Wednesday, February 8, 2017

१३ फ़ेब्रुवारी ते १४ मार्च २०१७ या रवि महिन्याचे राशीभविष्य

नमस्कार ज्योतिषप्रेमी लोकहॊ. आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मी सलग सहा महिने मासीक राशीभविष्य लिहीतो आहे. या महिन्यात तर मला काही वाचकांनी आठवण केली "पाठवताय ना लिंक?" . आपले प्रोत्साहन असल्यामुळेच हा उपक्रम सुरु राहील. विनंती इतकीच आहे की ज्यांना माझे राशीभविष्य आवडते आहे त्यांनी तुम्ही माझा ब्लॉग subscribe करा  म्हणजे ते तुम्हाला नियमीत इमेल वर प्राप्त होत राहील. पोष्ट्च्या खाली त्याची लिंक आहे. त्यावर आपला इमेल आय डी लिहुन submit हे बटन दाबलेत की पुढील सुचना येतील. त्यानुसार तुम्ही ही कृती पुर्ण करु शकाल.

या महिन्यात  बुध तीन राशीतुन भ्रमण करणार आहे. कुंभ ही बुधाची आवडती रास आहे. या राशीतुन बुधाचे भ्रमण होताना बुध्दीशी जोडलेले व्यवसाय असणारे व्यक्ती सुखावतील. त्यांना अनेक व्यावसायीक साक्षात्कार होण्याचे दिवस आहेत. २२ फ़ेब्रुवारी ते १० मार्च हा बुधाचा कुंभ राशीतुन भ्रमणाचा काळ परिक्षार्थी विद्यार्थ्यांना चांगला जाईल. अभ्यास केला असेल तर नक्की आठवेल.

मंगळाचा हर्षलशी होणारा युतीयोग मीन राशीत रेवती नक्षत्रात रविवारी आहे. रविवार २६ फ़ेब्रुवारीला अमावस्या आहे त्याच बरोबर चंद्र व नेपच्युन यांची युती गुढता दाखवते. या दिवशी शक्य असल्यास जलप्रवास, नौकानयन, जलक्रिडा टाळाव्यात. भारताला या योगाचे काय परिणाम पहायला मिळतात हे पहावे लागेल. नौसेनेला एखाद्या समुद्री चाच्यांशी संघर्ष करावा लागतो की मागे पाकिस्थानी अतिरेक्यांचे स्फ़ोटकाने भरलेले जहाज नष्ट करावे लागले अशी काही कारवाई करावी लागते हे काळच ठरवेल.

राशीनुसार १३ फ़ेब्रुवारी ते १४ मार्च या काळाचे भविष्य पाहु

मेष रास : २६ फ़ेब्रुवारीला तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा हर्षल या स्फ़ोटक ग्रहाच्या योगात येत आहे. या दिवशी अमावस्या आहे. हा किंवा त्याच्या आधीचे नंतरचे २-४ दिवस कोणाशी संघर्ष होऊ देऊ नका. संघर्ष करणे हा तुमचा स्वभाव आहे पण नियंत्रण ठेवा. पाण्याच्या राशीत हा योग असल्याने जलक्रिडा सांभाळुनच करा. तुमच्यासाठी १ मार्चपासुन तुमच्या स्वभावाला मुरड घालावी लागणार नाही कारण १ मार्चला मंगळ तुमच्या राशीत येतोय तुमचे वागणे आणखी आक्रमक होण्याचा हा काळ आहे. याची लोकांना कल्पना असली तरी तुमच्या रागाला विनाकारण कोणी बळी पडणार नाही हे पहा. कुंभेचा बुध अनेक प्रकारचे लाभ देऊन जाईल. १५ फ़ेब्रुवारीला होणारा चंद्र गुरु योग मातुलघराण्यात ( मावशी-मामा ) यांच्या संदर्भात उत्तम घटनेचा साक्षीदार असेल.

