाभ आहेतच पण उच्चीचा शुक्र सुध्दा मनाला सुखवुन जाणार आहे. ही फ़ळे मिश्र आहेत.

तुमची एखादा सरकारी क्लेम येणे असेल उदा. इनकम टॅक्स चा परतावा  किंवा इन्शुअरन्स कंपनीचा क्लेम असो किंवा एखाद्या केस मधे तुम्ही मागीतलेली नुकसान भरपाई मिळेल. तुमच्या कडुन विवाहाचे प्रपोजल गेले आहे असे असेल तर नक्कीच होकार मिळणे अपेक्षीत आहे.

एकंदरीत नोकरी व्यवसायात कष्टाचा असलेला कालखंड मात्र या महिन्यात तरी किमान वैयक्तीक जीवनात सुखावणारा आहे हे निश्चित.

Tuesday, December 20, 2016

साडेसाती वृश्चिक - धनु आणि मकर राशीची



२६ जानेवारी २०१७ रोजी शनिमहाराज धनु राशीत प्रवेश करणार आहेत. तूळा राशीची साडेसाती २६ जानेवारीला संपली तरी १०० टक्के संपत नाही. वृश्चिक राशीला शेवटची अडीचकी सुरु होते. धनु राशीला मधली अडिचकी सुरु होते आणि मकर राशीला साडेसातीची सुरवात होत आहे. प्रत्येक राशीला काय आणि कशी फ़ळे मिळणार आहेत याबाबत आता पाहू.

तूळा रास

या प्रवेशासोबत तूळ राशीची साडेसाती २६ जानेवारी २०१६ ते २० जून २०१७ या साधारण सहा महिने कालावधीसाठी संपणार आहे. हत्ती गेला आणि शेपुट राहीले असा अनुभव तुम्हाला येणार आहे. कारण २० जुन २०१७ पासुन २६ अक्टोबर २०१७ कालावधीसाठी साडेसाती पुन्हा येईल. त्याचा परिणाम खास करुन तूळा राशीच्या शेवटच्या अंशात म्हणजे विशाखा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना थोडासा प्रभावीत करेल. त्यांनी अजिबात चिंता करण्याचे कारण नाही.

फ़क्त तूळ रास व ज्यांचे वृषभ लग्नाच्या लोकांना या साडेसातीचा  त्रास संपला असे वाटणार नाही कारण  धनु राशीतला शनि, लग्न राशीकडुन अष्टमात जात आहे. वृषभ राशीला शनि राजयोग कारक आहे. तो नवमेश- द्शमेश आहे. नोकरी- व्यवसायात पुढील अडीच वर्षात  यश हुकुमी मिळणार नाही. यशासाठी झगडावे लागेल. उत्तम ज्योतिषाला विचारा की लग्न राशीकडुन तुमचा गुरु कोणत्या स्थानात आहे. तो जर उत्तम स्थानी असेल तर चिंता करण्याचे कारण नाही.

साडेसाती संपताना काही न्युनगंड तयार होतात. कोणाला ड्रायव्हिंगची भिती तयार होते, कोणाला काही परिस्थीतीचा सामना करण्याचे धैर्य रहात नाही तर कोणाला काही नाते- संबंध म्हणजे नुसता त्रास असे वाटायला लागते. आपण अजिबात कोणती उपासना करत नसाल तर अंघोळीनंतर गायत्री मंत्राचा मनापासुन जप करा. या त्रासातुन मोकळे व्हाल. याच बरोबर आपल्या बॅक ऑफ़ द माइंड मध्ये असे कोणते न्युनगंड तयार झाले आहेत आणि ते का आहेत याची कारणे शोधा. समजा, तुम्हाला साडेसातीत एखादा अपघात झाला म्हणुन तुम्ही ड्रायव्हींग करायला भीत असाल तर मनाला बजावा की असे पुन्हा पुन्हा घडत नाही. ज्याची भिती वाटते ते हमखास करा. त्याच बरोबर आपली उपासना सुरु ठेवा.

वृश्चिक रास 

आपली साडेसाती संपायला अजुन सर्वसाधारण अडिच वर्षे बाकी आहेत. मागची अडिच वर्षे तुम्ही खुपच पोळले गेले आहात. तुमच्या चंद्रावरुन म्हणजे मनाचे नियंत्रण करणारा ग्रह यावरुन मागिल अडिच वर्षे शनिचे भ्रमण झाले आहे. मनाला खुपच त्रास झाला असेल. ज्यांचा जन्म १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर काळात आहे अश्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती जरा जास्तच त्रासल्या असतील. आजारपण, मानहानी आणि वडीलांना त्रास असे प्रकार मागील अडीच वर्षात दिसले असतील. आपला रवि जर चंद्रा बरोबर वृश्चिकेत असेल तर शक्यता आहे की बुध आणि शुक्र या पैकी एखादा ग्रह किंवा दोन्हीही ग्रह वृश्चिक राशीत असतील.  अश्यावेळी ही दाहकता फ़ारच जाणवली असेल. ह्या काळात आपल्याकडुन नीट निर्णय घेतले गेले नसतील. डायबेटीस असेल तर रक्तातली साखर वाढली असेल आणि आपल्या कुटुंबातील स्त्रीवर्गाला सुध्दा काहीना काही सहन करावे लागले असेल. पण तो खराब काळ आता संपला आहे.

आपल्याला न्युनगंड निर्माण झाले तरी त्यावर कशी मात करायची याचे चांगले तंत्र अवगत आहे. आपण खुपच पोळले असाल तरी आता मानसीक रित्या बाहेर याल.

चंद्र राशीकडुन धनु रास तुमच्या कुटुंब स्थानात येते. जर तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी काळातला असेल तर या काळात शनिचे भ्रमण तुमच्या रवि वरुन होणार आहे. याचा परिणाम म्हणुन आपल्याला मानहानी स्विकारावी लागु शकते. आरोग्याच्या तक्रारी दिसु शकतात उदा. अर्थ तंबाखु खात असाल तोंडाच्या आरोग्याबाबत जागरुक रहा. दात दुखत आहे म्हणुन घरगुती उपाय करु नका. किमान एक रात्र आपली झोप जाईल. दात दुखतो आहे आणि उद्या रविवार आहे अश्यावेळी डेंटिस्ट ना भेट द्या. कितीही गर्दी असली तरी उपचार करुन घ्या. साडेसातीमधे शिळे अन्न खाऊ नका. राहूची महादशा चालु असेल तर शपथ घ्या की शिळे खाणार नाही. हे महिलांच्या बाबतीत जास्त लागु होते. कारण फ़ेकुन कसे द्यायचे म्हणुन महिला ते अन्न खातात.

