Friday, November 29, 2019

बहिणीची माया - जन्मठेप झालेल्या कैद्याची शिक्षा कमी/माफ़ होईल का ? केस स्टडी

४ नोव्हेंबरच्या आसपास एका बहिणीने सेशन कोर्टात बायकोचा खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप झालेल्या भावाची हायकोर्ट मधे सुटका होईल का असा प्रश्न विचारला होता. भारतात जन्मठेप म्हणजे १४ वर्षे किंवा २० वर्षे किंवा किती वर्षे असा स्पष्ट उल्लेख नसल्यास मरेपर्यंत शिक्षा असा अर्थ मी जाणून घेतला. २०११ मधे हा गुन्हा घडला होता. १ एप्रिल २०१७ ला भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.

हाय कोर्ट मधे या शिक्षेविरुध्द अपील करण्यात आले होते आणि तो आता शिक्षा संपवुन बाहेर यावा अशी बहिणीची आशा होती. सुनावणी संपुन १५ नोव्हेंबर २०१९ ला या खटल्याचा निकाल लागणे अपेक्षीत होते. बहिणीने काही ज्योतिषांशी संपर्क करुन जन्मकुंडली दाखवली होती. या दोन चार ज्योतिषांनी तिला ४ नोव्हेंबर २०१९ ला झालेल्या गुरु बदलामुळे भाऊ तुरुंगातून उर्वरीत शिक्षा माफ़ होऊन बाहेर येईल असे सांगीतले होते.

बहुदा बहिणीचे मनात शंका होती म्हणून तीने माझ्याशी संपर्क करुन मला रितसर फ़ी पाठवून विचारले.

या व्यक्तीचे किंवा त्याच्या बहिणीचे नाव मुद्दाम मी लिहीत नाही. बहिण जिथे रहाते तिथे आजूबाजूच्या लोकांना हा विषय माहित नसेल तर उगाचच हा लेख कुठून तरी तिच्या पर्यंत पोचायचा आणि याची जाहीर चर्चा झाली यामुळे आणखीनच दु:ख व्हायचे.

बहिणीने भावाचे जन्मकुंडलीचे विवरण पाठवले होते ते या प्रमाणे जन्मतारीख ०३ ऑगस्ट १९८२, जन्मवेळ ००.४५ मध्यरात्री, जन्मस्थान उत्तर गोवा.




{ माझ्या सॉफ़्टवेअर प्रमाणे रुद्र म्हणजे प्लुटॊ, इंद्र म्हणजे हर्षल आणि वरुण म्हणजे नेपच्युन }

मी ही जन्मकुंडली मांडली. मी सहसा असे प्रश्न प्रश्नकुंडली किंवा कृष्णमुर्ती पध्दतीची प्रश्नकुंडली मांडून सोडवत नाही. शेवटी या गुन्हेगार व्यक्तीचे प्रारब्ध जन्मकुंडलीत जास्त स्पष्ट होते हा माझा विश्वास आहे. फ़र्लो रजा मिळेल का हा प्रश्न कदाचीत प्रश्नकुंडलीत पहाणे योग्य ठरला असता. फ़र्लो रजा ही सजा असताना काही दिवसांची सुट्टी असते. कैदी अशी रजा मिळवून आपल्या घरी जाऊ शकतो. इथे फ़र्लो रजा हा विषय नव्हता तर वरच्या कोर्टात सजा कमी होईल किंवा सजा माफ़ होऊन तो बाहेर येईल का असा प्रश्न होता.