वृषभ रास : तुमचा राशी स्वामी संपुर्ण महिनाभर लाभ स्थानात आहे. जे मागाल ते निश्चीतच ४ मार्चपर्यंत मिळणार आहे. यानंतर राशीस्वामी शुक्र वक्री होतो. हा फ़ारसा चांगला नसतो त्यामुळे जे या महिन्यात आपल्याला घडवायचे आहे ते ४ मार्च पर्यंत प्रयत्नपुर्वक मिळवण्याचा प्रयत्न करा. खात्रीने हा काळ लाभदायक आहे. ४ मार्चनंतर घरचा/व्यवसायातला  स्त्री नोकरवर्ग अचानक सुट्टीवर जाऊ शकतो किंवा त्यांच्या नाराजीने काही अडचणी येऊ शकतात. आधीच अंदाज घ्या. ८ मार्चला सर्व स्त्री नोकर वर्गाचा सन्मान करण्याची प्रथा व्यवसायात येत आहे ती संधी घेऊन काही नाराजी असल्यास मनापासुन संपवण्याचा प्रयत्न करा. शेवटी तुमच्या यशात सर्वच भागीदार असतात हे विसरुन चालणार नाही.

मिथुन रास : तुमचा राशी स्वामी बुध २२ फ़ेब्रुवारीला कुंभेत जातो. चंद्राकडुन हे भाग्य स्थान असल्यामुळे २२ फ़ेब्रुवारी ते १० मार्च हा काळ तुमच्या साठी चांगला असेल. तुमच्या व्यक्तीमत्वाची, बुध्दीचातुर्याची चुणुक इतरांना समजेल आणि यामुळे तुमची पत- प्रतिष्ठा वाढीला लागेल. हर्षल मंगळाचा २६ फ़ेब्रुवारीचा योग तुमच्या दशमस्थानी असल्याने विनाकारण नोकरी व्यवसायात संघर्ष निर्माण होईल. आपण आपल्या बुध्दी चातुर्यावर व बोलण्याच्या कलेने तो संघर्ष टाळु शकाल परंतु नेमके काय पेटणार आहे हे आधीच शोधले तर विझवण्यासाठीचे प्रयत्न तसे करता येतील. १५ फ़ेब्रुवारीला एखादा घरगुती समारंभाने उत्साह निर्मांण होईल. अविवाहीत असाल तर याच समारंभात काही पावले या दिशेने वाटचाल कराल.

कर्क रास : तुमचा राशी स्वामी एका महिन्यात १२ राशी फ़िरतो. कधी तुमची मानसीक अवस्था उत्तम बनवतो तर काही तास तुम्हाला अस्वस्थ करुन जातो. हे सर्व तुमच्या जन्मापासुन चालले असल्यामुळे नविन काही नाही. जेव्हा महत्वाचे ग्रह राशी बदलात तेव्हा असे योग तुम्हाला एखादा दिवस त्रासदायक करुन जातात. शनि आता अग्नीराशीत आल्यामुळे जेव्हा जेव्हा धनु राशीत चंद्र असेल तेव्हा दुख:, मनस्ताप संभवतो. या महिन्यात २१/२२ फ़ेब्रुवारीला असे ग्रहमान आहे. २६ तारखेची अमावस्याही तुम्हाला पीडा देऊन जाईल. आपण शंकराचे भक्त असाल तर पंचाक्षरी मंत्र तुम्हाला या दाहकते पासुन दुर ठेवेल. शेवटी विषप्राशन करण्याचे सामर्थ्य ते एकाच देवाकडे आहे ज्याने चंद्र भाळी धरला आहे. स्पोर्ट्स्मन/वुमन असाल तर या महिन्यात तुम्ही मैदान मारणार आहात. तुमच्या वेगवान हालचालींनी प्रतिस्पर्ध्याला नमवाल. फ़क्त प्रतिस्पर्धी रागाने नियमबाह्य वर्तन करतो का याकडे लक्ष द्या.

सिंह रास : सातव्या म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी जाणारा बुध तुम्हाला व्यवसायात चांगली गती देईल. एखाद्या नविन करारचा लाभ होऊन व्यवसाय वृध्दीला सुरवात होण्याचे योग या महिन्यात दिसतात. सिंह राशीचे लोक सहसा एजंट नसतात. पण चुकून असाल तर या महिन्यात बुध तुम्हाला लाभदायक असेल. ४ मार्च पुर्वीच व्यवहार पुर्ण करा.  आणि पैसे गाठीला बांधा. मंगळ- हर्षल योग एखादे जुने दुखणे उकरुन काढील त्यामुळे जुन्या व्याधी अटोक्यात असतील असेच पथ्य पाळा. तुम्हाला पाण्याचा प्रवास वर्ज आहे. खास करिन २६ फ़ेब्रुवारीच्या आसपास हे टाळाच. मुलांच्या शैक्षणीक प्रगतीकडे लक्ष द्या. एकंदरीत मिश्र फ़ळे असलेला हा रवि महिना आहे.