जर तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी आपले सरकारी स्कीम मधले धन धोक्यात येऊ शकते. आपण पीपीएफ़ मधे पैसे ठेवले असतील आणि १५ वर्षे उलटुन गेली असतील तर मुदत वाढीचा एक अर्ज द्यावा लागतो तो नक्की द्या. तसेच या निमीत्ताने आपण पीपीएफ़ साठी नॉमीनेशन केले आहे ना ते पहा. घाबरु नका, माझ्या या वाक्याचा चुकुनही गैर अर्थ घेऊ नका. तुमच्या जीवाला धोका आहे असे अजिबात नाही. मी कोण्या व्यक्तीचा मृत्यु वर्तवणे सोडाच हींट सुध्दा देत नाही. व्यक्ती उगाचच घाबरुन जाते. त्यामुळे सर्वच वृश्चिक राशीच्या मंडळीनी याच अर्थ समजाऊन घ्या. एकतर त्या पीपीएफ़ अकाऊंटस  सरकारी बॅकेचे कर्मचारी फ़ारसे उत्साहाने किंवा काळजीने हाताळत नाहीत. पोस्ट खात्याबाबत फ़ारसे न बोललेले बरे म्हणुन मला हे सर्व लिहावेसे वाटले.

तुमचा जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी याकाळातला असुन धनु राशीत जर रवि बरोबर बुध, शुक्र हे ग्रह असतील तर काय घडेल हे जाणण्यासाठी एखाद्या जाणत्या ज्योतिषाला भेटा. तसेच मीन, मिथुन, कन्या या ही राशीत अनेक ग्रह असतील तरीही पत्रिका दाखवा. काही छोटे त्रास शनिच्या भ्रमणाने संभवतात. त्याबाबत जाणुन घ्या.

या  शिवाय विवीध लग्न राशींना चंद्राची रास वृश्चिक असताना काय फ़ळे मिळतील ते पाहु

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही.
वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा.
मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या.
कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.
सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.
कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेची चिंता करावी लागेल.
तूळा लग्न असेल तर शनि  तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.
वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील.
धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत  काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील.
मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. हे खर्च चांगल्या कामासाठी झाले तर ठीकच आहे.
कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात साडेसाती असुन घडणार आहेत.
मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

या लेखाच्या  शेवटी साडेसातीचा त्रास सुसह्य व्हावा म्हणुन काही उपासना लिहली आहे. तुमचा फ़ार विश्वास नाही या सगळ्यावर पण त्रास झाल्यानंतर काही करण्याऐवजी उपासना करत नसाल तर करा इतकेच लिहेन. तुमच्या लहान मुलांची वृश्चिक राशी - जेष्ठा नक्षत्र आहे पण अजुनही जननशांती केली नसेल तर करा. तुमचे जेष्ठा नक्षत्र आणि मुलाचे किंवा मुलीचेही जेष्ठा नक्षत्र असेल तर हा मोठा दोष आहे. त्याला होणारा त्रास तुम्हाला भोगता येत नाही. आई- वडील म्हणुन तुम्ही इतकेच करु शकता त्यांची जननशांती करा.

धनु राशी :

तुम्हाला जितकी उत्सुकता आहे की साडेसातीची मधली अडीचकी कशी जाईल तितकीच मलाही आहे. मला १९८६ साल ते १९८८ सालात मागच्या साडेसातीत मधली अडीचकी होती. ५ मे १९८६ साली एक छोटा अपघात प्रयाग हॉस्पीटल-  समोर पुणे येथे मला झाला होता. पुढच्या पाच मिनीटात मी जखमेवर उपचार ही केले होते पण ही जखम मला तीन महिने पुरली. शेवटी माझे सदगुरु श्री गजानन महाराज शेंगाव यांच्या कृपेने चमत्कार होऊन जखम बरी झाली. १९८७ सालच्या मार्च महिन्यात माझे लग्न होते पण मी जोरदार आजारी पडलो. तीन दिवस कोणतेही निदान नाही. पुन्हा सदगुरु धाऊन आले. मग निदान झाले की फ़क्त अ‍ॅसिडीटी झाली आहे. मग लग्नही आनंदाने पार पडले. त्या पाठोपाठ एक नको असताना ऑपरेशन झाले केवळ चुकीच्या निदानामुळे. अजुनही मानहानी होईल अशी घटना घडली. नोकरीत खुप त्रास झाला.  माझ्या मते माझे मुळ नक्षत्र असुन जननशांती न झाल्याने तसेच अमावस्येचा जन्म तीही शांती न झाल्याने हे सर्व घडले. पुढे मी वयाच्या ३० वर्षांनंतर स्व हस्ते या शांती केल्या. कारण मला आता ज्योतिष समजु लागले होते. मी साधना करत नव्हतो ती करायला लागलो. आता त्रास होणार आहेच पण तो इतका जोरदार नसेल.

तुमची धनु रास आहे आणि मुळ नक्षत्र असेल तर जननशांती केली नसेल तर करा. जर धनु रास असुन जन्म १६ डिसेंबर ते १४ जानेवारी काळात असेल तर जन्मकाळी अमावस्या असण्याची शक्यता आहे. मग जननशांती कराच आणि जर जाणत्या वयात ही दुसरी साडेसाती येणार असेल तर अनुभव घ्या आणि फ़रक जाणवेल. जननशांती दुसरी साडेसातीत चंद्रावरुन शनी जाण्याआधी केलीत तर ही साडेसाती सुसह्य होईल.

सर्व धनु राशीच्या लोकांना चंद्रावरुन शनिचे भ्रमण झाल्याचे  परिणाम ह्या काळात दिसतील. किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप होणार आहे. हमखास एखादी व्यक्ती असे वागेल की तुम्हाला अपेक्षा नसेल आणि म्हणुन मानसीक त्रास होईल. मुळ नक्षत्रांच्या लोकांना हे जरा जास्त जाणवेल पण पुर्वाषाढा आणि उत्तराषाढा यांना तितका त्रास होणार नाही. वर लिहील्याप्रमाणे अमावस्येचा जन्म असल्यास आणि मुळ नक्षत्रात रवि असल्यास ( १६ डिसेंबर ते २९ डिसेंबर ) जरा जास्त त्रास संभवतो. पुर्वाषाढा नक्षत्रात चंद्र आणि रवि असतानाही त्रास होणार आहे पण तो त्या मानाने कमी असेल. नविन काम सुरु करणार असाल तर गुंतवणुक कमी ठेवा. आईचे आरोग्य बिघडणार नाही हे पहा तसेच अमावस्येचा जन्म असताना आई- वडील या दोघांना जपा.