जन्मकुंडली पहाताना ही जन्मकुंडली सर्वप्रथम बरोबर आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक असते. या प्रमाणे पाहताना सर्वप्रथम मी लग्नेश तपासला. लग्नेश मंगळासारखा क्रुर ग्रह मला प्लुटो या ग्रहाच्या युतीत सप्तम स्थानी मिळाला. मंगळ आणि प्लुटो युती ही या व्यक्तीचे अपघात दर्शक आहे. रागाच्या भरात पत्नीचा खुन करणे हा अपघातच आहे. अन्यथा गुन्हेगारीची पार्श्वभुमी नसलेला हा माणूस खुन करण्यापर्यंत अपघाताने जाऊ शकतो. शुक्र आणि राहू हे पत्नीसोबत विसंवाद दर्शवितात. मागील जन्मी या दोघांमधे वैमनस्य असणे हे ते कारण असावे.  तात्कालीक कारण काय झाले माहित नाही पण जेंव्हा याने आपल्या पत्नीचा खुन केला तेंव्हा राहू महादशा सुरु झालेली होती.

जन्मकुंडली मधील चंद्र केतू युती आणि चंद्र शनि केंद्र योग याची मानसीक अवस्था नीट रहात नाही असे दर्शवितात.

ज्या दोन चार ज्योतिषांनी भाग्येश भाग्यात जातो म्हणून सुटका होईल असे भविष्य वर्तवले त्यांच्या नजरेतून जन्मकुंडलीत भाग्येश हा राहूच्या नक्षत्रात आहे हे निसटले असावे. शिवाय राहू हा बुधाच्या राशीत आहे आणि बुध हा आश्लेषा या क्रुर व गंडांत नक्षत्रात असल्यामुळे राहूची दशा या व्यक्तीला चांगली नाही हे मी जाणले.

( राहू ज्या ग्रहाच्या राशीत असतो तो ग्रह जर बलवान असेल तर राहूची महादशा सुध्दा चांगली जाते असा सर्वसाधारण नियम माझ्या पाहण्यात होता.)

मी बहिणीला ८०% ग्रहस्थितीच्या आधारे आणि २० % इंट्युशनने  सजा कमी होईल पण उर्वरीत सजा माफ़ होऊन तो लगेचच सुटणार नाही होणार नाही असे भविष्य सांगीतले. तो पर्यंत अनेकांनी तो सुटेल हे भविष्य वर्तन केलेले आहे मला माहित नव्हते. बहिण माझे प्रेडीक्शन ऐकून पुन्हा जन्मकुंडली पहाण्याचा आग्रह करु लागली. मी म्हणालो माझे भविष्य चुकले असे झाले तर आनंद आहे पण हे भविष्य चुकणार नाही.

निकाल माझ्या कडे यायच्या आधीच मी ही केस माझ्याकडे फ़लीत तंत्र शिकायला येणार्या ज्योतिषशास्त्री पास झालेल्या विद्यार्थ्यांना दिली. त्यांनाही माझ्या भविष्य कथनाचे आश्चर्य वाटून त्यांनी चर्चा केली. अनेकदा राहू महादशा ही खुप विचीत्र फ़ळ देते हे विसरुन गोचर ग्रहांच्या आधारे फ़लीत केले तर भविष्य चुकते. मुळ कुंडलीचा दर्जा काय आहे. राहू कोणती फ़ळे देत आहे आणि पुढे देणार आहे याकडे दुर्लक्ष होते.

पुढे या बहिणीचा फ़ोन आला. रडत रडत सजा कमी झाली नाही हा निकाल तिने मला सांगीतला. तिच्या दु:खात सहभागी व्हावे की खुनी व्यक्तीला शासन हे होणारच हे म्हणावे मला समजत नव्हते. पुढे सुप्रिम कोर्टात जावे की माझा भाऊ जेलमधेच मरणार असा प्रश्न तिने मला विचारला. मी तिची भावना पाहून केससाठी लागणारे पैसे जर कर्जाऊ आणायचे नसतील तर सुप्रिम कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. गुरु व्ययेश सुध्दा आहे. यामुळे पुढे येणारी गुरुची दशा सुध्दा फ़ारशी सुखावह नाही असे असताना मी हा सल्ला दिला. कारण प्रयत्न करणे हा माणसाचा स्वभाव आहे. आपण प्रयत्न केला नाही ही बोच बहिणीच्या मनात राहू नये यासाठी.

No comments:

Post a Comment