कन्या रास : सप्तम स्थानातुन शुक्राचे भ्रमण सुरु आहे हा शुक्र मीन राशीचा म्हणजे उच्च राशीत आहे. सप्तम स्थानावर गुरुची शुभ दृष्टी गेले सहा महिने आहेच. अश्या वेळी उपवर असाल आणि लग्न ठरले नसेल तर नक्की ठरेल. या साठी ४ मार्चच्या आधी हे सर्व घडल्यास नक्कीच फ़लदायी असेल. २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च याच कारणाने उपयोगी ठरतील. तुमच्या राशीचे लोक निर्णय घ्यायला फ़ार वेळ घेतात. अशी उत्तम ग्रहस्थिती पुन्हा वर्षभर येणार नाही आली तरी गुरुची दृष्टी यायला वेळ लागेल तेव्हा निर्णय घ्या.

सहाव्या स्थानातला रवि आणि बुध तुम्हाला नोकरी /व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल असेल. एखादे सरकारी फ़र्मान तुमच्या फ़ायद्याचे आणि शत्रुगटाला हादरा देणारे असेल. हे फ़र्मान हातात घेऊन केलेले स्टेटमेंट शत्रु गोटात अस्वस्थता आणेल.

तूला राशी:  तुमचे हित शत्रु नामोहरम होतील. नोकरी/ व्यवसायीक अडचणी दुर होतील. कर्जफ़ेडीसाठी पैसे येतील आणि तुमची असलीच तर चिंता दुर होईल. नाही म्हणायला पारिवारीक कलहाला तुम्हाला तोंड द्यायचे आहे त्या साठी न चिडता कुणाला काय सांगीतले म्हणजे पटते याचा आडाखा तयार ठेवा. पारिवारीक संघर्षात आपल कितीही बरोबर असेल तरी वेळ आल्याशिवाय सांगुन चालत नाही. हुकुमशाही सुध्दा चालत नाही. शारिरीक उष्णेतेच्या विकारांना हाताबाहेर जाऊ देऊ नका. वेळीच औषधे घ्या.

कुंभेतला बुध तुमच्या मुळातल्या तल्लख बुध्दीला अनुरुप असे नवे शिकण्याची संधी घेऊन येईल. दरवेळेला शिक्षण काही शाळा कॉलेजात होते असे नाही. हे जग तुम्हाला क्षणा क्षणाला जगायला शिकवते हे विसरु नका. जगात शिकण्यालायक ७२ कला आहे असे म्हणतात. जगणे ही ७२ वी कला आहे हे विसरुन उपयोग नाही.

वृश्चिक राशी : प्रेमात पडायला काही मुहुर्त असतो का ? मुहुर्त असतो असे नाही पण ग्रहमान असे आहेत की तुम्ही तरुण असुन एकटे असाल तर सहजपणे प्रेमात पडण्याचा हा कालावधी आहे. हे प्रेम व्यक्त करायला बुध अनुकूल आहेच. तुम्हाला तो योग्य शब्द सुध्दा सुचवेल. आता फ़क्त बोलायला धाडस हव. ते तुमच्याजवळ आहेच.  व्यक्त करायला मुहुर्त शोधुन हवाय ? अहो, संधी शोधा. मुहुर्त नंतर काढु.

लाभस्थानात होणारा गुरु- चंद्राचा योग १५-१६ तारखेला तुम्हाला लक्षात राहील असे फ़ळ नक्कीच देणार आहे.  शिक्षण क्षेत्रात असाल तर एक पुरस्कार नक्की मिळेल आणि विद्यार्थी असाल तर शैक्षणीक यश तुम्हाला मिळणार आहे. आत्ता अभ्यास पुर्ण झाला की परिक्षेचे दडपण संपेल.