आता विवीध लग्नराशींना, धनु चंद्र रास असताना धनु राशीतल्या शनि भ्रमणाचा काय परिणाम होईल ते पाहु.

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसीक त्रास होईल.
वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमाऊ नका. यातुनही बाहेर पडणार आहात.
मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.
कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.परिस्थीतीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थानातुन जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.
कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.
तुळा लग्न असेल तर शनि  तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.
वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागतील.
धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनु राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.
मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. व्यवसायीक असाल तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठी सुध्दा करावा लागेल.
कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात साडेसाती असुन घडणार आहेत.
मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

या लेखाच्या  शेवटी साडेसातीचा त्रास सुसह्य व्हावा म्हणुन काही उपासना लिहली आहे. तुम्ही भाविक आहात. भावना जागृत ठेऊन उपासना करा. तुम्हाला नक्कीच कमी त्रास होईल. या काळात शनिशिंगणापुरला जा शनि महाराजांचे दर्शन घ्या. शनि महाराज नक्कीच कृपा करतील.

मकर रास 

तुमच्या राशीला साडेसाती साडे बावीस वर्षांनी सुरु होत आहे. ती पुढे साडेसात वर्ष सुरु रहाणार आहे. पहिल्या अडिचकीत शनी चंद्राच्या व्यय स्थानातुन भ्रमण करतो. हा काळ चांगला नसतो. लग्न राशी आणि चंद्र राशी दोन्ही मकर राशी असताना याचे जास्त वाईट परिणाम अनुभवाला येतील कारण भौतीक नुकसान होतेच म्हणजे पैसे अनावश्यक खर्च होतात किंवा ज्याला आपण नुकसान म्हणु होते शिवाय चिंता लागुन रहाते.

काही सुचवायचे आहे पहा जमते का.

१. आपण ठेवलेल्या सर्व ठेवींची कागदपत्रे बरोबर आहेत का ते तपासुन पहा. काही मुदत ठेवी संपलेल्या असतील तर पुर्नजीवीत करा म्हणजे व्याजाचे नुकसान टळेल. नोटबंदीमुळे रद्द झालेल्या सर्व नोटा सगळ्या बॅकेत जमा केलेल्या आहेत ना याची खात्री करा.
२. आपण घेतलेल्या सर्व शेअर्स चे टेक्नीकल अ‍ॅनेलिसीस पहा. अचानक काही बदल झालेले दिसत असतील आणि हे शेअर्स कोसळणार अशी शंका वाटत असेल तर आर्थीक सल्लागारांचा सल्ला घेऊन योग्य निर्णय घ्या.
३. ज्या गुंतवणुकीतुन अपेक्षीत फ़ायदा होत नसेल त्याकडे ही लक्ष द्या. त्या गुंतवणुकींचे नेमके काय करायचे यावर लक्ष द्या.
४. नाते संबंध ताणले गेले असतील तर त्यांना वेळ द्या.
५. जुनी दुखणी कायमची बरी व्हावीत म्हणुन आवश्यक वाटल्यास पॅथी बदलुन पहा. पर्यायी उपचार पध्दतीने रोग बरा होईल ते पहा.


असे म्हणतात की एक टाका वेळेवर घातला म्हणजे पुढचे अनेक टाके घालणे वाचते. ह्या साठी चक्क एक महिना हातात आहे.

यातुन काही नुकसान होणार आहे. त्याला इलाज नाही. काही शिकायला पण मिळणार आहे. शिकलेले आयुष्यभर उपयोगी पडणारच आहे. आपली आपल्या जाणते पणी म्हणजे वयाच्या १६-१८ वर्षांनी पहिलीच साडेसाती येत असेल तर वयाने जास्त असलेल्यांचा सल्ला ऐका.

आता साडेसाती निवारणार्थ उपाय पाहु

साडेसाती सुरु असताना दररोज अंघोळीनंतर खालील मंत्र किमान ११ वेळा म्हणा. म्हणताना शनि शिंगणापुरच्या शनिदेवतेचे ध्यान करा.

सुर्यपुत्रो दीर्घा देहि विशालाक्षा शिव प्रियः।
मंदाचारा प्रसन्नात्मा पीड़ां हरतु मे शनि ॥

दर  शनिवारी हनुमंताचे दर्शन सुर्यास्तानंतर घ्या. पाठोपाठ शनिमहाराजांचे घ्या. शनिमहाराजांना काळे उडीद, खडे मीठ, चमचा भर तेल, रुईच्या पानांचा हार अर्पण करा. शनिमहाराजांच्या समोर दिवा लावा. दिप दान करा. पाठोपाठ वरील मंत्र ११ वेळा म्हणा.

दर शनिवारी स्वत: तेल लाऊन अंघोळ करा म्हणजे शारिरीक व्याधी कमी होतील. साडेसातीत संकटे आल्यास १०० हनुमान चालीसाचे पाठ करा.

                                                     शुभंभवतु

१६ डिसेंबर ते १४ जानेवारी महिन्याचे भविष्य http://gmjyotish.blogspot.in/2016/12/blog-post.html

Friday, December 9, 2016

१५ डिसेंबर ते १४ जानेवारी काळासाठी राशी भविष्य

नमस्कार ज्योतिष प्रेमी वाचकहो,

आज मी पुन्हा ऑफ़ीस सुरु करुन तसेच राशीभविष्य लिहायला लागुन ३ महिने पुर्ण होत आहेत. आपल्या प्रतिसादामुळेच हा उपक्रम सुरु ठेवण्यास आनंद होत आहे. मागच्या महिन्याचे राशी भविष्य माझ्या ब्लॉगवर आजपर्यंत ३३६ जणांनी वाचले हा गेल्या तीन महिन्यातला विक्रम आहे. १५० लोकांना मी राशीभविष्याची लिंक पाठवली असता ३०० च्या वर लोक वाचतात ही पावती सुखावणारी आहे.

आपणास विनंती आहे की जर आपण हे राशीभविष्य नियमीत वाचु इच्छित असाल तर माझ्या ब्लॉगला subscribe करा  म्हणजे ते तुम्हाला नियमीत इमेल वर प्राप्त होत राहील.

१५ डिसेंबरला रवि धनु राशीत जात आहे आणि मागील महिन्यात रविला लागलेले शनिचे ग्रहणही संपत आहे. रवि हा तेज पुंज ग्रहांचा राजा जेव्हा शनि सोबत येतो रविचे कारकत्व बिघडते. राजकीय व्यक्तींवर संकटे येतात हे ही आपण मागच्या महिन्यात पाहिले. सुश्री जयललीता यांचा दुख: शेवट झालेला मागील महिन्यात पाहिला. वाचकांपैकी काहींना रवि वडीलांचा कारक असल्यामुळे वडिलांच्या आजारपणाचा सामना करावा लागला असेल. खास करुन तुळ राशीला मी हे लिहले होते. आज हे मी १० डिसेंबरला लिहीत आहे पण अद्याप १४ डिसेंबर पर्यंत त्याचा त्रास जाणवणार आहे.

डिसेंबर महिन्यात रवि अर्थात सुर्य धनु राशीला म्हणजे गुरुच्या राशीला जात आहे. या महिन्यात रवि व गुरु यांचा केंद्र योग होत आहे. दोन्ही ग्रह नेत्रुत्व गुणांनी भरलेले आहेत.  जनहितार्थ काम करणारे हे ग्रह जेव्हा केंद्र योगात ९ ते १४ जानेवारी काळात, भारताच्या व्यय स्थानातुन तसेच ते भाग्य स्थानातुन केंद्र योगात जात आहेत. परराष्ट्र खात्याच्या संदर्भात काही महत्वाचे घडेल असे दिसत आहे. गुरु हा फ़ायनान्स चा कारक आहे त्यामुळे नोटबंदी पाठोपाठ आणि महत्वपुर्ण निर्णय फ़ायनान्स संदर्भात आले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. ह्या निर्णयाचा संबंध बहुदा परकीय चलन, परकीय गुंतवणुक किंवा तत्सम असेल अशीही शक्यता आहे.

सामान्य माणसांना त्या काळ्या पैशाची पडलेली नाही. त्यांना आता तरी एटीएम च्या रांगा कमी होतील का ? असा प्रश्न पडलेला असेल. ११ डिसेंबर आणि २८ डिसेंबर या तारखांना अनुक्रमे मंगळ आणि शुक्र भारताच्या धनस्थानी जात असल्याने चलन टंचाई ११ डिसेंबर पासुन कमी होऊन ती २८ डिसेंबरला फ़ारच कमी झालेली असेल असे वाटते. आपण कॅशलेस कडेच वाटचाल करावी हे आता क्रमपाप्त असल्याने मी ही PAYTM सुरु केले आहे.

चला १५ डिसेंबर ते १४ जानेवारी काळासाठीच्या  राशी भविष्याकडे जाऊ

मेष रास :
महिनाभर नुसतीच पळापळ पण खिशात काही नाही. त्यात नोटबंदीमुळे चलन नाही अशी स्थिती खास करुन छोटे उद्योजक यांना मागच्या महिनाभर जाणवली असेल. नोकरदार ही शनि व रवि यांच्या प्रतिकुलतेने महिनाभर त्रस्त असतील. पण चांगली बातमी अशी की रवि तुमच्या भाग्यात जात आहे. खेळाडु असाल तर या महिन्यात नक्की यश असेल. कोणत्या तरी टीम मधे तुमचा समावेश झाल्याची बातमी येईल. शोध घेतलात तर तुमची स्वत:ची एक स्वतंत्र क्रिडा शैली तुम्हाला सापडेल जी सहजासहजी कोणीच कॉपी करु शकणार नाही.

२८ डिसेंबरला शुक्र लाभात जाईल. अविवाहीत असाल तर येणारी बातमी चांगली असेल. मुळचा शुभ ग्रह तुम्हाला  काही देण्यासाठी लाभात २०-२५ दिवस मुक्कामी असेल. १-२-३ जानेवारी तारखांना सुध्दा आईकडुन एक चांगला आशीर्वाद मिळेल जो सुख देऊन जाईल. एखादी जुनी लाईफ़ इन्शुअरन्स पॉलीसी मॅच्युअर होत असेल तर ती सुध्दा बोनसच्या रुपात अनपेक्षीत लाभ देईल.

मेष राशी वालो. एक महिनाभर सुखाचा आहे. शनिचा त्रास २६ जानेवरी नंतर जवळ जवळ संपणार आहे. असे एकंदरीत ग्रहमान आहे.

वृषभ रास

मंगळ २१ जानेवारी पर्यंत कुंभ राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात रहाणार आहे. महिनाभर नोकरी- व्यवसायात लढाई करायची आहे असे मागील महिन्यात सांगीतले आहे. हे लक्षात ठेऊन जर संभाव्य लढाईची तयारी चांगली केली असेल तर समाधान लाभेल की आपल्याला शरणांगती पत्करावी लागली नाही. तयारी केली नसेल तर मात्र पराभवातुन काही शिकण्याचे तंत्र आत्मसात केल्यास पुन्हा अशी शरणांगती पत्करावी लागणार नाही. ह्या लढाईत मनालाही जखमा होणार पण आहेत त्यामुळे आत्मविश्वास गमाऊ नका.२८ डिसेंबरला शुक्र दशमात उतरला म्हणजे शत्रु पळुन जाण्याची तयारी करेल तोवर खिंड लढवायची आहे. लढाई फ़क्त शक्तीवर आणि नशीबावर जिंकायची आहे. तडजोडीला फ़ारसा वाव असेल असे दिसत नाही. २३-२४ डिसेंबर तारखांना मनाच्या हिंमतीवर पार करायच्या आहेत.

या सगळ्या पार्श्वभुमीवर गुरुची मंगळावर दृष्टी आहे. दररोज सकाळी श्री गणपतीचे स्मरण करा. युध्दात यश देणारी आणि संकट हरण करणारी देवता श्री गणपतीच आहे.

मिथुन रास

मिथुन राशीचा स्वामी बुध १९ डिसेंबर ते ८ जानेवारी पर्यंत वक्री होणार आहे. प्रोफ़ेसर असाल तर आपल्याला झोपेतुन उठुन जरी लेक्चर द्यायला सांगीतल तरी उत्तम होईल असा खात्री असलेला लेसन बिघडेल. घरात सुध्दा हवे ते शब्द तोंडातुन न आल्याने काही गैरसमज होतील. शेअर मार्केट, इंन्शुरन्स एजंट खात्री असल्या शिवाय सल्ला देऊच नका अंगाशी येईल.