धनु राशी : चतुर्थात मीनेचा शुक्र आहे. तो तुम्हाला सुख देणार आहे. प्रवास केलात तर उत्तम वहान मिळेल. जेवायला सुग्रास भोजनाचे पदार्थ असतील पण घरात ही सुखाची वेळ संपली की कटकटी सुध्दा असतील असा संमिश्र काळ आहे. तुमच्या आईला काही सांगायलाच जाऊ नका. पटणारच नाही. त्यापेक्षा तेच शब्द दुसरा कोणी बोलेल तर बर पडेल असे ग्रहमान आहे.

महत्वाचा संवाद घडेल. अपेक्षीत पत्र व्यवहार होईल. त्याच बरोबर लेखक असाल तर मनातल्या संकल्पना लगेच कागदावर उतरवण्याचा काळ आहे. काय म्हणता ? कागद वापरत नाही ? मग ब्लॉग वर लिहा किंवा फ़ेसबुक आहेच. नेमके शब्द तुमचे विचार पोचवण्यासाठी सापडतील.

मकर राशी : धाडस करण्याचा तुमचा स्वभाव नाही पण तुमच्या हातुन ते घडेल. हे करताना विवेक जागृत ठेवा हे सांगायला नकोच. शनिप्रधान व्यक्तीचे कोणतेही काम आखीव आणि रेखीव असतेच. आराखडा तयार करा मग धाडस विनाकारण ठरणार नाही.

नोकरी/व्यवसाय निमीत्ताने जवळचा प्रवास घडेल. हा प्रवास लाभदायी असेल. १६ तारखेला व्यावसायीक असाल तर एखादी भाग्यकारक घडना घडेल जी व्यवसायाच्या वृध्दीला पुरक ठरेल. परदेशास्थ व्यक्ती/ संस्था यांच्याबरोबर  काही व्यवसायाला पुरक ठरणारे करार घडतील.

नुकताच शनि धनू राशीत गेल्याने लगेच काही साडेसातीचा प्रभाव दिसणार नाही. पण शनि उपासना सुरु करा.

कुंभ रास : गेली अडीच वर्षे शनि तुमच्या दशमात होता. नोकरीत तुम्हाला त्रास होता तो संपला आहे. घरचे वातावरण कधी मिश्र राहील. मंगळ आणि शुक्र तुमच्या कुटुंबस्थानातुन जाताना काही तिखट जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ न फ़र्माईश करता तुम्हाला मिळतील. भेळ हा तुमचा फ़ेवरेट पदार्थ येताना सोबत कच्चा कैरीची चव घेऊन येईल.

तुमच्या संपत्तीकडे लक्ष द्या. शेअर बाजारात वातावरण टोकाचे येईल. आपले सौदे तपासुन घ्या. फ़ायदा होणार आहे पण उगाचच रिस्क नको.  १ मार्च ला मंगळ मेषेत येईल आणि आपले बहीण- भाऊ आपल्याला साथ द्यायला पुढे येतील. सर्वांच्या संमतीने काही करायचे असल्यास उत्तम काळ आहे.

मीन रास : समुद्राच्या पोटात काही घडले म्हणजे किनार्यावर लाटा धडकणारच. या महिन्यात मीन राशीतुन होणारे शुक्राचे भ्रमण आणि मंगळाचे भ्रमण तुम्हाला स्फ़ुर्ती देणार आहे. तुमची निराशा संपवून आशा निर्माण होईल असा काळ आहे. सगळे काही चांगले घडेल असे नाही. पण काही न घडण्यापेक्षा काही तरी घडणे हे सुध्दा महत्वाचे.

बाराव्या स्थानी महिनाभर रवि असणार आहे आणि केतू तर तिथे आहेच. वहान चालवत असाल तर लायसन्स आणि इतर कागदपत्रे तपासा म्हणजे खोळंबा होणार नाही. पोलीस चौकीत येन केन प्रकाराने जावे लागणार नाही याची काळजी घ्या. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढु नये तसे पोलीसांकडे जावे लागु नये यासाठी तत्पर असावे.

 शुभंभवतु

या महिन्यात अजुन एक लेख लिहला आहे. विवाह योग आणि अपेक्षा. त्याची ही लिंक http://gmjyotish.blogspot.in/2017/02/blog-post.html  आपली मते या लेखाच्या खाली जरुर लिहा.

No comments:

Post a Comment