भाग्यात गेलेला मंगळ आपल्याला धाडस करा असे खुणावेल परंतु ८ जानेवारी पर्यंत फ़ायनान्स संदर्भात धाडस करु नका. २८ डिसेंबरला भाग्यात जाणारा शुक्र तुमच्या कलात्मकतेला एक नविन व्यासपीठ मिळवुन देईल. त्या संधीचा लाभ घ्या. तुमची कला प्रदर्शन करण्याची संधी २८ डिसेंबर नंतर सोडु नका आणि पहा आपल्या कलागुणांचे चीज होताना दिसेल. ३०-३१ तारखा या दृष्टीने फ़ारच महत्वाच्या आहेत. हो पण ज्या कलेत पाठांतराचा/ शब्द फ़ेकीचा/ बोलण्याचा भाग महत्वाचा आहे तो भाग दगा देणार नाही यासाठी जास्त कष्ट घ्या.

कर्क रास

 सप्तमामध्ये शुक्र आहे. त्याचे वास्तव्य २८ डिसेंबर पर्यंत आहे. इंग्रजी वर्षाअखेर अनेकांना सुट्टी असते. दुरच्या प्रेक्षणीय स्थळी सुट्टीवर सहकुटुंब जाण्याचे योग आहेत या दृष्टीने ही वर्षाखेर लक्षात राहील अशी असेल. अष्टमात मंगळ आहे हा तब्येतीचे काही छोटे त्रास दर्शवितो. पायाला खरचटणे, ठेच लागणे अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही आहे. हे फ़ार मोठे होणार नाही यास्तव प्रवासाला निघालात तरी रिस्क नको हा मंत्र लक्षात ठेवा. शुक्र २८ ला कुंभेत गेला तरी ३० व ३१ तारखांना चंद्र सप्तमात असल्यामुळे आनंदाला विरजण लागणार नाही.

१-२-३ तारखांना चंद्र-मंगळाची युती तीही अष्ट्मात होते आहे. हा लक्ष्मी योग आहे. शेअर मार्केट २ जानेवारीला उघडताच प्रॉफ़ीट बुक करायचा विचार असेल तर तांत्रीक बाजु पाहून निर्णय घ्या. याच काळात बुध वक्री असल्याने शेअर मार्केट मधे मोठे बदल दिसतील त्यामुळे निर्णय विचारपुर्वक घ्या. शेअर मार्केटमधुन असुदे किंवा लॉटरीचा १ जानेवारीचा बंपर ड्रॉ असुदे खिसा गरम होणार आहे.

सिंह रास 

तुमच्या राशीला महत्वाचा ग्रह रवि जो शनिबरोबर गेले महिनाभर असल्याने अनेकदा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे जाणवले असेल. ही स्थिती आता नाही. रवि १५ डिसेंबरला तुमच्या पंचमस्थानात येत आहे. हे स्थान नवनिर्मीतीचे आहे. आपली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जी काय खेळी करायची ती करुन टाका. ही खेळी नाविन्यपुर्ण असेल ज्यामुळे जे तुम्हाला वाकुल्या दाखवत होते त्या सर्वांना एक धक्का बसेल. नाविन्यपुर्ण पध्दतीने हा " जोरो का झटका धीरे से लगे" असा तुमचा प्रयत्न असेल.

राशीचक्रात सर्वात प्रमुख ग्रह रवि असतो तो जेव्हा शनिच्या युतीत जातो तेव्हा तुमची प्रतिष्ठा पणाला लागते शिवाय तुम्ही नाऊमेद होऊ शकता. पण आता हा महिना तुमचा आहे. रवि पुर्वेला उगवतो म्हणुन त्याला पुर्व म्हणतात. आता महिनाभर तुम्ही म्हणाल ती पुर्व याचा अनुभव नक्की येईल. सप्टेंबर २०१७ पर्यंत राहू तुमच्या राशीला आहे फ़ार धाडस नको. साधूने नागाला जी गोष्ट सांगीतली ती आठवा. साधूने सांगीतल्यामुळे नागाने फ़ुत्कारणे बंद केले परिणामी मुले जाता येता दगड मारु लागली. म्हणुन दंश करुन नका पण फ़ुत्कार सोडाच.

कन्या रास 

कन्या राशीचे लोक फ़ारच चिकीत्सक म्हणुन वधु- वर संशोधनात सुध्दा फ़ार वेळ घालवतात. हा मामला फ़ार चिकित्सेचा नाही तर आपल ह्र्दय काय सांगते हे तपासुन निर्णय घेण्याचा असतो. आजुबाजुला अश्या संधी महिनाभर असतील. त्याची जाणिव ह्र्दयकरुन देईल तेव्हा त्याची शास्त्रीय चिकित्सा करु नका. हवा तो जोडीदार मिळावा असे वाटत असेल तर २८ डिसेंबर पर्यंत फ़क्त ह्र्दयाचेच ऐका. तुमच्या राशीचे शुभमंगल होण्यासाठी हे वर्षभर गुरुमहाराज तुमच्या लग्नी येऊन बसलेत. पण तुम्ही निर्णय  घेणार असाल तर.

तुम्ही खुपच हुशार आहात, बुध्दीमान आहात आणि सर्व निर्णय बुध्दीला घासुन घेता हा तुमचा स्वभाव आड येतो म्हणुन तुमचे शुभमंगल लांबते आहे. तुम्ही ह्र्दयाचे ऐकुन निर्णय घेण्याची संधी वर्षातुन एकदा येते. गुरु अनुकुल असेल तर त्यावर लग्नाचे शिक्कामोर्तब होते.  तुम्ही निर्णय घेतलात तर जानेवारी महिन्याचा शेवटी लग्नाची तारीख पक्की होण्याचेही योग आहेत.

तूळ रास

साडेसातीचा भर आता ओसरला आहे. खुप मानसीक छळ होण्याचा काळ संपला असे या महिन्यात नक्की जाणवेल. कारण तुमच्या चतुर्थात चक्क शुक्र नावाचा शुभ ग्रह येऊन बसला आहे. १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत आनंद लुटण्याचा काळ आहे असे नक्की जाणवेल. या काळात चिंतारहीत जीवन जगाल आणि सुख साधानांचा आस्वाद घ्याल. २६ अक्टॊबरला साडेसाती संपते तोवर शनि उपासना सुरुच ठेवा.

२८ डिसेंबरला शुक्र तुमच्या पंचमस्थानात येईल. तुम्ही कलाकार असाल तर नवनिर्मीतीचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. २८ डिसेंबर ते २८ जानेवारी हा महिना तुम्ही काही तरी नविन निर्माण करणार आहात हे नक्की. त्याच बरोबर तुम्हाला हा शुक्र त्याचे फ़ळ ही देऊन मग पुढे जाईल. तुमची रचना, तुमचे शब्द, तुमची सुरावट, तुमच संगीत, तुमचे चित्र, तुमचे व्यक्तीमत्व कोणाच्या तरी मनात आनंद देऊन जाईल.
इतके झाल्यावर प्रपोजल न येईल तरच नवल. तुम्हीही त्याकडे दुर्लक्ष करु नका. शब्द टाकताना, बोलताना फ़क्त विचार करा कारण बुध वक्री आहे. तुम्ही नको त्या शब्दात अडकुन पडाल. गुळाच्या गणपतीची गोष्ट जी "आहे मनोहर तरी" मधे सुनिता देशपांडे यांनी लिहलेली आहे. ज्यात फ़ार विचार न करता  पुल प्रपोजलवर सह्या करुन मोकळे होतात. ही गोष्ट वाचुन मगच सह्या करा किंवा शब्द द्या.

वृश्चिक रास 

सातही राशी जरा मनमुराद आनंद लुटावा अश्या मनस्थितीत असताना तुम्हाला ग्रहमान अजुन अनुकूल नाही असेच म्हणावे लागेल. साडेसातीची हीच ख्याती आहे. एक महिनाभर दम धरा. मधली अडचकी संपुन जेव्हा शनि, मंगळाच्या म्हणजे शत्रु राशीतुन सहा महिने बाहेर पडेल तेव्हाच सुटकेचा निश्वास सहा महिने टाका. २६ जानेवारीला शनि धनु राशीला जात आहे. त्याच परिणाम आत्ता दिसेल पण शांत रहा.

२०-२१-२२ डिसेंबर या तारखांना भाग्येश चंद्र तुमच्या लाभ स्थानातुन जात आहे. वर्षभर गुरु तिथे आहे त्यामुळे दरमहिन्याला ही एक स्थिती तुम्हाला १२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आहे. जेव्हा जेव्हा चंद्र कन्येत जाईल तेव्हा काही चांगले घडेलच.

धनु रास

कुटुंबस्थानी असलेले शुक्राचे भ्रमण २८ डिसेंबर पर्यंत आनंद निर्माण करेल. हे स्थान खाणे-पिणे दर्शविते. भेळ-पाणी पुरी सारखे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थांची रेलचेल या काळात असेल. शुक्र तुमचा लाभेश असल्यामुळे एखादी नवी गुंतवणुक तुम्ही कराल. थोडक्यात व्यस्त जीवनात एखादी झुळुक यावी तसे घडेल.

मंगळाचे भ्रमण तुमच्या तृतीय स्थानातुन असणार आहे. तिसरे स्थान हे शौर्य स्थान आहे. मंगळ हा शौर्य, उर्जा आणि धाडस याचा कारक असल्याने तुमचे बाहु स्फ़ुरण पावतील. जरा शंख वाजला की आपल्याला शौर्य दाखवण्याची उर्मी दाटुन येईल. शौर्याला विवेकाने आवरा.  कारण जानेवारी च्या १४-१५ तारखांना शेवटी मंगळ आणि शनि यांचा केंद्र योग आहे. बुध ही वक्री आहे  धाडस अंगाशी येईल. गरज आणि खात्री असेल तरच धाडस करा. या धाडसाला प्लॅनिंगची जोड द्या. प्लॅन बी -सी तयार ठेवा. मग धाडस अंगाशी येणार नाही.

मकर रास 

मकर राशीला जानेवारी महिन्यात साडेसाती सुरु होते. सहसा शनि मकर आणि कुंभ राशीला पिडत नाही याचे कारण पत्रिकेत शनि फ़ारच बिघडला सेल तरच मकर आणि कुंभेचे लोक अनितीने वागतात. त्यांना हवे ते कष्टाने मिळवण्याचा स्वभाव असल्याने ज्याला पाप म्हणतात असे फ़ारसे घडत नाही. मग शनि शिक्षा देणार कशाची ? साडेसाती कष्ट देते पण मकर आणि कुंभ राशीचे लोक त्याला भित नाहीत.
काही तयारी मात्र आवश्यक असते. जुनी दुखणी, चुकीच्या गुंतवणुकी आणि बिघडलेली नाती मात्र सताऊ नयेत यासाठी या महिन्यात विचार करा.

तुमच्या राशीला शुक्र राजयोग कारक आहे. तो लग्नी येताना व्ययेश आणि तृतीयेश गुरु सोबत नवपंचम योग करतो आहे. शुक्र आणि गुरु भक्तीचे कारक ग्रह आहेत. शुक्र पंचमेश आहे त्यामुळे कवि असाल तर एखादी भक्तीरचना सहज सुचेल. २०-२१-२२  डिसेंबर तारखांना अनुपम योग आपल्या भाग्यात येत आहे. काय घडले ते सांगायला विसरु नका. मलाही उत्सुकता आहे.

कुंभ रास 

तुमच्या राशीमधुन मंगळाच भ्रमण सुरु आहे. शनिच्या राशीचा शांत पणा बिघडवणारे योग आहेत.  मुळच्या चंद्रावरुन मंगळ जाताना एखादा दिवस मनस्तापाचा जाईल. शनि दशमात आहे व तो या मंगळाशी केंद्र योग करतो आहे त्यामुळे जरा जास्त त्रास संभवतो. तेव्हा तुमच्या पध्दतीने आधीच संभाव्य कारणे शोधुन त्यावर विचार करुन ठेवा

२८ डिसेंबर पर्यंत दुरचे प्रवासाचे योग येतील. हा प्रवास शुभ असेल कारण तो शुक्र घडवणार आहे. त्यामुळे प्रवास वेळेवर व सुखदायक असतील. लाल डब्याच्या एस टीचे नाईलाजास्तव तिकीट काढले तरी ऐन वेळी ती उपलब्ध नाही म्हणुन आरामदायक २ बाय २ येईल आणि प्रवास सुखाचा होईल असे योग हा शुक्र देतो.

मीन रास 

२८ डिसेंबर पर्यंत शुक्र तुमच्या लाभस्थानी आहे. तो अष्टमेश आहे. शेअर मार्केटमधला प्रॉफ़िट बुक करायची चांगली संधी आहे. बुध वक्री होत असल्यामुळे मात्र हा निर्णय विचारपुर्वकच घ्या. लेखक असाल तर पुर्वी लिहलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती तुम्हाला लाभ देऊन जाईल किंवा जे प्रसिध्द झालेले नाही ते प्रसिध्द होताना येणारा लाभ आता मिळेल.

जे  येणार आहे ते जाणारही आहे कारण मंगळ व्यय स्थानात बसला आहे. परदेश वारी किंवा लांबचा प्रवास सुरु असताना तुम्ही हात आखडणार नाही हे निश्चीत. हे सर्व चालु असताना येणारे पैसे आणि खर्च याचा ताळमेळ बसणार नाही. इलाज नाही. तुम्हाला याचा फ़रक पडत नाही. मीन राशीचे लोक असले फ़ालतु विचार मुळी करतच नाहीत.

शुभंभवतु

Wednesday, November 9, 2016

१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या महिन्याचे राशी भविष्य आणि कार्तिकेयाचे दर्शन

सर्व ज्योतिषप्रेमी वाचकांचे दिवाळी अंकाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या महिन्याचे राशी भविष्य सुरु करण्यापुर्वी एक महत्वाची माहिती आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. या महिन्यात कार्तिक पोर्णिमा अर्थात त्रिपुरारी पोर्णिमा दिनांक १४ नोव्हेंबर रोजी आहे. त्याच दिवशी कृतिका नक्षत्र सुध्दा आहे. महाराष्ट्रात कार्तिकेय फ़ारसे लोकांना माहित नाहीत. कार्तिकेय हे शिव-पार्वतीचे जेष्ठ पुत्र व गणपतीचे मोठे भाऊ. दक्षिणेत यांना विशेष पुजले जाते. या दिवशी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्याने वर्षभर आर्थिक चिंता रहात नाही. कृतिका नक्षत्र १४ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजुन २७ मिनीटानी सुरु होते. यानंतर कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे. विधीवत पुजा करावी. रात्री १९ वाजुन २२ मिनीटांनी म्हणजे रात्रीचे ७ वाजुन २२ मिनीटांनी पोर्णिमा संपते तो पर्यंतच दर्शन घ्यावे.

जे वाचक पुण्याला रहातात त्यांना पर्वतीवर असलेल्या  मंदीरमधे दर्शन घेता येईल.  तसेच चिंचवड येथे पदमजी पेपर मिल्स - थेरगाव येथे सुध्दा कार्तिकेय मंदीर आहे. असेच मंदीर सातारा तसेच सोलापुर येथेही आहे. ज्या ठिकाणी दाक्षिणात्य पध्द्तीची मंदीरे असतात तिथेच प्रदक्षीणा मार्गावर कार्तिकेयाची मंदीरे स्थापन केलेली असतात. हे ही सोयीचे नसल्यास आपल्या घरी कार्तिकेयाचा फ़ोटॊ ठेऊन श्रध्देने पुजन करता येते.

आता मासिक भविष्याकडे जाऊ. या महिन्यात रवि अर्थात सुर्य वृश्चिक राशीत महिनाभर आहे. बुधाचा २८ नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश, शुक्राचा मकर राशीत २ डिसेंबरला प्रवेश आणि मंगळाचा कुंभ राशीत ११ डिसेंबरला प्रवेश हे महत्वाचे बदल आहेत. वृश्चिक राशीतला रविचा महिना काहीवेळा काहीजणांना आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक जातो. खास करुन मुळव्याधीचे रोगी जास्त त्रस्त होतात. यासाठी फ़क्त दुपारी ताजे ताक सुंठ घालुन प्यावे. हिवाळा असल्याने शक्यतो रात्रीचे ताक पिऊ नये,

मेष रास : ११ डिसेंबरला मंगळ कुंभ राशीत जाईपर्यंत नोकरीच्या/ व्यवसायाच्या  ठिकाणी लढाई चालु असणार. २८-२९ नोव्हेंबर हे मनस्तापाचे दिवस असतील. त्याच बरोबर ७ डिसेंबर ते १४ डिसेंबर हा काळ फ़ारसा चांगला असणार नाही. आरोप- प्रत्यारोप होतील. आपले इंटरेस्ट संभाळुन रहा. २५-२६ नोव्हेंबर आणि ५-६ डिसेंबरला मनासारख्या काही गोष्टी घडतील. हा महिना पेशन्स दाखवा. २६ जानेवारी पर्यंत  स्थिर रहा. दिवस सुखाचे येतील.

वृषभ रास : २८ नोव्हेम्बर नंतर बुध आपल्या अष्टमात जातो आहे. आपण व्यापारी असाल किंवा शेअर मार्केटमध्ये असाल तर आपले अंदाज चुकण्याचे योग आहेत. जोखीम घेऊ नका असे सांगणारा हा महिना आहे. या महिन्यात कामाचे चांगले प्लॅनिंग करा म्हणजे पुढील महिन्यात जेव्हा मंगळ दशमात जाऊन लढाईचे योग आहेत तेव्हा प्लॅनिंगला वेळ मिळणार नाही. ३०-३१ तारखा फ़ारश्या चांगल्या नाहीत तसेच सप्तमात होणारी ७ ते १४ डिसेंबरला होणारी रवि- शनि युती पती-पत्नी मधे  वैचारीक मतभेद निर्माण करेल. हे फ़ार मोठे वादळ असेल असे नाही.  २८-२९  नोव्हेंबर  हे दिवस चांगले जातील.

मिथुन रास : दिवाळीत सप्तमात आलेला शुक्र आपल्या सप्तमस्थानात २ डिसेंबर पर्यंत विराजमान आहे. पती-पत्नी यांना सुखसंवाद करायला उत्तम काळ आहे. ३० नोव्हेंबर  आणि १- २ डिसेंबर तारखा स्मरणात रहातील. अष्टमातला मंगळ तब्येतीचे दुखणे निर्माण करत नाहीना या कडे पहावे. ११ डिसेंबर पर्यंत कोणतेही दुखणे अंगावर काढु नका. भावंडासंबंधी काही समस्या उभी रहाण्याची शक्यता ७ ते १४ डिसेंबरच्या दरम्यान आहे. भावंडाशी या काळात वितुष्ट घेऊ नका. अडचणीत असतील तर मदत करा.

कर्क  रास : सप्तमस्थानात आलेला मंगळ पती-पत्नीमधे महिनाभर विनाकारण धुस-फ़ुस घडवेल. याकडे कसे पहायचे ते तुम्ही ठरवा, ही धुस-फ़ुस होऊ नये असे वाटत असेल तर ज्या गोष्टींमुळे हे घडु शकते ते टाळा. एखाद्या कौटुंबीक संमेलनाचा योग या महिन्यात येईल. अश्या वेळी हे संमेलन पत्नीच्या माहेरी असेल तर वेळात वेळ काढुन तिकडे जा. हे वादाचे कारण नको. आपण रियल इस्टेट क्षेत्रात नोकरी करत असाल आणि खास करुन मार्केटींग करत असाल तर यशाचा काळ आहे.  काही प्रॉपर्टी खरेदी- विक्री च्या प्रयत्नात असाल तर ते घडुन येईल.

सिंह रास : नोकरी - व्यवसाय आणि घरात महिनाभर तणाव राहील. घरात तुमचे म्हणणे कुणाला पटणार नाही. यावर एकच पर्याय आहे. तुम्हाला जे काय सांगायचे आहे ते प्रथम ज्याला ते पटकन समजते त्याला सांगा. आणि त्यालाच ते इतरांना सांगायला सांगा. नोकरी- व्यवसायात शत्रुंना नामोहरम करण्याची सुवर्ण संघी चालुन येईल. केवळ आपले सामर्थ्य दाखवुन शत्रुला नामोहरम करण्याची संधी घ्या. शत्रु पुढे अनेक दिवस डोके वर काढणार नाही.

कन्या रास: मुलांच्या प्रगतीची चिंता करावी लागेल. खास करुन या महिन्यात एखादी परिक्षा असेल तर मुले नीट अभ्यास करत आहेत ना याची  चौकशी करा. लहान मुले  असतील तर परिक्षेच्या काळात त्यांना मैदानी खेळ खेळायची लहर येईल. काही वेळ खेळायला हरकत नाही पण त्या खेळात कसली रिस्क नसते ना या कडे लक्ष द्या. मुले परिक्षेचा अभ्यास सोडुन दुरदर्शन वर फ़ार वेळ घालवत आहेत असे वाटले तर नक्कीच योग्य ते करा.

तूळ रास : आपण ७ ते १४ डिसेंबर काळात वडीलधारे व्यक्तींच्या तब्येतीकडे  दुर्लक्ष करु नका. त्यांना वेळेवर औषधे -उपचार करा. लेखक असाल तर हा महिनाभर उत्तम लेखन होईल. फ़ेसबुक - व्हॉट्स अपवरचे तुम्ही लिहलेले पोस्टला खुप प्रसिध्दी मिळेल. १८-१९ नोव्हेंबरला ही प्रसिध्दी खुप मिळेल.  घरचे वातावरण थोडेसे गरम असेल. कोणत्या कारणामुळे घरातली शांतता बिघडत आहे ते लक्षात घेऊन त्याचे निराकरण करा. काहींना प्रॉपर्टीचे घेण्याचे  योग २ डिसेंबर पर्यंत आहेत.

वृश्चिक रास :  महिनाभर कामाचा ताण जाणवेल. ११ डिसेंबर पर्यंत कामाच्या निमीत्तने लहान प्रवासही अपरिहार्यपणे करावे लागतील. तुमचे विचार अनेकांपर्यंत पोचवताना तुम्ही तहान भुक विसरुन काम कराल. जे पैसे डुबले असे वाटत होते त्याच्या वसुलीचे प्रयत्न २ डिसेंबर पर्यंत नेटाने करा. यश मिळण्याची शक्यता आहे. ७ ते १४ तारखांना अकस्मात संघर्षाला सामोरे जावे लागेल. हे का घडत आहे याची कारण मिमांसा करा. नुकसान नाही पण काही काळ  नाते संबंध बिघडण्याची शक्यता यामुळे आहे.

धनु रास : धनु राशीचे लोक काही काळे काम करतील अशी शक्यता नसते. पण डिसेंबर महिन्यात नाईलाजास्तव केलेले बेकायदेशीर कृत्य समोर येईल. काय घडु शकते याची कल्पना येताच परिस्थीती आटोक्यात राहील हे पहा. या शिवाय तुमच्या मनासारखे व्हावे असा काळ २ डिसेंबर पर्यंतच आहे. जे काही आजवर तुमच्या मनात आहे ते घडवण्यासाठी प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. महिनाभर नविन लोक भेटतील. तुमचे मधुर नाते निर्माण होईल असा काळ आहे.

मकर रास : वरिष्ठांची नाराजी, किरकोळ कामातही बिघाड असे योग २ डिसेंबर पर्यंत आहेत. हाताखालचे लोक अचानक सुट्टीवर जाणे यासारखे प्रश्न वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांना हाताळावे लागतील. यातुन बाहेर पडण्यासाठी तुम्हाला अधिक काम करावे लागेल. असे असुनही काही कामे मनासारखी होतील पण ती सहज होणार नाहीत. २८ नोव्हेंबर नंतर प्रवासाचे योग संभवतात. हे नोकरीच्या/ व्यवसायाच्या निमीत्ताने असणार आहेत त्यामुळे काम जास्तच पडेल.

कुंभ रास : नोकरी व्यवसायात आपल्या अधिकाराला आव्हान मिळेल. ते आव्हान निपटुन काढायला केवळ बुध्दी चातुर्य पुरे पडणार नाही तर त्याही पुढे जाऊन पैसा  खर्च होईल. हा महिनाभर अनेक लाभ होण्याचे योग आहेत. यामुळे अचानक खर्च आले तरी त्याची तजवीज झालेली असेल. दशमात असलेला रवि तुम्हाला यश देईल पण महिनाभर तुम्ही व्यस्त असाल. नोकरी व्यवसायात सरकारी मदतीने काही नविन प्रस्ताव येतील. हे फ़ायद्याचे असतील. याकडे आपण कसे पहाता यावर त्याचा फ़ायदा अवलंबुन आहे.

मीन रास:  या ना त्या मार्गाने पैसे हाती पडल्याने तुम्ही खुश व्हाल. उत्तम सुखाचा लाभ महिनाभर आपल्या राशीला आहे. आपले व्यापारी अंदाज बरोबर येतील. २५-२६ तारखांना होणारा किरकोळ मनस्ताप सोडला तर हा महिना स्मरणात राहील असे एकंदरीत ग्रहमान आहे. आलेले पैसे चांगल्या पध्दतीने गुंतवा हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. लग्न व्हायचे असेल तर स्थळे येणार आहेत. त्याबाबत अजुनही निर्णय घेतला नसेल तर घ्या. स्थळे नाकारुन वेळ निघुन गेली तर लग्न लांबेल.